Sunday, October 16, 2022

बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

 बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

-श्री. कुमार मंडपे

     काही बाबा हवेत हात फिरवून सोन्याची साखळी काढतात, हिन्याची अंगठी काढतात, तर काही इलेक्ट्रॉनिक्सची घड्याळे, मूर्ती काढून आपल्या भक्तांना त्यांच्या लायकी प्रमाणे अर्पण करतात. इतक्या प्रचंड प्रमाणात सोने, हिरे निर्माण करणारे असंख्य बाबा, महाराज, स्वामी, भगवान, आपल्या देशात असतानाही आमच्या अर्थमंत्र्यांना हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीसाठी देशोदेशी फिरावे लागते आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणताही बाबा देशाच्या मदतीसाठी धावून आला नाही. कोणत्याही बाबाने सोन्याचा डोंगर निर्माण केला नाही, की एखाद्या नदीत किंवा समुद्रात हात घालून पाण्याचे पेट्रोल तयार केले नाही. हातचलाखीने हवेतून विभूती, रुद्राक्ष काढून देऊन चमत्काराचा दबदबा निर्माण करता येतो. लोकांना नादी लावून प्रचंड पैसा कमविता येतो. म्हणून या बाबांना देशाचे दारिद्रय नाहीसे करता येत नाही.

     एखाद्या बाबाने कोरड्या विहिरीला पाणी लावून दिल्याचे सांगितले जाते. नदीतून जाताना नदी दुभंगते व बाबांना पैलतीरी जाण्यासाठी वाट दिली जाते. इतकी प्रचंड दैवी शक्ती त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. पण अशा बाबांना दरवर्षी होणारा महापूरांचा प्रलय थांबविता आला नाही किंवा सतत दुष्काळग्रस्त असलेल्या भागात पाऊस पाडता आला नाही.

     काही बाबा, महाराज, करणी करण्यात, मूठ मारण्यात तरबेज असल्याचे सांगितले जाते, घराघरातून, गावागावातून असे प्रकार केल्याचे भासवून घरातील शांतता नाहीशी केली आहे. आणि गावागावातून भांडणे निर्माण केली आहेत. अशा बुवांनी मूठ मारून पाकिस्तानी आक्रमकांना जमीनदोस्त केल्याचे ऐकण्यात नाही. काश्मिर, पंजाबात होणारे निरपराध लोकांचे शिरकाण थांबविता आले नाही. अहो कसे थांबविता येणार! कारण तशी अतिंद्रिय शक्ती कोणाकडेही नसते.

     बुवा हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य असतात. त्यांच्या अंगावर असणारी कफनी सुद्धा त्यांना शून्यातून निर्माण करता येत नाही. एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. कायिक रासायनिक बदल घडून यावे लागतात. तेव्हा एखादा पदार्थ तयार होतो. नुसता हवेत हात फिरविला आणि वस्तू तयार केली असे घडत नाही. ही शुद्ध बनवाबनवी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

     कोणत्याही बुवा महाराजांनी, समाजासाठी काहीही केले नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधून समाजाचे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केले आहे. सामाजिक विषमतेच्या विषवल्लीला खतपाणी घालून पोसले आहे. मठ, आश्रम बांधून अनैतिक कार्ये मोठ्या प्रमाणात केली आहेत. समाजात दैववादाच्या जंतूंचा प्रसार केला आहे. आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

     थोडक्यात आपल्या जवळ जे नाही ते आहे असे भासविणारा, तो बुवा अध्यात्मिक वा पारलौकिक क्षेत्राशी स्वतःला जोडून दैनंदिन जीवनात दिशाभूल वा शोषण करणारा तो बुवा आणि श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार म्हणजे बुवाबाजी होय.

     मग लोक बुवाकडे का जातात? हा प्रश्न निर्माण होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रश्न निर्माण होतात. हुंड्याच्या बाजारामुळे मुलीचे लग्न ठरण्यात अडचणी येतात. इच्छा असूनही घरात अपत्य खेळत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. नवरा नांदवत नाही. नवऱ्याची दारू सुटत नाही. घरातील व्यक्तीला असाध्य रोग झाला आहे. अशा नानाविध अडचणींमुळे व्यक्ती अगतिक बनते, आणि बुवाला शरण जाते. भारतीय संस्कृतीत अवतार कल्पना प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परमेश्वराचा अवतार असलेला बुवा आपणास मार्गदर्शन करेल. संकटात मदत करेल अशा वेड्या आशेने लोक बुवाकडे जातात आणि कायमचे जायबंदी होतात.

बाबांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. इंग्लिश, हिंदीवर प्रभुत्व असते. त्यांच्याकडे संभाषणचातुर्य असते. याउलट काही बाबा ठार पागल असतात. स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव

नसते. त्यांच्या भोवती असणारे धूर्त भक्त या स्थितीचा हुशारीने उपयोग करून घेतात. बाबांच्या चमत्कारांच्या पद्धतशीर कंड्या पिकवितात. प्रसारमाध्यमांचा पद्धतशीर उपयोग करून घेतात. बाबांच्यासाठी मठ, समाध्या, देवळे बांधतात. बाबांचे महत्व वाढवून अर्थार्जन करतात. 

     बुवाबाजीची तंत्रे ठरलेली असतात. बाबांच्या सामर्थ्याचा कणखर पाया म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत होय. जरी बाबांचे भाकित चुकले तरी या सिद्धांताची मदत बाबांना घेता येते. गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणजे हा जन्म होय व म्हणून या जन्मात कितीही चांगले वागले तरी गेल्या जन्मीचे फळ या जन्मात भोगून संपवावे लागते व या जन्मातील कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो. म्हणजे बाबांचे भाकित चुकले नसून पूर्व जन्मीचा भोग आहे असे भक्ताला पटविता येते. याला म्हणतात कर्मविपाकाचा सिद्धांत.

    बाबांच्या तंत्राचा दुसरा मुद्दा म्हणजे संभवतेच्या नियमाचा (law of probability) आधार होय. बाबा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात ते सर्व प्रश्न द्विपर्यायी असतात. उदा. मी परीक्षेत पास होईन का? मला मुलगा होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे होय, नाही स्वरूपाची असतात. त्यामुळे कोणतेही भाकित केले तरी ५० ते ६० टक्के भाकित बरोबर येतेच. मुलगा झाला तर हत्तीवरून साखर वाटत बैंड लावून मठात यायला सांगितले जाते. त्यामुळे बाबांची प्रसिद्धी मोठ्याप्रमाणात होते आणि मुलगी झाली तर? गेल्या जन्मीचे पाप म्हणून व्यक्ती घरी स्वस्थ बसून राहते. माणसाचा स्वभावच आहे की, एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर गावभर सांगत सुटायचे आण अपयश आले तर तेरी भी चूप और मेरी भी चूप.

    बाबांच्या तंत्राचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, अफवा पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न होय. उदाहरणार्थ बाबांची थुंकी अंगाला चोळली असता महारोगी बरा होतो. बाबांच्या स्पर्शाने आंधळा बघू लागतो. पांगळा चालू लागतो, मुका बोलतो. पुरावा विचाराल तर हजार मैलावरील गाव सांगितले जाते. इतक्या दूरवरची चौकशी सामान्य माणसांना अशक्य असते.

     अशा बुवाबाजीला जर सुरूंग लावायचा असेल तर प्रत्येक गोष्ट पदर पसरून स्वीकारण्याचे सोडून दिल पाहिजे. उलट चमत्काराची चिकित्सा केली पाहिजे. सकस शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दाराशी नेली पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून मिळाले पाहिजे. प्रत्येक भारतीय मन शोधक व पुरुषार्थी बनविले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रबोधन करून माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे.


=================================

Monday, April 25, 2022

यात आश्चर्य ते काय?

 यात आश्चर्य ते काय?......य.ना.वालावलकर

धर्म आणि समाजजीवन या संबंधीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्यू(Pew) नावाचे एक चर्चामंडळ (फ़ोरम) अमेरिकेत आहे. या मंडळाने अमेरिकन नागरिकांच्या धर्मज्ञानासंबंधी एक सर्वेक्षण केले.

त्यांनी मुख्यत्वेकरून ख्रिश्चन धर्म आणि बायबल यांवर आधारित 32 प्रश्न काढले. ती प्रश्नावली 3400(तीन हजार चारशे) अमेरिकन नागरिकांना पाठविली. या प्रश्नावलीत अन्य प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ यांवरही काही प्रश्न होते.  शेवटी " मी धार्मिक/अज्ञेयवादी/निरीश्वरवादी आहे."  यांतील एक पर्याय उत्तरदात्याने निवडायचा होता.

आलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून नि:संदिग्धपणे असे आढळले की : " ईश्वरवादी व्यक्तींच्या धर्मज्ञानापेक्षा निरीश्वरवाद्यांचे धर्म आणि धर्मग्रंथ यांसंबंधीचे ज्ञान लक्षणीय प्रमाणात अधिक असते."

