Thursday, May 8, 2014

माणसाचे मांस

एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.

कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला,  "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही. बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला,  "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला की त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.

वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल."

मुलगा कावळा "होय" म्हणाला.

त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला, तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे. असले खाणे मला नको."

वडील कावळा म्हणाला, "थांब", तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते सुद्धा माणसाचे."

मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ते.

पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता.

थोड्या वेळाने वडील कावळा एक तुकडा घेवून आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.

वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त 'धर्म' भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

''आमच्या धर्माचा अपमान झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे'' असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.

या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.

आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, "बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"
कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."

इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून गेले.

Wednesday, April 30, 2014

महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार

फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.

खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते.महात्मा फुल्यांनी फलज्योतिषाची जनमानसावरील पकड अचुक पद्धतीने ओळखली. आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' मध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले त्यावरुन फलज्योतिषाच्या मुळ सिद्धांताचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता हे स्पष्टपणे जाणवते. प्रथम अभ्यासक व नंतर टीकाकार अशी त्यांची भूमिका होती. फलज्योतिष हा धर्माचा एक भाग मानला जात असल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात फलज्योतिषासंबंधी टीका केली.फुल्यांच्या काळातील म्हणजे शतकापुर्वीची असलेली सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर फलज्योतिषाला सामाजिक शोषण व अंधश्रद्धा म्हणणारे म.फुले काळाच्या किती पुढे होते हे समजते. फलज्योतिषी लोकांच्या अज्ञानाच्या फायदा उठवुन भरभक्कम दक्षिणा उकळतात असे ते स्पष्टपणे म्हणतात. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचे यज्ञयाग केले जातात. ज्या धर्मग्रंथात ग्रहपीडानिवारणाचे कर्मकांड सांगितले जाते त्याविषयी तीव्र भाषेत टीका करतात."अहो त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाउबंदास म्हणजे बैलास जन्म देणा-या गायांसह मेढ्यांस अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यांस खाण्याच्या निमित्ताने यज्ञामध्ये त्यांचा बुक्क्यांनी वध त्यांचे मांस गिधाडासारखे खात होते, त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणांचे काही नुकसान करवले नाही. तथापि हल्लीच्या सत्ययुगामधे जर गायामेंढ्यास जर ईश्वरकृपेने वाचा फुटली असती तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नांवे ठेवण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते."
अशाच जन्मनांव प्रकरणाचा समाचार महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपुर्वी घेतला. "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" मध्ये फुल्यांनी बळवंतराव हरी साकवळकर यांच्या जन्मवेळेवरुन जन्मनांव कसे काढतात? यावरुन जन्मरास पत्रिका कशी मांडतात? याविषयींच्या प्रश्नाला विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे. त्यावरुन त्यांना फलज्योतिषविषयक चांगली जाण होती हे दिसुन येते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर " मानव स्त्री पुरुष जन्म होताना त्यावेळी नक्षत्रांचे कोणते चरण होते म्हणुन समजणारे लोक फारच विरळा. त्यातुन नक्षत्रांचा पहिला व दुसरा चरण संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर 'चे' याची 'ची' अथवा 'चु' याचे 'चे' होण्याचा संभव आहे. त्याच प्रमाणे अश्विनीची चार चरणे, भरणीची चार चरणे आणि कृत्तीकाचे पहिले चरण अशी एकंदरीत नउ चरणे मिळुन एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर वृषभ राशीची मेष रास अथवा मेषराशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरुन स्त्री पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पहाणारे फारच थोडे. परंतु वाव अथवा कास-याने सुर्य अथवा रात्रीच्या तपा मोजणारे बहुत सापडतील.यावरुन आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या त-हेने वर्तवतात याविषयी एखादा अनुभव असेलच. याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचुन पहा. म्हणजे आर्य जोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल."
वरील विवेचनावरुन फुल्यांनी केलेली टीका तर्कसंगत आहे हे लक्षात येते. नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो. सुशिक्षित माणसे मात्र पत्रिका जुळत नाही म्हणुन वधु - वरांना प्राथमिक फेरीतच बाद करतात.ज्या पायावर पत्रिकातयार होते तो पायाच किती डळमळीत आहे हे फुल्यांनी आपल्या विवेचनात दाखवुन दिले आहे. तत्कालीन समाजात तर फलज्योतिषाचे बडे प्रस्थ होते.. अशा परिस्थितीत लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा फुल्यांनी प्रयत्न केला. मोठी मोठी माणसे सुद्धा फलज्योतिषावषयी उघड टीका करीत नसत. कारण हा जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने फलज्योतिषात तथ्य नसल्याचे सांगणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या, प्रतिमेच्या दृष्टीने हितावह नव्हते.
आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनातील सुख दु:खावर परिणाम होतो का? अशा आशयाचा प्रश्न जेव्हा फुल्यांना विचारला तेव्हा फुले म्हणतात," या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत. त्यापैकी आपल्या एका संनिध चे सुर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर,भुचर आणि वनचरांसह प्राणजिवन आहेत म्हणुन निर्विवाद आहेत व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्री पुरुषांस पीडा देतात म्हणुन सिद्ध करता येत नाही. तसेच शनी वगैरे ग्रहांच्या संबंधाने एखादे वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकंदर सर्व प्राणिमात्रास काही एक त-हेने हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे तरी ते एकंदरीत सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, म्हणुन सिद्ध करता येणार नाही. कारण शनीवरील एकंदरीत सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत. व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमुन दिलेले उद्योग एके बाजुला ठेउन तो या भुमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो, आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धुर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दुर होते., ही सर्व पोटबाबु आर्य जोशांची लबाडी आहे."
फुल्यांनी फलज्योतिषाच्या मूळ सिद्धांतावर हल्ला चढवला. त्याकाळी फुल्यांनी स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टीकोण आज आपल्याला स्वीकारणे जड जाते. फुल्यांच्या काळात नउवारी साडी नेसणारी स्त्री शनी पीडा देईल साडेसातीत शनीला तेल घालण्यासाठी ज्या भीतीपोटी जात होती त्याच भीती पोटी आजची स्लीवलेस ब्लाउज घालणारी, बॊबकट केलेली ललना शनीला जाते.
जन्मवेळ कुठली मानावी याविषयी प्रतिपादन करताना फुले म्हणतात," याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रात हे मनकल्पित थोतांड मुख्य उभे केले आहे. कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
यावरुन फुल्यांनी फलज्योतिषविषयक आपली भुमिका किती स्पष्ट व तर्कशुद्ध मांडली आहे हे दिसते.आपला फलज्योतिषावर विश्वास नाही अशि साधारण भुमिका न घेता इतरांनीही विश्वास ठेउ नये म्हणुन कारणमिमांसा करुन लोकांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी टीकेसाठी लागणा-या शब्दांसाठीही तडजोड स्वीकारली नाही. युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

-किशोर लोखंडे यांच्या फेसबुक TIMELINE वरून

Friday, April 25, 2014

अंनिस हिंदूंचेच अंधश्रद्धा निर्मूलन का करते?

