Monday, October 14, 2013

देव घावला कणाकणांत?


दि. ५ जुलै २०१२ रोजी सकाळी हातात पडलेल्या पेपरची मुख्य बातमी होती ‘देव घावला कणाकणांत?’ -दै. सकाळ, ‘अखेर वैज्ञानिकांनी शोधला देव’ –दै, पुढारी, ‘कोई गॉड मिल गया’ –दै. नवभारत टाईम्स, ‘The God of all particles is here, almost’ –The Times of India,  ‘विश्वाचे रहस्य उलगडले? देवाचा अंश दिसला’ –दै. लोकमत
         सर्व बातम्यांचा मतितार्थ होता ‘वैज्ञानिकांनी शोधला देव.’ मनात प्रश्न पडला, असं असेल तर मग महान कोण? शोधलेला की शोधणारा ! अर्थात विचार केला तरच असले प्रश्न पडणार. स्वित्झर्लंड जवळील जिनिव्हा येथे सुरु असलेल्या महाप्रयोगातील शोधाची ५ जुलैची मुख्य बातमी ‘विश्वातील सर्वात लहान कणाचा अर्थात ‘हिग्ज बोसॉन’चा वैज्ञानिकांनी शोध लावला.’ अशी असायला हवी होती.परंतु अशा प्रकारचा मथळा असलेला एकही पेपर नव्हता हे विशेष. सदर बातमीला दैवी अथवा अध्यात्मिक बाज देण्याची अजिबात गरज नव्हती. परंतु सदर बातमीमुळे विज्ञान आणि अध्यात्म यांच्या श्रेष्ठत्वावरील रंगतदार चर्चेला उधाण आलं.
           ५ जुलै २०१२ अशा प्रकारे भरून यायला कारणीभूत होती दि. ४ जुलै २०१२ रोजी आंतरराष्ट्रीय उच्च ऊर्जा भौतिकशास्त्र परिषद, मेलबोर्न येथे सर्न (CERN) मधील अॅटलस या विभागाच्या प्रमुख फॅबिओला जियानोत्ती (Fabiola Gianotti) यांनी वैज्ञानिक शोधाची केलेली अधिकृत घोषणा “We observe in our data clear signs of a new particle, at the level of 5 sigma, in the mass rigion around 126 GeV. The outstanding performance of the LHC (Large Hadron Collider) and ATLAS (A Torodial LHC Apparatus) and the huge efforts of many people have brought us to this exciting stage. A little more time is needed to finalize these results, and more data and more study will be needed to determine the new particle’s properties. The search is more advanced today than we imagined possible. The Higs Boson is an unstable particle, living for only the tiniest fraction of a second before decaying into other prticles.”
          याचा मराठी अनुवाद होतो, ‘आम्हाला जी वैज्ञानिक माहिती मिळाली आहे त्यावरून १२६ गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा असलेल्या व ५ सिग्मा पर्यंत सांखिकीय पुरावा असलेल्या कणांचा शोध आम्हाला लागलेला आहे. हा महत्वाचा शोध लावण्यात अनेकांच्या प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा कारणीभूत आहे. ही माहिती परिपूर्ण करण्यासाठी व या कणांचे गुणधर्म शोधण्यासाठी आम्हाला आणखी कालावधी लागेल. हा शोध हा पूर्वीपेक्षा अत्यंत आधुनिक आहे. हिग्ज बोसॉन कण हे अस्थिर आहेत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये दुसऱ्या कणांमध्ये रुपांतरीत होतात.’
             जिनिव्हा येथे सुरु असलेल्या महाप्रयोगातून विश्वातील लहानात लहान कण ज्यांना हिग्ज बोसॉन कण असे संबोधतात त्यांचे अस्तित्व वैज्ञानिकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले हा या शोधाचा मतितार्थ होता. पीटर हिग्ज व भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी गणिती प्रणालीतून मांडलेला सिद्धांत प्रयोगाद्वारे सिद्ध झाला होता. भारतीयांचा ऊर वैज्ञानिक अंगाने भरून येण्याची गरज होती. न की दैवी अंगाने.
फॅबिओला जियानोत्ती यांनी केलेल्या घोषणेमध्ये कोठेही ‘God Particle’ अथवा ‘देव कण’ असा शब्दप्रयोग नाही. तरीसुद्धा प्रसारमाध्यमांनी या शोधाचं रुपांतर देव कणामध्ये करून वैज्ञानिकांच्या प्रयत्नाला व शोधाला देवापुढे कमी लेखण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक माहिती धार्मिक किंवा दैवी शक्तीशी जोडली की मगच सर्वसामान्यजन उत्सुकतेपोटी वाचणार आणि मग आपल्या बातमीचं मूल्य वधारणार हे पत्रकारांपेक्षा इतरांना कसं समजणार?
           वैज्ञानिक God Particle हा शब्दप्रयोग करत नाहीत तर वैज्ञानिक संकुलाव्यतिरीक्तचे लोक हा शब्दप्रयोग करतात. God Particle हा शब्दप्रयोग आला कसा हे जाणून घेणं मनोरंजक ठरेल. अमेरिकन वैज्ञानिक व सन १९८८ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त लिऑन लिडरमन हे मुलभूत कणांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. म्युऑन न्युट्रीनो या मुलभूत कणांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी मुलभूत कणांच्यावरचे एक पुस्तक ‘God damn Particle’ या नावाने प्रकाशनासाठी प्रकाशकाकडे दिले. परंतु प्रकाशकाला आर्थिक व पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ते नाव योग्य वाटले नाही. प्रसिद्धीसाठी यापेक्षा वेगळे नाव गरजेचे आहे या अनुषंगाने त्याने ‘God Particle: If the Universe is the Answer, What Is the Question?’ असे नामाधिनाम केले. विश्वातील लहान कणांना म्हणजे हिग्ज बोसॉन कणांना गॉड कण म्हणून संबोधणे हिग्ज सहित अनेक अनेक वैज्ञानिकांना आवडलेले नव्हते. सदर टोपणनाव धार्मिक लोकांच्या भावना दुखावल्यासारखे होईल असे हिग्ज यांचे मत होते. परंतु प्रसिद्धीसाठी प्रकाशकाने वैज्ञानिकांच्या मताला केराची टोपली दाखवली. आणि ‘God Particle: If the Universe is the Answer, What Is the Question?’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले आणि देव कण अर्थात ‘God Particle’ हा शब्द रूढ केला. प्रकाशकाला जे साध्य करायचे होते ते त्याने निर्विवादपणे साध्य केले. परंतु वैज्ञानिक अशा प्रकारच्या बाष्फळ चर्चेत गुंतून न पडता आपला संशोधनाचा वसा पुढे चालवतो आणि युवा पिढीला नाविन्याची, आधुनिकतेची आणि प्रगल्भ होण्याची कास धरण्यास प्रवृत्त करत असतो.
- डॉ. नितीन शिंदे यांच्या लेखातून

No comments:

Post a Comment