"हा निष्कर्ष धक्कादायक आहे. विस्मयकारक आहे."अशी प्रतिक्रिया कांही अभ्यासकांनी व्यक्त केली.

.....खरे तर या निष्कर्षात आश्चर्यकारक ते काय? कारण:

1. धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

2. धर्मातील अनेक तत्त्वांच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो. त्यांवर श्रद्धा ठेवण्याविना अन्य पर्याय नसतो. म्हणून धार्मिकांना श्रद्धाळू असावेच लागते. श्रद्धा ठेवली की चिकित्सक बुद्धी कुंठित होते.

3. बहुसंख्य धार्मिक व्यक्ती विचारवंत नसतात तर बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.

4. जागतिक लोकसंख्येत धार्मिकांचे प्रमाण 80% + आहे; तर नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण 93% आहे.

5.वरील सत्यविधान 4 वरून दिसते की नास्तिकांचा बुद्ध्यंक(IQ) हा धार्मिकांच्या बुद्ध्यंकाहून मोठा असतो. (हे विधान वर्गाविषयी आहे. एखाद्या व्यक्तिविषयी नाही.)

6.बहुसंख्य धार्मिकलोक रूढी, परंपरा, कर्मकांडे, सरमनात/ कथाकीर्तनात ऐकलेली मिथके/भाकडकथा, येशूने/देवाने , संतांनी केलेले तथाकथित चमत्कार इत्यादि गोष्टींनाच धर्म मानतात. अधिक विचार करत नाहीत. धर्मग्रंथ/तत्त्वज्ञान वाचत नाहीत. वाचले तर अर्थ समजून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे धर्मज्ञान यथातथाच असते.

7.एका विचारवंताने म्हटले आहे:"पूर्वी आस्तिक होतो. पण नंतर मी धर्मग्रंठ अभ्यासले." हे पटण्यासारखे आहे. नास्तिकतेच्या प्रसारासाठी धर्मग्रंथ हे प्रभावी साधन ठरू शकते. हे ग्रंथ विचारपूर्वक अर्थ समजून वाचणार्‍या धार्मिकाचे परिवर्तन नास्तिकात होऊ शकते. त्यामुळे अनेक नास्तिकांना चांगल्यापैकी धर्मज्ञान असते. (हिंदूंच्या बहुतेक धार्मिकविधींचे मंत्र संस्कृत भाषेत असतात. तेव्हा अर्थ कळण्याचा प्रश्नच नसतो.)

वरील विवेचन लक्षात घेतले तर प्यू फोरमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक वाटू नये.

**********************************

Sunday, April 29, 2018

मूर्तीत ताकद असते?

अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:
......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया, सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्याचे डोळे फिरले. "ही सारी दौलत आम्ही लुटणार " असे त्याने तिथेच जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले, "हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील."
......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले. गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली. सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली. तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही. पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा! धन्य धन्य ते परम भक्त ! त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.
.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो? सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही. ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही. त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते. म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे. असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो. डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते.! यावरून निर्जीव देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ (अंध)श्रद्धा !
- यनावाला

Sunday, January 28, 2018

डॉ. दाभोलकर यांची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके online खरेदीसाठी उपलब्ध. खालील लिंकवरून आपण ती खरेदी करू शकता.
१) श्रद्धा अंधश्रद्धा
Amazon- http://amzn.to/2jKY6qw
२) विचार तर कराल?
Amazon- http://amzn.to/2A0lAvZ
३) मती भानामती
Amazon- http://amzn.to/2jIzsqv
४) भ्रम आणि निरास
Amazon- http://amzn.to/2DE3ULL
५) तिमिरातून तेजाकडे
Amazon- http://amzn.to/2E98jDj
६) अंधश्रद्धा विनाशाय
Amazon- http://amzn.to/2DMdziF
७) प्रश्न मनाचे
Amazon- http://amzn.to/2DNbnar
८) अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
Amazon- http://amzn.to/2naxTQi
९) अंधविश्वास उन्मूलन (भाग पहला): विचार
Amazon- http://amzn.to/2jbYXg4
१०) अंधविश्वास उन्मूलन (भाग दुसरा): आचार
Amazon- http://amzn.to/2BviEq8
११) अंधविश्वास उन्मूलन (भाग तिसरा): सिद्धांत
Amazon- http://amzn.to/2EauCZe
१२) लढे अंधश्रद्धेचे
Flipkart- https://amzn.to/3kNbQgS
१३) ठरलं डोळस व्हायचंच
Amazon- http://amzn.to/2DHXuLt
१४) ऐसे कैसे झाले भोंदू
Amazon- http://amzn.to/2DAVlNM

