डॉ. बाबासाहेब तमाम
बहुजनांना संदेश देतात- 'देव, दैव यावर विसंबून राहू नका भविष्य, मुहूर्त,चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका !'
तर
स्वामी विवेकानंद देखील
नेहमी म्हणायचे 'जो
पर्यंत या देशातील तरुण नशिबावर अवलंबून रहाणार आहे तो पर्यंत भारतासारख्या देशाला
मुळीच भवितव्य नाही !' क्रांतिसूर्य
जोतीराव ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांपर्यंत व आगरकर ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत
सर्वांनी 'नशिब' या संकल्पनेवर कडाडून हल्ला केलेला आहे. का बरं या लोकांनी नशीब या
संकल्पनेवर हल्ला केला ? आपलं
नेहमीचं एक वाक्य असतं ''नशिबात
असतं तसं घडतं !''
शिर्डीला एक जीप करून
दहा-बारा माणसे जातांना रस्त्यात अपघात होतो नवू माणसे मारली जातात दोन जबर जखमी -
तीही दवाखान्यामध्ये अत्यवस्थ - मरतील अशी अवस्था व एक जिवंत रहातो .
वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी बातमी 'देव
तारी त्याला कोण मारी !' नऊ
मेले, दोन दवाखान्यात, एकाला मात्र काहीच झाले नाही ! देव
तारी त्याला कोण मारी ! …. अरे
मग नऊ मारले ते कुणी मारले,असा
विचार सुद्धा मनामध्ये येत नाही. कारण आपली विचार करण्याची पद्धतीच अशी असते की 'नशिबात असतं तसं घडतं.' असा विचार करतांना आपण म्हणतो खर तर सगळेच मरायचेच पण एकाला देवाने
वाचवलं बाकीच्या नऊ जणांना डायरेक्ट मरू दिलं, तर दोघांना इनडायरेक्ट मरणाच्या दारात सोडून दिलं.
'नशिबात असतं तसं घडतं' हा संस्कार तुमच्या माझ्यावर
बालपणापासूनच लादला गेलेला आहे. भारतीय समाजाची जातीव्यवस्थेची संपूर्ण चौकट या
नशीब या संकल्पनेवरच उभी आहे. …
बाबा रे तू ब्राह्मण
जातीमध्ये जन्माला आलास, कारण
तुझं तसं नशीब आहे ! बाबा रे तू दलित किंवा हलक्या जातीत जन्माला आलास, कारण तुझं नशीब तसं आहे ! तुझं जसं
प्राक्तन आहे त्या पद्धतीने तुझा जन्म झालेला आहे. आणि जे तुझ्या वाट्याला आलं आहे
ते तू निमूटपणाने भोगलं पाहिजे ! अश्या प्रकारची मानसिकता नशिब या संकल्पनेखाली
लादण्यात आली आणि अत्यंत अमानुष,वाईट
असणारी ,या देशाचं प्रचंड नुकसान करणारी
जातीव्यवस्था तब्बल २००० वर्षे या देशामध्ये निमूटपणे टिकू शकली.
सृष्टीनियंता आणि नशीब
विसाव्या शतकात निर्मिक /
सृष्टीनियंता अशी संकल्पना रुजली होती.
तरीही आपण कल्पना करू -
या संपूर्ण सृष्टीचा एक निर्माता आहे आणि तो ही संपूर्ण सृष्टी गव्हर्न करतो, संपूर्ण सृष्टी तो नियंत्रित करतो. …
*आता नियंत्रण शक्य आहे का ते पाहू !
आता आपल्याला माहित आहे
की पृथ्वीवरील सध्याची लोकसंख्या ९०० ते १००० करोड (१०अब्ज ) च्या दरम्यान आहे. मग
या सर्व लोकांच नशीब ठरवणारा, लिहिणारा
कोणीतरी सृष्टीनियंता असला पाहिजे. मग हा सृष्टीनियंता एक आहे की अनेक आहेत, म्हणजे हिंदुंचा वेगळा मुस्लिम
समाजासाठी वेगळा, ख्रिश्चन
लोकांचा सृष्टीनियंता वेगळा आणि कुणाकुणाचा वेगवेगळा ! हे शक्य आहे का ?
