Sunday, October 16, 2022

बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

 बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

-श्री. कुमार मंडपे

     काही बाबा हवेत हात फिरवून सोन्याची साखळी काढतात, हिन्याची अंगठी काढतात, तर काही इलेक्ट्रॉनिक्सची घड्याळे, मूर्ती काढून आपल्या भक्तांना त्यांच्या लायकी प्रमाणे अर्पण करतात. इतक्या प्रचंड प्रमाणात सोने, हिरे निर्माण करणारे असंख्य बाबा, महाराज, स्वामी, भगवान, आपल्या देशात असतानाही आमच्या अर्थमंत्र्यांना हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीसाठी देशोदेशी फिरावे लागते आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणताही बाबा देशाच्या मदतीसाठी धावून आला नाही. कोणत्याही बाबाने सोन्याचा डोंगर निर्माण केला नाही, की एखाद्या नदीत किंवा समुद्रात हात घालून पाण्याचे पेट्रोल तयार केले नाही. हातचलाखीने हवेतून विभूती, रुद्राक्ष काढून देऊन चमत्काराचा दबदबा निर्माण करता येतो. लोकांना नादी लावून प्रचंड पैसा कमविता येतो. म्हणून या बाबांना देशाचे दारिद्रय नाहीसे करता येत नाही.

     एखाद्या बाबाने कोरड्या विहिरीला पाणी लावून दिल्याचे सांगितले जाते. नदीतून जाताना नदी दुभंगते व बाबांना पैलतीरी जाण्यासाठी वाट दिली जाते. इतकी प्रचंड दैवी शक्ती त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. पण अशा बाबांना दरवर्षी होणारा महापूरांचा प्रलय थांबविता आला नाही किंवा सतत दुष्काळग्रस्त असलेल्या भागात पाऊस पाडता आला नाही.

     काही बाबा, महाराज, करणी करण्यात, मूठ मारण्यात तरबेज असल्याचे सांगितले जाते, घराघरातून, गावागावातून असे प्रकार केल्याचे भासवून घरातील शांतता नाहीशी केली आहे. आणि गावागावातून भांडणे निर्माण केली आहेत. अशा बुवांनी मूठ मारून पाकिस्तानी आक्रमकांना जमीनदोस्त केल्याचे ऐकण्यात नाही. काश्मिर, पंजाबात होणारे निरपराध लोकांचे शिरकाण थांबविता आले नाही. अहो कसे थांबविता येणार! कारण तशी अतिंद्रिय शक्ती कोणाकडेही नसते.

     बुवा हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य असतात. त्यांच्या अंगावर असणारी कफनी सुद्धा त्यांना शून्यातून निर्माण करता येत नाही. एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. कायिक रासायनिक बदल घडून यावे लागतात. तेव्हा एखादा पदार्थ तयार होतो. नुसता हवेत हात फिरविला आणि वस्तू तयार केली असे घडत नाही. ही शुद्ध बनवाबनवी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

     कोणत्याही बुवा महाराजांनी, समाजासाठी काहीही केले नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधून समाजाचे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केले आहे. सामाजिक विषमतेच्या विषवल्लीला खतपाणी घालून पोसले आहे. मठ, आश्रम बांधून अनैतिक कार्ये मोठ्या प्रमाणात केली आहेत. समाजात दैववादाच्या जंतूंचा प्रसार केला आहे. आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

     थोडक्यात आपल्या जवळ जे नाही ते आहे असे भासविणारा, तो बुवा अध्यात्मिक वा पारलौकिक क्षेत्राशी स्वतःला जोडून दैनंदिन जीवनात दिशाभूल वा शोषण करणारा तो बुवा आणि श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार म्हणजे बुवाबाजी होय.

     मग लोक बुवाकडे का जातात? हा प्रश्न निर्माण होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रश्न निर्माण होतात. हुंड्याच्या बाजारामुळे मुलीचे लग्न ठरण्यात अडचणी येतात. इच्छा असूनही घरात अपत्य खेळत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. नवरा नांदवत नाही. नवऱ्याची दारू सुटत नाही. घरातील व्यक्तीला असाध्य रोग झाला आहे. अशा नानाविध अडचणींमुळे व्यक्ती अगतिक बनते, आणि बुवाला शरण जाते. भारतीय संस्कृतीत अवतार कल्पना प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परमेश्वराचा अवतार असलेला बुवा आपणास मार्गदर्शन करेल. संकटात मदत करेल अशा वेड्या आशेने लोक बुवाकडे जातात आणि कायमचे जायबंदी होतात.

बाबांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. इंग्लिश, हिंदीवर प्रभुत्व असते. त्यांच्याकडे संभाषणचातुर्य असते. याउलट काही बाबा ठार पागल असतात. स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव

नसते. त्यांच्या भोवती असणारे धूर्त भक्त या स्थितीचा हुशारीने उपयोग करून घेतात. बाबांच्या चमत्कारांच्या पद्धतशीर कंड्या पिकवितात. प्रसारमाध्यमांचा पद्धतशीर उपयोग करून घेतात. बाबांच्यासाठी मठ, समाध्या, देवळे बांधतात. बाबांचे महत्व वाढवून अर्थार्जन करतात. 

     बुवाबाजीची तंत्रे ठरलेली असतात. बाबांच्या सामर्थ्याचा कणखर पाया म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत होय. जरी बाबांचे भाकित चुकले तरी या सिद्धांताची मदत बाबांना घेता येते. गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणजे हा जन्म होय व म्हणून या जन्मात कितीही चांगले वागले तरी गेल्या जन्मीचे फळ या जन्मात भोगून संपवावे लागते व या जन्मातील कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो. म्हणजे बाबांचे भाकित चुकले नसून पूर्व जन्मीचा भोग आहे असे भक्ताला पटविता येते. याला म्हणतात कर्मविपाकाचा सिद्धांत.

    बाबांच्या तंत्राचा दुसरा मुद्दा म्हणजे संभवतेच्या नियमाचा (law of probability) आधार होय. बाबा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात ते सर्व प्रश्न द्विपर्यायी असतात. उदा. मी परीक्षेत पास होईन का? मला मुलगा होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे होय, नाही स्वरूपाची असतात. त्यामुळे कोणतेही भाकित केले तरी ५० ते ६० टक्के भाकित बरोबर येतेच. मुलगा झाला तर हत्तीवरून साखर वाटत बैंड लावून मठात यायला सांगितले जाते. त्यामुळे बाबांची प्रसिद्धी मोठ्याप्रमाणात होते आणि मुलगी झाली तर? गेल्या जन्मीचे पाप म्हणून व्यक्ती घरी स्वस्थ बसून राहते. माणसाचा स्वभावच आहे की, एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर गावभर सांगत सुटायचे आण अपयश आले तर तेरी भी चूप और मेरी भी चूप.

