यात आश्चर्य ते काय?......य.ना.वालावलकर
धर्म आणि समाजजीवन या संबंधीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्यू(Pew) नावाचे एक चर्चामंडळ (फ़ोरम) अमेरिकेत आहे. या मंडळाने अमेरिकन नागरिकांच्या धर्मज्ञानासंबंधी एक सर्वेक्षण केले.
त्यांनी मुख्यत्वेकरून ख्रिश्चन धर्म आणि बायबल यांवर आधारित 32 प्रश्न काढले. ती प्रश्नावली 3400(तीन हजार चारशे) अमेरिकन नागरिकांना पाठविली. या प्रश्नावलीत अन्य प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ यांवरही काही प्रश्न होते. शेवटी " मी धार्मिक/अज्ञेयवादी/निरीश्वरवादी आहे." यांतील एक पर्याय उत्तरदात्याने निवडायचा होता.
आलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून नि:संदिग्धपणे असे आढळले की : " ईश्वरवादी व्यक्तींच्या धर्मज्ञानापेक्षा निरीश्वरवाद्यांचे धर्म आणि धर्मग्रंथ यांसंबंधीचे ज्ञान लक्षणीय प्रमाणात अधिक असते."
"हा निष्कर्ष धक्कादायक आहे. विस्मयकारक आहे."अशी प्रतिक्रिया कांही अभ्यासकांनी व्यक्त केली.
.....खरे तर या निष्कर्षात आश्चर्यकारक ते काय? कारण:
1. धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.
2. धर्मातील अनेक तत्त्वांच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो. त्यांवर श्रद्धा ठेवण्याविना अन्य पर्याय नसतो. म्हणून धार्मिकांना श्रद्धाळू असावेच लागते. श्रद्धा ठेवली की चिकित्सक बुद्धी कुंठित होते.
3. बहुसंख्य धार्मिक व्यक्ती विचारवंत नसतात तर बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.
4. जागतिक लोकसंख्येत धार्मिकांचे प्रमाण 80% + आहे; तर नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण 93% आहे.
5.वरील सत्यविधान 4 वरून दिसते की नास्तिकांचा बुद्ध्यंक(IQ) हा धार्मिकांच्या बुद्ध्यंकाहून मोठा असतो. (हे विधान वर्गाविषयी आहे. एखाद्या व्यक्तिविषयी नाही.)
6.बहुसंख्य धार्मिकलोक रूढी, परंपरा, कर्मकांडे, सरमनात/ कथाकीर्तनात ऐकलेली मिथके/भाकडकथा, येशूने/देवाने , संतांनी केलेले तथाकथित चमत्कार इत्यादि गोष्टींनाच धर्म मानतात. अधिक विचार करत नाहीत. धर्मग्रंथ/तत्त्वज्ञान वाचत नाहीत. वाचले तर अर्थ समजून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे धर्मज्ञान यथातथाच असते.
7.एका विचारवंताने म्हटले आहे:"पूर्वी आस्तिक होतो. पण नंतर मी धर्मग्रंठ अभ्यासले." हे पटण्यासारखे आहे. नास्तिकतेच्या प्रसारासाठी धर्मग्रंथ हे प्रभावी साधन ठरू शकते. हे ग्रंथ विचारपूर्वक अर्थ समजून वाचणार्या धार्मिकाचे परिवर्तन नास्तिकात होऊ शकते. त्यामुळे अनेक नास्तिकांना चांगल्यापैकी धर्मज्ञान असते. (हिंदूंच्या बहुतेक धार्मिकविधींचे मंत्र संस्कृत भाषेत असतात. तेव्हा अर्थ कळण्याचा प्रश्नच नसतो.)
वरील विवेचन लक्षात घेतले तर प्यू फोरमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक वाटू नये.
**********************************