Sunday, August 18, 2013

टाळ्या वाजवणारे मृतात्मे: अमेरिकन बहिणींची बुवाबाजी



जगाच्या पाठीवर सर्वत्र मृतात्म्यांच्या अस्तित्वाला विविध धर्मांत मान्यता आहे. हे आत्मे विविध रुपात भटकत असतात असा समज आहे. विज्ञानात आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. तरीही एका मानसिक गरजेपोटी माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाला सहन करत नाही व त्याला आपल्या प्रिय व्यक्तीच्या तथाकथित आत्म्याशी संवाद साधण्याची अनिवार ओढ लागलेली असते. या मानसिकतेचा फायदा घेऊन नसलेल्या आत्म्याशी संवाद साधून देणारे दलाल जागोजागी जगभर दिसतात. अमेरिकाही याला अपवाद नाही. १९४८ मध्ये न्यूयॉर्कमधून आत्म्याशी संवाद साधण्याची बुवाबाजी दोन चलाख भगिनींनी सुरु केली. या बुवाबाजीचा पर्दाफाश कसा झाला हे जाणून घेणे जितके मनोरंजक तितकेच प्रबोधन करणारे ठरेल.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील हाईड्सव्हिले हे एक उपनगर. जॉन फॉक्स नावाच्या लोहाराचे कुटुंब येथे राहत होते. या कुटुंबात एकूण पाच सभासद होते. जॉन फॉक्स, त्याची पत्नी व मार्गारेट(मॅगी), कॅथेरीन (कॅथी) आणि ली फिश या त्यांच्या मुली.
मार्गारेट आठ वर्षांची व कॅथेरीन साडे सहा वर्षांची असतानाची ही घटना. या दोघी बहिणी मोठ्या खोडकर होत्या. त्यांची आई मात्र प्रेमळ व सरळ मनाची पण भित्र्या स्वभावाची होती. या स्वभावाचा फायदा घेऊन या खोडकर पोरी आईला घाबरवण्याचे विविध उद्योग करीत असत. बेडवर झोपायला जाताना दोघी बहिणी एक सफरचंद दोरीला बांधून ती दोरी वरून खाली जमिनीवर टाकून आपटल्याचा आवाज काढीत. आईने हा आवाज बऱ्याचदा ऐकला पण तिला आवाज कशामुळे येतोय हे कळायचे नाही. कॅथी व मॅगी तशा लहानच. त्यामुळे त्या हा चावटपणा करत असतील अशी पुसट शंकाही तिला आली नाही.
अखेरीस तिने हा गूढ प्रकार आपल्या शेजाऱ्यांना सांगायला सुरुवात केली. आपली आई व शेजारी या गूढ आवाजावर विश्वास ठेवतात हे लक्षात येताच दोघी बहिणींनी पायाची बोटे लाकडी जमिनीवर खुबीने वाकवून वेगळेच आवाज काढायची नाटके सुरु केली.
हे आवाज आपण कसे काढीत असू हे पुढे मॅगीने उघड केले. तिने दिलेला कबुली जबाब असा, “माझी बहीण कॅटी हिला हाताची बोटे मोडण्यातून आवाज निघतो हे माहित होते. तसाच आवाज पायाची बोटे जमिनीवर मोडून काढता येईल हे तिच्या लक्षात आले. मग आम्ही दोघींनी एका पायाची बोटे वापरून असा आवाज काढण्याचा सराव केला. नंतर दोन्ही पायाच्या बोटाने असा आवाज काढण्याचा सराव केला आणि अंधारात असा बेमालूम आवाज काढण्याचे कौशल्य आम्ही प्राप्त केले.”
पायाची बोटे लाकडी जमिनीवर मोडून टाळीसारखा आवाज निघे. या आवाजाचा वापर करून या बहिणींनी न्यूयॉर्कमध्ये व नंतर सर्व अमेरिकेत एका नव्या बुवाबाजीची सुरुवात केली. अमेरिकेत मृतात्म्याशी संवाद करण्याचे दरबार या दोघींनी सुरु केले. १९४८ मध्ये या नाट्याला सुरुवात झाली.
मॅगी व कॅथी यांनी असा दावा करायला सुरुवात केली की आपल्या बेडरूममधून विचित्र आवाज येत आहेत. हे आवाज एका खून झालेल्या फेरीवाल्याच्या आत्म्याचे होत असे सांगायला त्यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसांनी या दोघींच्या आईला याबाबतची खात्री देणारा अनुभवच आला. हा अनुभव तिने स्वतःच्या सहीने प्रसिद्धीस दिला. ती वेळ होती ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतरची. म्हणजेच एप्रिल फूलचा दिवस. मॅगी व  कॅटीने सगळ्या अमेरिकेला एप्रिलफूल करण्याची ती सुरुवात होती. मॅगीच्या आईने हा अनुभव खालीलप्रमाणे वर्णन केला.
