शाळा, महाविद्यालयांत विज्ञान नीटपणे शिकवले जात नाही. वैज्ञानिकांनी कोणते शोध लावले हे सांगितले जाते; पण आतापर्यंत लागलेल्या शोधांची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. शोधांमागची प्रक्रिया म्हणजे विज्ञान. प्रश्न कसे उभे राहतात, त्यांची संभाव्य उत्तरे आहे काय असू शकतात, संभाव्य उत्तराचा खरे-खोटेपणा कसा जोखायचा, त्यासाठी प्रयोग, निरीक्षणे कशी करायची, नोंदी कशा ठेवायच्या, त्यातून निष्कर्ष कसे काढायचे, त्यासाठी गणिते मांडावी लागली, तर कशी मांडायची, संख्याशास्त्राचा योग्य उपयोग कसा करायचा, सिद्धान्तांची मांडणी कशी करायची, कोणत्या निकषांवर एखादा सिद्धान्त मान्य अथवा अमान्य होतो, या सगळ्यांमागची तत्त्वे आणि ती अमलात आणण्याच्या पद्धती म्हणजे विज्ञान. ही मूलभूत तत्त्वे आणि पद्धती आत्मसात न करता कितीही माहिती गोळा केली, तरी त्याला विज्ञान म्हणता येत नाही.
विज्ञानाविषयी विज्ञान शिक्षणातच इतके अज्ञान असल्यानंतर त्याचा गैरफायदा घ्यायला अनेक मंडळी सरसावली तर आश्चर्य वाटायला नको. विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या भेटीतच मी "ज्योतिष हे विज्ञान आहे काय?' हा प्रश्न विचारतो. गेली अनेक वर्षे पहिल्या वर्षाच्या पहिल्या तासाला हा किंवा यासारखा प्रश्न मी विचारत आलो आहे. (मला मिळणाऱ्या उत्तरांमध्ये अर्थातच "हो' आणि "नाही' असे पक्ष असतात. त्यापुढे जाऊन का "हो' किंवा का "नाही' असे विचारले, तर येणाऱ्या उत्तरांमध्ये चकित करणारी विविधता असते.) "अमुक-तमुक' हे विज्ञान आहे काय, असा प्रश्न विचारला, तर त्याच्या उत्तरात दोन टप्पे असायला हवेत. पहिल्या टप्प्यात विज्ञान कशाला म्हणतात, विज्ञानाचे निकष कोणते, ते कळले पाहिजेत आणि दुसऱ्या टप्प्यात ते "अमुक-तमुक' या निकषांमध्ये बसते की नाही, हे पाहिले पाहिजे. विज्ञान कशाला म्हणायचे, हे सामान्यांना नीटसे माहीत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण विज्ञानाची पदवी घेताना तरी ते समजलेले असायला हवे; पण फार थोड्या पदवीधरांना ते समजलेले असते.
सुदैवाने अथवा दुर्दैवाने एखादी गोष्ट विज्ञानाधारित आहे, असे म्हटले, की पटकन समाजमान्य होते. पण विज्ञान म्हणजे नक्की काय, याचे चित्र समाजाच्या मनात पक्के नाही. त्यामुळे विज्ञानाचा मुखवटा पांघरून आपला माल खपवायला बसलेल्यांची या जाहिरातींच्या युगात मुळीच कमतरता नाही. यातून होणारी सामान्यांची फसवणूक कशी टाळायची, हा मुख्य प्रश्न आहे. मला तरी याचे एकच उत्तर दिसते, ते म्हणजे विज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि पद्धती समजून घेणे.