Wednesday, April 19, 2017

थोडक्यात महत्वाचे

*अंधश्रद्धा निर्मूलन*

(1) स्त्री-पुरुष/मुलगा-मुलगी दोघेही शक्ती बुध्दीच्या बाबतीत सारखेच असतात.
(2) मंत्र, तंत्र,नवस, बळी, प्रसाद यामुळे मुल होणे, मुलीचा मुलगा होणे या गोष्टी कधीही शक्य नाहीत
(3) "अंगात येणे" हे देवीमुळे शक्य होत नाही, तो मानसिक आजार, संमोहनाची एक अवस्था किंवा ढोंग  आहे.
(4) कोणाकडेही दैवी शक्ती नसते.
(5) कोणताही चमत्कार, भौतिक अथवा रासायनिक विज्ञानांमधल्या तत्वावर आधारलेला असतो किंवा हातचलाखीने केलेला असतो.
(6) कोणालाही कोणतीही गोष्ट हवेतून काढता येत नाही.
(7) चमत्कार करुन कोणाचीही फसवणूक करणे हा गुन्हा आहे.
(8) मंत्र, तंत्र, ताईत, अंगारा, गंडे, दोरे, उतारा यांनी कोणताही आजार बरा होत नाही.
(9) आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवावर कोणताही परिणाम होत नाही.
(10) आपले भविष्य आपल्या मनगटात असते, आपण आपले भविष्य बनवू शकतो.
(11)  ज्योतिष हे विज्ञानासारखे शास्त्र नाही.
(12) भानामतीमुळे घरातील वस्तू धडपडतात, डबे फळीवरुन खाली पडतात, वस्तू घराबाहेर फेकल्या जातात, कपडे फाटतात, कपडे पेटतात, पिठात राख मिसळते, अन्नात वाळू पडते, अंगावर बिब्बाच्या फुल्या उमटतात.  घरावर लिंबू, दगड पडतात.  भानामतीमुळे अशा काही गोष्टी घडतात असे लोक समजतात परंतु ते खरे नाही.
(13) या जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.
(14) भानामती घरातील मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती घडवत असते.
(15) बाह्य प्रेरणेशिवाय जागची वस्तू हलत नाही.
(16) करणी, मुठ, भानामती या गोष्टी खोट्या आहेत.
(17) निसर्गात घडणारी कोणतीही घटना शुभ किंवा अशुभ नसते.
(18) "नवस करुन हवे ते मिळविता येते" हा गैरसमज आहे.
(19) नवस फेडण्याच्या प्रयत्नात माणसाचे आर्थिक, शारीरिक नुकसान होते.
(20) स्वत:च्या प्रयत्नाने आपण आपली प्रगती करु शकतो.  आपले भविष्य आपल्या हातात म्हणजे प्रयत्नात असते.
(21) माणूस मेल्यानंतर त्याची राख होते किंवा माती होते, भूत होत नाही.
(22) भूत ही एक कल्पना आहे. ते सत्य नाही.
(23) निर्भय होऊन, धीट होऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे.
(24) साप, नाग आपली दैवते नाहीत, पण मित्र आहेत.
(25) आपल्याकडे आढळणारे बरेच साप बिनविषारी असतात, फक्त नाग, मण्यार, घोणस, फुरसे या जातीचे साप विषारी असतात.
(26) विषारी साप चावल्यास दाताच्या दोन खुणा उमटतात.
(27) विषारी साप चावल्यास त्या व्यक्तीला प्रतिविषाचे इंजेक्शन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात न्यावे, इतर कोणत्याही उपायाने  विष उतरत नाही.

Monday, April 17, 2017

एक गोष्ट

थोडं थांबून शांत मनाने वाचावी
अशी एक गोष्ट !!
******
ब्राझील देशातील थेन चिकीनो स्कार्पा नावाच्या एका गर्भ श्रीमंत माणसाने एक गोष्ट घोषित केली की, त्याच्या कडे असलेली करोडो डाॅलर किमतीची बेंटली कार तो दफन करणार..!!
मृत्युनंतरच्या जिवनात ही ऐशोरामात या कार मधून फिरण्याची त्याची मनिषा पारलौकीक जगातही पूर्ण होत रहावी , हा त्याचा उद्देश असल्या चेही त्याने जाहिर केले.