आपल्या पैकी कोणीही
म्हणेल की नाही सृष्टीनियंता म्हटल्यावर एकच ! सर्वांचे नियंत्रण करणारा सृष्टीनियंता
हा एकच आहे !
जर आपल्या पृथ्वीवरील
सर्व माणसांचे नियंत्रण करणारा सृष्टीनियंता एकच आहे तर त्याचे या पृथ्वीवर देखील
अगदी बारीक असं लक्ष असलं पाहिजे. कारण कुठेतरी भूकंप होतो हजारो माणसे मारली
जातात, ते त्याच्या नियंत्रणाशिवाय शक्य
नाही नाही का ? म्हणजेच
पृथ्वीवरील अगदी बारीक बारीक गोष्टींवर त्याचे बारीक बारीक लक्ष असले पाहिजे.
मित्रांनो पृथ्वी हा एकच ग्रह आहे का ? नाही
! .. आपल्याला पुस्तकी अभ्यासात आलेले ९ ग्रह आणि विज्ञानाला शोध लागलेले असंख्य
ग्रह आहेत मग निदान या ९ ग्रहांवर तरी या नियंत्याचे बारीक लक्ष असले पाहिजे, कारण जो विज्ञान शिकला आहे, ज्याला विज्ञानाचे ज्ञान आहे त्या
प्रत्येकाला माहित आहे की जिथे गुरु आहे तिथे तो नसता तर पृथ्वीही आहे त्या ठिकाणी
नसती. पृथ्वीवरील सर्व घडामोडी आत्ताच्या पद्धतीने झाल्या नसत्या. एकूणच सर्व ग्रह
व सूर्य एकमेकांच्या गुरुत्वाकर्शणाने संतुलित आहेत. थोडक्यात एखाद्या ग्रहाने
थोडासा अतिरेकपणा करून आपली जागा हलवली तर पृथ्वीची जागा देखील ढळेल. आणि सगळी
परिस्थिती बदलेल. याचा अर्थ असा की या सृष्टीनियंत्याचं या नऊही ग्रहांवर नियंत्रण
आहे. आणि त्यांवर त्याचं बारीक लक्ष असलं पाहिजे. बरं हे सर्वजण सूर्याच्या भोवती
फिरत असतात. सूर्याने थोडा अतिरेक केल्यास या भोवती फिर्नार्यांचे काय ? म्हणजेच या सृष्टीनियंत्याच
सुर्यावरही बारीक लक्ष असले पाहिजे. हा सूर्य आपल्या असंख्य लहान मोठ्या
मित्रांसमवेत (ताऱ्यान्सोबत) आकाशगंगेत असतो आणि ही आकाशगंगा आपल्या अगणित
मैत्रिणी (आकाशगंगा ) सोबत विशिष्ठ अंतर राखून एकमेकांचे संतुलन राखून फिरत असतात.
यातील काहींनी जरा अतिरेक केला तर आपल्या आकाशगंगेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
म्हणजेच या सृष्टीनियंत्याचं सर्व आकाशगंगांवर बारीक लक्ष असलं पाहिजे. त्याच्या
आज्ञेशिवाय त्या मुळीच हलत नसल्या पाहिजेत.
आता आपण थोडं उलट्या
बाजूने जाऊ ..
प्रचंड आकाशगंगा म्हणजे
किती आकाशगंगा .. असंख्य आकाशगंगा .. त्यांच्या मानाने वाळूच्या कणा एव्हढी आपली
आकाशगंगा आहे. त्यावरही हा नियंता बारीक लक्ष ठेऊन आहे. या आकाशगंगेमध्ये प्रचंड
मोठाले सूर्य आहेत .. अगदी आपल्या सूर्यापेक्षाही प्रचंड मोठाले तारे आहेत .. त्या
सर्व ताऱ्यांवर तर लक्ष आहेच पण त्या सर्व अब्जावधी तार्यांपैकी एका चिटुकल्या
सूर्यावरसुद्धा आपल्या सृष्टीनियंत्याचं लक्ष आहे. या चिटुकल्या सूर्याभोवती नऊ
पिटुकले पिटुकले ग्रह फिरत आहेत त्यावरही या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे.
त्यातल्या गुरु, शनी
सारख्या मोठ्याच नव्हे तर पृथ्वीसारख्या पिचुकल्या ग्रहावर त्या सृष्टीनियंत्याचं
बारीक लक्ष आहे. या पिचुकल्या ग्रहावर हजार कोटी माणसे आहेत त्यावर या
सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. या पिचुकल्या ग्रहावर एक आशिया नावाचा खंड आहे.
त्या खंडातल्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचा प्रांत आहे. त्या प्रांतात
रत्नागिरी नावाचे छोटुस शहर आहे आणि या रत्नागिरीतील खालच्या आळीतील कोण्या
राम्यावरही या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. आणि हा खालच्या आळीतील राम्या
कोणत्या ऑफिसमध्ये चिकटणार, तेही
तोच ठरवतोय. … आणि
या खालच्या आळीतील रामयाचं लग्न हेमामालीनिशी होणार की टूनटूनशी, ते ही तोच ठरवतोय ! …
मित्रांनो हे कुठेतरी
पोसिबल आहे का ? हे
शक्य आहे का ?
मित्रांनो एवढी मोठी
सृष्टी / विश्व निर्माण करणारा जर सृष्टीनियंता असेल तर त्याच्या दृष्टीने पृथ्वी
निर्माण झाली की नाही हे ही गौण आहे. … त्यातला
कोणी खालच्या आळीतील राम्या .. त्याचं लग्न .. त्याची नोकरी .. त्याच्या
आयुष्यातील घटना .. सकाळी चालायला गेला तर शेणावरून पाय घसरून पडला. - फ्रेक्चर
झाला .. हे सर्व तो ठरवतो हे शक्य आहे का ?
मित्रांनो एक कल्पना करू
की सृष्टीनियंत्याचा मुक्काम सध्या शेजारच्या आकाशगंगेवर आहे, समजा त्याने तिथून खालच्या आळीतील
राम्याला आशीर्वाद दिला ' जा
तुझ लग्न कट्रिनाशी होईल ' तर हा आशीर्वाद खालच्या आळीतल्या
राम्यापर्यंत पोहचेपर्यंत अब्जावधी वर्षे लागतील. हा आशीर्वाद अगदी प्रकाशाच्या
वेगाने आला तरी अब्जावधी वर्षे लागतील तो पर्यंत ह्या खालच्या आळीतील राम्याची
हाडे सुद्धा शिल्लक रहाणार नाहीत हो ! एवढी मोठी ही सृष्टी / विश्व आहे, याचे पुरावे आज आपल्या विज्ञानाकडे
उपलब्ध आहेत. या पद्धतीने तुमचं माझं भविष्य कोणीही ठरवू शकत नाही ! कोणीही
सृष्टीनियंता तुमच्या माझ्या जीवनामध्ये एवढा रस घेईल असे वाटत नाही ! …
तरीही ज्याला असं वाटतंय
की ''आपल्या नशिबात असतं तस घडतं'' त्याने आजपासून घरात तुमची जी
कामाची आयुध असतील विद्यार्थ्यांनी पुस्तके असतील ती गेस वर किंवा चुलीत जाळून
टाकावीत, आणि आरामात पलंगावर झोपून जावे !
असेल तुमच्या नशिबात तर व्हाल ग्रेज्युएट -अगदी झोपल्या झोपल्या व्हाल ! असेल
तुमच्या नशिबात नोकरी,तर
मिळेल - अगदी झोपल्या झोपल्या नोकरी मिळेल ! नशिबात असेल तर लग्न होईल ,होईल लग्न - अगदी झोपल्या झोपल्या लग्न होईल ! ... होईल का
?
आता तुम्ही म्हणाल - … - 'नाही नाही सर कर्तुत्व करावं लागतं
त्याशिवाय होत नाही !' …
अहो कर्तुत्व केल्याशिवाय
कोणतीही गोष्ट हात नाही हा तुमच्या माझ्या जीवनातला रोजचा अनुभव आहे. तर मग नशिबात
असेल तसे घडेल असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार रहातो काय ?