सुरवातीला विचारलेल्या प्रश्नाचेच उदाहरण घेऊ. त्यातून विज्ञानाची तत्त्वे थोडीफार तरी स्पष्ट करता येतील. ज्योतिषशास्त्र ग्रहमानावरून भाकीत वर्तवते. हवामानशास्त्र हवामानाविषयी भाकीत वर्तवते. दोघांचीही भाकिते कधी बरोबर येतात, कधी चुकतात. मग हवामानशास्त्र विज्ञान असेल, तर ग्रहज्योतिष हे विज्ञान का नाही? विज्ञानाचा पहिला निकष हा, की केलेली भाकिते वस्तुनिष्ठ असायला हवीत. पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल हे भाकीत वस्तुनिष्ठ आहे. कारण अनेक वर्षांच्या सरासरीची पद्धतशीर नोंद आहे आणि पाऊस मोजण्याच्या प्रमाणित पद्धतीही आहेत."या महिन्याच्या 6, 12 व 13 तारखा शुभ आहेत. चांगल्या घटना घडतील,' हे भाकीत वस्तुनिष्ठ नाही. कारण शुभ म्हणजे नक्की काय, याचे प्रमाणित मोजमाप नाही. एकाला जे शुभ वाटते, ते दुसऱ्याला अशुभ वाटत असेल, तर शुभ तारीख हे वस्तुनिष्ठ भाकीत नाही. ज्योतिष्याने वस्तुनिष्ठ आणि मोजता येणारी भाकिते केली, तर विज्ञानाच्या परीक्षेचा पहिला पेपर पास झाला, असे म्हणता येईल. दुसरा पेपर पास होण्यासाठी या भाकितांचे खरेपण पाहावे लागेल. यासाठी शंभर टक्के भाकिते खरी होण्याची आवश्यकता नाही. पावसाचे अंदाज अथवा वैद्यकशास्त्राचे रोगाविषयीचे अंदाज कुठे शंभर टक्के बरोबर असतात? एखादा सिद्धान्त, तत्त्व किंवा पद्धत वापरून केलेला अंदाज, ते न वापरता केलेल्या अंदाजापेक्षा पुरेशी अधिक अचूकता देत असेल, तर त्या तत्त्वाला किंवा पद्धतीला पुष्टी मिळाली, असे म्हणता येईल. "पुरेशी अधिक' म्हणजे किती अधिक, हे ठरवण्याच्या प्रमाणित संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. सामान्य ज्ञान वापरून केलेल्या अंदाजापेक्षा ग्रहांची स्थिती पाहून केलेली भाकिते वस्तुनिष्ठ मोजमापांवरून जास्त प्रमाणात खरी ठरली, तर दुसरा पेपर पास झाला, असे म्हणता येईल. हवामानाचे अंदाज अनेकदा चुकत असले, तरी त्यांनी ही संख्याशास्त्रीय चाचणी पास केलेली असते. दोन, पेपर म्हणजे पूर्ण पदवी परीक्षा नाही. संख्याशास्त्रीयदृष्ट्या कोंबडा आरवणे आणि सूर्य उगवणे यातला सहसंबंध खूप घट्ट आहे. कोंबडा आरवण्यावरून सूर्योदयाचे भाकीत करता येते. (पण म्हणून कोंबडा आरवण्याने सूर्य उगवला असे म्हणता येत नाही.)ज्यांच्यामधला सहसंबंध दाखवता येतो, त्यांच्यामधला कार्यकारणभाव दाखवणे, ही पुढची खूप महत्त्वाची पायरी. कार्यकारणभाव शोधण्याचा काही एक ठोक सरधोपट फॉर्म्युला नाही. इथे वैज्ञानिकाची विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता पणाला लागते. यातून एक किंवा अनेक प्रमेये (हायपॉथिसिस) तयार होतात. त्यापुढची परीक्षा म्हणजे या प्रमेयाची पडताळणी करणे. ती करण्याचा मार्ग परत मागल्या वळणावर जातो. प्रत्येक प्रमेयाने चाचणी घेता येईल, असे काही नवीन भाकीत केले पाहिजे. चाचणीवरून हे प्रमेय तगणार, का फेकून द्यावे लागणार, ते ठरते. कधी एखादे प्रमेय असे असते, की त्याची चाचणी घेण्याचा काही मार्ग नसतो. ज्याची चाचणी घेता येत नाही असे प्रमेय विज्ञानाला मान्य नाही. अशा चाचण्यांमधून उत्तीर्ण झालेला कार्यकारण संबंध हा विज्ञानाचा गाभा आहे.
ज्या प्रश्नांनी आपण सुरवात केली, त्याचे उत्तर मी दिले नाही; देणारही नाही; पण याचे उत्तर कसे शोधायचे, याचा मार्ग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मार्ग समजला, तर फेंग-शुई, वास्तुशास्त्र ही विज्ञाने आहेत काय, यांचीही उत्तरे ज्याला त्याला मिळतील. यामागचे तत्त्व सोपे आहे. प्रश्नांची उत्तरे शोधण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे विज्ञान. ही पद्धत वापरली तर संगीतकलासुद्धा विज्ञान आहे आणि पाठ्यपुस्तके पाठ करून पदवी मिळवली, तर भौतिक विज्ञानसुद्धा विज्ञान नाही. शाळा-महाविद्यालयांमधून खऱ्या अर्थाने विज्ञान शिकवायला आपण कधी सुरवात करणार?
- डॉ. मिलिंद वाटवे
(लेखक विज्ञानाचे अध्यापक व संशोधक आहेत.)
No comments:
Post a Comment