अर्थातच माध्यमांनी त्याच्या या विचित्र घोषणेला प्रचंड प्रसिद्धी दिली. देशभर चर्चा सुरू झाली. या चर्चेचा सूर नकारात्मक होता. थेन चिकीनो वर प्रचंड टिका करण्यात आली. एवढी किमती कार पुरून टाकणे हा मुर्खपणा असल्याचे लोकांनी म्हटले आपणास ही कार विकायची नव्हती तर  दान करून टाकली असती तर पुण्य तरी मिळाले असते असा सल्ला ब्राझिलीयन मेडिया ने दिला...
😃

हे कृत्य म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा विनाश असल्याचेही अनेकांनी म्हटले.. तेथील काही राष्ट्रभक्तांनी त्याला देशद्रोही ही संबोधले.

अखेर सर्व प्रकारच्या टिकेला सामोरे जात थेन चिकीनो ने त्याच्या स्टेनली कारच्या दफन विधी समारंभाची तारीख ही जाहिर करून टाकली.
 
झाले...अखेर तो दिवस उजाडला.
प्रचंड गर्दी जमली.
विविध माध्यमांचे अनेक प्रतिनिधी लाईव कवरेज साठी हजर होते..
🏎  🚗  🚕 🚙

येथे कहाणीला ट्विस्ट आहे .
आणि तसा तो नसता तर
हा किस्सा आपणासाठी मी लिहीला ही नसता...
आणि जगभरच्या माध्यमांनी त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ही दिली नसती...

थेन चिकीनोने घराच्या अंगणातच कार पुरता येईल एवढा मोठा खड्डा खणून घेतला होता... थोड्याच वेळात ही महागडी कार पुरली जाणार होती.
तेवढ्यात थेन चिकीनो ने, तो ही कार दफन करू इच्छित नाही अशी घोषणा केली.. आणि हा दफन विधीचा ड्रामा एका अत्यंत आवश्यक अशा राष्ट्रीय कार्या साठी असल्याचे सांगितले.
ह्या गुपित राष्ट्रीय कार्याची उकल त्याने केली तेव्हा उपस्थितां नी टाळ्यांचा कडकडाट केला व थेन च्या जय जय काराच्या घोषणा दिल्या.
***
अवयव दानाचे महत्व माझ्या देशातील जनतेला कळावे हाच एकमेव पवित्र उद्देश ह्या दफन नाट्या मागे असल्याचे थेन ने सांगितले.

थेन चिकानो म्हणाला,
"लोकांनी मी महागडी / किमती कार दफन करणार म्हणून मला मुर्ख म्हटले. खरी गोष्ट तर ही आहे की ह्या कारपेक्षा ही खूप किमती असलेले अवयव आपण पुरून टाकता. हृदय, यकृत, फुफ्फुसे डोळे, मूत्रपिंडे आदी अवयव पुरून टाकणे हा मी करत असलेल्या मुर्खपणा पेक्षा खूप मोठा मुर्खपणा कळत नकळत आपण सारेच जण पिढ्यान पिढ्या करत आहात..!! आपल्या देशात हजारो लाखो रूग्ण अवयवांची वाट पहात आहेत. कोणी त्यांना दान दिले तर त्यांना नवा जन्म मिळणार आहे..!!
अनेकांचे प्राण यातून वाचू शकतील..!!
आज आपण ही अवयव दानाचा संकल्प करूया.

 ..अवयव दानाचा प्रचार व प्रसार करावा व ..ब्रेन डेड परिस्थितीत जरूर निर्णय घेऊन गरजवंतांना अवयव दान करुन मदत करावी .

Friday, April 7, 2017

मुहूर्त

बाळाला *काळे*
टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात *बालमृत्यूदर शून्य*
असता .

 गाडीला *लिंबूमिरची*
लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात *अपघातांची*
संख्या शून्य असती.

 पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच
*उद्योजक*
 झाले असते.

बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त *सुखी*
 दिसले असते.

कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरिजिस *यशस्वी*
झाली असती.

*यज्ञ*करून  जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता

*चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल.*

      मुहूर्ताचे वेड

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!

जन्माला येताना कधी मुहर्थ पाहत नाही. व मरतानाही पाहत नाहीत.

 तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

 सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे.

फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..

आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...?

पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?

95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?

 
 मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....?

 एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????

 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?

 अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....

तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :

  शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

 मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.

*स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

*जर तुमचं मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता  असेल... तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' चांगली वेळच असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.*