Saturday, September 26, 2015

संस्कारांचा अंधश्रद्ध सापळा

आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.

डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com

डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

Saturday, August 1, 2015

तू मुर्ख आहेस

तू हिंदू असशील तरी मुर्ख आहेस,
तू मुसलमान असशील तरी मुर्ख आहेस …
तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.
कारण तुला जगायला 'धर्माचा' आधार लागतो.
समोरच्याने सांगितलं, तु निमूटपणे ऐकलंस
तुझ्या विचारांना तूच चौकटीत बसवलंस.
कारण पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडली नाहीत कधी,
ना कधी त्या प्रश्नांनाच जाब विचारायची हिंमत झाली तुझी.
तू अडकत गेलास आणि स्वत:ला अडकवत राहिलास.
पण,
तू धर्म पाळतोस म्हणून तुझी अधोगती झाली असं नाहीच,
तू धर्म पाळतोस म्हणून तुला यश आलं नाही, असंही नाही
कारण प्रगतीच्या, यशाच्या व्याख्याच तुझ्या नजरेत वेगळ्या भरतात.
तो धर्म ज्याचा तू पुरस्कार करतोयस, तो धर्म कुठून आणलास ?
याचा तुला ठाव नाही.
आईबापांनी हिंदू सांगितलं कि तु हिंदू समजतो स्वत:ला,
आईबापांनी मुसलमान सांगितलं असतंस तरी तु तेच समजलं असतंस,
कुठल्याही धर्माचा तू स्वीकार केलास असताच ना ?
तुझ्याच धर्माप्रमाणे देव एकच आहे,
तुझ्याच धर्माप्रमाणे देव चराचरात आहे,
मग तरी तुला २० मैल जाऊन देवळात जायची गरज भासते ?
घराशेजारी असलेलं मस्जिद तुला पहावत नाही….
तुझ्या मनातच देव असता तर तुला देव कुठेही दिसला असता.
पण मुळात तुला देव शोधायचाच नाही,
तुझा विश्वास आहे चमत्कारांवर,
तुझा विश्वास आहे दैवी शक्तींवर.
तुला हवंय कुणीतरी ज्याच्यासमोर तुझी गाऱ्हाणी ऐकवू शकशील,
तुझ्या कर्तुत्वाने कुणाला खुश करू शकशील,
बदल्यात मिळेल तुला घबाड काहीतरी,
नाहीतर स्वर्गात जागा एखादी,
वा अप्सरेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची संधी कदाचित ….
हा सगळा आंधळा विश्वास तुला धर्म देतो.
आणि म्हणूनच,
तू मुर्ख आहेस, कारण तू हिंदू आहेस,
तू मुर्ख आहेस, कारण तू मुसलमान आहेस,
तू मूर्ख आहेस, कारण कुठल्यातरी धर्मात अडकणारा आहेस.
तू मूर्ख आहेस, कारण तू तुझ्या विचारांना बंधनात अडकवलंयस.
अर्थात,
तूझ्या नजरेत फार काही वेगळा नाहीच मी !

Saturday, December 27, 2014

जगासमोर 'धर्म'संकट !

धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो.  असे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन  हरवून बसली आहे .
-----------------------------------------------------------

धर्मांध तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील पेशावर येथे कोवळ्या मुलांच्या केलेल्या क्रूर हत्येने साऱ्या जगाला हादरवून टाकले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल सर्वदूर निषेध झाला असला तरी घटनेबद्दल आनंद व्यक्त करणारे उलट्या काळजाचे लोक पाहून काळजात चर्र झाल्याशिवाय राहात नाही. हे उलट्या काळजाचे लोक धर्मांध आहेत हे लक्षात घेतले तर धर्म ही संस्थाच आज जगावर मोठे संकट बनली आहे हाच निष्कर्ष निघतो. या घटनेबद्दल क्रूरकर्मा तालिबान्यांनी जेवढा आनंद व्यक्त केला तितकाच आनंद भारतातील अतिरेकी हिंदूवाद्यांना  झाला  हे लक्षात घेतले म्हणजे धर्मवाद माणसाला किती अमानुष बनवितो हे स्पष्ट होते. जगात प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी धर्माचा जन्म झाल्याचे साऱ्याच धर्माचे पंडीत सांगत असले तरी प्रत्येक धर्मवाद्याचे वर्तन याच्या विरोधात राहिल्याचा इतिहास आहे. जगात धर्मावरून जितके युद्ध , दंगली आणि रक्तपात झालेत तेवढे दुसऱ्या कोणत्याही कारणावरून झाले नाहीत हा इतिहास आहे. एखाद्या धर्माने एखाद्या कालखंडात एखाद्या प्रदेशात प्रेम आणि भाईचारा निर्माण केला याचे एखादे अपवादात्मक उदाहरण इतिहासाच्या एखाद्या पानावर सापडेलही, पण इतिहासाची पाने भरली आहेत ती धर्माने एका समुदाया विरुद्ध दुसऱ्या समुदायाचा द्वेष आणि तिरस्कार करण्याने. जगात द्वेष आणि तिरस्कार निर्मितीचा एकमेव कारखाना म्हणजे धर्म आहे. धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने जगात द्वेष आणि तिरस्कार याची निर्मिती आणि फैलाव झालेला नाही हे लक्षात घेतले तर जगात प्रेम आणि बंधुभाव नांदायचा असेल तर धर्म नावाच्या संस्थेपासून मुक्ती मिळविण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मानवाला मुक्ती आणि मोक्ष मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या धर्मापासून सुटका झाली तरच खऱ्या अर्थाने मानवजातीला मुक्ती मिळेल हेच आजवरचा धर्मसंस्थेचा प्रवास दर्शवीत आहे.