    बाबांच्या तंत्राचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, अफवा पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न होय. उदाहरणार्थ बाबांची थुंकी अंगाला चोळली असता महारोगी बरा होतो. बाबांच्या स्पर्शाने आंधळा बघू लागतो. पांगळा चालू लागतो, मुका बोलतो. पुरावा विचाराल तर हजार मैलावरील गाव सांगितले जाते. इतक्या दूरवरची चौकशी सामान्य माणसांना अशक्य असते.

     अशा बुवाबाजीला जर सुरूंग लावायचा असेल तर प्रत्येक गोष्ट पदर पसरून स्वीकारण्याचे सोडून दिल पाहिजे. उलट चमत्काराची चिकित्सा केली पाहिजे. सकस शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दाराशी नेली पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून मिळाले पाहिजे. प्रत्येक भारतीय मन शोधक व पुरुषार्थी बनविले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रबोधन करून माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे.


=================================

Monday, April 25, 2022

यात आश्चर्य ते काय?

 यात आश्चर्य ते काय?......य.ना.वालावलकर

धर्म आणि समाजजीवन या संबंधीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्यू(Pew) नावाचे एक चर्चामंडळ (फ़ोरम) अमेरिकेत आहे. या मंडळाने अमेरिकन नागरिकांच्या धर्मज्ञानासंबंधी एक सर्वेक्षण केले.

त्यांनी मुख्यत्वेकरून ख्रिश्चन धर्म आणि बायबल यांवर आधारित 32 प्रश्न काढले. ती प्रश्नावली 3400(तीन हजार चारशे) अमेरिकन नागरिकांना पाठविली. या प्रश्नावलीत अन्य प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ यांवरही काही प्रश्न होते.  शेवटी " मी धार्मिक/अज्ञेयवादी/निरीश्वरवादी आहे."  यांतील एक पर्याय उत्तरदात्याने निवडायचा होता.

आलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून नि:संदिग्धपणे असे आढळले की : " ईश्वरवादी व्यक्तींच्या धर्मज्ञानापेक्षा निरीश्वरवाद्यांचे धर्म आणि धर्मग्रंथ यांसंबंधीचे ज्ञान लक्षणीय प्रमाणात अधिक असते."

"हा निष्कर्ष धक्कादायक आहे. विस्मयकारक आहे."अशी प्रतिक्रिया कांही अभ्यासकांनी व्यक्त केली.

.....खरे तर या निष्कर्षात आश्चर्यकारक ते काय? कारण:

1. धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

2. धर्मातील अनेक तत्त्वांच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो. त्यांवर श्रद्धा ठेवण्याविना अन्य पर्याय नसतो. म्हणून धार्मिकांना श्रद्धाळू असावेच लागते. श्रद्धा ठेवली की चिकित्सक बुद्धी कुंठित होते.

3. बहुसंख्य धार्मिक व्यक्ती विचारवंत नसतात तर बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.

4. जागतिक लोकसंख्येत धार्मिकांचे प्रमाण 80% + आहे; तर नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण 93% आहे.

5.वरील सत्यविधान 4 वरून दिसते की नास्तिकांचा बुद्ध्यंक(IQ) हा धार्मिकांच्या बुद्ध्यंकाहून मोठा असतो. (हे विधान वर्गाविषयी आहे. एखाद्या व्यक्तिविषयी नाही.)

6.बहुसंख्य धार्मिकलोक रूढी, परंपरा, कर्मकांडे, सरमनात/ कथाकीर्तनात ऐकलेली मिथके/भाकडकथा, येशूने/देवाने , संतांनी केलेले तथाकथित चमत्कार इत्यादि गोष्टींनाच धर्म मानतात. अधिक विचार करत नाहीत. धर्मग्रंथ/तत्त्वज्ञान वाचत नाहीत. वाचले तर अर्थ समजून घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे धर्मज्ञान यथातथाच असते.

7.एका विचारवंताने म्हटले आहे:"पूर्वी आस्तिक होतो. पण नंतर मी धर्मग्रंठ अभ्यासले." हे पटण्यासारखे आहे. नास्तिकतेच्या प्रसारासाठी धर्मग्रंथ हे प्रभावी साधन ठरू शकते. हे ग्रंथ विचारपूर्वक अर्थ समजून वाचणार्‍या धार्मिकाचे परिवर्तन नास्तिकात होऊ शकते. त्यामुळे अनेक नास्तिकांना चांगल्यापैकी धर्मज्ञान असते. (हिंदूंच्या बहुतेक धार्मिकविधींचे मंत्र संस्कृत भाषेत असतात. तेव्हा अर्थ कळण्याचा प्रश्नच नसतो.)

वरील विवेचन लक्षात घेतले तर प्यू फोरमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक वाटू नये.

**********************************

Sunday, April 29, 2018

मूर्तीत ताकद असते?

अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:
......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया, सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्याचे डोळे फिरले. "ही सारी दौलत आम्ही लुटणार " असे त्याने तिथेच जाहीर केले. तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले, "हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील."
......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले. गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली. सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली. तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही. पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा! धन्य धन्य ते परम भक्त ! त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.
.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो? सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही. ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही. त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते. म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे. असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो. डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते.! यावरून निर्जीव देव स्वतःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ (अंध)श्रद्धा !
- यनावाला

Sunday, January 28, 2018

डॉ. दाभोलकर यांची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके online खरेदीसाठी उपलब्ध. खालील लिंकवरून आपण ती खरेदी करू शकता.
१) श्रद्धा अंधश्रद्धा
Amazon- http://amzn.to/2jKY6qw
२) विचार तर कराल?
Amazon- http://amzn.to/2A0lAvZ
३) मती भानामती
Amazon- http://amzn.to/2jIzsqv
४) भ्रम आणि निरास
Amazon- http://amzn.to/2DE3ULL
५) तिमिरातून तेजाकडे
Amazon- http://amzn.to/2E98jDj
६) अंधश्रद्धा विनाशाय
Amazon- http://amzn.to/2DMdziF
७) प्रश्न मनाचे
Amazon- http://amzn.to/2DNbnar
८) अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
Amazon- http://amzn.to/2naxTQi
९) अंधविश्वास उन्मूलन (भाग पहला): विचार
Amazon- http://amzn.to/2jbYXg4
१०) अंधविश्वास उन्मूलन (भाग दुसरा): आचार
Amazon- http://amzn.to/2BviEq8
११) अंधविश्वास उन्मूलन (भाग तिसरा): सिद्धांत
Amazon- http://amzn.to/2EauCZe
१२) लढे अंधश्रद्धेचे
Flipkart- https://amzn.to/3kNbQgS
१३) ठरलं डोळस व्हायचंच
Amazon- http://amzn.to/2DHXuLt
१४) ऐसे कैसे झाले भोंदू
Amazon- http://amzn.to/2DAVlNM