कॅटी मोठ्याने म्हणाली, “मि. स्प्लिटफूट (खुन्याचा आत्मा) मी जसं करते तसं तू कर.” मग तिने टाळ्या वाजवल्या. लगेच तेवढ्याच टाळ्या कुठूनतरी वाजल्या. मोठे गूढच झाले. नंतर मॅगी उद्गारली, “आता मी करते ते कर; मोज एक, दोन, तीन आणि चार.” तशा चार टाळ्या तिने वाजविल्या आणि आश्चर्य म्हणजे तशाच चार टाळ्या प्रतिसादादाखल वाजल्या.
नतंर फेरीवाल्याच्या आत्म्याने अशा प्रतिसादाद्वारे संदेश दिला की, त्याचा खून झालाय व त्याचे प्रेत तळघरात पुरलंय. पण याची शहानिशा करण्यासाठी ते तळघर खणल्यावर तेथे थोडी हाडेच सापडली. मात्र ही हाडे कोण्यातरी प्राण्याची असावीत माणसाची नव्हे असा निष्कर्ष निघाला.
काही दिवसातच लोकांपर्यंत बातम्या पोचल्या की, या मुली केवळ त्या फेरीवाल्याच्या आत्म्याची माहिती देत नाहीत तर अशा भटकणाऱ्या वा खितपत पडलेल्या अनेक आत्म्यांच्या शोधासाठी मदत करतात. त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकांची एवढी ख्याती झाली की, या मुलींची थोरली बहीण ली फिश हिने मृतात्मावादी सोसायटीची स्थापना घोषित केली. याच्या प्रसाराला धर्माचे स्वरूप आले. आणि मृतात्म्याच्या दरबारात सुरुवातीला व शेवटी धार्मिक प्रार्थना म्हणायला सुरुवात झाली.
न्यूयॉर्क शहरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर ली फिशने या दोघींना घेऊन संपूर्ण अमेरिकेतील विविध शहरामधून मृतात्म्याशी बोलण्याचे दरबार भरविण्याची मोहीम सुरु केली. प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या प्रिय मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधण्यास मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले.
या गोष्टीचा असा बोलबाला झाल्यावर अमेरिकेतील विवेकवादी मंडली जागी झाली. चिकित्सक संशोधकांनी मॅगी व कॅटीला आव्हान देण्यास सुरुवात केली. बफेलो विद्यापीठातील प्राध्यापकांनी या मुलींना मिळणारे आत्म्यांचे गूढ आवाज तपासले. संशोधनांती हे गूढ आवाज आत्म्याचे नसून या मुलींच्या सांध्यांतून मुद्दामहून काढलेले असावेत असा निष्कर्ष काढला. नंतरच्या संशोधनात असे आढळले की, हे आत्मे अनेकदा चुकीची उत्तरे देत आहेत. मॅगीच्या पायाची हालचाल नियंत्रित केल्यावर असे गूढ आवाज येत नाहीत असा निष्कर्ष त्यांनी काढला.
चलाख मंडळी आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप होऊन त्याची जाहीर कबुली सहसा देत नाहीत. आपण इतरांना फसवले हे कोण सांगेल? ते लपवून ठेवण्यातच शहाणपणा दाखविण्याची प्रवृत्ती बहुतेक मंडळींची असते. पण कॅटी आणि मॅगीच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली. आम्ही लोकांना फसवीत होतो याची जाहीर कबुली त्यांनी दिली. पण ती चाळीस वर्षांनी. त्यांच्या दरबाराची सुरुवात झाली १९४८ मध्ये व जाहीर कबुली दिली २१ ऑक्टोबर १९८८ मध्ये. त्या दिवशी या भगिनी न्यूयॉर्कमधील संगीत अकादमीच्या हॉलमध्ये दाखल झाल्या. आम्ही चलाखीने मृतात्म्याचे आवाज कसे काढत होतो याचे प्रात्यक्षिक मार्गारेट दाखवू लागली आणि कॅथरीन मान डोलावून त्यास होकार देत होती. गंमत म्हणजे या कार्यक्रमास जमलेल्या मंडळीत आत्म्याचे अस्तित्व मानणारे बहुसंख्येने होते. त्यांना धक्काच बसला व ते भुवया उंचावून स्टेजवरील प्रात्याक्षिके खोटी आहेत असा नकारात्मक सूर काढू लागले व आपली नाराजी प्रकट करू लागले. मृतात्म्यांचे टाळीसारखे आवाज मार्गारेट पायातील बूट चलाखीने काढून, पायाची बोटे वाकवून कशी काढत होती ते स्पष्टपणे दाखवीत होती. मोजे घातलेला पाय पातळ अशा लाकडी फळीवर कौशल्याने आपटून ती आत्म्याचा गूढ अवाज काढत होती. आणि हे ती सर्वांसमोर दाखवीत होती.