धर्मसंस्थे संदर्भात सुप्रसिद्ध कवी गुलजार यांचे ताजे वक्तव्य अत्यंत समर्पक आहे. धर्म म्हणजे मुदत संपलेले औषध आहे असे गुलजार बोलले. मुदत संपलेले औषध घेतले तर रोगी बरा होत नाही , उलट तो दगावण्याचा धोका असतो. हे मुदतबाह्य औषध पाजण्याचा जगात धर्मांधांकडून जिथे जिथे प्रयत्न होतो आहे तिथे तिथे मानवजात आपले सुखचैन  हरवून बसली आहे , मृत्युच्या खाईत लोटली जात आहे. विज्ञानाचा विकास होण्या आधी , राज्यसंस्थेचा उदय आणि विकास होण्या आधी गूढ जग समजावून घेण्यासाठी आणि समाजाचे नियमन करण्यासाठी इतिहासाच्या एका टप्प्यावर धर्मसंस्थांची गरज होती. गूढ विश्वाचे भय वाटणाऱ्या मानवजातीला मानसिक स्थैर्य आणि अभय हवे होते . ही गरज प्रारंभी धर्माने पूर्ण केली असेल , पण नंतर मात्र धर्म हेच मानवजातीच्या भयाचे कारण बनले हे विसरून चालणार नाही. धर्म सांगतो ते ऐकले नाही , तसे वागले नाही तर मुक्ती नाही असा धाक साऱ्याच धर्मांनी घातला आणि मानवजातीला वेठीला धरले. पण समाजात जसजसा विज्ञानाचा विकास झाला, सृष्टीचे गूढ उकलण्यात विज्ञानाला यश आले तसतशी धर्माची मगरमिठी सैल होत गेली. धर्माचे मूळ काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्था यांनी हाती घेतल्याने धर्माच्या अस्तित्वाची गरज संपली होती. धर्माला जे साध्य करता आले नाही ते विज्ञान आणि राज्यसंस्था यांनी मिळून केले. रोगराई, भूक , नैसर्गिक आपत्ती यांपासून मानवजातीला मुक्त करण्यात हजारो वर्षात कोणत्याच धर्माला यश आले नाही . हेच काम विज्ञान आणि आधुनिक राज्यसंस्थेने शे-दोनशे वर्षात करून दाखविले. धर्माच्या अस्तित्वावर आणि उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे यश होते. मात्र धर्म नावाच्या संस्थेपासून ज्या वर्गाचा फायदा होत होता त्या वर्गाने आपला धर्म वाचविण्यासाठी दुसऱ्या धर्माची भीती दाखवण्याच्या, दुसऱ्या धर्मीयांविषयी द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याच्या हत्याराने आपला धर्म वाचविण्याचे कार्य चालविले आहे. पूर्वी मोक्ष आणि मुक्ती मिळणार नाही असे धमकावत धर्म प्रभाव टिकविला आणि आता परधर्मीयांची भीती दाखवत आपला धर्म टिकवून स्वत:चा स्वार्थ धर्माचा पुरस्कार करणाऱ्याकडून साधला जात आहे. हेच जगातील समस्यांचे खरे कारण आहे.