Wednesday, April 19, 2017

थोडक्यात महत्वाचे

*अंधश्रद्धा निर्मूलन*

(1) स्त्री-पुरुष/मुलगा-मुलगी दोघेही शक्ती बुध्दीच्या बाबतीत सारखेच असतात.
(2) मंत्र, तंत्र,नवस, बळी, प्रसाद यामुळे मुल होणे, मुलीचा मुलगा होणे या गोष्टी कधीही शक्य नाहीत
(3) "अंगात येणे" हे देवीमुळे शक्य होत नाही, तो मानसिक आजार, संमोहनाची एक अवस्था किंवा ढोंग  आहे.
(4) कोणाकडेही दैवी शक्ती नसते.
(5) कोणताही चमत्कार, भौतिक अथवा रासायनिक विज्ञानांमधल्या तत्वावर आधारलेला असतो किंवा हातचलाखीने केलेला असतो.
(6) कोणालाही कोणतीही गोष्ट हवेतून काढता येत नाही.
(7) चमत्कार करुन कोणाचीही फसवणूक करणे हा गुन्हा आहे.
(8) मंत्र, तंत्र, ताईत, अंगारा, गंडे, दोरे, उतारा यांनी कोणताही आजार बरा होत नाही.
(9) आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवावर कोणताही परिणाम होत नाही.
(10) आपले भविष्य आपल्या मनगटात असते, आपण आपले भविष्य बनवू शकतो.
(11)  ज्योतिष हे विज्ञानासारखे शास्त्र नाही.
(12) भानामतीमुळे घरातील वस्तू धडपडतात, डबे फळीवरुन खाली पडतात, वस्तू घराबाहेर फेकल्या जातात, कपडे फाटतात, कपडे पेटतात, पिठात राख मिसळते, अन्नात वाळू पडते, अंगावर बिब्बाच्या फुल्या उमटतात.  घरावर लिंबू, दगड पडतात.  भानामतीमुळे अशा काही गोष्टी घडतात असे लोक समजतात परंतु ते खरे नाही.
(13) या जगात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.
(14) भानामती घरातील मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती घडवत असते.
(15) बाह्य प्रेरणेशिवाय जागची वस्तू हलत नाही.
(16) करणी, मुठ, भानामती या गोष्टी खोट्या आहेत.
(17) निसर्गात घडणारी कोणतीही घटना शुभ किंवा अशुभ नसते.
(18) "नवस करुन हवे ते मिळविता येते" हा गैरसमज आहे.
(19) नवस फेडण्याच्या प्रयत्नात माणसाचे आर्थिक, शारीरिक नुकसान होते.
(20) स्वत:च्या प्रयत्नाने आपण आपली प्रगती करु शकतो.  आपले भविष्य आपल्या हातात म्हणजे प्रयत्नात असते.
(21) माणूस मेल्यानंतर त्याची राख होते किंवा माती होते, भूत होत नाही.
(22) भूत ही एक कल्पना आहे. ते सत्य नाही.
(23) निर्भय होऊन, धीट होऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे.
(24) साप, नाग आपली दैवते नाहीत, पण मित्र आहेत.
(25) आपल्याकडे आढळणारे बरेच साप बिनविषारी असतात, फक्त नाग, मण्यार, घोणस, फुरसे या जातीचे साप विषारी असतात.
(26) विषारी साप चावल्यास दाताच्या दोन खुणा उमटतात.
(27) विषारी साप चावल्यास त्या व्यक्तीला प्रतिविषाचे इंजेक्शन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात न्यावे, इतर कोणत्याही उपायाने  विष उतरत नाही.

Monday, April 17, 2017

एक गोष्ट

थोडं थांबून शांत मनाने वाचावी
अशी एक गोष्ट !!
******
ब्राझील देशातील थेन चिकीनो स्कार्पा नावाच्या एका गर्भ श्रीमंत माणसाने एक गोष्ट घोषित केली की, त्याच्या कडे असलेली करोडो डाॅलर किमतीची बेंटली कार तो दफन करणार..!!
मृत्युनंतरच्या जिवनात ही ऐशोरामात या कार मधून फिरण्याची त्याची मनिषा पारलौकीक जगातही पूर्ण होत रहावी , हा त्याचा उद्देश असल्या चेही त्याने जाहिर केले.

अर्थातच माध्यमांनी त्याच्या या विचित्र घोषणेला प्रचंड प्रसिद्धी दिली. देशभर चर्चा सुरू झाली. या चर्चेचा सूर नकारात्मक होता. थेन चिकीनो वर प्रचंड टिका करण्यात आली. एवढी किमती कार पुरून टाकणे हा मुर्खपणा असल्याचे लोकांनी म्हटले आपणास ही कार विकायची नव्हती तर  दान करून टाकली असती तर पुण्य तरी मिळाले असते असा सल्ला ब्राझिलीयन मेडिया ने दिला...
😃

हे कृत्य म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा विनाश असल्याचेही अनेकांनी म्हटले.. तेथील काही राष्ट्रभक्तांनी त्याला देशद्रोही ही संबोधले.

अखेर सर्व प्रकारच्या टिकेला सामोरे जात थेन चिकीनो ने त्याच्या स्टेनली कारच्या दफन विधी समारंभाची तारीख ही जाहिर करून टाकली.
 
झाले...अखेर तो दिवस उजाडला.
प्रचंड गर्दी जमली.
विविध माध्यमांचे अनेक प्रतिनिधी लाईव कवरेज साठी हजर होते..
🏎  🚗  🚕 🚙

येथे कहाणीला ट्विस्ट आहे .
आणि तसा तो नसता तर
हा किस्सा आपणासाठी मी लिहीला ही नसता...
आणि जगभरच्या माध्यमांनी त्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ही दिली नसती...

थेन चिकीनोने घराच्या अंगणातच कार पुरता येईल एवढा मोठा खड्डा खणून घेतला होता... थोड्याच वेळात ही महागडी कार पुरली जाणार होती.
तेवढ्यात थेन चिकीनो ने, तो ही कार दफन करू इच्छित नाही अशी घोषणा केली.. आणि हा दफन विधीचा ड्रामा एका अत्यंत आवश्यक अशा राष्ट्रीय कार्या साठी असल्याचे सांगितले.
ह्या गुपित राष्ट्रीय कार्याची उकल त्याने केली तेव्हा उपस्थितां नी टाळ्यांचा कडकडाट केला व थेन च्या जय जय काराच्या घोषणा दिल्या.
***
अवयव दानाचे महत्व माझ्या देशातील जनतेला कळावे हाच एकमेव पवित्र उद्देश ह्या दफन नाट्या मागे असल्याचे थेन ने सांगितले.

