Friday, November 14, 2014

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते.कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले.प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे.बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने विचारले. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनालाआलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांनानमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण मी नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते.देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकीसगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून )देवस्थानला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. मी देणगी दिली नव्हती. तरी माझ्यासाठीसुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मीनाकारलेला प्रसादाचा लाडू आणि देणगीचे पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही.तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील.एकदम धक्का बसल्यासारखे होऊन बसचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. वाहक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना.प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय?सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा मी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. वंगध्वज राजा, साधुवाणी, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ?एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक बाई बोलल्या.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही.बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झालेच असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही."कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तर अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते.पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता."माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा होती. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना. तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून,देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. तो काही कुणाचे बरे -वाईट करू शकत नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मधाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो.कुठे कसली तक्रार नाही.गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कधीही इतरांचा खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलले.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? विचार करावा. बस बंद पडली त्याच्याशी बसमध्ये कोण कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, त्यांची वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक,दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "

थोडावेळ शांतता पसरली. इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काहीतरी, थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. माणसाने आशावादी असावे.
-प्रा.य.ना.वालावलकर

Wednesday, October 29, 2014

पोप यांचा साक्षात्कार

देवाच्या हातात काही जादूची छडी नाही, हे पोप फ्रान्सिस यांचे उद्गार क्रांतिकारी असेच म्हणावे लागतील. कारण धर्म कोणताही असो, त्यात देव म्हणजे जणू कोणी जादूगार आहे याच दृष्टिकोनातून पाहिले जात असते. आकाशात कोठे तरी तो बसलेला असतो आणि तेथून सर्व विश्वाची सूत्रे हलवीत असतो, अशी ती कल्पना. प्रार्थना करून, नवस वगैरे बोलून त्याला प्रसन्न करून घेणे हे त्याच कल्पनेचे व्यावहरिक रूप. त्याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा. अर्थ एकच. त्या अर्थाला कोणा नास्तिकाने आव्हान दिले तर त्यात विशेष काहीही नाही. त्याने धार्मिकांच्या एकूण जीवनव्यवहारावर तसूभरही परिणाम होत नाही. कॅथलिक ख्रिश्चनांच्या मुख्य धर्मगुरूने, पोप फ्रान्सिस यांनीच देवाच्या या लोकप्रिय भूमिकेतील हवा काढून घेणे ही मात्र निश्चितच एक मोठी घटना आहे. आज सर्वच धर्म किरटय़ा एकारलेपणाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर तर पोप यांची अशी भूमिका फारच महत्त्वाची ठरते. पाँटिफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे केलेल्या भाषणात पोप यांनी हे वक्तव्य केले. पण एवढय़ावरच ते थांबले नाहीत. विश्वाच्या उत्पत्तीचा महाविस्फोट सिद्धान्त तसेच डार्विनप्रणीत उत्क्रांतिवाद यांतही तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले. ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. केवळ ख्रिश्चन धर्मातीलच नव्हे, तर सर्वच धर्मातील विश्वोत्पत्तीच्या मूलभूत सिद्धान्तांना किंचित का होईना, पण छेद देणारी अशी ही गोष्ट पोप सांगत आहेत म्हटल्यानंतर त्याचे महत्त्व ध्यानी यावे.