आज जगावरून एक नजर फिरविली तर आपल्या असे लक्षात येते की, जे जे राष्ट्र स्वत:ला धार्मिक राष्ट्र म्हणवून घेत आहे आणि नव्याने धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धार्मिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न होत आहे अशी सगळी राष्ट्रे समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. या सगळ्या राष्ट्रात अराजकसदृश्य परिस्थिती आहे. ही राष्ट्रे अंतर्गत किंवा बाह्ययुद्धात अडकली आहेत. द्वेष आणि तिरस्कारापोटी या राष्ट्रातील स्थैर्य , सौख्य , शांतता आणि ऐक्य धोक्यात आले आहे. विकास आणि प्रगती थांबली आहे. अनेक धर्मराष्ट्रे विघटनाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. जगाच्या पाठीवर असलेल्या एकमेव हिंदूराष्ट्राने -नेपाळने - हा धोका वेळीच ओळखून स्वत:ला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. भारतालाच नव्हे तर जगाला धर्ममुक्त करण्याची गरज असताना मोदी विजयानंतर भारताला धर्मवादाच्या आगीत नव्याने फेकण्याचा खतरनाक खेळ सुरु झाला आहे. या शक्तींना यात थोडे जरी यश मिळाले तर आज जगातील धर्मराष्ट्रे ज्या संकटात सापडली आहेत त्या संकटात भारत सापडल्याशिवाय राहणार नाही. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण झाल्याशिवाय देशाची आणि जगाची धर्माच्या प्रभावापासून सुटका होणार नाही. कोपर्निकसच्या वैज्ञानिक संशोधनाला  नाकारण्यात, धर्मातील समज खोटे ठरविणारे संशोधन करणाऱ्या गैलिलिओ सारख्या वैज्ञानिकाला कैद करून ठेवण्यात  चर्चची चूक झाली हे आता ख्रिश्चन धर्मगुरूला जाहीरपणे मान्य करावे लागले याचे कारणच चर्च मध्ये जाणारा समाज अधिकाधिक विज्ञाननिष्ठ बनत चालला हेच आहे. जगाच्या निर्मिती विषयक बायबलचे नाही तर विज्ञानाचे म्हणणे सत्य असल्याची कबुली दिल्यानंतर खरे तर त्यांनी आता ख्रिश्चन धर्माची आवश्यकता उरली नाही हे सांगायला हवे होते. पण ते असे सांगणार नाहीत. कारण चर्चची आर्थिक उलाढाल मोठी आहे ! भारतातील मंदिराबाबत तर बोलायलाच नको. लुटीचा आणि काळा पैसा दडविण्याची ती इतिहासकाळापासून चालत आलेली ऐतिहासिक ठिकाणे आहेत. एकाएकी वाढलेली मस्जीदीची संख्या हा पैसा मिळविण्याचा धर्ममार्तंडाचा खेळ आहे हे आता लपून राहिलेले नाही. आता धर्म म्हणजे धर्मकारण राहिले नसून ते पूर्णपणे अर्थकारण बनले आहे. मात्र समाज अर्थकारणी बनला तर यांचे अर्थकारण विस्कटणार आहे. समाज अर्थनिष्ठ न बनता धर्मनिष्ठ राहावा यासाठी सगळे धर्म आणि धर्ममार्तंड धडपडत आहेत. अर्था सोबत सत्ता मिळणार असेल तर त्या धर्माचे गुणगान वरच्या पट्टीत होणार हे ओघानं आलेच. आज आपल्या देशात जे धार्मिक फुत्कार आपल्या कानावर आदळत आहेत त्या मागचे रहस्य हेच आहे. धर्म परमार्थासाठी निर्माण झाला असेलही , पण त्याच्यावर प्रभुत्व मात्र स्वार्थी लोकांनीच कायम ठेवले आहे. धर्ममुक्ती म्हणचे अनाचार नसून या स्वार्थीतत्वाच्या जोखडापासून मुक्ती ठरणार आहे. 


अर्थात हजारो वर्षाच्या धर्मप्रभावापासून समाजाला आणि जगाला एकाएकी मुक्ती मिळणार नाही हे खरे आहे. पण त्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे. या दिशेने पडणारे सर्वात मोठे क्रांतिकारी पाउल असेल ते जन्माने माणसाच्या कपाळावर धर्माची पट्टी लागता कामा नये. कोणत्या आई-बापाच्या पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हाती नसते. जन्माच्या अपघाताने माणसाच्या डोक्यावर धर्माचे ओझे पडता कामा नये ही अगदी तर्कसंगत गोष्ट आहे. एखाद्याला एखादा धर्म स्विकारायचा असेल तर तो त्याने जाणतेपणाने स्विकारला पाहिजे. बालमजुरी हा जसा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आह, आपल्या घरात आपल्या मुलावर अत्याचार करणे हा जसा गुन्हा ठरविण्यात आला आहे तशीच तरतूद धर्माच्या बाबतीत देखील केली पाहिजे. बालकावर पालकांनी आणि समाजाने धर्म लादणे हा गुन्हा ठरविला गेला पाहिजे. वयात आल्यानंतर एखाद्याने एखादा धर्म स्विकारण्याचे ठरविले तर त्याची नोंद घेण्यापलीकडे राज्यसंस्थेचा आणि धर्मसंस्थेचा संबंध असता कामा नये. ही नोंद त्या-त्या व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्यासाठी घ्यावी लागणार आहे. एकदा का स्वेच्छेने धर्म स्विकारण्याची तरतूद झाली तर एका झटक्यात तीन चतुर्थांश जग धर्ममुक्त झाल्या शिवाय राहणार नाही. धर्मलुबडे आणि धर्मभाबडे यांच्यापुरतेच धर्माचे अस्तित्व उरेल आणि धर्म हळूहळू लयाला जावून जगातील सगळा अधर्म संपून जग सुखी होईल. धर्म लयाला गेले नाही तरी धर्म सुधारणा नक्कीच होतील. स्त्रियांनी आपला धर्म स्विकारावा यासाठी त्यांना समान स्थान प्रत्येक धर्माला द्यावे लागेल. त्यांच्यावर लादलेली बंधने प्रत्येक धर्माला उठवावी लागतील . जुनाट धर्म आधुनिक तर नक्कीच बनतील ! जन्माने धर्माची पट्टी कपाळावर चिकटण्याची सोय नसती तर पेशावरच्या कोवळ्या मुलांचे प्राण वाचले असते. ओडीशात ख्रिश्चन मिशनरीच्या गाडीत झोपलेल्या दोन कोवळ्या मुलांना गाडी पेटवून जिवंत जाळण्याचा अमानवीय अपराध घडला नसता किंवा पुणे सारख्या सुसंस्कृततेचे बिरूद मिरविणाऱ्या नगरीत निरपराध मुस्लीम युवक बळी गेला नसता. जगात धर्म नसते तर आतंकवादी घटनेत जगातील एकही माणूस मारला गेला नसता. धर्ममुक्तीकडे जाणारे पहिले पाउल म्हणून धर्म जन्माने मिळता कामा नये असा कायदा आणि संविधान संशोधन करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे. त्याशिवाय जगावरील धर्मसंकट टळणार नाही.