थेन चिकानो म्हणाला,
"लोकांनी मी महागडी / किमती कार दफन करणार म्हणून मला मुर्ख म्हटले. खरी गोष्ट तर ही आहे की ह्या कारपेक्षा ही खूप किमती असलेले अवयव आपण पुरून टाकता. हृदय, यकृत, फुफ्फुसे डोळे, मूत्रपिंडे आदी अवयव पुरून टाकणे हा मी करत असलेल्या मुर्खपणा पेक्षा खूप मोठा मुर्खपणा कळत नकळत आपण सारेच जण पिढ्यान पिढ्या करत आहात..!! आपल्या देशात हजारो लाखो रूग्ण अवयवांची वाट पहात आहेत. कोणी त्यांना दान दिले तर त्यांना नवा जन्म मिळणार आहे..!!
अनेकांचे प्राण यातून वाचू शकतील..!!
आज आपण ही अवयव दानाचा संकल्प करूया.

 ..अवयव दानाचा प्रचार व प्रसार करावा व ..ब्रेन डेड परिस्थितीत जरूर निर्णय घेऊन गरजवंतांना अवयव दान करुन मदत करावी .

Friday, April 7, 2017

मुहूर्त

बाळाला *काळे*
टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात *बालमृत्यूदर शून्य*
असता .

 गाडीला *लिंबूमिरची*
लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात *अपघातांची*
संख्या शून्य असती.

 पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच
*उद्योजक*
 झाले असते.

बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त *सुखी*
 दिसले असते.

कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरिजिस *यशस्वी*
झाली असती.

*यज्ञ*करून  जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता

*चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल.*

      मुहूर्ताचे वेड

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!

जन्माला येताना कधी मुहर्थ पाहत नाही. व मरतानाही पाहत नाहीत.

 तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

 सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे.

फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..

आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...?

पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?

95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?

 
 मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....?

 एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????

 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?

 अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....

तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :

  शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

 मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.

*स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

*जर तुमचं मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता  असेल... तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' चांगली वेळच असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.*

Wednesday, March 22, 2017



महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचाबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर
विशेषतः स्त्रियांसाठी महत्त्वाचा व्हिडीओ

Wednesday, August 17, 2016

जगदीश काबरे

1] मनुस्मृती,पुराणे आणि देवळे असा तिपेडी फास हिंदू समाजावर लटकवून भिक्क्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवतसुभ्याचं सोवळं वर्चस्व आजवर टिकवून धरलेलं आहे.या मर्मावर कुणी घाव घालताच एकजात सुधारक-दुर्धारक भट सापासारखे फुसफुसतात. कारण या तिपेडीवर प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनही गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावरील प्राणघातक धोंडी आहेत. या गोष्टी नष्ट करा! जाळून खाक करा!! की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच!!! ( प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ या पुस्तकातून साभार.)

2] जुने-जुनाट असणे हा विषय अभिमानाचा कसा असू शकतो ? एखादा माणूस अनेक वर्षे एकच जुनाट वस्त्र वापरत असेल तर त्यास आपण दारिद्र्याची, दुर्दैवाची खूण समजू की अभिमानास्पद वैभवाची ? मग ऐंशी टक्के माणसांना गुलाम ठरवणाऱ्या जुनाट संस्कृतीचा अभिमान का बाळगावा ? [नरहर कुरुंदकर, मनुस्मृती- इंद्रायणी प्रकाशन]

3] मुखें सांगे ब्रम्हज्ञान ।जन लोकाची कापितो मान ।।१।। ज्ञान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ।।ध्रु।। कथा करितो देवाची । अंतरी आशा बहु लोभाची ।।२।। तुका म्हणे तो चि वेडा। त्याचें हाणूनि थोबाड फोडा ।।३।।

4] महारासी सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥१॥  तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृ॥  नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती३॥[संत तुकाराम महाराज ]

5] वैज्ञानीक शोध लावणाऱ्यात एखादा तरी चमत्कारी-दैवी शक्तीधारी बाबा, बूवा, बापू, महाराज, साध्वी, पंडित आहे का? यांच्याकडे तर दैवी सिद्ध शक्ती असते म्हणे!
यांच्या तंत्रा-मंत्रात-पुजेत-पंचांगात आणि होमहवनात शक्ती असते म्हणे!! मग ह्या ''नमुन्यांनी" एखादा तरी शोध लावायला पाहिजे होता की नाही? पण यांनी आजपर्यंत एक तरी शोध लावला का? नाही ना? कारण मित्रांनो, बाबा,बुवा,महाराज,पंडित ही सर्व माणसे देवाधर्माच्या नावावर जगणारी व चलाखीने सर्वसामांन्याचे शोषण करणारी बांडगुळं आहेत.

वैज्ञानिक ,संशोधक शास्त्रज्ञ आणि ज्यांनी समानतेचे धडे दिले ते समाजसुधारक संतच आपले खरे हिरो व आदर्श आहेत. त्यांच्या संशोधन आणि अथक परिश्रमांमुळेच जनजागृती होऊन आज समाजास सुखी व आनंदमय जीवन लाभलेले आहे.या बांडगुळांमुळे नाही. म्हणुन पालकांनी आपल्या मुलामुलींवर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चिकित्सक विज्ञानवादी व बुद्धीप्रामाण्यवादी होण्याचे संस्कार केले पाहिजेत. तेव्हाच भारतात जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ पुन्हा तयार होतील.तरच प्रगत व बलशाली भारत निर्माण होईल.(^M^)  (^J^) (मनोगते)

Thursday, October 22, 2015

गुरुविण कोण लावितो वाट ?

बर्‍याच वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा आम्ही शालेय विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या वर्गावर पहिल्या तासाला येणार्‍या गुरुजींना फुलें देऊन नमस्कार करीत असू. सर्व गुरुजींचा पहिला तास कुठल्या ना कुठल्या वर्गावर असायचा. त्यामुळे त्यादिवशी सर्व गुरुजनांचे पुष्पपूजन होई. तसेच गायन, वादन, नृत्य अशा कला क्षेत्रांतील गुरूंचे त्यांचे शिष्य पूजन करीत. त्याकाळी गुरुपौर्णिमेचा संबंध शिक्षकांच्या, कलातपस्वींच्या, ज्ञानमहर्षींच्या सन्मानाशी होता. ते दिवस गेले.




संगीत, नाट्य, नृत्य, शिल्प अशा कलाक्षेत्रात गुरूंचे महत्त्व अजून टिकून आहे.कारण या कला गुरूकडूनच ग्रहण कराव्या लागतात. तिथे निवडक शिष्य असतात. आध्यात्मिक क्षेत्रात ठकसेन गुरूंचा सुळसुळाट झालेला दिसतो. कांही खरे सद्गुरू असतात. पण आजच्या जाहिरातींच्या कल्लोळात आणि झगमगाटात ते दिसेनासे झाले आहेत. गावोगावी मेळावे भरवून खरे सद्गुरू आपली भक्तसंख्या वाढविण्याच्या मागे नसतात. त्यांना प्रसिद्धीची आणि संपत्तीची हाव नसते. शिष्यांनी गुरूंचा शोध ध्यावा अशी अपेक्षा असते. पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना झटपट रेडिमेड हवे असते. त्यासाठी ते पैसे मोजायला तयार असतात.आपल्याला हवे तें ठकसेन गुरूंकडून मिळेल असे त्यांना वाटते. कारण ते जाहिरातींना बळी पडतात. असे भक्त त्यांच्या कच्छपी लागतात. ठकसेनांचा धंदा फोफावतो. आजच्या मार्केटिंच्या युगाचा हा अपरिहार्य परिणाम आहे. खरे सद्गुरू आणि भक्त यांची संख्या आता नगण्य झाली आहे असे दिसते. त्यांचा विचार या लेखात नाही. श्रद्धाळूंनी ठकसेनांच्या नादी लागून फसू नये, हा या लेखाचा हेतू आहे.