सर्वच मानव समाजांसमोर आणि म्हणून सर्वच धर्मासमोर 'हे सारे कोठून येते' हा एक महत्त्वाचा सवाल राहिलेला आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक धार्मिक तत्त्वज्ञानाचा. दुसरा विज्ञानाचा. धर्मानुसार हे जग, पंचमहाभूते, अवघी सजीव-निर्जीव सृष्टी यांच्या निर्मितीचे श्रेय हे परमेश्वराचे. शिवाय पुन्हा तोच जगन्नियंता. या विश्वाचे यंत्र चालविणारा. विज्ञानाला अर्थातच हे मान्य असण्याचे कारण नाही. विज्ञानानुसार एका महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली. अशी असंख्य विश्वे अवकाशाच्या पोकळीत आहेत. ती सतत प्रसरण पावत आहेत. आता ही अवकाशाची पोकळी कोठून आली. पुन्हा ती आहे तर कशात आहे असे अनेक प्रश्न आहेत. विज्ञान सांगते- माहीत नाही. तीच गोष्ट सजीव सृष्टीची. कोणी केले या सृष्टीचे सर्जन? विज्ञान सांगते, धर्माने त्याला आकाशातला बाप वा खुदा वा ब्रह्मा असे काहीही म्हणू दे; सृष्टीचे असे जनकत्व कोणाकडे नसते. कारण मुळात पृथ्वीवर आधी काहीही नव्हते आणि एका रात्रीत येथे सारे आले असे झालेले नाही. जे काही घडले ते जैवरासायनिक प्रक्रियेतून आणि पुढे उत्क्रांतीतून. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. नव्या जीवजाती जन्माला येतात. काही नामशेष होतात. जुन्या जीवांच्या गुणसूत्रांत वगैरे बदल होऊन नव्या जाती निर्माण होतात. यात ईश्वरनामक संकल्पनेचा संबंधच काय, असा विज्ञानाचा सवाल आहे. या अर्थाने महास्फोटाचा सिद्धान्त असो वा उत्क्रांतिवाद या गोष्टी ईश्वरवादाच्या मूळ प्रमेयांनाच चूड लावतात. केवळ एवढेच करून त्या थांबत नाहीत, तर मानवाचे श्रेष्ठत्वच त्या नाकारतात. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. त्यामुळे त्याचे मत असे की आपण परमेश्वराचे लाडके. त्याने आपणास खेळण्यासाठी म्हणूनच हे जग दिले आहे. येथील प्रत्येक गोष्ट मानवाच्या सुखोपभोगासाठीच निर्माण झाली आहे. जगाच्या निर्मितीतच हा रचनावाद आहे. थोडक्यात सांगायचे तर देवाने माणसाला जे नाक दिले ते चष्मा ठेवण्यासाठी म्हणूनच, अशा शब्दांत फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर यांनी या रचनावादाची खिल्ली उडविली होती. पुढे उत्क्रांतिवादाने या रचनावादाच्या पायालाच सुरुंग लावला. माणसाचा जन्मच जर माकडापासून झाला असेल, तर त्याच्यासाठी देवाने हे जग बनविले या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. या सिद्धान्ताने रचनावाद तर ढासळून पडतोच, पण रचनाकारही कोसळतो. त्यामुळेच कोणत्याही धर्मश्रद्धाळूला हे मान्य असणे शक्यच नव्हते. हे सिद्धान्त मांडणारी सारी मंडळी युरोप-अमेरिकेतली पण प्रबोधनकाळानंतरची म्हणून ती बचावली. नाही तर त्यांना या पाखंडाबद्दल सुळावरच चढावे लागले असते. अर्थात या वैज्ञानिकांना जाळणे-मारणे यांसारखे धर्मदंड देण्यात आले नसले, तरी त्यांच्या विज्ञानविचारांना मात्र सातत्याने क्रुसेड वा जिहादचा सामना करावा लागला आहे. या तथाकथित धर्मयुद्धातील एक हत्यार असते छद्मविज्ञान. छद्मविज्ञान म्हणजे काटय़ाने काटा काढण्याचा धार्मिकप्रिय प्रकार. विज्ञानातील काही तत्त्वे, काही विचार घ्यायचे आणि ती धार्मिक बाबींमध्ये अशी काही घोळायची की वाटावे हा अभिनव शास्त्रविचारच. अमेरिकेत लोकप्रिय असलेला इंटेलिजन्ट डिझाइन किंवा काही ख्रिस्ती पंथांना अत्यंत प्रिय असलेला क्रिएशनिझम हा त्यातलाच प्रकार. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ. अफगाणिस्तान, इराक या देशांवर हल्ले करावेत असा आदेश त्यांना खुद्द आकाशातल्या बाप्पानेच दिला असल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा ख्रिस्तित्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्याच्या कारकिर्दीत छद्मविज्ञानाला बहर यावा यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्याच काळात अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांतून इंटेलिजन्ट डिझाइन हे 'विज्ञान' शिकवावे अशी टूम निघाली होती. या 'इंटेलिजन्ट डिझाइन'कारांनुसार नैसर्गिक निवड वगैरे प्रकार मिथ्या आहे. विश्वातील अनेक गोष्टींमध्ये कोणा बुद्धिमान रचनाकाराचा हात दिसतो. हा रचनाकार म्हणजेच परमेश्वर. तर 'क्रिएशनिझम'नुसार हे जग, ही प्राणीसृष्टी हे सारे एका दैवी निर्मितीची अपत्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांनी महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद खरे असल्याचे सांगितल्याने ही छद्मविज्ञाने उताणी पडली आहेत. अर्थात येथे हेही लक्षात घ्यायला हवे की असा क्रांतिकारी विचार मांडणारे फ्रान्सिस हे काही पहिलेच पोप नाहीत. यापूर्वी पोप पायस बारावे यांनी महास्फोट सिद्धान्ताचे स्वागत केले होते. ते १९३९ ते ५८ या काळात पोपपदी होते. त्यानंतर १९९६ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी उत्क्रांतिवाद पुराव्याने शाबीत झाल्याचे सांगून खळबळ उडविली होती. पण हा असा किंचित विज्ञान पक्षपातही चर्चच्या गुणसूत्रांत नाही. त्याची प्रचीती २००५ मध्ये पोपपदी आलेले बेनेडिक्ट सतरावे यांनी आणून दिली. त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शब्दांची अशी काही जाळी विणून इंटेलिजन्ट डिझाइनचा सिद्धान्त उचलून धरला. परंतु पोप फ्रान्सिस यांनी आज त्याची भरपाई केली आहे. याचा अर्थ त्यांनी देव नाकारला आहे असे नाही. त्यांचे म्हणणे एवढेच की महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद देवकल्पनेशी विसंगत नाही. खरे तर चर्चला नव्याने झालेला हा साक्षात्कारही थोडका नाही.
धर्म हा मोठा चलाख परंतु गतिमंद विद्यार्थी असतो. चलाख यासाठी की तत्त्वज्ञानाच्या मायाजालात तो बडय़ा बडय़ा बुद्धीमंतांनाही मंद करून टाकतो आणि गतिमंद विद्यार्थी यासाठी की तो आधुनिक ज्ञान-विज्ञान अंगीकारतो परंतु त्यासाठी त्याला वेळ लागतो. पोप फ्रान्सिस यांनी विज्ञानाचे दोन महत्त्वाचे सिद्धान्त मान्य करून धर्माची आजवरची चलाखी उघड करून दाखविली आहेच, पण त्याच्या गतिमंदत्वाचेही प्रमाण दिले आहे. काहीही असो, त्यांना झालेला हा साक्षात्कार क्रांतिकारी ठरणारा आहे हे नक्की.
-३० ऑक्टोबर २०१४ च्या 'लोकसत्ता' मधील अग्रलेख

Saturday, July 19, 2014

हिंदी कविता



आप का जनम हिंदू घर में हुआ
तो आप हिंदू हित की बात करेंगे

आपका जनम मुस्लिम घर में हो गया
तो आप मुसलमानों के मुद्दों पर बोलेंगे


आप ऊंची जात वाले घर में पैदा हुए तो आप
दलितों के मुद्दों पर अविचलित रहेंगे

अगर आपका जनम दलित परिवार में हुआ तो आप
दलित समस्याओं पर बोलेंगे

आपका जनम किसी बड़े शहर में हुआ तो आप दंतेवाड़ा के आदिवासियों की ज़मीनें छीने जाने को विकास के लिए ज़रूरी बताएँगे

और अगर आपका जनम दंतेवाड़ा के आदिवासी के घर में हुआ तो आप नक्सलवादी कहलायेंगे .

किसी खास जगह पैदा होने की वजह से आप एक खास तरीके से सोचते हैं

आपका चिंतन स्थान सापेक्ष है
स्थान बदलते ही आपके विचार बदल जायेंगे

लेकिन सत्य तो स्थान बदलने से नहीं बदलता

सत्य हिंदू या मुसलमान ,सवर्ण या दलित के, घर में या भारत या पाकिस्तान में भी नहीं बदलता

अब देखिये आपके विचार अपने जनम के स्थान के कारण बने हैं या उन विचारों में हर स्थान में सही सिद्ध होने का गुण है .