तुमच्या माझ्या जिवनात
कर्तुत्व केल्याशिवाय काही घडत नसेल तर खाटेवर पडून काही होणार नाहीच. काही
मिळवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी काम करावे लागेल, अपार मेहनत घ्यावी लागेल. आणि
नेमक्या संधीचा नेमकेपणाने फायदा उठवावा लागेल, तेंव्हा काही बाबींमध्ये आपल्याला आपल्या जीवनात यश मिळेल हे जर
आपल्याला माहित असेल तर 'नशिबात
असतं तस घडतं' म्हणण्याला
काय अर्थ आहे ? आणि
जर आपलं नशीब आधीच ठरलेलं असेल तर कर्तुत्व केलं काय अथवा न केलं काय , तसंच घडायला हवं दुसर काही वेगळ
घडायलाच नको !
त्यामुळे मित्रांनो आपल्या
आयुष्यात एक तर नशिबाला जागा असू शकते किंवा कर्तुत्वाला तरी जागा असू शकते !
दोन्हीही गोष्टींना एकत्रितपणे आपल्या जीवनामध्ये जागा असू शकत नाही ! पण आपली
सर्वात मोठी अडचण हि आहे की आपण दोन्ही दगडींवर पाय ठेऊन असतो. ना आपल्या
कर्तुत्वावर आपला विश्वास असतो ना धड नशिबावर विश्वास असतो !
आता म्हणाल - 'कर्तुत्व करावं लागतं पण त्याला नशिबाची साथ लागते.'
म्हणजे काय ?
निव्वळ भोंगळ भाषा -
दुसरं काही नाही ! कारण आपलं नशीब आधीच ठरलेलं असतं अस म्हणण म्हणजे तुमच्या
कर्तुत्वाला काहीच अर्थ उरत नाही ! आणि नशिबाने काही मिळणार असेल तर काही
करण्यासारख उरतच नाही !
मित्रांनो हे सर्व
वाचल्यावर / ऐकल्यावर तुमचा नशिबावर अजूनही विश्वास आहे काय ?
त्यातूनही जर कोणी होय
म्हणत असेल तर मी तुमच्याजवळ येवून एक मुस्कटात जोरदार झापड हाणतो ! ... काय होईल
हो ?
मी तर म्हणेन 'मी नाही मारली ! तुझ्या नशिबात होती तू खाल्ली ! माझ्या
नशिबात होती मी मारली ! मला वरून आदेश आला दिली ठेऊन !
चालेल काय हे तुम्हाला ?
मला माहित आहे आपल्यापैकी
कुणालाही हे चालणार नाही ! .. 'लय
श्याना आलायस' असं
म्हणून तुम्ही पोलिसाला बोलावून 'हा
डोक्यावर पडलाय याला मेंटल हॉस्पिटल ला भरती करा' असा सल्ला त्यांना द्याल. कारण तुम्हाला माहित आहे की माणसाच्या
मेंदूने निर्णय घेतल्याशिवाय झापड मारणे शक्य नाही.
मित्रांनो यावरून
आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जेंव्हा मिळतात तेंव्हा
आपण नशिबावर विश्वास ठेवत नाही. पण जेंव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला
शोधता येत नाहीत, तेंव्हा
आपण नशिबाचा ढोल बडवतो. व जीवनातील पराभव नशिबावर ढकलत असतो.