-----------------------------------------------------------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ 

Sunday, December 21, 2014

व्यसनांना करु बदनाम - पोवाडा



आधी नमन माझे शिवबाला
ज्योतिरावाला शाहुराजाला
भिमराव अण्णाभाऊल़ा
ज्यांनी अर्थ दिला जगण्याला
वंदन करुन त्या सर्वान्ला
शाहिर आज रस्त्यावरती आला
विनवणी करण्या जनतेला
साथ मागतोया तुम्हाला
बदनाम करण्या व्यसनाला जी जी जी $$


जात येडी झाली मानसाची
बघा तर्हा याच्या जगण्याची
झाली घाई त्याला मरण्याची
बायका पोर उघडी पाडन्याची
पान गुटखा खावुन थुकन्याची
सिगारेट बिडी फुकन्याची
तंबाखूचा बार मळण्याची
दारू सोडा आणि चकन्याची
सांगतो व्यथा याच्या व्यसनाची जी जी जी $$

पैसा कमावला होता थोडा फार
पण तम्बाखुने दिला केंसर
बरा करण्या त्याचा आजार
खर्च झाला किती बेसुमार
मग धरला दारुवर जोर
सिगारेटीचा काढला धूर
जेव्हा झाले ख़राब लीवर
लागले विकायला घरदार
व्यसनांनी केले बेजार जी जी जी $$

जरा विचार कर माझ्या भावा
जरा विचार कर माझे ताई
घे आनंद जीवनाचा
सोड सगळ्या वाईट सवयी
व्यसनांना घालुन लगाम
करुन टाकू त्यांना रामराम
आयुष्याला करुन सलाम
आज करू एक सत्काम
व्यसनांना करू बदनाम जी जी जी
व्यसनांना करू बदनाम जी जी जी$$

- अन्ना

Saturday, November 22, 2014

वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!


जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. ह्या चरचरात विज्ञानच भरून राहीले आहे.निसर्गाचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान. त्याला चारभिंतीच्या प्रयोगशाळेत बंदीस्त करणे ही आपली संकुचित विचारसरणी झाली. आईनस्टाइनने त्याचे शोध निसर्गाच्या प्रयोगशाळेत गणिती विचार करून लावले. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन हा माणसाला तत्वज्ञ बनवतो. आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करतो. त्यामध्ये धर्म,भावना,शब्द्प्रामण्य यापेक्षा सत्याची कसोटी महत्वाची ठरते. प्रत्येक गोष्टीचे documentation केल्यावरच त्याची सत्यासत्यता पडताळता येते. तेथे शब्द्प्रामण्यपेक्षा चिकीत्सेला महत्त्व असते. या पध्दतीनेच आजवर माणसाची प्रगती झाली आहे.
गोमूत्र प्यायाल्याने आणि शेण सारवल्याने वा खाल्याने तब्बेत सुधारते हे कुठल्याही authentic कोशात लिहीलेले नाही आणि सिध्दही झालेले नाही. ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात.मग ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती ठरते.सार्वत्रिक नव्हे.
योग, तुळस,वृक्ष, हळदीसारखी काही उदाहरणे वैज्ञानिकतेच्या निकषावर काही बाबतीत खरी असली तरी हनुमान चालीसामध्ये जरी NASA ची साक्ष (खरी असेल तर तो कागद प्रसिध्द करायला कोणाची हरकत आहे?) काढून सूर्य व पृथ्वीचे अंतर दिले आहे तरी कुठल्याही वैज्ञानिकाने त्यावर समर्थन दिलेले नाही. तसेच जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. (मग जानवेधारी आजारी का पडतात?) चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. (मग दहादा वाकून नमस्कार करणार्यांना स्पाँडीलायटीस का होतो?) दारावर तोरण लावल्याने वातावरण शुध्द होते. (उलट तोरणासाठी पाने-फुले तोडून आपण पर्यावरणाची हानी करत असतो.) दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. (मुळात ती आपल्या वृत्तीत असावी लागते.) कान टोचल्याने अस्थमा बरा होतो.( मग अनेक कान टोचलेल्या बाया अस्थामाग्रस्त का आहेत?) कुंकूम लावल्याने वशीकरणापासून बचाव होतो. (Hypnotist अनेक कुंकू लावलेल्या - टिकली नव्हे - स्त्रीयांना hypnotized कसे करू शकतात?) तिलक लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले जाते, शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो. (मग शंखध्वनी करणारेच मलेरीयाग्रस्त का होतात? दुसरे असे की,भारतात आज मोठ्या प्रमाणात मलेरीयाचे रुग्ण वढताहेत तेव्हा करा की शंख ध्वनी! डॉक्टरांची गरज काय?) चिताग्नी दिल्याने प्रेताची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरणाची हानी टळली जाते.(लाकडे जाळून प्रदूषण झाले तरी) उठाबशा वा कान खेचण्याच्या शिक्षेमुळे मेंदू तल्लख होतो आणि तोतरेपणा जातो यासारख्या गोष्टीत हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. यातील एकही मुद्दा कुठेही सिध्द झालेला नाही. हे सगळे आपल्या पूर्वजांना माहीत होते या अभिनिवेशाने लिहीले जाते. वैज्ञानिक पध्दतीत documentation ला महत्त्व असते,पुराण कथांना नाही.
कोणत्याही धर्मवाद्यांचे मुद्दे जर विज्ञानेतर असतील तर मग त्यातील प्रत्येक मुद्दयाचा वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का? त्यांनी ही वैयक्तीक अनुभूती आहे असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो. मग त्यांनी Believe-Hinduism is based on science असं म्हणायला नको. खरी मखलाशी अशी असते की,ते विज्ञानाला अनुसरून आहे असे म्हटले की, सुशिक्षित लोक सहज स्वीकारातात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.ह्याला बनवेगिरी म्हणतात.दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि उन्मादाचे बळी ठरताहेत.
म्हणूनच मी म्हणतो, आजच्या सुशिक्षित माणसाने वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही. त्यातूनच हिन्दू धर्माला वैज्ञानिक लेबल लावायचा फोल प्रयत्न केला जातो.
विचार- जगदीश काबरे सर

