भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले...तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ "आस्तिक" आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.
खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला "ब्रह्म" हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.
असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.
दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. पण मीमांसा वेद आणि यज्ञ यांना केंद्रीभूत ठेवुनच रचली गेली असल्या त्यांतील तत्वज्ञानाला सर्वस्वी अवैदिक म्हणता येत नाही. पण तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.
वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.
या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.
सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत...जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.
काय आहे चार्वाक दर्शन?
चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.
१. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून "मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही." असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. "जे काही आहे ते याच लोकात" म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.
२. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. "काम" आणि "अर्थ" (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व "स्वभाव" हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.
३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.
४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.
५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)
६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!
७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.
८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.
९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.
१०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.
पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.
आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी...जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात "चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे." असे म्हटले आहे. यातच "चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही." असेही या ग्रंथात म्हटले आहे.
चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला "मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार" म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.
चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच "लोप" पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.
या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.
परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.
"यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत" या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे "लोकायतिक हे अनीतिमान आहेत." हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.
लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.
इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.
पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.
लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.
राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.
आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला...तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.
अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले...फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते.
-संजय सोनवणी