अंनिस हिंदूंचेच अंधश्रद्धा निर्मूलन का करते? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी म्हणून हा लेख लिहित आहे. चर्चा करायला सोयीचे म्हणून प्रत्येक मुद्द्याला क्रमांक दिले आहेत. ज्यांना वाद घालायचा आहे त्यांनी मुद्देसूद घालावा. जो मुद्दा पटला नाही तो मुद्दाक्रमांक नोंदवून आपले मत मांडावे. अन्य मुद्दे तुम्हाला मान्य आहेत असे समजले जाईल. वाद घालताना भाषा सभ्य माणसाला शोभेल अशी वापरावी ही विनंती.
१)अंनिस हिंदूंचेच अंधश्रद्धा निर्मूलन का करते? या प्रश्नाचे उत्तर खरे तर एकाच ओळीत देता येईल आणि हा प्रश्न वारंवार विचारणाऱ्यांचे तोंड बंद करता येईल. ते म्हणजे ‘आमचे हिंदू धर्मीय लोकांवर प्रेम आहे म्हणून आम्ही त्यांच्याच अंधश्रद्धांचे निर्मूलन करतो.’ (परंतु या प्रश्नाआडून अंनिस बद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग काही लोक करत आहेत म्हणून सविस्तर उत्तर देत आहे.)
२) अंनिसचे बहुतांश कार्यकर्ते हिंदू कुटुंबातून आलेले आहेत. मी स्वतः हिंदू कुटुंबात जन्माला आलेलो आहे. माझे शेजारी हिंदू धर्मीय आहेत. माझे नातेवाईक हिंदू धर्मीय आहेत. माझे मित्रमंडळी हिंदू धर्मीय आहेत. माझ्या गावातील बहुतांश लोक हिंदू धर्मीय आहेत. असे असताना मी त्यांना मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मांतील अंधश्रद्धांचा फोलपणा सांगत बसावा काय? माझ्या जवळचे लोक अंधश्रद्धेचे बळी ठरत असताना मी माझ्यापासून कोसो अंतर दूर असणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे काय? माझे आणि माझ्या शेजाऱ्याचे घर जळत असताना मी माझ्या गावाबाहेरील कुणाचे घर जळत आहे याचा शोध घेत फिरावे काय?
३) ज्या अंधश्रद्धांचा मला पावलोपावली त्रास होतो, ज्या अंधश्रद्धा माझ्या नित्य परिचयाच्या आहेत त्या अंधश्रद्धा सोडून ज्या धर्मांचा आणि माझा काहीच संबंध नाही, ज्या धर्मातील रूढी-परंपरांचा माझा काहीच अभ्यास नाही त्या धर्मांतील अंधश्रद्धांच्या पाठीमागे मी हात धुऊन लागावे यासारखा दुसरा मूर्खपणा असेल काय? घरातील व्यक्ती आजारी असताना तुम्ही लांबच्या नातेवाईकाच्या आजारपणासाठी धावपळ करता का?
४)भारतात सुमारे ८२% लोकसंख्या हिंदूंची आहे. सुमारे १२-१३% लोकसंख्या मुस्लिमांची आणि उरलेले लोक अन्य धर्मीय आहेत. असे क्षणभर मानू की आपला देश हे १० खोल्यांचे घर आहे. साहजिकच त्यातील ८ खोल्या हिंदूंच्याकडे असणार. १ खोली मुस्लीम आणि १ खोली इतर धर्मीयांकडे असणार. आता या १० खोल्यांच्या वाड्यातील ८ खोल्या जर अंनिस स्वतःला तोशीस लावून स्वच्छ करत असेल, तर त्यामुळे बहुसंख्य खोल्या स्वच्छ होतील. म्हणजे जवळ जवळ सर्व वाडाच स्वच्छ होईल. अशा वेळी आधी ९वी खोली स्वच्छ करा आणि मगच पहिल्या ८ खोल्या स्वच्छ करा, अशी दमबाजी कुणी करत असेल तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ इतकाच होतो की लोकांनी घाणीतच राहिले पाहिजे अशी त्या माणसाची इच्छा आहे. (अशी इच्छा धरणाऱ्या माणसाचा हेतू तपासून बघायला नको का?)
५)खरे तर हिंदू धर्मात धर्म हा प्रमुख घटक नसून जात हा प्रमुख घटक आहे. प्रत्येक जातीच्या रूढी-परंपरा वेगवेगळ्या आहेत. साहजिकच अंधश्रद्धांचे प्रकारही तितकेच वेगवेगळे आहेत. हिंदू धर्माला एकच धर्मग्रंथ नाही. एकच देव नाही. हिंदू धर्म साधारणपणे ५००० वर्षे इतका जुना आहे. त्या मानाने ख्रिश्चन धर्म २००० वर्षे इतका जुना आहे. मुस्लीम धर्म तर अवघा १४०० वर्षापूर्वीचा आहे. या दोन्ही धर्मांचा एकच देव आणि धर्मग्रंथ आहे. या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्याचा अर्थ इतकाच की हिंदू धर्मात इतर धर्मांच्या मानाने जास्त अंधश्रद्धा असणे स्वाभाविक गोष्ट आहे. आता मी प्राधान्याने कोणत्या अंधश्रद्धांचे निर्मुलन करायला हवे? आपण सफाईचे काम करताना जिथे जास्त कचरा जमा झाला आहे ती जागा तशीच सोडून जिथे कमी कचरा आहे त्याच जागी झाडू मारत बसतो का?
६)आणि कचरा साफ करताना आपण आधी आपल्या घरातील कचरा साफ करणे सोडून शेजाऱ्याच्या घरातील कचरा साफ करतो का? तेही आपल्या घरात शेजाऱ्याच्या घरापेक्षा जास्त कचरा असताना.
७)समाजसुधारणेच्या जागतिक इतिहासाकडे पहिले तर असे दिसते की प्रत्येक समाजसुधारकाने सुधारणेला आपल्या धर्मापासूनच सुरुवात केलेली आहे. मग आम्ही फक्त हिंदूंच्याच अंधश्रद्धांचे निर्मुलन केले (प्रत्यक्षात तसे काही नाही हे पुढे स्पष्ट होईलच.) तर बिघडले कुठे? आम्ही तर जागतिक नियमानुसारच जात आहोत ना.
८)क्षणभर खरे मानून चालूया की अंनिस फक्त हिंदूंच्याच अंधश्रद्धांच्या मागे लागली आहे. पण पुढचा मुद्दा असा आहे की हे काम चांगले आहे की वाईट? हे काम करणे आवश्यक आहे की नाही? या कामाने समाजाचे हित होणार आहे की अहित? ज्या लोकांना हे काम आपल्या समाजासाठी वाईट आहे असे वाटते ते लोक आपल्या समाजाचे हितशत्रू आहेत असेच म्हणावे लागेल. (याबाबतीत ख्रिश्चन धर्मातील सुधारणांमुळे तो समाज कमजोर झाला की मजबूत, याचा विचार करावा.)
९)मुळात अंनिस फक्त हिंदू धर्मावरच बोलते हीच एक थाप आहे. अंनिस ने इतर धर्माबाबतीत सुद्धा काम केले आहे. त्याची यादी जरी करायची म्हटले तरी या लेखाला जेवढी जागा लागली त्यापेक्षा जास्त जागा निश्चितच लागेल. मदर तेरेसांना संत घोषित करण्याची पद्धत, सध्या कटगुण (जि.सातारा) येथील दर्ग्याबाबत चालू असलेला संघर्ष, अस्लम बाबाविरोधात केलेली कारवाई, शिखर सम्मेदजी या जैनांच्या तीर्थस्थानाची चिकित्सा करणारा लेख (जो गेल्या वर्षी विधानसभेतही चर्चेत आला होता. असे ख्रिश्चन आणि मुस्लीम अंधश्रद्धांची परखड चिकित्सा करणारे अनेक लेख अंनिसच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत.), करमली बाबाच्या दर्ग्यावरील कथित चमत्काराचा भांडाफोड, बौद्ध धर्मातील विपश्यनेसारख्या अंधश्रद्धेविरोधातील लेखन असे कितीतरी कार्य अंनिसने हिंदू धर्माबाहेरही केले आहे आणि करत आहे. (अधिक माहितीसाठी अंनिस ने प्रकाशित केलेले साहित्य वाचावे.) पण ज्यांना थापा मारून दिशाभूलच करायची आहे आहे ते या गोष्टी लोकांना कशाला सांगतील? एक गोष्ट खरी आहे की अंनिसने हाताळलेली बहुतांश प्रकरणे हिंदू धर्माशी संबंधित आहेत. पण त्याची कारणे वरील १ ते ७ मुद्दे आहेत.
१०)अंनिस जात आणि धर्म या गोष्टींचा विचार न करता सर्वांसाठी काम करते. पण ज्या लोकांच्या डोक्यातून या लेखाच्या सुरुवातीचा प्रश्न आला आहे ते लोक मात्र एका विशिष्ट वर्गासाठी काम करतात. लोकांनी अंधश्रद्धाळू असण्यावरच ज्यांचे पोटपाणी अवलंबून आहे त्या लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि त्यांचे आंधळे भक्त (ब्रेन वॉश केलेले मानव) त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून आपल्याच बांधवांच्या विरोधात त्या लोकांना साथ देत आहेत. त्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्यांची भक्ती करताय त्या लोकांचा इतिहास जरा तपासून बघा. खोटारडेपणा हा त्यांच्या कार्यपद्धतीचा पाया आहे. ज्यांना खोटे बोलण्याची गरज पडते, त्यांचं हेतूही शुद्ध असू शकत नाही.
(हा लेख लिहिण्यापूर्वी मी फेसबुकवर ‘आम्ही इतर धर्मियांचे अंधश्रद्धा निर्मूलन का करावे?’ असा प्रश्न विचारला होता. माझी अपेक्षा होती की माझे जे मित्र मला नेहमी विचारतात की तुम्ही हिंदूंच्याच मागे का लागता ते उत्तर देतील. पण त्यांनी उत्तर दिलेच नाही. म्हणजे त्यांनी आपली जबाबदारी टाळली. त्यांनी आता तरी हा प्रश्न विचारणे सोडून द्यावे.)