इव्हनिंस पोस्ट या दैनिकाने दुसऱ्या दिवशी या प्रयोगावर बातमी दिली. “मिसेस मार्गारेट आता आधुनिक मृतात्मावादाचा उगम तिच्या पायाच्या अंगठ्यात असल्याचे दाखवीत आहे.” मार्गारेटने स्वतः याबाबत खालील निवेदन जाहीर केले.
“हीच वेळ आहे की, आता मला मृत्यूनंतरचे जग व एकूणच अध्यात्मवादाबाबतच्या या विषयाबाबतचे सत्य उघड करायला हवे. हा विषय आता जगभर पसरला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला नाही तर त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या क्षेत्रात मी प्रथम प्रवेश केला आणि म्हणून तो उघड करण्याचा हक्क मलाच आहे.”
पुढे मग लहानपणी आईच्या भित्र्या स्वभावाचा फायदा घेऊन तिच्या खोड्या कशा काढत असू हे मार्गारेटने विस्ताराने आपल्या निवेदनात कथन केले. ज्याची माहिती या लेखाच्या सुरवातीस आली आहे. या निवेदनात मार्गारेटने पुढे लिहिले आहे की,
तिची थोरली बहिण ली फिश हिला माहित होते की, मृतात्म्यांच्या टाळीचा आवाज हा बनावट होता आणि जेव्हा तिने दोघी बहिणीबरोबर अमेरिकेचा दौरा केला तेव्हा लोकांच्या प्रिय मृतात्म्यांच्या प्रश्नांची उत्तरे तीच त्यांना सुचवित असे. यासाठी ती दरबारात आलेल्या लोकांकडून अगोदरच माहिती मिळवीत असावी आणि अशी माहिती मिळत नसेल तेव्हा या क्षेत्रातील चाणाक्ष लोक संदिग्ध उत्तर देण्याचे जे कौशल्य वापरतात तेच त्या वापरत असाव्यात.
मार्गारेट आणि तिच्या बहिणींचे हे मृतात्मानाट्य आणखीनच वेगळ्या प्रकारे रंगत गेले. या भगिनींची अशी अटकळ होती की, आपल्या सत्य कथनाबद्दल लोक आपली स्तुती करतील व निर्भयपणाला दाद देतील. शेवटी माणूस पैशाचा गुलाम असतो हेच खरे. पूर्वी दरबारात चलाखी करून पैसा मिळे, पण आता खरे लोकांना सांगितले तर लोक खूश होऊन अधिक बक्षीस देतील अशी त्यांची अटकळ होती. पण घडले उलटेच. आपण मृतात्म्यांचा आवाज चलाखीने काढत होतो याचे प्रयोग त्यांनी लोकांसमोर सुरु केले. त्याला खुश होऊन लोक आर्थिक मदत करतील ही मार्गारेटची अपेक्षा फोल ठरली. चरितार्थ चालवणे त्यामुळे कठीण झाले. तिला जाणीव झाली की, लोक फसण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात पण शहाणे होण्यासाठी नाही करत.
परिणामी मार्गारेट परत आपल्या मूळ मृतात्मा संवाद दरबाराकडे वळली याचे आश्चर्य वाटायला नको. ८ मार्च १९९५ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या शोकयात्रेसाठी हजारो अध्यात्मवादी (मृत्यूनंतर आत्मा असतो असे मानणारे) जमले होते व शोक व्यक्त करीत होते.
आजही मृतात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेली ही मंडळी मार्गारेटने कबूल केलेला अपराध हा खोटा असल्याचे सांगतात. तिच्या पैशाच्या गरजेपोटी किंवा या क्षेत्रातील इतर स्पर्धकांवर सूड उगवण्यासाठी तिने हे ढोंग केले असावे असे त्यांचे म्हणणे आहे. तथापि पुढे तिच्या बहिणीने, ती चलाखीच करत होती याला पुष्टी दिली आणि ही चलाखी त्या दोघी कशा करत होत्या याची प्रात्याक्षिके दाखवण्याचे कार्यक्रम परत परत केले.
मार्गारेट व तिच्या बहिणींचा अमेरिकेतील हा आत्म्याचा खेळ मानवी स्वभावाचे अनेक पैलू दाखवतो. माणसांना सत्य पचवणे किती जड जाते व सुप्त इच्छांच्या पूर्तीसाठी आभासी जग त्यांना खरं वाटू लागतं. या आभासी जगाचे दर्शन चलाख मंडळी करतात हे त्यांना हवहवसं वाटतं. आपली फसवणूक होत आहे हे दिसल्यावर देखील लोक ते मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणूनच जेम्स रँडीनं म्हटलंय, “लोकांना फसण्याची भारी हौस असते. म्हणून त्यांना फसवणे सोपे जाते.”
विवेकाची वाट किती अवघड आहे नाही का?

-प्रा. प. रा. आर्डे

No comments:

Post a Comment