Friday, November 14, 2014

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहेआठवला तसा लिहिला आहेत्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतोतिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झालात्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होतीएक मिनिबस ठरवलीत्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारलेसहल तीन दिवसांची होतीसगळी माहिती घेऊन मी हो म्हटलेपैसे भरलेनियोजित दिवशी सहल निघालीसहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरूनअसे तेवीस पर्यटक सहभागी होतेसर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होतीपणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झालीसमूह (ग्रुपचांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरेदेवस्थानेतीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोचआम्ही एका मंदिरात गेलोदेऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हतेसर्वांबरोबर मीही आत गेलोमूर्ती संगमरवरी दगडाची होतीकाळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते.कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडतेभाविकांनी मूर्तीला हात जोडलेनतमस्तक होऊन नमस्कार केलापेटीत दान टाकले.प्रसाद घेतलामी यातले काही केले नाहीसगळे पाहिलेइतरांसोबत प्रदक्षिणा घातलीबहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे.बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
तुम्ही देवाला नमस्कार केला नाहीप्रसाद घेतला नाहीअसे का ?"
मला तसे करावेसे वाटले नाहीकधीच वाटत नाहीम्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
होकुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेलापुन्हा त्याने प्रश्न विचारला.
मग मंदिरात कसे आला ?"
तुमच्यासारखाचबस मधून उतरलोचालत चालत देवळात आलो."
तसे नव्हेनास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे कातशी पाटी कुठे दिसली नाहीअसोगमतीने विचारलेमूर्तीचे शिल्प पाहायचेदर्शनालाआलेले भाविक काय करतातपुजारी काय करतातकाय बोलतात ते पाहायचेऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावेसगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाहीयात अहंकाराचा प्रश्न नाहीनिर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाहीमाणसांनानमस्कार करतो."
देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण मी नमस्कार केला हे देवाला समजत नाहीमाणसांना समजतेत्यांना भावना असतातत्या दुखावू नये असे मला वाटते.देवापुढे मी नतमस्तक झालो नाहीत्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छामी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलोनंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढलापरत गप्पा सुरू झाल्यादुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिलीतिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झालीमूर्ती वेगळीती अधिक रेखीव आणि सुबक होतीपुरोहित वेगळेबाकीसगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचेते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होतेतिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केलानंतर सर्वांनी (मी सोडून )देवस्थानला देणग्या दिल्याएकूण तेरा पावत्या फाडल्याआम्ही हॉटेलवर परतलोते जवळच होतेकाही वेळाने देवस्थानचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आलामी देणगी दिली नव्हतीतरी माझ्यासाठीसुद्धा लाडू आणला होतामी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करामी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितलेत्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलेमीनाकारलेला प्रसादाचा लाडू आणि देणगीचे पावती पुस्तक पिशवीत भरलेआणि तो तिथून निघालामाझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाहीएकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोसगळे वेळी आलेबस चालू झालीहवेत गारवा होतावातावरण छान उत्साहवर्धक होतेअजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झालीकुठे काही अडचण आली नाही.तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिलेसर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणालात्याने सहलीचे आयोजन केले होतेआपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदानेउत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होतीसारेजण उत्साहातआनंदात होतेहास्यविनोद चालले होतेसकाळचे अकरा वाजले असतील.एकदम धक्का बसल्यासारखे होऊन बसचे इंजिन बंद पडलेतेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतलीआणि ती थांबलीचवाहक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरलेकाही ठाक-ठूक करू लागलेवीस मिनिटे गेलीबस चालू होईना.प्रवाशांचा उत्साह मावळलाअस्वस्थताचुळबुळ सुरू झालीएक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होताप्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय?सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
ती कथा मी अनेकदा ऐकली आहेतसेच पोथीसुद्धा स्वतवाचली आहेसत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येतेवंगध्वज राजासाधुवाणीअसल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या का त्यांवर कधी विचार करायचाच नाही का आपल्या पूजेचा दिलेला प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजेभक्षण केलाच पाहिजे असा या देवाचा हट्ट का असावा कोणी प्रसाद घेतला नाहीखाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का देव इतका सूडकरी कसा ?एवढ्या क्षुद्र मनाचा कसा या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहेपण नकोवेळ जाईल."
आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा.एक बाई बोलल्या.
"ठीक आहेऐकणार असाल तर थोडे सांगतोसत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहेपण ही पुराणकथा नाहीशिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाहीछत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणानंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होतेपण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही.बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.१८८०च्या सुमारास इकडे आलेयाविषयी इतिहासकारांचे एकमत आहेसध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतातहे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झालेच असतेतसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही."कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहेअर्थ सरळ आहे.) तर अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते.पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होतेश्रद्धा ही मनोभावना आहेभावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
ठीक आहेपण प्रसाद नाकारायचा कशाला तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता."माझ्या शेजारी बसणारा बोलला.
त्याच्या हातात पावतीपुस्तक होतेमी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा होतीते असोमी प्रसाद नाकारलाम्हणजे समजा मी पाप केलेतर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी नातुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊनप्रसाद ग्रहण करून,देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली नामग बस बंद का पडली तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाहीभक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलेतरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाहीदेव सर्वसमर्थ आहेतो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असताज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावीजे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावेजी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावीअसे काही करणे त्याला शक्य नव्हते काय मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
अहोअसं काय बोलता तुम्ही हे तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडेअसे बोलू नयेशुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
चिंता नसावीबोललो ते खरे आहेबोलून काही होत नाहीमाणसे उगीच देवाला घाबरताततो काही कुणाचे बरे -वाईट करू शकत नाही." मी उत्तरलो.
आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मधाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्याबहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्यपण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखाम्हणून ते नासतातमाझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाहीतसा बोलतो आहे तो हा आत्ताबस बंद पडल्यावरत्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोललेपण सार्‍यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तरपण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावलेमी त्वरित पैसे भरलेत्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो.कुठे कसली तक्रार नाही.गैरवर्तन तर नाहीच नाहीसहलीचे वेळापत्रक पाळलेसर्वांबरोबर मंदिरांत आलोतिथे जे पटले नाहीकरावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरेपण कधीही इतरांचा खोळंबा केला नाही."
पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलले.
ठीक आहेमाझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणातुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतोपण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतातत्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००श्रद्धाळू भाविक असताततरी असे जीवघेणे अपघात का घडतात देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही कायविचार करावाबस बंद पडली त्याच्याशी बसमध्ये कोण कोण प्रवासी आहेतत्यांची विचारसरणी काय आहेत्यांची वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाहीगाडीच्या कांही भागांतील दोषदेखभालीतील चाल-ढकलचूक,दक्षतेचा अभावरस्त्यातील खड्डेइंधनातील भेसळअसले कसले तरी कारण असू शकतेकार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "

थोडावेळ शांतता पसरलीइंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटलेसर्वांनी कान टवकारलेकांही क्षणांत बस चालू झालीबंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागलीवेग घेतलापुढचा प्रवास चालू झालाप्रवाशांची मरगळ गेलीबसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलेसगळे जण मागचे सारे विसरलेहास्यविनोद झडू लागलेमी डोळे मिटून विचारमग्न झालोवाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरीकाहीतरीथोडातरी विचार करील काकुठेतरी ठिणगी पडेल का कुणाचे विचारचक्र चालू होईल कामला वाटले होकाहीतरी सकारात्मक घडेलमाणसाने आशावादी असावे.
-प्रा.य.ना.वालावलकर