गर्भसंस्कार: एक थोतांड?


आपले मूल (बहुदा एकच होऊ देत असल्यामुळे... सर्वात महत्वाचे झालेले ते मुल) हुशार, सुंदर, कर्तृत्ववान व्हावं ही प्रत्येक आई-बापाची स्वाभाविक इच्छा... नैसर्गिकच. आता व्यापारी जगात या नैसर्गिक इछेचा फायदा घेऊन अनेक गर्भसंस्कारांची दुकानं गावोगाव उघडली गेली आहेत.
हजारो रुपये घेऊन ‘गर्भसंस्कारामध्ये प्रशिक्षण देणारे’ वर्ग चालवले जात आहेत.
‘नुकसान तर नाही ना?’
‘आणि आयुर्वेदात आहे... मग शास्त्रीयच असणार ना?’
या दोन वाक्यांत ही सुशिक्षित गिऱ्हाईकं सहजपणे आपल्या आधुनिक ‘अभिमन्यू’साठी काही हजार रुपये खर्च करताना दिसत आहेत. ‘अभिमन्यू’ हे एकच उदाहरण ‘मार्केट’ करून हे तथाकथित व्यापारी गिऱ्हाईकं खेचतात.
ठीक. आपण उदाहरण बघू... शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा जिजाबाई गर्भवती होत्या तेव्हा अक्षरशः मोगल पाठीवर घेऊन पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची/भावाची हत्या झाली. त्यांना ना व्यापारी भेटले ना गर्भसंस्कार केले! तरी शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडले! जिजाबाईंचा जरूर वाटा आहे. किंबहुना त्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराज घडले.
पण हे ‘जन्मानंतर’च्या संस्कारांमुळे. गर्भसंस्कारांमुळे नाही! पुराणकाल (अभिमन्यू) व भूतकाळ (शिवाजी महाराज) यांच्या उदाहरणानंतर आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ.
भारतातील सधन वर्ग जो पैसे टाकून गर्भसंस्कार घेऊ शकतो हा एकीकडे अन् छोटी गावं, गरिबी यात गर्भसंस्कारासाठी कुठे पैसा आणणार असा मध्यमवर्गीय एकीकडे. आज एशिया व कॉमनवेल्थमध्ये ज्यांनी मेडल्स मिळवली आहेत, त्यात खूप जास्त संख्या ही ग्रामीण भागातून आलेल्या, धडपडणाऱ्या मुलां-मुलींची आहे. उदा. कविता राऊत ही नाशिकमधल्या आदिवासी भागातील मुलगी! आज दीर्घ पल्ल्याची सर्वोत्तम धावपटू आहे. गर्भसंस्कार हा शब्दही तिच्या आईने ऐकला नाही- तरी.
डॉ. कन्ना मडावी हा माझ्याप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ! कांदोटी या आजही मागासलेल्या व दुर्गम भागात जन्मलेला आणि लोकबिरादरमध्ये १९७६ साली येऊन शिक्षण घेतलेला कन्ना- एम.डी. झाला. अॅडव्होकेट लालचू नौगोटी-जुनी या छोट्या आडगावातल्या; वडील व आई दोघंही लहानपणीच वारले. तो एम.ए.एल.एल.बी. झाला.
ही दोन हेमलकसाची प्रातिनिधीक उदाहरणं. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आईबापांपोटी व आदिवासी व दुर्गम भागात जन्म घेतलाय यांनी! अनेक हजार वर्षांतही या भागात आयुर्वेद पोचलाच नव्हता. डॉ.प्रकाश व डॉ. मंदा यांच्या रुपानं आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रकाशाची तिरीप प्रथम पोचली ती १९३ ला. या अशा परिस्थितीत या मुलांवर गर्भसंस्कार कुठून येणार?
तरीही मुलं शिकली व परत गडचिरोली भागातच परतली. तिथं ती आपल्या ज्ञानाचा फायदा आदिवासींना करून देत आहेत. गर्भसंस्कारांमुळे हे घडलं नाही तर बाबा, प्रकाश, मंदा आमटे यांच्या मदतीच्या हातानं हा चमत्कार घडला!
या सर्व उदाहरणांनी अभिमन्यूची कथा किती फोल आहे व जन्मानंतरचे संस्कार, जिद्द, प्रेरणा कर्तृत्वासाठी किती महत्वाचे ठरतात हे आपण सहजपणे स्वतःच बघू शकतो. गर्भसंस्कार मार्केट करणाऱ्यांकडे फक्त एका अभिमन्यूची कथा आहे. आपल्यासमोर गर्भसंस्काराशिवाय नोबेल, ऑलिम्पिक व इतर मेडल मिळवणाऱ्यांची प्रत्यक्ष फौज आहे. तेव्हा कथेच्या मोहातून आपण बाहेर पडू या.
आता गर्भसंस्कारांचा तथाकथित शास्त्रीय/वैज्ञानिक मुखवटा आपण तपासून बघूया.
गर्भसंस्कार वर्गात हे घडते.
१. चर्चा, कौन्सेलिंग- मान्य
२. आहार मार्गदर्शन- मान्य
३. व्यायाम मार्गदर्शन- मान्य
४. आनंदी राहण्याची सूचना- मान्य
५. नवरा-सासूचा सहभाग- मान्य
हे सर्व कोणीही सुजन व्यक्ती मान्य करेल. त्यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा मुखवटा घ्यायची गरज नाही.
गर्भावर संस्कार करण्यासाठी, पूर्णपणे त्याची बुद्धी वाढवण्यासाठी मातेला ‘मंत्र’ शिकवले जातात. हे मात्र पूर्ण अमान्य.
गर्भ पोटात असताना मंत्र म्हणून त्याची बुद्धी वाढू शकते हा विश्वास शास्त्रीय आहे व त्यासाठी आयुर्वेदात ‘मंत्र’ दिले आहेत, असा गर्भसंस्कारांचा पाया सांगितला जातो...
या पायाची दोन पद्धतीनं आपण चिकित्सा करू.
अ) आयुर्वेदात काय आहे?
आ) आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
अ) आयुर्वेदात काय आहे?
आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळंतपणानंतर ‘वार’ कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. तसेच त्याकाळात गर्भपात अटळ असेल तर ‘राजाची’ परवानगी घ्या अशी कायदेशीर यंत्रणाही दर्शवली गेली आहे.
आयुर्वेदाला विरोध म्हणून गर्भसंस्काराला विरोध अशी आमची भूमिका नाही. आमचे आयुर्वेदातील तज्ञ सहकारी अनेक व्याधी आज व्यवस्थित पद्धतीने हाताळतात व या सर्वांबद्दल आम्हाला व्यावसायिक आदर आहे. आयुर्वेद ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे व अर्थातच त्यातली काही निरीक्षणे/अनुमाने व उपाय कालबाह्य झाले आहेत.
उदाहरणं अशी:
(अष्टांग हृदय, वाग्भट कृत)
१. गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो.
२. पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३. पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते. –(सार्थ भाव प्रकाश) पूर्वखंड श्लोक १३-१६, वैद्य नानल यांची प्रत
४. पाळीनंतर सम रात्री (२,४,६,८,१०,१२) संभोग केला तर पुत्र होतो व विषम रात्री (५,७,९) केला तर कन्या होते.
(पाळीनंतर पहिल्या 10 दिवसांत गर्भधारणाच होऊ शकत नाही हे शास्त्रीय सत्य आज शाळांतही शिकवलं जातं.)
५. शरीरात ३०८ हाडं आहेत. (पाचवा अध्याय) आजच्या शास्त्राप्रमाणे २०६.
६. गर्भाधान संस्कार: गर्भधारणा होण्याचे ठिकाण, त्यावेळची मानसिक अवस्था याचा गर्भावर होणारा परिणाम. उदा. समागमाच्या खोलीत अडगळ नको. (आज हे किती जोडप्यांना शक्य आहे?)
७. अनवमोलन संस्कार: यात गर्भपातापासून सुटका सांगितली आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहपीडा यामुळे होणारा.
३००० वर्षांपूर्वीचं आयुर्वेद अर्थातच तत्कालीन मर्यादांचा विचार करूनच वाचलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष:
आयुर्वेद हे ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे ही त्याची मर्यादा आज मान्य करायला हवी. खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं. ते करायला हवं!
आ) आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
काही गर्भसंस्कार करणारे तर हेही बिनदिक्कत सांगतात की, आजच्या शास्त्राप्रमाणे गर्भसंस्कार वैज्ञानिकच आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्र काय सांगते?
१) गर्भाची गर्भाशयामधली वाढ व क्षमता अशी विकसित होते.
तीन महिन्यांचा गर्भ: हात, पाय, डोळे, हृदय, किडनी, आतडी, मेंदूही प्राथमिक स्वरुपात तयार.
चार महिन्यांचा गर्भ: ऐकू शकतो. म्हणजे आवाजाची जाणीव होण्यासाठी मेंदूचा भाग थोडा विकसित होतो. ऐकणं... म्हणजे आवाज ऐकणं. ऐकून समजणं नव्हे.
चौथ्या महिन्याअखेर: Myelination मायलीनेशन म्हणजे मज्जातंतूवरचं आवरण. ह्याची सुरुवात होते. मायलीनेशन झाल्याशिवाय मज्जातंतू काम करू शकत नाहीत. त्यांचे काम संवेदना इकडून तिकडे पोचवण्याचे असते.
जन्मवेळेपर्यंत: जेमतेम १२ ते १५% मज्जातंतू हे मायलीनेशनचे असतात, व त्यामुळे श्वसन, हृद्य, आतडं अशा जीवनावश्यक क्रियाच फक्त शक्य असतात. ‘समजण्या’साठी (ऐकून/वाचून) अजून बाळ तयार नसते. हे मायलीनेशन जन्मानंतरही चालूच राहते व ते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
२) शिक्षणक्षमता (गर्भाची)
३२ आठवडे पूर्व गर्भाला ही शिक्षण क्षमता थोडीबहुत येते. मात्र ही Habituation हॅबीच्युएशन या प्रकारची असते.
ती Reflex असते. प्रतिक्षिप्त क्रिया असते. ती Response नसते, प्रतिसाद नसतो.
अगदी एकपेशीय आमीबाही त्यावर प्रकाशाचा तीव्र झोत टाकला तर आक्रसून दूर होतो!
म्हणजे
-ओरडणे (आवाज आदळणे)
-बोलणे (आवाज येणे)
-मंत्रोच्चार (आवाज येणे)
-फटाके (आवाज आदळणे)
-हॉरर मुव्ही (आवाज आदळणे)
-शास्त्रीय संगीत (आवाज येणे)
या सर्व Stimulus ला... उत्तेजनेला- गर्भ प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देतो- एवढेच त्याचं ऐकणं असतं! उदा. आई हॉरर मुव्ही बघत असेल तर आवज व आईच्या दचकण्यामुळे गर्भ हलतो.
तसाच तो आई अत्यानंदाने ओरडली तरी हलतो. हॅबीच्युएशनची प्रतिक्रिया म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे.
केवळ या मुलभूत क्षमतेचा वापर गर्भसंस्कार व्यापारासाठी करतात. ते म्हणतात, ’बघा... बाळ ऐकतंय.’
बाळाला ऐकू येतं... पण गोंगाटाच्या स्वरुपात! त्यात शिक्षण घेण्याची क्षमता नसते.
३) बाळाला ऐकू येतं?
वर सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकू येतो तो गोंगाट. आवजाची संवेदना. गर्भसंस्कारात आई मंत्रोच्चार करते. हा आवाज बाळापर्यंत पोचतो का? तर पोचतो, पण क्षीण! बाळाच्या आजूबाजूला गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असतात. मागे भला मोठा अेओर्टा असतो. यातून जाणाऱ्या रक्ताचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो, तो ६० ते ८० डेसिबलचा! म्हणजे बाळ आर्टरीचा, हा मोठ्या आवाजात डिस्को ऐकत असतं दिवसरात्र!
त्यात हा पुटपुटण्याचा (मंत्रांचा) आवाज कसा पोहोचणार? शक्यच नाही.
किंबहुना मायलीनेशन होत नाही व बाळ काही ‘समजू’ शकत नाही हे बाळाला वरदानच आहे. नाहीतर या गोंगाटानं ते बधीर व्हायचं!
४) आईच्या मनातील भावनांचा व तिच्या विचारांचा, गर्भावर काय परिणाम होतो?
उत्तर: काहीही नाही.
पुरावा: Dizygotic Twins.
यामध्ये दोन बाळं एकाचवेळी आईच्या गर्भाशयात असतात. यात एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुलगे/दोन्ही मुली असं काहीही असू शकतं. यांची जनुकं वेगळी असल्याने त्यांच्यात शारीरिक साधर्म्य कमी प्रमाणात असतं. पूर्णपणे भिन्न असतात.
आता आईचे विचार, तिचा आचार व तिने केलेले ‘संस्कार’ दोघांसाठी ‘एकच’ असताना ही भिन्नता कशी? पुढे जाऊन प्रत्येकाचं कर्तृत्व पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात आईच्या इच्छेवर बाळ सुंदर, बुद्धिमान बनत नाही. अजिबात नाही.
अशा गर्भसंस्कारामुळे पसरणाऱ्या समजुती घातक आहेत. मातेचा गर्भारपणाचा सहज आनंद या समजुती मातीत मिळवतात. एक OBSESSION मातेमध्ये रुजवतात. जणू बाळाचं भवितव्य तिच्या हातात आहे! हल्ली झटपट व पैसे टाकून सर्व, अगदी आरोग्यही, विकत मिळते अशी रूढ समजूत आहे. पैसे फेका... मंत्रोचार शिका. पैसा फेका- क्लास लावा, आपलं मूल- बिल गेट्स.
