बर्याच वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणार्या गुरुजींना फुलें देऊन नमस्कार करीत असू. सर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचा. त्यामुळे त्यादिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होई. तसेच गायन, वादन, नृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीत. त्याकाळी गुरुपौर्णिमेचा संबंध शिक्षकांच्या, कलातपस्वींच्या, ज्ञानमहर्षींच्या सन्मानाशी होता. ते दिवस गेले.
संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प अशा कलाक्षेत्रात गुरूंचे महत्त्व अजून टिकून आहे.कारण या कला गुरूकडूनच ग्रहण कराव्या लागतात. तिथे निवडक शिष्य असतात. आध्यात्मिक क्षेत्रात ठकसेन गुरूंचा सुळसुळाट झालेला दिसतो. कांही खरे सद्गुरू असतात. पण आजच्या जाहिरातींच्या कल्लोळात आणि झगमगाटात ते दिसेनासे झाले आहेत. गावोगावी मेळावे भरवून खरे सद्गुरू आपली भक्तसंख्या वाढविण्याच्या मागे नसतात. त्यांना प्रसिद्धीची आणि संपत्तीची हाव नसते. शिष्यांनी गुरूंचा शोध ध्यावा अशी अपेक्षा असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना झटपट रेडिमेड हवे असते. त्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात.आपल्याला हवे तें ठकसेन गुरूंकडून मिळेल असे त्यांना वाटते. कारण ते जाहिरातींना बळी पडतात. असे भक्त त्यांच्या कच्छपी लागतात. ठकसेनांचा धंदा फोफावतो. आजच्या मार्केटिंच्या युगाचा हा अपरिहार्य परिणाम आहे. खरे सद्गुरू आणि भक्त यांची संख्या आता नगण्य झाली आहे असे दिसते. त्यांचा विचार या लेखात नाही. श्रद्धाळूंनी ठकसेनांच्या नादी लागून फसू नये, हा या लेखाचा हेतू आहे.
आता गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पूजनाचा (आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा) दिवस असा अर्थ रूढ झाला आहे. पूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणार्या बुवा,महाराज, स्वामी, बाबा यांची संख्या मोठी होती. पुढे अनेक बुवा-बाबांच्या "लीला" उघड झाल्या. त्यांचेदैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागले. त्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झाले. पण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवते, त्याप्रमाणे बुवा--बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करून, आपली कार्यपद्धती बदलून,श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत मह्त्कार्य पुढे चालू ठेवले. "हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे॥" या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठ्या प्रमाणात लाभले. गुरुबाजी का फोफावते यासंबंधी"उदासबोध" या कवितासंग्रहात मंगेश पाडगावकर म्हणतात,:
" प्रत्येकासी येथे हवा । कोणीतरी जबरा बुवा।जो काढील सार्या उवा । मनातल्या चिंतेच्या।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।आपण भिडायचे नाही । आयुष्याला।
येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा। तो आपुल्या धोतरा कासोटा । वर्ज्य मानी।
असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसते. भक्तांची संख्या अमाप आहे. बहुतेक आध्यात्मिक गुरु हे प्रच्छन्न ठकसेन असतात. शिष्यांना फसवून, आपल्या भजनी लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. आसाराम,रामपाल, नित्यानंद, निर्मलबाबा, वेंकटसर्वानन अशा अनेक गुरूंचे ढोंग उघड झाले. खरे स्वरूप समजले. तरी अशा ठकसेन गुरूंच्या कच्छपीं लागणारे भोळसट भाविक आहेतच. परब्रह्म, परमात्मा, जीवात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, ब्रह्मलोक, असे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातात. त्यांना भुरळ पडते. गुरूवरील श्रद्धा दृढ होते.दुसर्या प्रकारच्या कांही गुरूंना वाटते, की अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहे, आपण साक्षात्कारी आहो, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, आपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे,भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतो, ज्ञानसंक्रमण करू शकतो. अशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होत. कुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतो. अशाभ्रमसेन गुरूंत काहीजण सज्जन, सदाचारी, सत्पुरुष असू शकतात. मात्र दिव्य ज्ञान, अलौकिक शक्ती कुणापाशी नसते. खरेतर अशा शक्तीला अस्तित्वच नाही. निसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.काही गुरू निष्पाप, अश्राप, निरिच्छ, निर्मोही असतात. त्यांचे भक्त त्यांना विदेही, जीवन्मुक्त, देहातीत,अवलिया, पहुंचा हुवा आदमी असे समजतात. त्यांच्या भजनी लागतात. त्या गुरूंना आपल्या शरीराचे,कपड्यांचे, खाण्या-पिण्याचे, स्वच्छतेचे भान नसते..." हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेत? गाणे कसले म्हणताहेत? समोरच्या पेटीत पैसे का टाकताहेत?..." हे त्यांना काही समजत नसते. खरे तर ते मतिमंद असतात. काही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असते. हे मूढसेन गुरू होत. अशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तर्हा (ठकसेन, भ्रमसेन, मूढसेन) दिसतात.गुरू ठकसेन असो, भ्रमसेन असो वा मूढसेन असो प्रत्येकाचा भक्तवृंद असतोच. त्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठ्या संख्येने शिष्य लाभतात. सर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहातात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातात. अशा भक्तांविषयी पु.ल.देशपांडे यांनी एक अप्रतिम भक्तिगीत लिहिले आहे. बहुतेकांनी ते वाचले असेल. ते दत्तगुरूंविषयी असले तरी सर्वच गुरुभक्तांना आवडेल आणि मुखोद्गत करावेसे वाटेल म्हणून इथे दिले आहे.
गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे । जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता । स्वपुच्छ हलवित हसले । गुरुराज मन्मनीं बसले ।..त्या श्वानाचा वाटे हेवा । कधी सुखाचा मिळेल ठेवा
गुरुचरणांच्या ठायीं मजला । सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले ।...
खरेतर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतात. त्यांतील कोणापाशी दैवी शक्ती,अलौकिक सामर्थ्य, दिव्य ज्ञान असले काही नसते. गीतेतील श्लोक, धर्मग्रंथांतील वचने, पुराणांतील दाखले, संतसाहित्यातील अभंग, ओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडून) तोंडपाठ करतात.बरेचसे वाचलेले, ऐकलेले असते. वक्तृत्व प्रभावी असते...."ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहे. तो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे.त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला." असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतात. माना डोलावू लागतात. गुरुवचन सत्य मानायचे.त्याची चिकित्सा करायची नाही. " गाईचे मुख महन्मंगल कसे? " अशी शंका विचारायची नाही.भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारी, टिळाधारी-माळाधारी, कफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.गुरूमुळे भक्तांची आर्थिक हानी होते. वेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतो. पण सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होते. भक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातो. गुरूचा शब्द प्रमाण मानतो. गुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतो. गुरुवचनांची चिकित्सा करणे, त्यांवर शंका घेणे पाप समजतो. गुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटते. तो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. आपली बुद्धी गुरूच्या पायी गहाण ठेवतो. दुसर्याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. दास्य स्वीकारणे. शरणागती पत्करणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. पण भक्तांना त्यात धन्यता वाटते. मूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपा कटाक्षासाठी आसुसलेले असतात. गुरूने त्यांच्याकडे पाहिले, आशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटते. गुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतो. म्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असते. गुरुपायाशी बुद्धी गहाण असते.आध्यात्मिक गुरुविषयीं एक जुना किस्सा आहे. मुळात तो एक संस्कृत श्लोक आहे. त्याला कुणी मराठी दिले. त्या आधारे हा किस्सा लिहिला आहे.
"नमस्कार महाराज! आपल्या या कफनीला मोठा झोळ पडलेला दिसतो. तसेच त्यात लहान लहान छिद्रेही आहेत."
" खरे आहे. नदीत आंघोळ करताना अशा कफनीचा उपयोग मी मासे पकडण्यासाठी करतो."
"मासे? म्हणजे तुम्ही मासे खाता? मत्स्याहारी आहांत? "
"हो. तळलेले छोटे मासे दारूबरोबर छान लागतात. आपला काय अनुभव?"
"दारू? म्हणजे मद्यपानसुद्धा करता?"
"व्यसन नाही. पण कधी बाईकडे जायचे तर आधी एखादी बाटली पिणे बरे. आपला काय अनुभव?"
"बाप रे! बाई? म्हणजे वेश्यागमन?"
"आश्चर्य कसले त्यात? अहो, जुगारात एखादे वेळी एकदम घबाड लागले तर मौज मजा करावीशी वाटणारच ना?"
" म्हणजे तुम्ही जुगारी अड्ड्यांवर पण जाता? "
" क्वचित कधीतरी. बाकी वेळ कुणाला असतो. आमच्या मठात सतत गर्दी असते भक्तांची. त्यांना दर्शन देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात खूप वेळ जातो."
" समजले.तुम्ही आध्यात्मिक गुरू आहांत तर ! नमस्कार. निघतो मी."हा किस्सा जुना झाला. आता या गुरूंची जीवन पद्धती (लाईफ स्टाईल) खूप बदलली आहे. तरी मूळ मनोवृत्ती तशीच आहे. अशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्त व्यासपौर्णिमेला पूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय.
-प्रा.य.ना.वालावलकर