कभी अपने ही मन में अपना स्थान बदल कर फिर सोचिये .

कल्पना में खुद को अपने विरोधी के स्थान पर रख कर सोचने की कोशिश कीजिये .

क्या आप हर जगह के सत्य को देख पा रहे हैं ?

क्या अब भी आपको लगता है आप सही थे ?

देखिये आपका कट्टर नजरिया अब हल्का होने लगा है .

यही मुक्ति है .

यही आपके जानवरपन से मनुष्त्व की यात्रा की शुरुआत है .

अब आप जीवन का आनंद लेने के लिए तैयार हैं .

कवी : हिमांशू कुमार

Tuesday, July 8, 2014

माझी विचारसरणी

विविध विषयांवर माझे विचार काय आहेत, माझी मते कोणती आहेत ते या लेखात मांडण्याचा प्रयत्‍न केला आहे. विविध विषय म्हटले तरी ते देव-धर्म-श्रद्धा-विवेकवाद यांच्याशी संबंधित आहेत. तसेच लेखातील विषय काही एका विशिष्ट क्रमाने मांडले आहेत असे नाही. जसे सुचेल तसे लिहिले आहे. मला जे मन:पूर्वक वाटते तेच लिहिले आहे.
(१) हे विश्व कशातून निर्माण झाले ? कसे उत्पन्न झाले ? कोणी केले ? प्रारंभी काय होते ? हे विश्व शून्यातून निर्माण झाले का ? याविेषयी मला निश्चित असे काही ठाऊक नाही. अजून मतमतांतरे आहेत असे दिसते.महाविस्फोट, बिगबॅंग, हिग्सबोसोन् कण यांसंबंधी प्रसंगपरत्वे वाचतो. पण ते मला आकळते(समजते) असेनाही. हे विश्व एवढे अफाट, एवढे अमर्याद आहे की त्याच्या तुलनेत आपला पृथ्वी ग्रह अगदीच नगण्य आहे. हेमला समजते. माझा संबंध या पृथ्वी ग्रहाशी आहे. म्हणून विश्वाच्या उत्पतीविषयी मी अधिक विचार करीत नाही. अवकाश, वस्तुमान, काळ (स्पेस-मास-टाईम) या गोष्टी अनादि कालापासून अस्तित्वात आहेत ,निसर्गनियमही अनादि कालापासून आहेत असे मी मानतो. या घटकांवर निसर्गनियमांनुसार विविध प्रक्रिया होऊन तारे, ग्रहमाला, आकाशगंगा, नेब्यूला, क्वासार, कृष्णविवरे, इत्यादि सर्व काही निर्माण झाले असे मी मानतो. माझे हे अज्ञान असेल. माझ्या आकलन क्षमतेची ही मर्यादा आहे.
मात्र हे विश्व कोण्या एका अलौकिक ईश्वराने निर्माण केलेले नाही. ते निसर्गनियमांनुसार उद्भवले असे माझे ठाम मत आहे. याविषयी अधिक वाचन,मनन, चिंतन करण्याची माझी क्षमता नाही. तसे करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. त्यातून काही उपयुक्त घडेल असेही वाटत नाही. माझे आयुष्य काही वर्षांचे आहे. माझे विश्व लहान आहे.
(२) " या अमर्याद विश्वाविषयी अधिक सखोल विचार करावा असे मला वाटत नाही. " असे म्हटले असले तरी या विश्वाविषयी शक्य होईल तेवढे सत्यज्ञान आपण मिळवायला हवे असे मला वाटते. आपली ग्रहमाला(प्लॅनेटरि सिस्टिम) कशी अस्तित्वात आली याचे विश्वासार्ह आणि सर्वमान्य ज्ञान विज्ञानाला आहे.साधारणपणे ४६० कोटी वर्षांपूर्वी एक अजस्र तारा सूर्या जवळून गेला. त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर मोठी भरती आली. (सूर्य वायुरूप आहे.) ती फुटून लहान-मोठे पुंजके तयात झाले. ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणक्षेत्राच्या बाहेर गेले नाहीत. सूर्याच्या केंद्रगामी गुरुत्वाकर्षण बलामुळे(सेंट्रिपेटल फोर्स) ते सूर्याभोवती फिरत राहिले. हीझाली आपली ग्रहमाला. म्हणजे पृथ्वीचे वय ४६० कोटी वर्षे आहे.