भयंकर सापळा आहे हा... व तो बाळाला पकडतो. गर्भसंस्कार करून बाहेर पडलेलं बाळ बुद्धीनं सामान्य निघालं तर आईला धक्का बसतो. इतकं हे Obsession या गर्भसंस्काराच्या खुळामुळे पसरते आहे.
या सगळ्या Instant व पैसे टाकून विकत मिळवायच्या शर्यतीत आपण मुळात व्यक्ती/बाळ शिकते कसे ते लक्षात घेत आहोत का?
५) व्यक्ती शिकते कशी?
खालील learning pyramid बघा.
(शिक्षणाचा आराखडा)
सर्वसाधारण व्यक्ती वेगवेगळ्या मार्गानं शिकत असते. ते मार्ग व त्यांची उपयुक्तता अशी. (आईनस्टाईन वगैरे अपवाद. ते सोडून द्यायचे. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आपलं मूलही तसंच आहे, हे वास्तव आधी मान्य करूया.)
सर्वसाधारण व्यक्ती अशी शिकते
१०% वाचणे, २०% ऐकणे व पाहणे, ३०% प्रयोग बघणे व करणे, ५०% मनन व चर्चा, ७५% ज्ञानाचा उपयोग करून, ९०% दुसऱ्यांना शिकवून.
आपण बघितलं की गर्भाला मुळात मायलीनेशन नसल्यामुळे फक्त आवाजाची संवेदना समजते. त्यातून ते अर्थ समजू शकत नाही. वादापुरतं असं मान्य केलं की तो समजतो, पण मग जो विषय आपण शिकवतो (गर्भारपणी काय शिकवतो? गणित?) पण जरी शिकवलं गणित गर्भारपणी, तरी ते ऐकून फक्त शिकणार म्हणजे ते वाचू शकणार नाही, प्रयोग बघू शकणार नाही. करू शकणार नाही, त्या ज्ञानाचा उपयोग ‘तेव्हाच’ करू शकणार नाही.
२०% शिकण्याची क्षमता उपयोगात येईल आली तर! अर्थातच बाळ पोटात आईनं म्हटलेलं मंत्र ऐकून शिकते ही एक पूर्ण अंधश्रद्धा आहे. मातृत्वाच्या टप्प्याला मातेनं व तिच्या नवऱ्यानं नीट आत्मसात करावं. त्याचं मनन करावं. ते वापरावं आपल्या बळावर.
समारोप
‘गर्भसंस्कार’ करायला जाणाऱ्या सुशिक्षित स्त्री/पुरुषांची दोन गृहीतं असतात. ‘नुकसान तर नाही ना?’ आणि ‘आयुर्वेदात आहे मग वैज्ञानिकच असणार ना!’
यात ‘आयुर्वेदा’ची व आधुनिक विज्ञानाची ही कसोटी लावली तर ‘गर्भसंस्कार’ वैज्ञानिक नाहीत. Evidence based नाहीत हे आपण बघितलं. आता ‘नुकसान तर नाही ना?’ या मुद्द्याकडे येऊ या.
खलील जिब्रान म्हणतो तसं तुमचं बाळ हे सुटलेला बाण आहे. अगदी गर्भावस्थेपासून ते वेगळी ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे. गर्भसंस्कारांसारखे अट्टाग्रह मनात धरून त्याचा रोबो करू नका. आई-बाप आहात... आधार द्या, प्रेम द्या, थोडी शिक्षाही करा.
पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फुलवा. आपली स्वप्न... आपले हट्टाग्रह लादू नका. पालकांच्या हट्टाग्रहाची सुरुवात गर्भसंस्कारांचे मंत्रपठण करून होते... ही वाट धोक्याची आहे... सावध असा!
गर्भसंस्कारांना आपण जातो तेव्हा, आपण आपल्या बाळाकडून अवास्तव अपेक्षांची सुरवात गर्भावस्थेतच करतो! हे मोठं नुकसानच आहे, नाही का? म्हणून प्रत्येक वाचकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा.
...खरं-खोट्याचा बेमालूम व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकत असतील बाजारात...
पण मी अवैज्ञानिक व अवास्तव अपेक्षांनी भारून जाऊन त्यांना बळी का पडतेय/पडतोय?
गर्भसंस्कार करायचे नाहीत तर काय करायचं?
तर मातृत्व उपनिषद वाचायचं. त्यातलं ज्ञान मिळवायचं. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या आपल्या बाळाची व्यवस्थित जडणघडण घडेल, मातृत्वाचे त्रास कमी होतील, धोके आधी समजतील. मातृत्व सुखद, समाधानी, सुखरूप ठरेल. डिलीव्हरीनंतर निव्वळ स्तनपान करायचं. आदर्श हे... की पहिले ६ महिने फक्त स्तनपान! त्यासाठी आईचा आहार... गर्भवती असताना होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. बाहेरचं दूध, पावडरी... कशाचीही गरज नाही.
हल्ली मुली नोकऱ्या व करिअर करतात. ठीक. जेवढे महिने जमेल तेवढं-
१. तात्पुरती, दोन वर्षं फक्त, गृहिणी व्हायचा पर्याय सर्वोत्तम शक्य आहे. (सरकारसुद्धा सहा महिने मॅटर्निटी लीव्ह... बाळंतपणाची रजा देते.)
आर्थिक गरज नसेल तर शक्य होईलही कदाचित. विचार तर करा. हा पर्याय विचारात घ्या.
२. किमान पहिले चार महिने निव्वळ स्तनपान.
३. नंतर बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने गरज असेल तर, बाहेरचं दूध व इतर आहार.
जन्मतः मायलीनेशन फक्त १२ ते १५% व पहिल्या ३ वर्षात पूर्ण. अर्थातच बाळाच्या दृष्टीनं हा कालखंड सर्वात महत्वाचा. त्याचं पोषण/आहार अत्यंत काटेकोर व योग्य असावा. (बालरोगतज्ञाची मदत घ्या.)
४. लसीकरण पूर्ण व त्या त्या वेळेवर.
५. बाळाशी बोलणं महत्वाचं... खूप बोलणं.
जन्मल्यापासून बोलवं... गर्भसंस्कारांच्या वेळचा मंत्रोच्चार काही उपयोगाचा नाही. आता बोलणं उपयोगाचं.
६. संस्कार हे ‘बोलून’ होत नाहीत. ते करून होतात. जे काही मुलानं/मुलीनं करावं असं वाटतं ते आपण करावं. बाळ स्वभावतःच आई वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं.
सर्वात शेवटी
आपलं मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जे जमत नाही (बुद्धीमुळे, कमी क्षमतांमुळे वा परिस्थितीमुळे) त्या गोष्टी करणारं ते यंत्र नाही. ही समज महत्वाची. नाही का?
खात्री आहे आमची... की आजचे होणारे आई-बाबा... खूप संवेदनशील, उत्साही व सजग आहेत.
सारासार विचार करून निर्णय घेणारे आहेत. सदिच्छा.
लेखक- डॉ. अरुण गद्रे
आभार- अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र