आता गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या पूजनाचा (आणि त्या गुरूंनी भक्तांकडून दक्षिणा लाटण्याचा) दिवस असा अर्थ रूढ झाला आहे. पूर्वी दैवी शक्तीचे चमत्कार करून दाखविणार्‍या बुवा,महाराज, स्वामी, बाबा यांची संख्या मोठी होती. पुढे अनेक बुवा-बाबांच्या "लीला" उघड झाल्या. त्यांचेदैवी चमत्कार म्हणजे हातचलाखीचे प्रयोग हेही लक्षात येऊ लागले. त्यामुळे चमत्कारी बुवा बदनाम झाले. पण एखादी दहशतवादी संघटना जशी जुने नाव बदलून नव्याने आपली स्फोटक कृत्ये चालू ठेवते, त्याप्रमाणे बुवा--बाबांनी आध्यात्मिक गुरू हे नाव धारण करून, आपली कार्यपद्धती बदलून,श्रद्धाळूंना फसवण्याचे आपले मूलभूत मह्त्कार्य पुढे चालू ठेवले. "हृदयीं गुरु नांदे। फसवुनी घेऊं आनंदे॥" या मनोवृत्तीचे श्रद्धाळू भक्त त्यांना मोठ्या प्रमाणात लाभले. गुरुबाजी का फोफावते यासंबंधी"उदासबोध" या कवितासंग्रहात मंगेश पाडगावकर म्हणतात,:

" प्रत्येकासी येथे हवा । कोणीतरी जबरा बुवा।जो काढील सार्‍या उवा । मनातल्या चिंतेच्या।
आपण शोधायचे नाही । आपण लढायचे नाही।आपण भिडायचे नाही । आयुष्याला।
येक गुरू फार मोठा । अध्यात्मधंद्या नाही तोटा। तो आपुल्या धोतरा कासोटा । वर्ज्य मानी।
असल्या आध्यात्मिक गुरूंचे स्तोम आज सर्वत्र माजलेले दिसते. भक्तांची संख्या अमाप आहे. बहुतेक आध्यात्मिक गुरु हे प्रच्छन्न ठकसेन असतात. शिष्यांना फसवून, आपल्या भजनी लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. आसाराम,रामपाल, नित्यानंद, निर्मलबाबा, वेंकटसर्वानन अशा अनेक गुरूंचे ढोंग उघड झाले. खरे स्वरूप समजले. तरी अशा ठकसेन गुरूंच्या कच्छपीं लागणारे भोळसट भाविक आहेतच. परब्रह्म, परमात्मा, जीवात्मा, पुनर्जन्म, मोक्ष, ब्रह्मलोक, असे शब्द कानी पडल्यावर ते श्रद्धाळू भारावून जातात. त्यांना भुरळ पडते. गुरूवरील श्रद्धा दृढ होते.दुसर्‍या प्रकारच्या कांही गुरूंना वाटते, की अध्यात्मशास्त्राचा आपला परिपूर्ण अभ्यास आहे, आपण साक्षात्कारी आहो, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे, आपल्यापाशी दिव्य अलौकिक शक्ती आहे,भक्ताच्या डोक्यावर हात ठेवून आपण शक्तिपात करू शकतो, ज्ञानसंक्रमण करू शकतो. अशा कल्पनेच्या राज्यात जे वावरतात ते भ्रमसेन गुरू होत. कुणाला फसवण्याचा त्यांचा हेतू नसतो. अशाभ्रमसेन गुरूंत काहीजण सज्जन, सदाचारी, सत्पुरुष असू शकतात. मात्र दिव्य ज्ञान, अलौकिक शक्ती कुणापाशी नसते. खरेतर अशा शक्तीला अस्तित्वच नाही. निसर्गनियमांचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही.काही गुरू निष्पाप, अश्राप, निरिच्छ, निर्मोही असतात. त्यांचे भक्त त्यांना विदेही, जीवन्मुक्त, देहातीत,अवलिया, पहुंचा हुवा आदमी असे समजतात. त्यांच्या भजनी लागतात. त्या गुरूंना आपल्या शरीराचे,कपड्यांचे, खाण्या-पिण्याचे, स्वच्छतेचे भान नसते..." हे इतके लोक माझ्यापुढे असे हात का जोडताहेत? गाणे कसले म्हणताहेत? समोरच्या पेटीत पैसे का टाकताहेत?..." हे त्यांना काही समजत नसते. खरे तर ते मतिमंद असतात. काही धूर्त लोकांनी त्यांना गुरू बनवून मठात बसवलेले असते. हे मूढसेन गुरू होत. अशा या आध्यात्मिक गुरूंच्या तीन तर्‍हा (ठकसेन, भ्रमसेन, मूढसेन) दिसतात.गुरू ठकसेन असो, भ्रमसेन असो वा मूढसेन असो प्रत्येकाचा भक्तवृंद असतोच. त्यांत ठकसेन गुरू साधनशुचिता गुंडाळून ठेवून आपल्या धंद्याचे व्यवस्थापन पद्धतशीरपणे करत असल्याने भाविकांवर त्यांचा प्रभाव अधिक पडतो आणि त्यांना मोठ्या संख्येने शिष्य लाभतात. सर्व गुरूंचे शिष्य आपली बुद्धी गुरुचरणी वाहातात आणि गुरूंना सर्वभावे शरण जातात. अशा भक्तांविषयी पु.ल.देशपांडे यांनी एक अप्रतिम भक्तिगीत लिहिले आहे. बहुतेकांनी ते वाचले असेल. ते दत्तगुरूंविषयी असले तरी सर्वच गुरुभक्तांना आवडेल आणि मुखोद्गत करावेसे वाटेल म्हणून इथे दिले आहे.
गुरुराज मन्मनीं बसले । हृदयात माझिया ठसले ।
श्वान सुलोचन अहा गोजिरे । जवळी बसता दिसे साजिरे
झोळीमधला प्रसाद मिळता । स्वपुच्छ हलवित हसले । गुरुराज मन्मनीं बसले ।..त्या श्वानाचा वाटे हेवा । कधी सुखाचा मिळेल ठेवा
गुरुचरणांच्या ठायीं मजला । सात स्वर्गही दिसले । गुरुराज मन्मनीं बसले ।...