कालांतराने पृथ्वी थंड झाली. पाणी पृथ्वीच्या पोटातून वर येऊन समुद्र निर्माण झाले. समुद्राच्या पाण्यातील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स) अविरत घडत राहिले. या सततच्या प्रक्रियेतून सुमारे साठ कोटी वर्षांनी सजीव पेशी यदृच्छया निर्माण झाल्या. अगदी प्रथमिक स्वरूपाचे जीव तयार झाले. नंतर स्वैर गुणबदल (रॅंडम म्युटेशन) आणि निकष लावून झालेली नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वांच्या आधारे उत्क्रांती होत होत या पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी निर्माण झाली. माणूसही त्याच प्रक्रियेतून उत्क्रांत झाला.
(३) या पृथ्वी ग्रहावरील मानव प्रजातीत माझा जन्म झाला हे माझे महद्भाग्य मानतो. मला लाभलेले हे एकमेव जीवन आहे--पहिले आणि शेवटचे. माझा गतजन्म नव्हता. पुनर्जन्मही असणार नाही. कुणाचाच नसतो.पुनर्जन्म ही भ्रामक कल्पना आहे. "जातस्य हि ध्रुवो मृत्यु: ।" हे गीतावचन सत्य आहे. मृत्यू अटळ आहे. माझामृत्यू झाल्यावर माझे जीवन संपुष्टात येणार.
(४) मी कुटुंबात राहातो. समाजात राहातो. म्हणून जी काही माझी कौटुंबिक कर्तव्ये आहेत, सामाजिक कर्तव्ये आहेत ती सर्व मी यथाशक्ती, यथामती आनंदाने आणि निष्ठेने पार पाडणार. कर्तव्य म्हणजे अवश्य करायला हवे असे स्वकर्म. ज्ञानेश्वरीतील "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा तोषालागी ।" हे वचन मी मानतो.
(५) मरण अटळ आहे. मृत्युनंतर पुन्हा जीवन नाही. म्हणून या सृष्टिविषयीचे आणि विश्वासंबंधीचे शक्य होईल तेवढे सत्यज्ञान मिळविण्याचा मी आमरण प्रयत्‍न करणार. जीवनाचा आनंद उपभोगणार. कुटुंबाचे,समाजाचे आणि पुढील पिढ्यांचे जीवन अधिक सुखकर ,अधिक सुरक्षित होईल यासाठी शक्य होईल ते काम करणार. समाजातील अज्ञान आणि माणसांचे दु:ख दूर होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्‍न करणार.
(६) भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मला पटते. म्हणून मी ते मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे असे मला विचारान्तीं वाटते. हेप्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैधमार्गांनी परोपरीने सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुनावैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे, भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
(७) या लेखात मी ज्या अंधश्रद्धा सांगितल्या आहेत, ज्यांना भंपक शास्त्रे (स्यूडो सायंसे ) म्हटले आहे, त्यांतीलकोणत्याही गोष्टीचा त्याग न करता ती खरी मानून चालणार्‍या श्रद्धाळूंना मी दोष देत नाही. त्यांच्याविषयीमाझ्यामनात किंचितही राग नाही. पण त्यांनी स्वबुद्धीने विचार करावा. श्रद्धेची चिकित्सा करावी. असे माझे मत आहे. समाजात काही धूर्त, लबाड माणसे असतात. सर्वकाळी असतात. श्रद्धाळूंना फसवून लुबाडणे, त्यांचेआर्थिक शोषण करणे हाच त्यांच्या उपजीविकेचा धंदा असतो. प्रसारमाध्यमांतून जाहिराती करून ते सतत अज्ञान पसरवीत असतात. तसेच भाडोत्री प्रचारक नेमून आपल्या धंद्याचा प्रचार करतात. एखाद्या समस्येमुळे अपरिहार्यपणे अगतिक झालेले श्रद्धाळू या धूर्तांच्या प्रचाराला बळी पडतात. आधीच अगतिक झालेल्या आणि श्रद्धेने लिप्त असलेल्या लोकांना आपली आर्थिक फसवणूक होत आहे हे कळतही नाही. माझा विरोध आहे तो या कावेबाज धूर्तांना. राग येतो तो त्यांचा. ते भोळ्या श्रद्धाळूंना अज्ञानात ठेवून निर्दयपणे फसवत असतात. वरशहाजोगपणाचा आव आणतात.