Wednesday, April 9, 2014

नशिबाचे दोर कापून टाका !'

डॉ. बाबासाहेब तमाम बहुजनांना संदेश देतात- 'देव, दैव यावर विसंबून राहू नका भविष्य, मुहूर्त,चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका !
तर
स्वामी विवेकानंद देखील नेहमी म्हणायचे 'जो पर्यंत या देशातील तरुण नशिबावर अवलंबून रहाणार आहे तो पर्यंत भारतासारख्या देशाला मुळीच भवितव्य नाही !' क्रांतिसूर्य जोतीराव ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांपर्यंत व आगरकर ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सर्वांनी 'नशिब' या संकल्पनेवर कडाडून हल्ला केलेला आहे. का बरं या लोकांनी नशीब या संकल्पनेवर हल्ला केला ? आपलं नेहमीचं एक वाक्य असतं ''नशिबात असतं तसं घडतं !''
शिर्डीला एक जीप करून दहा-बारा माणसे जातांना रस्त्यात अपघात होतो नवू माणसे मारली जातात दोन जबर जखमी - तीही दवाखान्यामध्ये अत्यवस्थ - मरतील अशी अवस्था व एक जिवंत रहातो . वृत्तपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी बातमी 'देव तारी त्याला कोण मारी !' नऊ मेले, दोन दवाखान्यात, एकाला मात्र काहीच झाले नाही ! देव तारी त्याला कोण मारी ! …. अरे मग नऊ मारले ते कुणी मारले,असा विचार सुद्धा मनामध्ये येत नाही. कारण आपली विचार करण्याची पद्धतीच अशी असते की 'नशिबात असतं तसं घडतं.' असा विचार करतांना आपण म्हणतो खर तर सगळेच मरायचेच पण एकाला देवाने वाचवलं बाकीच्या नऊ जणांना डायरेक्ट मरू दिलं, तर दोघांना इनडायरेक्ट मरणाच्या दारात सोडून दिलं.
'नशिबात असतं तसं घडतं' हा संस्कार तुमच्या माझ्यावर बालपणापासूनच लादला गेलेला आहे. भारतीय समाजाची जातीव्यवस्थेची संपूर्ण चौकट या नशीब या संकल्पनेवरच उभी आहे.
बाबा रे तू ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलास, कारण तुझं तसं नशीब आहे ! बाबा रे तू दलित किंवा हलक्या जातीत जन्माला आलास, कारण तुझं नशीब तसं आहे ! तुझं जसं प्राक्तन आहे त्या पद्धतीने तुझा जन्म झालेला आहे. आणि जे तुझ्या वाट्याला आलं आहे ते तू निमूटपणाने भोगलं पाहिजे ! अश्या प्रकारची मानसिकता नशिब या संकल्पनेखाली लादण्यात आली आणि अत्यंत अमानुष,वाईट असणारी ,या देशाचं प्रचंड नुकसान करणारी जातीव्यवस्था तब्बल २००० वर्षे या देशामध्ये निमूटपणे टिकू शकली.
सृष्टीनियंता आणि नशीब
विसाव्या शतकात निर्मिक / सृष्टीनियंता अशी संकल्पना रुजली होती.
तरीही आपण कल्पना करू - या संपूर्ण सृष्टीचा एक निर्माता आहे आणि तो ही संपूर्ण सृष्टी गव्हर्न करतो, संपूर्ण सृष्टी तो नियंत्रित करतो.
*आता नियंत्रण शक्य आहे का ते पाहू !
आता आपल्याला माहित आहे की पृथ्वीवरील सध्याची लोकसंख्या ९०० ते १००० करोड (१०अब्ज ) च्या दरम्यान आहे. मग या सर्व लोकांच नशीब ठरवणारा, लिहिणारा कोणीतरी सृष्टीनियंता असला पाहिजे. मग हा सृष्टीनियंता एक आहे की अनेक आहेत, म्हणजे हिंदुंचा वेगळा मुस्लिम समाजासाठी वेगळा, ख्रिश्चन लोकांचा सृष्टीनियंता वेगळा आणि कुणाकुणाचा वेगवेगळा ! हे शक्य आहे का ?
आपल्या पैकी कोणीही म्हणेल की नाही सृष्टीनियंता म्हटल्यावर एकच ! सर्वांचे नियंत्रण करणारा सृष्टीनियंता हा एकच आहे !
जर आपल्या पृथ्वीवरील सर्व माणसांचे नियंत्रण करणारा सृष्टीनियंता एकच आहे तर त्याचे या पृथ्वीवर देखील अगदी बारीक असं लक्ष असलं पाहिजे. कारण कुठेतरी भूकंप होतो हजारो माणसे मारली जातात, ते त्याच्या नियंत्रणाशिवाय शक्य नाही नाही का ? म्हणजेच पृथ्वीवरील अगदी बारीक बारीक गोष्टींवर त्याचे बारीक बारीक लक्ष असले पाहिजे. मित्रांनो पृथ्वी हा एकच ग्रह आहे का ? नाही ! .. आपल्याला पुस्तकी अभ्यासात आलेले ९ ग्रह आणि विज्ञानाला शोध लागलेले असंख्य ग्रह आहेत मग निदान या ९ ग्रहांवर तरी या नियंत्याचे बारीक लक्ष असले पाहिजे, कारण जो विज्ञान शिकला आहे, ज्याला विज्ञानाचे ज्ञान आहे त्या प्रत्येकाला माहित आहे की जिथे गुरु आहे तिथे तो नसता तर पृथ्वीही आहे त्या ठिकाणी नसती. पृथ्वीवरील सर्व घडामोडी आत्ताच्या पद्धतीने झाल्या नसत्या. एकूणच सर्व ग्रह व सूर्य एकमेकांच्या गुरुत्वाकर्शणाने संतुलित आहेत. थोडक्यात एखाद्या ग्रहाने थोडासा अतिरेकपणा करून आपली जागा हलवली तर पृथ्वीची जागा देखील ढळेल. आणि सगळी परिस्थिती बदलेल. याचा अर्थ असा की या सृष्टीनियंत्याचं या नऊही ग्रहांवर नियंत्रण आहे. आणि त्यांवर त्याचं बारीक लक्ष असलं पाहिजे. बरं हे सर्वजण सूर्याच्या भोवती फिरत असतात. सूर्याने थोडा अतिरेक केल्यास या भोवती फिर्नार्यांचे काय ? म्हणजेच या सृष्टीनियंत्याच सुर्यावरही बारीक लक्ष असले पाहिजे. हा सूर्य आपल्या असंख्य लहान मोठ्या मित्रांसमवेत (ताऱ्यान्सोबत) आकाशगंगेत असतो आणि ही आकाशगंगा आपल्या अगणित मैत्रिणी (आकाशगंगा ) सोबत विशिष्ठ अंतर राखून एकमेकांचे संतुलन राखून फिरत असतात. यातील काहींनी जरा अतिरेक केला तर आपल्या आकाशगंगेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच या सृष्टीनियंत्याचं सर्व आकाशगंगांवर बारीक लक्ष असलं पाहिजे. त्याच्या आज्ञेशिवाय त्या मुळीच हलत नसल्या पाहिजेत.
आता आपण थोडं उलट्या बाजूने जाऊ ..
प्रचंड आकाशगंगा म्हणजे किती आकाशगंगा .. असंख्य आकाशगंगा .. त्यांच्या मानाने वाळूच्या कणा एव्हढी आपली आकाशगंगा आहे. त्यावरही हा नियंता बारीक लक्ष ठेऊन आहे. या आकाशगंगेमध्ये प्रचंड मोठाले सूर्य आहेत .. अगदी आपल्या सूर्यापेक्षाही प्रचंड मोठाले तारे आहेत .. त्या सर्व ताऱ्यांवर तर लक्ष आहेच पण त्या सर्व अब्जावधी तार्यांपैकी एका चिटुकल्या सूर्यावरसुद्धा आपल्या सृष्टीनियंत्याचं लक्ष आहे. या चिटुकल्या सूर्याभोवती नऊ पिटुकले पिटुकले ग्रह फिरत आहेत त्यावरही या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. त्यातल्या गुरु, शनी सारख्या मोठ्याच नव्हे तर पृथ्वीसारख्या पिचुकल्या ग्रहावर त्या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. या पिचुकल्या ग्रहावर हजार कोटी माणसे आहेत त्यावर या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. या पिचुकल्या ग्रहावर एक आशिया नावाचा खंड आहे. त्या खंडातल्या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र नावाचा प्रांत आहे. त्या प्रांतात रत्नागिरी नावाचे छोटुस शहर आहे आणि या रत्नागिरीतील खालच्या आळीतील कोण्या राम्यावरही या सृष्टीनियंत्याचं बारीक लक्ष आहे. आणि हा खालच्या आळीतील राम्या कोणत्या ऑफिसमध्ये चिकटणार, तेही तोच ठरवतोय. आणि या खालच्या आळीतील रामयाचं लग्न हेमामालीनिशी होणार की टूनटूनशी, ते ही तोच ठरवतोय !
मित्रांनो हे कुठेतरी पोसिबल आहे का ? हे शक्य आहे का ?
मित्रांनो एवढी मोठी सृष्टी / विश्व निर्माण करणारा जर सृष्टीनियंता असेल तर त्याच्या दृष्टीने पृथ्वी निर्माण झाली की नाही हे ही गौण आहे. त्यातला कोणी खालच्या आळीतील राम्या .. त्याचं लग्न .. त्याची नोकरी .. त्याच्या आयुष्यातील घटना .. सकाळी चालायला गेला तर शेणावरून पाय घसरून पडला. - फ्रेक्चर झाला .. हे सर्व तो ठरवतो हे शक्य आहे का ?
