हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते.कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले.प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे.बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने विचारले. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनालाआलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांनानमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण मी नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते.देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकीसगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून )देवस्थानला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. मी देणगी दिली नव्हती. तरी माझ्यासाठीसुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मीनाकारलेला प्रसादाचा लाडू आणि देणगीचे पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही.तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील.एकदम धक्का बसल्यासारखे होऊन बसचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. वाहक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना.प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय?सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा मी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. वंगध्वज राजा, साधुवाणी, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी ? राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ?एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक बाई बोलल्या.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही.बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झालेच असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही."कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तर अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते.पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता."माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा होती. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना. तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून,देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. तो काही कुणाचे बरे -वाईट करू शकत नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मधाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो.कुठे कसली तक्रार नाही.गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कधीही इतरांचा खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलले.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? विचार करावा. बस बंद पडली त्याच्याशी बसमध्ये कोण कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, त्यांची वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक,दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
थोडावेळ शांतता पसरली. इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काहीतरी, थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. माणसाने आशावादी असावे.
-प्रा.य.ना.वालावलकर