(८) जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा असा कोणी अलौकिक ईश्वर अस्तित्वात नाही. कितीही आर्ततेने धावा केला तरी देव धावून येत नाही. "देव भक्ताघरीं धावला" हे केवळ काल्पनिक पुराणकथांत असते. व्यवहारात नसते. माणसाने वास्त्ववादी असावे. कुठल्याहीभ्रमात राहू नये.
(९) "या विश्वात एक अलौकिक , अद्भुत शक्ती आहे. ती विश्वाचे संचलन करते. विश्वातील यच्चयावत् सर्व घटना ती शक्ती घडवते. " हे पूर्णतया तथ्यहीन आहे. अशी अलौकिक शक्ती कुठेही अस्तित्वात नाही.विश्वातील सर्व घटना निसर्गनियमांनुसार घडतात.
(१०) जगात कुणाकडे कसलीही दैवी शक्ती नसते. आपल्या कृपेने, प्रसादाने, अनुग्रहाने, आशीर्वादाने कुणाचे भले करण्याचे सामर्थ्य कुणाजवळ नसते. मग तो कितीही मोठा, सुप्रसिद्ध असो. तसे सामर्थ्य असल्याचा दावा करणारे गुरु-बाबा-स्वामी-बापू हे सर्व लबाड, ढोंगी, ठकसेन असतात अथवा मनोविकृत भ्रमसेन असतात.
..........
(११) आत्मा, पुनर्जन्म, परमात्मा, मोक्ष या सर्व भ्रामक संकल्पना आहेत. त्या उपनिषदांत आहेत, गीतेतप्रत्यक्ष भगवंतांच्या मुखी आहेत, शांकरभाष्यात आहेत, संतसाहित्यात आहेत, तरी त्या सत्य मानता येत नाहीत. त्या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. लोकप्रसिद्ध अनुमान प्रमाणाने सिद्ध होत नाहीत. तार्किकयुक्तिवादाने तसेच मानवाच्या अधिकृत ज्ञान संग्रहातील तत्त्वांच्या आधारे वरील संकल्पनांची सत्यता प्रस्थापित करता येत नाही. त्या संकल्पना केवळ श्रद्धेने खर्‍या मानायच्या. श्रद्धेला तर विज्ञानात तसेच तर्कशास्त्रात मुळीच स्थान नाही. म्हणून आत्मा, परमात्मा इ. संकल्पना मी खर्‍या मानीत नाही. पूर्वापार ,पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या संकल्पनांची कोणतीही चिकित्सा न करता व्यासमहर्षी, आद्यशंकराचार्य,ज्ञानेश्वर, अन्य साधुसंत यांनी त्या शब्दप्रामाण्याच्या आधारे खर्‍या मानल्या. पण आधुनिक विज्ञानाच्या आधारे चिकित्सा केल्यास त्या भ्रामक ठरतात.
(१२) स्वर्ग, नंदनवन, अप्सरा, अमृत, नरक-कुंभिपाक-रौरव-यमयातना या सर्वच्या सर्व गोष्टी केवळ काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत, हे उघड आहे.
(१३) संचित, क्रियमाण, प्रारब्ध, कर्मविपाक, या तथ्यहीन कल्पना आहेत. नियती, ललाटलेख, ब्रह्मलिखित,या सर्व गोष्टी निरर्थक आहेत.
(१४) कोणतेही धार्मिकविधी (पूजा-अर्चा-व्रतवैकल्ये-होम-हवन इ.)करून कोणताही हेतू साध्य होत नाही. (जोविधी करायचा असे योजिले असेल तो विधी पार पडतो एव्हढेच.) केवळ मानसिक समाधान लाभू शकते. अशाकर्मकांडांच्या वेळी जे संस्कृत भाषेतील मंत्र म्हणतात त्या मंत्रांत कोणतेही सामर्थ्य नसते.
(१५) गुरुमंत्र, ॐ नम: शिवाय।, गं गणपतये नम:। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।, मृत्युंजय महामंत्र, गायत्रीमंत्र, असल्या कुठल्याही मंत्रात कसलेही सामर्थ्य नसते. हे मंत्र आणि "ओले मंतर कोले मंतर फू: मंतर छू: मंतर" यांत मूलत: काही भेद नाही. सगळे सारखेच निरुपयोगी !
(१६) पुराणात शाप-उ:शाप, वर-वरदान, देण्याच्या अनेक कथा आहेत. त्या सर्व काल्पनिक आहेत. एखाद्यालाशाप देऊन त्याचे काही वाईट करण्याचे सामर्थ्य कुणाजवळही नसते. पूर्वीसुद्धा कुणाजवळ नव्हते. तथाकथितसिद्धयोगी, तपस्वी, ऋषी, अशा कोणीही कुणाला शाप दिला तरी त्या शापाचा कोणताही परिणाम शापित व्यक्तीवर हो्ऊ शकत नाही. पूर्वी कधीही झालेला नाही. भविष्यात कधी होणार नाही. मात्र, "मला त्या साधूने शाप दिला आहे. आता माझे काहीतरी वाईट होणार " असा धसका त्या शापित व्यक्तीने घेतला तर त्या भीतीने मानसिक परिणाम होईल. त्याचे पर्यवसान काही शारीरिक आजारात होऊ शकेल. कुण्या तापट साधूने रागीट मुद्रा धारण करून, डोळे खदिरांगारांसारखे लालबुंद करून , "तुला भस्मसात करतो." अशी शापवाणी उच्चारली तरी वाळलेल्या गवताची काडीसुद्धा पेट घेणार नाही.
तसेच आपल्या भक्तावर संतुष्ट होऊन कुण्या साधूने, तथाकथित योग्याने, त्या भक्ताला वर अथवा आशीर्वाद दिला तरी त्यामुळे त्याभक्ताचे काही कल्याण होणार नाही. काहीसुद्धा भले होऊ शकत नाही. (केवळ मानीव मानसिक समाधान मिळेल तेवढेच.)
शाप अथवा वर यामुळे काही प्रत्यक्ष घडून येणे हे निसर्गनियमाविरुद्ध आहे. तसे करण्याचे सामर्थ्य कुणालाही प्राप्त होत नाही. या संबंधीच्या सर्व पौराणिक कथा बाष्कळ आहेत.
(१७) कितीही योगसाधना केली, ध्यान-धारणा करून समाधी लावली, तरी अष्टसिद्धींतील एकही सिद्धी कुणालाही प्राप्त होणे शक्य नाही. अशी सिद्धी मिळणे हे निसर्ग नियमाचे उल्लंघन आहे. ते कोणीही करू शकत नाही.
(१८) सर्व तथाकथित चमत्कार हे हातचलाखीचे प्रयोग असतात. पदार्थांच्या रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करून असे प्रयोग दखविता येतात की जे लोकांना चमत्कारसदृश वाटतील. विविध रासायनिक अभिक्रियांविषयी जनसामान्यांना काही ठाऊक नसते.
(१९) आकाशातील ग्रह आणि राशी (तारकापुंज) माणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो याला यत्किंचितही पुरावा नाही. असा कोणताच परिणाम होत नाही असे सर्व वैज्ञानिक नि:संदिग्धपणे सांगतात.म्हणूनफलज्योतिष, त्यांतील ग्रह योग, युती-प्रतियुतीचे परिणाम, शनीची साडेसाती, इ. सर्व संकल्पना निरर्थक आहेत. थोडक्यात म्हणजे फलज्योतिष हे एक भंपक विज्ञान (स्यूडो सायन्स) आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे.फलज्योतिषाचा अभ्यास इथेच संपतो. फलज्योतिष विषयावरील पुस्तके वाचणे, अभ्यास करणे हा केवळ कालापव्यय आहे.
(२०) अंगठीत विशिष्ट रंगाचा खडा घातला की इथून कित्येक कोटी कि.मि. दूर असलेल्या ग्रहांची अशुभफळे टळतात ही समजूत अडाणीपणाची आहे. मुळात कुठल्याही ग्रहाचे कसलेच फळ नसते. स्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी हे सहज समजते. तसेच बोटांत अंगठ्या, किंबहुना अंगावर कसले अलंकार घालणे हे मला ओंगळवाणेपणाचे वाटते.
(२१) कोणताही दिवस, कोणतीही गोष्ट, शुभ-अशुभ, पवित्र-अपवित्र, पुण्यदायक-पापकारक नसते. ती चांगली-वाईट, योग्य-अयोग्य, हितकारक-अहितकारक असू शकते.
(२२) वास्तु (दिशाभूल) शास्त्र, प्राणिक हीलिंग (प्राणशक्तिउपचार) , ब्रह्मविद्या, ओंकार गुंजन, अग्निहोत्रइ.सर्व भंपक (स्यूडो) शास्त्रे आहेत. त्यांतून हितकारक असे काहीही साध्य होत नाही.मात्र असल्या भंपक शास्त्रांच्या आधारे श्रद्धाळू गिर्‍हाइकांना फसवून काही लबाड माणसे भरपूर कमाई करतात.