खरेतर हे सर्व आध्यात्मिक गुरू म्हणजे सामान्य माणसे असतात. त्यांतील कोणापाशी दैवी शक्ती,अलौकिक सामर्थ्य, दिव्य ज्ञान असले काही नसते. गीतेतील श्लोक, धर्मग्रंथांतील वचने, पुराणांतील दाखले, संतसाहित्यातील अभंग, ओव्या यांतील काही गोष्टी हे गुरू (मूढसेन सोडून) तोंडपाठ करतात.बरेचसे वाचलेले, ऐकलेले असते. वक्तृत्व प्रभावी असते...."ब्रह्मस्वरूप गोमातेच्या महन्मंगल मुखातून उद्भूत झालेला पवित्रतम गहनगूढ गायत्री मंत्र सर्वतोभद्र आहे. तो शिवस्वरूप असून धवलवर्णी आहे.त्या महामंत्राच्या जपाचे रहस्य पुरंजनाने रंतिदेवाला कथन केले तेव्हा त्याचा आत्मा देहमुक्त होऊन अर्चिमार्गे ब्रह्मलोकी प्रवेश करून शाश्वत अशा चिदानंदात तरंगू लागला." असले गुरुमुखातून येणारे अगम्य बोल ऐकले की श्रद्धाळू भक्त मंत्रमुग्ध होतात. माना डोलावू लागतात. गुरुवचन सत्य मानायचे.त्याची चिकित्सा करायची नाही. " गाईचे मुख महन्मंगल कसे? " अशी शंका विचारायची नाही.भक्तांच्या या श्रद्धाळू वृत्तीमुळे जटाधारी-गोटाधारी, टिळाधारी-माळाधारी, कफनीधारी-लुंगीधारी असे सर्व गुरू इथे प्रभावी ठरतात.गुरूमुळे भक्तांची आर्थिक हानी होते. वेळ आणि ऊर्जा यांचा अपव्यय होतो. पण सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धी पांगळी होते. भक्त आपल्या गुरूला सर्वभावे शरण जातो. गुरूचा शब्द प्रमाण मानतो. गुरू जे सांगेल ते पूर्ण सत्य असणार हे गृहीत धरतो. गुरुवचनांची चिकित्सा करणे, त्यांवर शंका घेणे पाप समजतो. गुरूचे विचार हे आपलेच विचार आहेत असे त्याला वाटते. तो स्वबुद्धीने स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. आपली बुद्धी गुरूच्या पायी गहाण ठेवतो. दुसर्‍याच्या आहारी जाऊन त्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वत्व हरवून बसणे. दास्य स्वीकारणे. शरणागती पत्करणे. हा माणूसपणाचा अपमान आहे. पण भक्तांना त्यात धन्यता वाटते. मूढसेन गुरूचे भक्त त्याच्या कृपा कटाक्षासाठी आसुसलेले असतात. गुरूने त्यांच्याकडे पाहिले, आशीर्वाद दिल्यासारखा हात वर केला की भक्ताला धन्य धन्य वाटते. गुरूने कधी थप्पड मारली तर आता आपल्या मोक्षाचा मार्ग मोकळा झाला असे वाटून भक्त कृतार्थ होतो. म्हणजे अशा मतिमंद गुरूपुढे भक्ताची पूर्ण शरणागती असते. गुरुपायाशी बुद्धी गहाण असते.आध्यात्मिक गुरुविषयीं एक जुना किस्सा आहे. मुळात तो एक संस्कृत श्लोक आहे. त्याला कुणी मराठी दिले. त्या आधारे हा किस्सा लिहिला आहे.

"नमस्कार महाराज! आपल्या या कफनीला मोठा झोळ पडलेला दिसतो. तसेच त्यात लहान लहान छिद्रेही आहेत."
" 
खरे आहे. नदीत आंघोळ करताना अशा कफनीचा उपयोग मी मासे पकडण्यासाठी करतो."
"
मासे? म्हणजे तुम्ही मासे खाता? मत्स्याहारी आहांत? "
"
हो. तळलेले छोटे मासे दारूबरोबर छान लागतात. आपला काय अनुभव?"
"
दारू? म्हणजे मद्यपानसुद्धा करता?"
"
व्यसन नाही. पण कधी बाईकडे जायचे तर आधी एखादी बाटली पिणे बरे. आपला काय अनुभव?"
"
बाप रे! बाई? म्हणजे वेश्यागमन?"
"
आश्चर्य कसले त्यात? अहो, जुगारात एखादे वेळी एकदम घबाड लागले तर मौज मजा करावीशी वाटणारच ना?"
"
 म्हणजे तुम्ही जुगारी अड्ड्यांवर पण जाता? "
" 
क्वचित कधीतरी. बाकी वेळ कुणाला असतो. आमच्या मठात सतत गर्दी असते भक्तांची. त्यांना दर्शन देण्यात आणि मार्गदर्शन करण्यात खूप वेळ जातो."
" 
समजले.तुम्ही आध्यात्मिक गुरू आहांत तर ! नमस्कार. निघतो मी."
हा किस्सा जुना झाला. आता या गुरूंची जीवन पद्धती (लाईफ स्टाईल) खूप बदलली आहे. तरी मूळ मनोवृत्ती तशीच आहे. अशा या गुरूंचे श्रद्धाळू भक्त व्यासपौर्णिमेला पूजन करतात हे आपल्या समाजाचे दुर्भाग्य होय.
-प्रा.य.ना.वालावलकर

Saturday, September 26, 2015

संस्कारांचा अंधश्रद्ध सापळा

आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.

डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com

डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Saturday, August 1, 2015

तू मुर्ख आहेस

तू हिंदू असशील तरी मुर्ख आहेस,
तू मुसलमान असशील तरी मुर्ख आहेस …
तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.
कारण तुला जगायला 'धर्माचा' आधार लागतो.
समोरच्याने सांगितलं, तु निमूटपणे ऐकलंस
तुझ्या विचारांना तूच चौकटीत बसवलंस.
कारण पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडली नाहीत कधी,
ना कधी त्या प्रश्नांनाच जाब विचारायची हिंमत झाली तुझी.
तू अडकत गेलास आणि स्वत:ला अडकवत राहिलास.
पण,
तू धर्म पाळतोस म्हणून तुझी अधोगती झाली असं नाहीच,
तू धर्म पाळतोस म्हणून तुला यश आलं नाही, असंही नाही
कारण प्रगतीच्या, यशाच्या व्याख्याच तुझ्या नजरेत वेगळ्या भरतात.
तो धर्म ज्याचा तू पुरस्कार करतोयस, तो धर्म कुठून आणलास ?
याचा तुला ठाव नाही.
आईबापांनी हिंदू सांगितलं कि तु हिंदू समजतो स्वत:ला,
आईबापांनी मुसलमान सांगितलं असतंस तरी तु तेच समजलं असतंस,
कुठल्याही धर्माचा तू स्वीकार केलास असताच ना ?
तुझ्याच धर्माप्रमाणे देव एकच आहे,
तुझ्याच धर्माप्रमाणे देव चराचरात आहे,
मग तरी तुला २० मैल जाऊन देवळात जायची गरज भासते ?
घराशेजारी असलेलं मस्जिद तुला पहावत नाही….
तुझ्या मनातच देव असता तर तुला देव कुठेही दिसला असता.
पण मुळात तुला देव शोधायचाच नाही,
तुझा विश्वास आहे चमत्कारांवर,
तुझा विश्वास आहे दैवी शक्तींवर.
तुला हवंय कुणीतरी ज्याच्यासमोर तुझी गाऱ्हाणी ऐकवू शकशील,
तुझ्या कर्तुत्वाने कुणाला खुश करू शकशील,
बदल्यात मिळेल तुला घबाड काहीतरी,
नाहीतर स्वर्गात जागा एखादी,
वा अप्सरेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची संधी कदाचित ….
हा सगळा आंधळा विश्वास तुला धर्म देतो.
आणि म्हणूनच,
तू मुर्ख आहेस, कारण तू हिंदू आहेस,
तू मुर्ख आहेस, कारण तू मुसलमान आहेस,
तू मूर्ख आहेस, कारण कुठल्यातरी धर्मात अडकणारा आहेस.
तू मूर्ख आहेस, कारण तू तुझ्या विचारांना बंधनात अडकवलंयस.
अर्थात,
तूझ्या नजरेत फार काही वेगळा नाहीच मी !

Saturday, December 27, 2014

जगासमोर 'धर्म'संकट !

धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो.  असे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन  हरवून बसली आहे .
-----------------------------------------------------------

धर्मांध तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथे कोवळ्या मुलांच्या केलेल्या क्रूर हत्येने साऱ्या जगाला हादरवून टाकले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल सर्वदूर निषेध झाला असला तरी घटनेबद्दल आनंद व्यक्त करणारे उलट्या काळजाचे लोक पाहून काळजात चर्र झाल्याशिवाय राहात नाही. हे उलट्या काळजाचे लोक धर्मांध आहेत हे लक्षात घेतले तर धर्म ही संस्थाच आज जगावर मोठे संकट बनली आहे हाच निष्कर्ष निघतो. या घटनेबद्दल क्रूरकर्मा तालिबान्यांनी जेवढा आनंद व्यक्त केला तितकाच आनंद भारतातील अतिरेकी हिंदूवाद्यांना  झाला  हे लक्षात घेतले म्हणजे धर्मवाद माणसाला किती अमानुष बनवितो हे स्पष्ट होते. जगात प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी धर्माचा जन्म झाल्याचे साऱ्याच धर्माचे पंडीत सांगत असले तरी प्रत्येक धर्मवाद्याचे वर्तन याच्या विरोधात राहिल्याचा इतिहास आहे. जगात धर्मावरून जितके युद्ध , दंगली आणि रक्तपात झालेत तेवढे दुसऱ्या कोणत्याही कारणावरून झाले नाहीत हा इतिहास आहे. एखाद्या धर्माने एखाद्या कालखंडात एखाद्या प्रदेशात प्रेम आणि भाईचारा निर्माण केला याचे एखादे अपवादात्मक उदाहरण इतिहासाच्या एखाद्या पानावर सापडेलही, पण इतिहासाची पाने भरली आहेत ती धर्माने एका समुदाया विरुद्ध दुसऱ्या समुदायाचा द्वेष आणि तिरस्कार करण्याने. जगात द्वेष आणि तिरस्कार निर्मितीचा एकमेव कारखाना म्हणजे धर्म आहे. धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने जगात द्वेष आणि तिरस्कार याची निर्मिती आणि फैलाव झालेला नाही हे लक्षात घेतले तर जगात प्रेम आणि बंधुभाव नांदायचा असेल तर धर्म नावाच्या संस्थेपासून मुक्ती मिळविण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मानवाला मुक्ती आणि मोक्ष मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या धर्मापासून सुटका झाली तरच खऱ्या अर्थाने मानवजातीला मुक्ती मिळेल हेच आजवरचा धर्मसंस्थेचा प्रवास दर्शवीत आहे.




धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो. हे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन  हरवून बसली आहे , मृत्युच्या खाईत लोटली जात आहे. विज्ञानाचा विकास होण्या आधी , राज्यसंस्थेचा उदय आणि विकास होण्या आधी गूढ जग समजावून घेण्यासाठी आणि समाजाचे नियमन करण्यासाठी इतिहासाच्या एका टप्प्यावर धर्मसंस्थांची गरज होती. गूढ विश्वाचे भय वाटणाऱ्या मानवजातीला मानसिक स्थैर्य आणि अभय हवे होते . ही गरज प्रारंभी धर्माने पूर्ण केली असेल , पण नंतर मात्र धर्म हेच मानवजातीच्या भयाचे कारण बनले हे विसरून चालणार नाही. धर्म सांगतो ते ऐकले नाही , तसे वागले नाही तर मुक्ती नाही असा धाक साऱ्याच धर्मांनी घातला आणि मानवजातीला वेठीला धरले. पण समाजात जसजसा विज्ञानाचा विकास झाला, सृष्टीचे गूढ उकलण्यात विज्ञानाला यश आले तसतशी धर्माची मगरमिठी सैल होत गेली. धर्माचे मूळ काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्था यांनी हाती घेतल्याने धर्माच्या अस्तित्वाची गरज संपली होती. धर्माला जे साध्य करता आले नाही ते विज्ञान आणि राज्यसंस्था यांनी मिळून केले. रोगराई, भूक , नैसर्गिक आपत्ती यांपासून मानवजातीला मुक्त करण्यात हजारो वर्षात कोणत्याच धर्माला यश आले नाही . हेच काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्थेने शे-दोनशे वर्षात करून दाखविले. धर्माच्या अस्तित्वावर आणि उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे यश होते. मात्र धर्म नावाच्या संस्थेपासून ज्या वर्गाचा फायदा होत होता त्या वर्गाने आपला धर्म वाचविण्यासाठी दुसऱ्या धर्माची भीती दाखवण्याच्या, दुसऱ्या धर्मीयांविषयी द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याच्या हत्याराने आपला धर्म वाचविण्याचे कार्य चालविले आहे. पूर्वी मोक्ष आणि मुक्ती मिळणार नाही असे धमकावत धर्म प्रभाव टिकविला आणि आता परधर्मीयांची भीती दाखवत आपला धर्म टिकवून स्वत:चा स्वार्थ धर्माचा पुरस्कार करणाऱ्याकडून साधला जात आहे. हेच जगातील समस्यांचे खरे कारण आहे.