मित्रांनो समजा - तुमच्या
बहिणीचा तिच्याच नवर्याने खून केलाय, पोलिस
तुम्हाला सांगत आहेत की 'तुमच्या
बहिणीच्या खुनामध्ये तिच्या नवर्याचा हात आहे.' यावर आपण असं म्हणाल का - 'जाऊ
दे ओ साहेब ! तिच्या नशिबात होत ते घडलं ! माझ्या बहिणीच्या नशिबात लिहील होत तिचा
खून होणार,
झाला ! तिच्या नवऱ्याच्या
नशिबात होत त्याने तिचा खून करावा , त्याने
केला ! वरच सर्व ठरलेलं होतं, त्याप्रमाणे
झालं ! तुम्ही तुमच्या घरी जाउन गप्प बसा ! मी माझ्या घरी गप्प बसतो ! 'जसं नशिबात असतं तसं घडतं !'…
मित्रांनो आपण 'आपल्या नशिबात असतं तसं घडतं !' हे धोरण स्वीकारले की लोकशाहीला
काही जागा उरत नाही. कायदाव्यवस्थेला काही जागा उरत नाही. तुमच्या माझ्या
कर्तुत्वालाही जागा उरत नाही. आपल्याला मग 'ठेविले
अनंते तैसेची …. असं
म्हणून झोपून रहावे लागेल ! .. पण यावर कोणीही विश्वास ठेवत नाही कारण आम्हांला एक
सवय लागलेली आहे दोन दगडीवर पाय ठेवण्याची ! तळ्यात मळ्यात ! तळ्यात मळ्यात !
मित्रांनो .. आपण असफल
होत असू, तर त्याला काही कारणे आहेत - कदाचित
संधी अनुकूल नसेल, प्रयत्न
कमी पडत असतील ह्याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे आणि करणे समजून घेतली पाहिजेत.
मित्रांनो मला एक छत्रपती
शिवरायांच्या काळातील उदाहरण आपल्याला द्यावेसे वाटते . -
''गड आला पण सिंह गेला. ''
ही कथा आपल्याला सर्वाना
माहित आहे. - तानाजी मालुसरे आणि मावले घोरपड लाऊन गडावर चढले - नंतर तुंबळ युद्ध
झाले - युद्धामध्ये तानाजी मालुसरे पडले (मारले गेले) - तानाजी पडले तसे सर्व
मावळे ज्या दोराने वर आले होते त्या दोराने खाली उतरू लागले - तानाजीचे भाऊ
सूर्याजी याने एकच मोठे काम केले की जाउन दोर कापले आणि मावळ्यांना म्हणाला -'अरे तुमचा बाप इकडे मरून पडलाय,आणि तुम्ही पळताय ! कड्याचे दोर मी कापून टाकलेत, आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक
म्हणजे भेकडासारखे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शुरांसारखे लढा, जिवंत रहा, विजय संपादन करा ! उड्या टाकून
मेलात तर नरकात जाल , लढताना
मेलात तर स्वर्गात जाल ! जिवंत राहिलात, विजय
संपादन केलात तर सुवासिनी तुम्हाला ओवाळतील !
मित्रांनो स्वर्ग -नरक हा
मुद्दा इथे सोडून द्या पण मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला परतायचे नाही, त्यामुळे एक तर उड्या टाकून मरा, नाहीतर शुरांसारखे लढा आणि जिवंत
रहा. ..
आणि मित्रांनो अशा
परिस्थितीत माणसे नेहमी शुरांसारखे लढण्याचाच मार्ग स्वीकारतात, आणि तोच मार्ग मावळ्यांनी स्वीकारला
आणि गड जिंकला.
मित्रांनो - तुमच्या
माझ्या जीवनामध्ये नशिबा सारख्या काही भोंगळवादी संकल्पना रुजवल्या गेल्या आहेत या
संकल्पनांचे दोर पकडून आपण पलायनवाद स्वीकारतो आणि जीवानातून पळ काढतो.
मित्रांनो आजपासनं आपल्या
जीवनातले नशिबाचे दोर कापून टाका ! जीवनातल्या प्रसंगांना शर्थीने तोंड द्या !
कदाचित पराजित व्हाल , कदाचित
विजयी व्हाल,
जरी पराजित झालो तरी आपण
पूर्ण ताकदीनिशी लढलो याचं समाधान घेऊन आपल्याला जगता येईल त्यामुळे यापुढे कधीही
नशिबाचे दोर पकडू नका ! नशिबाचे दोर कापून टाका ! नशिबाचे दोर कापून टाका !
सं/ले.- विवेक घाटविलकर.
(अ. भा. अं. नि. सं. रत्नागिरी)
संदर्भ:अभाअंनिसं चे
साहित्य
No comments:
Post a Comment