(२३) सुरक्षाकवचे, श्रीयंत्रे, रुद्राक्षे, पिरॅमिडस्, अशा सर्व वस्तु पूर्णतया निरुपयोगी असतात. त्या घरात आणून ठेवल्या असता आपल्या समस्या दूर होतील असे मानणे असमंजसपणाचे आहे.
(२४) अंत्यसंस्कारांच्या संदर्भात हिंदुधर्मातील पुरोहितांनी जी कर्मकांडे रूढ केली ती सर्व त्यांच्या कमाईसाठी,अधिकाधिक लाभासाठी आहेत. हे अगदी स्पष्ट दिसते. अन्यथा पिंडदान, अकरावे, बारावे, तेरावे, मासिकश्राद्ध, वार्षिक श्राद्ध, सर्वपित्री अमावास्या, असले प्रकार का आले असते? या संदर्भात वैज्ञानिक सत्य काय आहे?मृत्युनंतर जीवन पूर्णतया संपते. अमर आत्मा, अतृप्त आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना भ्रामक आहेत.विद्युत् दाहिनीत दहन करावे. (देहदान केल्यास उत्तमच). नंतर कोणतेही कर्मकांड करू नये. मोठ्याप्रमाणातहोणारा अनावश्यक खर्च वाचेल. आपल्या श्रमाचा, घामाचा, कष्टाचा पैसा व्यर्थ वेचू नये. या कर्मकांडांमुळे आजवर अब्जावधी रुपयांची लूट झाली. कित्येकजण कर्जबाजारी झाले. हे पैसे नुसते वाया जातात. हे विधी केले नाही तर कुणाचे काहीही वाईट होत नाही. हे स्वानुभवाने सांगतो. समाज काय म्हणेल याची चिंता नको.अनेकजण तुमचे अनुकरण करतील.

(२५) निसर्ग हा पूर्णतया उदासीन आहे. भूकंप, वणवे, महापूर, वादळे, अशा घटना निसर्ग नियमांनुसार घडतात.त्यामागे कुणाचा कसलाही हेतू नसतो. कोणतीही नैसर्गिक घटना माणसांच्या, पशुपक्षांच्या, अन्य प्राण्यांच्या,वनस्पतिसृष्टीच्या हितासाठी अथवा हानीसाठी घडत नाही. पाऊस पडतो तो प्राणिमात्रांना , वृक्षवेलींना पाणी मिळावे म्हणून नव्हे. तो निसर्गनियमानुसार पडतो. त्यामागे कार्य-कारणभाव असतो तो केवळ निसर्ग नियमांचा. अन्य कशाचाही नाही.
-प्रा.य.ना.वालावलकर

Thursday, May 8, 2014

माणसाचे मांस

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.

कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला,  "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला,  "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला की त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.

वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल."

मुलगा कावळा "होय" म्हणाला.

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको."

वडील कावळा म्हणाला, "थांब", तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे."

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ते.

पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता.

थोड्या वेळाने वडील कावळा एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.

वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त 'धर्म' भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

''आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे'' असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.

या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.

आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."

इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.