आज जगावरून एक नजर फिरविली तर आपल्या असे लक्षात येते की, जे जे राष्ट्र स्वत:ला धार्मिक राष्ट्र म्हणवून घेत आहे आणि नव्याने धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धार्मिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न होत आहे अशी सगळी राष्ट्रे समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. या सगळ्या राष्ट्रात अराजकसदृश्य परिस्थिती आहे. ही राष्ट्रे अंतर्गत किंवा बाह्ययुद्धात अडकली आहेत. द्वेष आणि तिरस्कारापोटी या राष्ट्रातील स्थैर्य , सौख्य , शांतता आणि ऐक्य धोक्यात आले आहे. विकास आणि प्रगती थांबली आहे. अनेक धर्मराष्ट्रे विघटनाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जगाच्या पाठीवर असलेल्या एकमेव हिंदूराष्ट्राने -नेपाळने - हा धोका वेळीच ओळखून स्वत:ला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. भारतालाच नव्हे तर जगाला धर्ममुक्त करण्याची गरज असताना मोदी विजयानंतर भारताला धर्मवादाच्या आगीत नव्याने फेकण्याचा खतरनाक खेळ सुरु झाला आहे. या शक्तींना यात थोडे जरी यश मिळाले तर आज जगातील धर्मराष्ट्रे ज्या संकटात सापडली आहेत त्या संकटात भारत सापडल्याशिवाय राहणार नाही. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण झाल्याशिवाय देशाची आणि जगाची धर्माच्या प्रभावापासून सुटका होणार नाही. कोपर्निकसच्या वैज्ञानिक संशोधनाला  नाकारण्यात, धर्मातील समज खोटे ठरविणारे संशोधन करणाऱ्या गैलिलिओ सारख्या वैज्ञानिकाला कैद करून ठेवण्यात  चर्चची चूक झाली हे आता ख्रिश्चन धर्मगुरूला जाहीरपणे मान्य करावे लागले याचे कारणच चर्च मध्ये जाणारा समाज अधिकाधिक विज्ञाननिष्ठ बनत चालला हेच आहे. जगाच्या निर्मिती विषयक बायबलचे नाही तर विज्ञानाचे म्हणणे सत्य असल्याची कबुली दिल्यानंतर खरे तर त्यांनी आता ख्रिश्चन धर्माची आवश्यकता उरली नाही हे सांगायला हवे होते. पण ते असे सांगणार नाहीत. कारण चर्चची आर्थिक उलाढाल मोठी आहे ! भारतातील मंदिराबाबत तर बोलायलाच नको. लुटीचा आणि काळा पैसा दडविण्याची ती इतिहासकाळापासून चालत आलेली ऐतिहासिक ठिकाणे आहेत. एकाएकी वाढलेली मस्जीदीची संख्या हा पैसा मिळविण्याचा धर्ममार्तंडाचा खेळ आहे हे आता लपून राहिलेले नाही. आता धर्म म्हणजे धर्मकारण राहिले नसून ते पूर्णपणे अर्थकारण बनले आहे. मात्र समाज अर्थकारणी बनला तर यांचे अर्थकारण विस्कटणार आहे. समाज अर्थनिष्ठ न बनता धर्मनिष्ठ राहावा यासाठी सगळे धर्म आणि धर्ममार्तंड धडपडत आहेत. अर्था सोबत सत्ता मिळणार असेल तर त्या धर्माचे गुणगान वरच्या पट्टीत होणार हे ओघानं आलेच. आज आपल्या देशात जे धार्मिक फुत्कार आपल्या कानावर आदळत आहेत त्या मागचे रहस्य हेच आहे. धर्म परमार्थासाठी निर्माण झाला असेलही , पण त्याच्यावर प्रभुत्व मात्र स्वार्थी लोकांनीच कायम ठेवले आहे. धर्ममुक्ती म्हणचे अनाचार नसून या स्वार्थीतत्वाच्या जोखडापासून मुक्ती ठरणार आहे. 


अर्थात हजारो वर्षाच्या धर्मप्रभावापासून समाजाला आणि जगाला एकाएकी मुक्ती मिळणार नाही हे खरे आहे. पण त्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे. या दिशेने पडणारे सर्वात मोठे क्रांतिकारी पाउल असेल ते जन्माने माणसाच्या कपाळावर धर्माची पट्टी लागता कामा नये. कोणत्या आई-बापाच्या पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसते. जन्माच्या अपघाताने माणसाच्या डोक्यावर धर्माचे ओझे पडता कामा नये ही अगदी तर्कसंगत गोष्ट आहे. एखाद्याला एखादा धर्म स्विकारायचा असेल तर तो त्याने जाणतेपणाने स्विकारला पाहिजे. बालमजुरी हा जसा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आह, आपल्या घरात आपल्या मुलावर अत्याचार करणे हा जसा गुन्हा ठरविण्यात आला आहे तशीच तरतूद धर्माच्या बाबतीत देखील केली पाहिजे. बालकावर पालकांनी आणि समाजाने धर्म लादणे हा गुन्हा ठरविला गेला पाहिजे. वयात आल्यानंतर एखाद्याने एखादा धर्म स्विकारण्याचे ठरविले तर त्याची नोंद घेण्यापलीकडे राज्यसंस्थेचा आणि धर्मसंस्थेचा संबंध असता कामा नये. ही नोंद त्या-त्या व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी घ्यावी लागणार आहे. एकदा का स्वेच्छेने धर्म स्विकारण्याची तरतूद झाली तर एका झटक्यात तीन चतुर्थांश जग धर्ममुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. धर्मलुबडे आणि धर्मभाबडे यांच्यापुरतेच धर्माचे अस्तित्व उरेल आणि धर्म हळूहळू लयाला जावून जगातील सगळा अधर्म संपून जग सुखी होईल. धर्म लयाला गेले नाही तरी धर्म सुधारणा नक्कीच होतील. स्त्रियांनी आपला धर्म स्विकारावा यासाठी त्यांना समान स्थान प्रत्येक धर्माला द्यावे लागेल. त्यांच्यावर लादलेली बंधने प्रत्येक धर्माला उठवावी लागतील . जुनाट धर्म आधुनिक तर नक्कीच बनतील ! जन्माने धर्माची पट्टी कपाळावर चिकटण्याची सोय नसती तर पेशावरच्या कोवळ्या मुलांचे प्राण वाचले असते. ओडीशात ख्रिश्चन मिशनरीच्या गाडीत झोपलेल्या दोन कोवळ्या मुलांना गाडी पेटवून जिवंत जाळण्याचा अमानवीय अपराध घडला नसता किंवा पुणे सारख्या सुसंस्कृततेचे बिरूद मिरविणाऱ्या नगरीत निरपराध मुस्लीम युवक बळी गेला नसता. जगात धर्म नसते तर आतंकवादी घटनेत जगातील एकही माणूस मारला गेला नसता. धर्ममुक्तीकडे जाणारे पहिले पाउल म्हणून धर्म जन्माने मिळता कामा नये असा कायदा आणि संविधान संशोधन करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे. त्याशिवाय जगावरील धर्मसंकट टळणार नाही.

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