मित्रांनो एक कल्पना करू की सृष्टीनियंत्याचा मुक्काम सध्या शेजारच्या आकाशगंगेवर आहे, समजा त्याने तिथून खालच्या आळीतील राम्याला आशीर्वाद दिला ' जा तुझ लग्न कट्रिनाशी होईल ' तर हा आशीर्वाद खालच्या आळीतल्या राम्यापर्यंत पोहचेपर्यंत अब्जावधी वर्षे लागतील. हा आशीर्वाद अगदी प्रकाशाच्या वेगाने आला तरी अब्जावधी वर्षे लागतील तो पर्यंत ह्या खालच्या आळीतील राम्याची हाडे सुद्धा शिल्लक रहाणार नाहीत हो ! एवढी मोठी ही सृष्टी / विश्व आहे, याचे पुरावे आज आपल्या विज्ञानाकडे उपलब्ध आहेत. या पद्धतीने तुमचं माझं भविष्य कोणीही ठरवू शकत नाही ! कोणीही सृष्टीनियंता तुमच्या माझ्या जीवनामध्ये एवढा रस घेईल असे वाटत नाही !
तरीही ज्याला असं वाटतंय की ''आपल्या नशिबात असतं तस घडतं'' त्याने आजपासून घरात तुमची जी कामाची आयुध असतील विद्यार्थ्यांनी पुस्तके असतील ती गेस वर किंवा चुलीत जाळून टाकावीत, आणि आरामात पलंगावर झोपून जावे ! असेल तुमच्या नशिबात तर व्हाल ग्रेज्युएट -अगदी झोपल्या झोपल्या व्हाल ! असेल तुमच्या नशिबात नोकरी,तर मिळेल - अगदी झोपल्या झोपल्या नोकरी मिळेल ! नशिबात असेल तर लग्न होईल ,होईल लग्न - अगदी झोपल्या झोपल्या लग्न होईल ! ... होईल का ?
आता तुम्ही म्हणाल - … - 'नाही नाही सर कर्तुत्व करावं लागतं त्याशिवाय होत नाही !' …
अहो कर्तुत्व केल्याशिवाय कोणतीही गोष्ट हात नाही हा तुमच्या माझ्या जीवनातला रोजचा अनुभव आहे. तर मग नशिबात असेल तसे घडेल असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार रहातो काय ?
तुमच्या माझ्या जिवनात कर्तुत्व केल्याशिवाय काही घडत नसेल तर खाटेवर पडून काही होणार नाहीच. काही मिळवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी काम करावे लागेल, अपार मेहनत घ्यावी लागेल. आणि नेमक्या संधीचा नेमकेपणाने फायदा उठवावा लागेल, तेंव्हा काही बाबींमध्ये आपल्याला आपल्या जीवनात यश मिळेल हे जर आपल्याला माहित असेल तर 'नशिबात असतं तस घडतं' म्हणण्याला काय अर्थ आहे ? आणि जर आपलं नशीब आधीच ठरलेलं असेल तर कर्तुत्व केलं काय अथवा न केलं काय , तसंच घडायला हवं दुसर काही वेगळ घडायलाच नको !
त्यामुळे मित्रांनो आपल्या आयुष्यात एक तर नशिबाला जागा असू शकते किंवा कर्तुत्वाला तरी जागा असू शकते ! दोन्हीही गोष्टींना एकत्रितपणे आपल्या जीवनामध्ये जागा असू शकत नाही ! पण आपली सर्वात मोठी अडचण हि आहे की आपण दोन्ही दगडींवर पाय ठेऊन असतो. ना आपल्या कर्तुत्वावर आपला विश्वास असतो ना धड नशिबावर विश्वास असतो !
आता म्हणाल - 'कर्तुत्व करावं लागतं पण त्याला नशिबाची साथ लागते.'
म्हणजे काय ?
निव्वळ भोंगळ भाषा - दुसरं काही नाही ! कारण आपलं नशीब आधीच ठरलेलं असतं अस म्हणण म्हणजे तुमच्या कर्तुत्वाला काहीच अर्थ उरत नाही ! आणि नशिबाने काही मिळणार असेल तर काही करण्यासारख उरतच नाही !
मित्रांनो हे सर्व वाचल्यावर / ऐकल्यावर तुमचा नशिबावर अजूनही विश्वास आहे काय ?
त्यातूनही जर कोणी होय म्हणत असेल तर मी तुमच्याजवळ येवून एक मुस्कटात जोरदार झापड हाणतो ! ... काय होईल हो ?
मी तर म्हणेन 'मी नाही मारली ! तुझ्या नशिबात होती तू खाल्ली ! माझ्या नशिबात होती मी मारली ! मला वरून आदेश आला दिली ठेऊन !
चालेल काय हे तुम्हाला ?
मला माहित आहे आपल्यापैकी कुणालाही हे चालणार नाही ! .. 'लय श्याना आलायस' असं म्हणून तुम्ही पोलिसाला बोलावून 'हा डोक्यावर पडलाय याला मेंटल हॉस्पिटल ला भरती करा' असा सल्ला त्यांना द्याल. कारण तुम्हाला माहित आहे की माणसाच्या मेंदूने निर्णय घेतल्याशिवाय झापड मारणे शक्य नाही.
मित्रांनो यावरून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जेंव्हा मिळतात तेंव्हा आपण नशिबावर विश्वास ठेवत नाही. पण जेंव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येत नाहीत, तेंव्हा आपण नशिबाचा ढोल बडवतो. व जीवनातील पराभव नशिबावर ढकलत असतो.
मित्रांनो समजा - तुमच्या बहिणीचा तिच्याच नवर्याने खून केलाय, पोलिस तुम्हाला सांगत आहेत की 'तुमच्या बहिणीच्या खुनामध्ये तिच्या नवर्याचा हात आहे.' यावर आपण असं म्हणाल का - 'जाऊ दे ओ साहेब ! तिच्या नशिबात होत ते घडलं ! माझ्या बहिणीच्या नशिबात लिहील होत तिचा खून होणार, झाला ! तिच्या नवऱ्याच्या नशिबात होत त्याने तिचा खून करावा , त्याने केला ! वरच सर्व ठरलेलं होतं, त्याप्रमाणे झालं ! तुम्ही तुमच्या घरी जाउन गप्प बसा ! मी माझ्या घरी गप्प बसतो ! 'जसं नशिबात असतं तसं घडतं !'…
मित्रांनो आपण 'आपल्या नशिबात असतं तसं घडतं !' हे धोरण स्वीकारले की लोकशाहीला काही जागा उरत नाही. कायदाव्यवस्थेला काही जागा उरत नाही. तुमच्या माझ्या कर्तुत्वालाही जागा उरत नाही. आपल्याला मग 'ठेविले अनंते तैसेची …. असं म्हणून झोपून रहावे लागेल ! .. पण यावर कोणीही विश्वास ठेवत नाही कारण आम्हांला एक सवय लागलेली आहे दोन दगडीवर पाय ठेवण्याची ! तळ्यात मळ्यात ! तळ्यात मळ्यात !
मित्रांनो .. आपण असफल होत असू, तर त्याला काही कारणे आहेत - कदाचित संधी अनुकूल नसेल, प्रयत्न कमी पडत असतील ह्याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे आणि करणे समजून घेतली पाहिजेत.
मित्रांनो मला एक छत्रपती शिवरायांच्या काळातील उदाहरण आपल्याला द्यावेसे वाटते . -
''गड आला पण सिंह गेला. ''
ही कथा आपल्याला सर्वाना माहित आहे. - तानाजी मालुसरे आणि मावले घोरपड लाऊन गडावर चढले - नंतर तुंबळ युद्ध झाले - युद्धामध्ये तानाजी मालुसरे पडले (मारले गेले) - तानाजी पडले तसे सर्व मावळे ज्या दोराने वर आले होते त्या दोराने खाली उतरू लागले - तानाजीचे भाऊ सूर्याजी याने एकच मोठे काम केले की जाउन दोर कापले आणि मावळ्यांना म्हणाला -'अरे तुमचा बाप इकडे मरून पडलाय,आणि तुम्ही पळताय ! कड्याचे दोर मी कापून टाकलेत, आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे भेकडासारखे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शुरांसारखे लढा, जिवंत रहा, विजय संपादन करा ! उड्या टाकून मेलात तर नरकात जाल , लढताना मेलात तर स्वर्गात जाल ! जिवंत राहिलात, विजय संपादन केलात तर सुवासिनी तुम्हाला ओवाळतील !
मित्रांनो स्वर्ग -नरक हा मुद्दा इथे सोडून द्या पण मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला परतायचे नाही, त्यामुळे एक तर उड्या टाकून मरा, नाहीतर शुरांसारखे लढा आणि जिवंत रहा. ..
आणि मित्रांनो अशा परिस्थितीत माणसे नेहमी शुरांसारखे लढण्याचाच मार्ग स्वीकारतात, आणि तोच मार्ग मावळ्यांनी स्वीकारला आणि गड जिंकला.
मित्रांनो - तुमच्या माझ्या जीवनामध्ये नशिबा सारख्या काही भोंगळवादी संकल्पना रुजवल्या गेल्या आहेत या संकल्पनांचे दोर पकडून आपण पलायनवाद स्वीकारतो आणि जीवानातून पळ काढतो.
मित्रांनो आजपासनं आपल्या जीवनातले नशिबाचे दोर कापून टाका ! जीवनातल्या प्रसंगांना शर्थीने तोंड द्या ! कदाचित पराजित व्हाल , कदाचित विजयी व्हाल, जरी पराजित झालो तरी आपण पूर्ण ताकदीनिशी लढलो याचं समाधान घेऊन आपल्याला जगता येईल त्यामुळे यापुढे कधीही नशिबाचे दोर पकडू नका ! नशिबाचे दोर कापून टाका ! नशिबाचे दोर कापून टाका !
सं/ले.- विवेक घाटविलकर.
(अ. भा. अं. नि. सं. रत्नागिरी)
संदर्भ:अभाअंनिसं चे साहित्य


शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.
हे भीषण अमंगळ हिंदुधर्मा ! तुझ्या आज्ञेने स्मशानात शेकडो वर्षे आम्ही क्षौरें केली,कणकेचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेवले,गळके मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घातल्या,त्याबद्दल तू आम्हांस काय दिलेस?...हिंदूंनो!, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक,तोंड,पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय?
खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? गरुडपुराणातील किळसवाण्या गप्पांवर श्रद्धा ठेवणार्‍या मूढांनो,अरबी भाषेतील चमत्कारी कथा खर्‍या मानून त्यांना पुराणांच्या पदवीला चढवाल तर अधिक बरें होईल.अकलेची ऐट मिरविणार्‍या मतिमंदांनो ’अ’ व्यक्तीचा ’ब’ हा आप्त वारला तर ’अ’ला कोणत्या कारणानें सुतकी,अस्पृश्य मानून त्याला दहा दिवस वाळीत टाकता? ’अ’चा अपराध काय? बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का ? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हें तुम्हाला कसे कळले ? कुणी सांगितले?" ...( "सुधारका"तील लेखाचा काही भाग)
.........खरें तर कुणाचा मृत्यू हा दु:खद प्रसंग.पण पिंडदान विधीत जें चालतें तें पाहून हसूं यावे. पिंड ठेवले आहेत .काकस्पर्शासाठी माणसे ताटकळत उभी आहेत.मग मृताचा मुलगा पुढे येऊन हात जोडून म्हणतो," बापू, चिंता करू नका.आत्याला आम्ही अंतर देणार नाही.शेवटपर्यंत सांभाळू."बापूंच्या आत्म्याला हे ऐकू येते.त्याच्या अदृश्य चेहेर्‍यावरील चिंतेचे भाव जाऊन समाधान पसरते.झाडावरील कावळ्याला हा बदल दिसतो.तो खाली येऊन पिंडाला शिवतो.हे सगळे खरे मानण्यात आपले काही चुकते आहे असे कुणाला वाटतच नाही.
माझ्या परिचयाच्या एका गृहस्थाने काकस्पर्शासंबंधीचा एक अनुभव गंभीरपणे सांगितला.तो त्याच्या शब्दांत:--"आमचे एक ब्रह्मचारी काका--म्हणजे माझ्या वडिलांचे धाकटे बंधू--आमच्याकडे राहात.ते वारले.दशक्रिया विधीला पिंड ठेवले.पण कावळा शिवेना.आम्ही दोन तास थांबलो.नाना प्रकारचे सांगणे झाले.पण व्यर्थ.काकांचे एक मित्र विधीला आले होते.ते म्हणाले की काकांना अश्लील पुस्तके वाचण्याची फार आवड होती. मी लगेच स्कूटरवरून घरी गेलो.काकांच्या खोलीतील टेबलावरील एक पुस्तक चाळले. त्यात वाचन खुण होती. म्हणजे गोष्ट वाचून पूर्ण झाली नव्हती.काकांची अतृप्त इच्छा हीच असावी हे जाणून मी ते पुस्तक घेऊन घाटावर आलो.खुणेच्या पानापुढील दोन पाने,काकांना जरा कमी ऐकू येत असे म्हणून, खड्या आवाजात वाचून गोष्ट संपवली. तुम्हांला सांगतो, दोन मिनिटात कावळा शिवला ."
काकांच्या आत्म्याला आपण सद्गती दिली याची कृतकृत्यता त्या गृहस्थाच्या चेहर्‍यावरून ओसंडत होती....(हा अनुभव ऐकून एक कल्पना सुचली की अनेकांचे असे अनुभव असतील. त्यांचे संकलन केले तर "काकस्पर्श अनुभव बृहत् कोश" सिद्ध होऊ शकेल.त्यात "त्वरित काकस्पर्शासाठी अकरा वचने आणि तेरा सूत्रे "समाविष्ट केली आणि कोशाच्या प्रती पिंडदानाच्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली तर त्याचा खप घाटोघाट होईल.मात्र अनुभव काल्पनिक नसावे.घाटावर जाऊन,लोकांना भेटून,त्यांना बोलते करून अनुभव संकलित करावे.म्हणजे कोश रंजक होईल.)
कल्पना करा की असले अंत्यविधी प्रकार आपल्याकडे नाहीतच. समजा आफ्रिकेतील एका जमातीत थेट असेच प्रकार रूढ आहेत.एका मराठी मासिकात "ऐकावे ते नवलच!" या सदरात त्या पिंडदान विधीची साग्रसंगीत माहिती छापून आली.आबांनी ती वाचली. तर ते म्हणतील, "काय हे घोर अज्ञान! मृताचा आत्मा तृप्त आहे की नाही ते कावळ्याला समजते म्हणे! एकविसाव्या शतकात कोणी हे खरे मानत असेल यावर विश्वास बसत नाही." यावर तात्या म्हणतील," म्हणजे तुम्हाला हे खरे वाटते की काय? अहो, हे संपादक लोक मासिकाची पाने भरण्यासाठी काही मनात येईल ते छापतात.काल्पनिक लिहावे. पण ते थोडेतरी खरे वाटेल असे असावे. आप्तांची आश्वासने काय,काकस्पर्श काय ,सगळे काल्पनिक.असले कधी कुठे असते काय? आफ्रिकेतील जमात असली म्हणून काय झाले? लोक इतके मूर्ख असणे शक्य नाही. आपले गंमत म्हणून वाचायचे झाले."
आज आपल्याकडे हे वास्तव आहे .प्रत्यही घडते आहे.अशा श्रद्धावंतांना सव्वा शतकापूर्वी "खुळ्यांनो,असे पोराहून पोर कसे झालांत? "असा प्रश्न आगरकरांनी विचारला तो आजही विचारणे योग्य आहे.
-प्रा. य. ना. वालावलकर

Monday, March 24, 2014

धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!


भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले...तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ "आस्तिक" आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.
खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला "ब्रह्म" हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.
असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.
दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. पण मीमांसा वेद आणि यज्ञ यांना केंद्रीभूत ठेवुनच रचली गेली असल्या त्यांतील तत्वज्ञानाला सर्वस्वी अवैदिक म्हणता येत नाही. पण तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.
वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.
या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.
सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत...जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.
काय आहे चार्वाक दर्शन?
चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.
१. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून "मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही." असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. "जे काही आहे ते याच लोकात" म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.
२. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. "काम" आणि "अर्थ" (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व "स्वभाव" हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.
३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.
४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.
५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)
६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!
७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.
८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.
९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.
१०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.
पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.
आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी...जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात "चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे." असे म्हटले आहे. यातच "चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही." असेही या ग्रंथात म्हटले आहे.
चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला "मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार" म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.
चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच "लोप" पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.
या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.
परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.
"यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत" या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे "लोकायतिक हे अनीतिमान आहेत." हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.
लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.
इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.
पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.
लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.
राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.
आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला...तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.
अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले...फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते.
-संजय सोनवणी