Wednesday, October 29, 2014

पोप यांचा साक्षात्कार

देवाच्या हातात काही जादूची छडी नाही, हे पोप फ्रान्सिस यांचे उद्गार क्रांतिकारी असेच म्हणावे लागतील. कारण धर्म कोणताही असो, त्यात देव म्हणजे जणू कोणी जादूगार आहे याच दृष्टिकोनातून पाहिले जात असते. आकाशात कोठे तरी तो बसलेला असतो आणि तेथून सर्व विश्वाची सूत्रे हलवीत असतो, अशी ती कल्पना. प्रार्थना करून, नवस वगैरे बोलून त्याला प्रसन्न करून घेणे हे त्याच कल्पनेचे व्यावहरिक रूप. त्याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा. अर्थ एकच. त्या अर्थाला कोणा नास्तिकाने आव्हान दिले तर त्यात विशेष काहीही नाही. त्याने धार्मिकांच्या एकूण जीवनव्यवहारावर तसूभरही परिणाम होत नाही. कॅथलिक ख्रिश्चनांच्या मुख्य धर्मगुरूने, पोप फ्रान्सिस यांनीच देवाच्या या लोकप्रिय भूमिकेतील हवा काढून घेणे ही मात्र निश्चितच एक मोठी घटना आहे. आज सर्वच धर्म किरटय़ा एकारलेपणाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर तर पोप यांची अशी भूमिका फारच महत्त्वाची ठरते. पाँटिफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे केलेल्या भाषणात पोप यांनी हे वक्तव्य केले. पण एवढय़ावरच ते थांबले नाहीत. विश्वाच्या उत्पत्तीचा महाविस्फोट सिद्धान्त तसेच डार्विनप्रणीत उत्क्रांतिवाद यांतही तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले. ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. केवळ ख्रिश्चन धर्मातीलच नव्हे, तर सर्वच धर्मातील विश्वोत्पत्तीच्या मूलभूत सिद्धान्तांना किंचित का होईना, पण छेद देणारी अशी ही गोष्ट पोप सांगत आहेत म्हटल्यानंतर त्याचे महत्त्व ध्यानी यावे.
सर्वच मानव समाजांसमोर आणि म्हणून सर्वच धर्मासमोर 'हे सारे कोठून येते' हा एक महत्त्वाचा सवाल राहिलेला आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक धार्मिक तत्त्वज्ञानाचा. दुसरा विज्ञानाचा. धर्मानुसार हे जग, पंचमहाभूते, अवघी सजीव-निर्जीव सृष्टी यांच्या निर्मितीचे श्रेय हे परमेश्वराचे. शिवाय पुन्हा तोच जगन्नियंता. या विश्वाचे यंत्र चालविणारा. विज्ञानाला अर्थातच हे मान्य असण्याचे कारण नाही. विज्ञानानुसार एका महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली. अशी असंख्य विश्वे अवकाशाच्या पोकळीत आहेत. ती सतत प्रसरण पावत आहेत. आता ही अवकाशाची पोकळी कोठून आली. पुन्हा ती आहे तर कशात आहे असे अनेक प्रश्न आहेत. विज्ञान सांगते- माहीत नाही. तीच गोष्ट सजीव सृष्टीची. कोणी केले या सृष्टीचे सर्जन? विज्ञान सांगते, धर्माने त्याला आकाशातला बाप वा खुदा वा ब्रह्मा असे काहीही म्हणू दे; सृष्टीचे असे जनकत्व कोणाकडे नसते. कारण मुळात पृथ्वीवर आधी काहीही नव्हते आणि एका रात्रीत येथे सारे आले असे झालेले नाही. जे काही घडले ते जैवरासायनिक प्रक्रियेतून आणि पुढे उत्क्रांतीतून. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. नव्या जीवजाती जन्माला येतात. काही नामशेष होतात. जुन्या जीवांच्या गुणसूत्रांत वगैरे बदल होऊन नव्या जाती निर्माण होतात. यात ईश्वरनामक संकल्पनेचा संबंधच काय, असा विज्ञानाचा सवाल आहे. या अर्थाने महास्फोटाचा सिद्धान्त असो वा उत्क्रांतिवाद या गोष्टी ईश्वरवादाच्या मूळ प्रमेयांनाच चूड लावतात. केवळ एवढेच करून त्या थांबत नाहीत, तर मानवाचे श्रेष्ठत्वच त्या नाकारतात. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. त्यामुळे त्याचे मत असे की आपण परमेश्वराचे लाडके. त्याने आपणास खेळण्यासाठी म्हणूनच हे जग दिले आहे. येथील प्रत्येक गोष्ट मानवाच्या सुखोपभोगासाठीच निर्माण झाली आहे. जगाच्या निर्मितीतच हा रचनावाद आहे. थोडक्यात सांगायचे तर देवाने माणसाला जे नाक दिले ते चष्मा ठेवण्यासाठी म्हणूनच, अशा शब्दांत फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर यांनी या रचनावादाची खिल्ली उडविली होती. पुढे उत्क्रांतिवादाने या रचनावादाच्या पायालाच सुरुंग लावला. माणसाचा जन्मच जर माकडापासून झाला असेल, तर त्याच्यासाठी देवाने हे जग बनविले या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. या सिद्धान्ताने रचनावाद तर ढासळून पडतोच, पण रचनाकारही कोसळतो. त्यामुळेच कोणत्याही धर्मश्रद्धाळूला हे मान्य असणे शक्यच नव्हते. हे सिद्धान्त मांडणारी सारी मंडळी युरोप-अमेरिकेतली पण प्रबोधनकाळानंतरची म्हणून ती बचावली. नाही तर त्यांना या पाखंडाबद्दल सुळावरच चढावे लागले असते. अर्थात या वैज्ञानिकांना जाळणे-मारणे यांसारखे धर्मदंड देण्यात आले नसले, तरी त्यांच्या विज्ञानविचारांना मात्र सातत्याने क्रुसेड वा जिहादचा सामना करावा लागला आहे. या तथाकथित धर्मयुद्धातील एक हत्यार असते छद्मविज्ञान. छद्मविज्ञान म्हणजे काटय़ाने काटा काढण्याचा धार्मिकप्रिय प्रकार. विज्ञानातील काही तत्त्वे, काही विचार घ्यायचे आणि ती धार्मिक बाबींमध्ये अशी काही घोळायची की वाटावे हा अभिनव शास्त्रविचारच. अमेरिकेत लोकप्रिय असलेला इंटेलिजन्ट डिझाइन किंवा काही ख्रिस्ती पंथांना अत्यंत प्रिय असलेला क्रिएशनिझम हा त्यातलाच प्रकार. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ. अफगाणिस्तान, इराक या देशांवर हल्ले करावेत असा आदेश त्यांना खुद्द आकाशातल्या बाप्पानेच दिला असल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा ख्रिस्तित्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्याच्या कारकिर्दीत छद्मविज्ञानाला बहर यावा यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्याच काळात अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांतून इंटेलिजन्ट डिझाइन हे 'विज्ञान' शिकवावे अशी टूम निघाली होती. या 'इंटेलिजन्ट डिझाइन'कारांनुसार नैसर्गिक निवड वगैरे प्रकार मिथ्या आहे. विश्वातील अनेक गोष्टींमध्ये कोणा बुद्धिमान रचनाकाराचा हात दिसतो. हा रचनाकार म्हणजेच परमेश्वर. तर 'क्रिएशनिझम'नुसार हे जग, ही प्राणीसृष्टी हे सारे एका दैवी निर्मितीची अपत्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांनी महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद खरे असल्याचे सांगितल्याने ही छद्मविज्ञाने उताणी पडली आहेत. अर्थात येथे हेही लक्षात घ्यायला हवे की असा क्रांतिकारी विचार मांडणारे फ्रान्सिस हे काही पहिलेच पोप नाहीत. यापूर्वी पोप पायस बारावे यांनी महास्फोट सिद्धान्ताचे स्वागत केले होते. ते १९३९ ते ५८ या काळात पोपपदी होते. त्यानंतर १९९६ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी उत्क्रांतिवाद पुराव्याने शाबीत झाल्याचे सांगून खळबळ उडविली होती. पण हा असा किंचित विज्ञान पक्षपातही चर्चच्या गुणसूत्रांत नाही. त्याची प्रचीती २००५ मध्ये पोपपदी आलेले बेनेडिक्ट सतरावे यांनी आणून दिली. त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शब्दांची अशी काही जाळी विणून इंटेलिजन्ट डिझाइनचा सिद्धान्त उचलून धरला. परंतु पोप फ्रान्सिस यांनी आज त्याची भरपाई केली आहे. याचा अर्थ त्यांनी देव नाकारला आहे असे नाही. त्यांचे म्हणणे एवढेच की महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद देवकल्पनेशी विसंगत नाही. खरे तर चर्चला नव्याने झालेला हा साक्षात्कारही थोडका नाही.
धर्म हा मोठा चलाख परंतु गतिमंद विद्यार्थी असतो. चलाख यासाठी की तत्त्वज्ञानाच्या मायाजालात तो बडय़ा बडय़ा बुद्धीमंतांनाही मंद करून टाकतो आणि गतिमंद विद्यार्थी यासाठी की तो आधुनिक ज्ञान-विज्ञान अंगीकारतो परंतु त्यासाठी त्याला वेळ लागतो. पोप फ्रान्सिस यांनी विज्ञानाचे दोन महत्त्वाचे सिद्धान्त मान्य करून धर्माची आजवरची चलाखी उघड करून दाखविली आहेच, पण त्याच्या गतिमंदत्वाचेही प्रमाण दिले आहे. काहीही असो, त्यांना झालेला हा साक्षात्कार क्रांतिकारी ठरणारा आहे हे नक्की.
-३० ऑक्टोबर २०१४ च्या 'लोकसत्ता' मधील अग्रलेख