Saturday, August 1, 2015

तू मुर्ख आहेस

तू हिंदू असशील तरी मुर्ख आहेस,
तू मुसलमान असशील तरी मुर्ख आहेस …
तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.
कारण तुला जगायला 'धर्माचा' आधार लागतो.
समोरच्याने सांगितलं, तु निमूटपणे ऐकलंस
तुझ्या विचारांना तूच चौकटीत बसवलंस.
कारण पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडली नाहीत कधी,
ना कधी त्या प्रश्नांनाच जाब विचारायची हिंमत झाली तुझी.
तू अडकत गेलास आणि स्वत:ला अडकवत राहिलास.
पण,
तू धर्म पाळतोस म्हणून तुझी अधोगती झाली असं नाहीच,
तू धर्म पाळतोस म्हणून तुला यश आलं नाही, असंही नाही
कारण प्रगतीच्या, यशाच्या व्याख्याच तुझ्या नजरेत वेगळ्या भरतात.
तो धर्म ज्याचा तू पुरस्कार करतोयस, तो धर्म कुठून आणलास ?
याचा तुला ठाव नाही.
आईबापांनी हिंदू सांगितलं कि तु हिंदू समजतो स्वत:ला,
आईबापांनी मुसलमान सांगितलं असतंस तरी तु तेच समजलं असतंस,
कुठल्याही धर्माचा तू स्वीकार केलास असताच ना ?
तुझ्याच धर्माप्रमाणे देव एकच आहे,
तुझ्याच धर्माप्रमाणे देव चराचरात आहे,
मग तरी तुला २० मैल जाऊन देवळात जायची गरज भासते ?
घराशेजारी असलेलं मस्जिद तुला पहावत नाही….
तुझ्या मनातच देव असता तर तुला देव कुठेही दिसला असता.
पण मुळात तुला देव शोधायचाच नाही,
तुझा विश्वास आहे चमत्कारांवर,
तुझा विश्वास आहे दैवी शक्तींवर.
तुला हवंय कुणीतरी ज्याच्यासमोर तुझी गाऱ्हाणी ऐकवू शकशील,
तुझ्या कर्तुत्वाने कुणाला खुश करू शकशील,
बदल्यात मिळेल तुला घबाड काहीतरी,
नाहीतर स्वर्गात जागा एखादी,
वा अप्सरेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची संधी कदाचित ….
हा सगळा आंधळा विश्वास तुला धर्म देतो.
आणि म्हणूनच,
तू मुर्ख आहेस, कारण तू हिंदू आहेस,
तू मुर्ख आहेस, कारण तू मुसलमान आहेस,
तू मूर्ख आहेस, कारण कुठल्यातरी धर्मात अडकणारा आहेस.
तू मूर्ख आहेस, कारण तू तुझ्या विचारांना बंधनात अडकवलंयस.
अर्थात,
तूझ्या नजरेत फार काही वेगळा नाहीच मी !

3 comments: