Monday, March 17, 2014

गर्भसंस्कार: एक थोतांड


आपले मूल (बहुदा एकच होऊ देत असल्यामुळे... सर्वात महत्वाचे झालेले ते मुल) हुशार, सुंदर, कर्तृत्ववान व्हावं ही प्रत्येक आई-बापाची स्वाभाविक इच्छा... नैसर्गिकच. आता व्यापारी जगात या नैसर्गिक इछेचा फायदा घेऊन अनेक गर्भसंस्कारांची दुकानं गावोगाव उघडली गेली आहेत.
हजारो रुपये घेऊन ‘गर्भसंस्कारामध्ये प्रशिक्षण देणारे’ वर्ग चालवले जात आहेत.
‘नुकसान तर नाही ना?’
‘आणि आयुर्वेदात आहे... मग शास्त्रीयच असणार ना?’
या दोन वाक्यांत ही सुशिक्षित गिऱ्हाईकं सहजपणे आपल्या आधुनिक ‘अभिमन्यू’साठी काही हजार रुपये खर्च करताना दिसत आहेत. ‘अभिमन्यू’ हे एकच उदाहरण ‘मार्केट’ करून हे तथाकथित व्यापारी गिऱ्हाईकं खेचतात.
ठीक. आपण उदाहरण बघू... शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा जिजाबाई गर्भवती होत्या तेव्हा अक्षरशः मोगल पाठीवर घेऊन पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची/भावाची हत्या झाली. त्यांना ना व्यापारी भेटले ना गर्भसंस्कार केले! तरी शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडले! जिजाबाईंचा जरूर वाटा आहे. किंबहुना त्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराज घडले.
पण हे ‘जन्मानंतर’च्या संस्कारांमुळे. गर्भसंस्कारांमुळे नाही! पुराणकाल (अभिमन्यू) व भूतकाळ (शिवाजी महाराज) यांच्या उदाहरणानंतर आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ.
भारतातील सधन वर्ग जो पैसे टाकून गर्भसंस्कार घेऊ शकतो हा एकीकडे अन् छोटी गावं, गरिबी यात गर्भसंस्कारासाठी कुठे पैसा आणणार असा मध्यमवर्गीय एकीकडे. आज एशिया व कॉमनवेल्थमध्ये ज्यांनी मेडल्स मिळवली आहेत, त्यात खूप जास्त संख्या ही ग्रामीण भागातून आलेल्या, धडपडणाऱ्या मुलां-मुलींची आहे. उदा. कविता राऊत ही नाशिकमधल्या आदिवासी भागातील मुलगी! आज दीर्घ पल्ल्याची सर्वोत्तम धावपटू आहे. गर्भसंस्कार हा शब्दही तिच्या आईने ऐकला नाही- तरी.
डॉ. कन्ना मडावी हा माझ्याप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ! कांदोटी या आजही मागासलेल्या व दुर्गम भागात जन्मलेला आणि लोकबिरादरमध्ये १९७६ साली येऊन शिक्षण घेतलेला कन्ना- एम.डी. झाला. अॅडव्होकेट लालचू नौगोटी-जुनी या छोट्या आडगावातल्या; वडील व आई दोघंही लहानपणीच वारले. तो एम.ए.एल.एल.बी. झाला.
ही दोन हेमलकसाची प्रातिनिधीक उदाहरणं. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आईबापांपोटी व आदिवासी व दुर्गम भागात जन्म घेतलाय यांनी! अनेक हजार वर्षांतही या भागात आयुर्वेद पोचलाच नव्हता. डॉ.प्रकाश व डॉ. मंदा यांच्या रुपानं आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रकाशाची तिरीप प्रथम पोचली ती १९३ ला. या अशा परिस्थितीत या मुलांवर गर्भसंस्कार कुठून येणार?
तरीही मुलं शिकली व परत गडचिरोली भागातच परतली. तिथं ती आपल्या ज्ञानाचा फायदा आदिवासींना करून देत आहेत.  गर्भसंस्कारांमुळे हे घडलं नाही तर बाबा, प्रकाश, मंदा आमटे यांच्या मदतीच्या हातानं हा चमत्कार घडला!
या सर्व उदाहरणांनी अभिमन्यूची कथा किती फोल आहे व जन्मानंतरचे संस्कार, जिद्द, प्रेरणा कर्तृत्वासाठी किती महत्वाचे ठरतात हे आपण सहजपणे स्वतःच बघू शकतो. गर्भसंस्कार मार्केट करणाऱ्यांकडे फक्त एका अभिमन्यूची कथा आहे. आपल्यासमोर गर्भसंस्काराशिवाय नोबेल, ऑलिम्पिक व इतर मेडल मिळवणाऱ्यांची प्रत्यक्ष फौज आहे. तेव्हा कथेच्या मोहातून आपण बाहेर पडू या.
आता गर्भसंस्कारांचा तथाकथित शास्त्रीय/वैज्ञानिक मुखवटा आपण तपासून बघूया.
गर्भसंस्कार वर्गात हे घडते.
१.       चर्चा, कौन्सेलिंग- मान्य
२.       आहार मार्गदर्शन- मान्य
३.       व्यायाम मार्गदर्शन- मान्य
४.       आनंदी राहण्याची सूचना- मान्य
५.       नवरा-सासूचा सहभाग- मान्य
हे सर्व कोणीही सुजन व्यक्ती मान्य करेल. त्यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा मुखवटा घ्यायची गरज नाही.
गर्भावर संस्कार करण्यासाठी, पूर्णपणे त्याची बुद्धी वाढवण्यासाठी मातेला ‘मंत्र’ शिकवले जातात. हे मात्र पूर्ण अमान्य.
गर्भ पोटात असताना मंत्र म्हणून त्याची बुद्धी वाढू शकते हा विश्वास शास्त्रीय आहे व त्यासाठी आयुर्वेदात ‘मंत्र’ दिले आहेत, असा गर्भसंस्कारांचा पाया सांगितला जातो...
या पायाची दोन पद्धतीनं आपण चिकित्सा करू.
अ)     आयुर्वेदात काय आहे?
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?

अ)     आयुर्वेदात काय आहे?
आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळंतपणानंतर ‘वार’ कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. तसेच त्याकाळात गर्भपात अटळ असेल तर ‘राजाची’ परवानगी घ्या अशी कायदेशीर यंत्रणाही दर्शवली गेली आहे.
आयुर्वेदाला विरोध म्हणून गर्भसंस्काराला विरोध अशी आमची भूमिका नाही. आमचे आयुर्वेदातील तज्ञ सहकारी अनेक व्याधी आज व्यवस्थित पद्धतीने हाताळतात व या सर्वांबद्दल आम्हाला व्यावसायिक आदर आहे. आयुर्वेद ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे व अर्थातच त्यातली काही निरीक्षणे/अनुमाने व उपाय कालबाह्य झाले आहेत.
उदाहरणं अशी:
(अष्टांग हृदय, वाग्भट कृत)
१.       गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो.
२.       पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३.       पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते. –(सार्थ भाव प्रकाश) पूर्वखंड श्लोक १३-१६, वैद्य नानल यांची प्रत
४.       पाळीनंतर सम रात्री (२,४,६,८,१०,१२) संभोग केला तर पुत्र होतो व विषम रात्री (५,७,९) केला तर कन्या होते.
(पाळीनंतर पहिल्या 10 दिवसांत गर्भधारणाच होऊ शकत नाही हे शास्त्रीय सत्य आज शाळांतही शिकवलं जातं.)
५.       शरीरात ३०८ हाडं आहेत. (पाचवा अध्याय) आजच्या शास्त्राप्रमाणे २०६.
६.       गर्भाधान संस्कार: गर्भधारणा होण्याचे ठिकाण, त्यावेळची मानसिक अवस्था याचा गर्भावर होणारा परिणाम. उदा. समागमाच्या खोलीत अडगळ नको. (आज हे किती जोडप्यांना शक्य आहे?)
७.       अनवमोलन संस्कार: यात गर्भपातापासून सुटका सांगितली आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहपीडा यामुळे होणारा.
३००० वर्षांपूर्वीचं आयुर्वेद अर्थातच तत्कालीन मर्यादांचा विचार करूनच वाचलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष:
आयुर्वेद हे ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे ही त्याची मर्यादा आज मान्य करायला हवी. खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं. ते करायला हवं!
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
काही गर्भसंस्कार करणारे तर हेही बिनदिक्कत सांगतात की, आजच्या शास्त्राप्रमाणे गर्भसंस्कार वैज्ञानिकच आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्र काय सांगते?
१) गर्भाची गर्भाशयामधली वाढ व क्षमता अशी विकसित होते.
तीन महिन्यांचा गर्भ: हात, पाय, डोळे, हृदय, किडनी, आतडी, मेंदूही प्राथमिक स्वरुपात तयार.
चार महिन्यांचा गर्भ: ऐकू शकतो. म्हणजे आवाजाची जाणीव होण्यासाठी मेंदूचा भाग थोडा विकसित होतो. ऐकणं... म्हणजे आवाज ऐकणं. ऐकून समजणं नव्हे.
चौथ्या महिन्याअखेर: Myelination मायलीनेशन म्हणजे मज्जातंतूवरचं आवरण. ह्याची सुरुवात होते. मायलीनेशन झाल्याशिवाय मज्जातंतू काम करू शकत नाहीत. त्यांचे काम संवेदना इकडून तिकडे पोचवण्याचे असते.
जन्मवेळेपर्यंत: जेमतेम १२ ते १५% मज्जातंतू हे मायलीनेशनचे असतात, व त्यामुळे श्वसन, हृद्य, आतडं अशा जीवनावश्यक क्रियाच फक्त शक्य असतात. ‘समजण्या’साठी (ऐकून/वाचून) अजून बाळ तयार नसते. हे मायलीनेशन जन्मानंतरही चालूच राहते व ते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
२) शिक्षणक्षमता (गर्भाची)
३२ आठवडे पूर्व गर्भाला ही शिक्षण क्षमता थोडीबहुत येते. मात्र ही Habituation हॅबीच्युएशन या प्रकारची असते.
ती Reflex असते. प्रतिक्षिप्त क्रिया असते. ती Response नसते, प्रतिसाद नसतो.
अगदी एकपेशीय आमीबाही त्यावर प्रकाशाचा तीव्र झोत टाकला तर आक्रसून दूर होतो!
म्हणजे
-ओरडणे (आवाज आदळणे)
-बोलणे (आवाज येणे)
-मंत्रोच्चार (आवाज येणे)
-फटाके (आवाज आदळणे)
-हॉरर मुव्ही (आवाज आदळणे)
-शास्त्रीय संगीत (आवाज येणे)
या सर्व Stimulus ला... उत्तेजनेला- गर्भ प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देतो- एवढेच त्याचं ऐकणं असतं! उदा. आई हॉरर मुव्ही बघत असेल तर आवज व आईच्या दचकण्यामुळे गर्भ हलतो.
तसाच तो आई अत्यानंदाने ओरडली तरी हलतो. हॅबीच्युएशनची प्रतिक्रिया म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे.
केवळ या मुलभूत क्षमतेचा वापर गर्भसंस्कार व्यापारासाठी करतात. ते म्हणतात, ’बघा... बाळ ऐकतंय.’
बाळाला ऐकू येतं... पण गोंगाटाच्या स्वरुपात! त्यात शिक्षण घेण्याची क्षमता नसते.
३) बाळाला ऐकू येतं?
वर सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकू येतो तो गोंगाट. आवजाची संवेदना. गर्भसंस्कारात आई मंत्रोच्चार करते. हा आवाज बाळापर्यंत पोचतो का? तर पोचतो, पण क्षीण! बाळाच्या आजूबाजूला गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असतात. मागे भला मोठा अेओर्टा असतो. यातून जाणाऱ्या रक्ताचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो, तो ६० ते ८० डेसिबलचा! म्हणजे बाळ आर्टरीचा, हा मोठ्या आवाजात डिस्को ऐकत असतं दिवसरात्र!
त्यात हा पुटपुटण्याचा (मंत्रांचा) आवाज कसा पोहोचणार? शक्यच नाही.
किंबहुना मायलीनेशन होत नाही व बाळ काही ‘समजू’ शकत नाही हे बाळाला वरदानच आहे. नाहीतर या गोंगाटानं ते बधीर व्हायचं!
४) आईच्या मनातील भावनांचा व तिच्या विचारांचा, गर्भावर काय परिणाम होतो?
उत्तर: काहीही नाही.
पुरावा: Dizygotic Twins.
यामध्ये दोन बाळं एकाचवेळी आईच्या गर्भाशयात असतात. यात एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुलगे/दोन्ही मुली असं काहीही असू शकतं. यांची जनुकं वेगळी असल्याने त्यांच्यात शारीरिक साधर्म्य कमी प्रमाणात असतं. पूर्णपणे भिन्न असतात.
आता आईचे विचार, तिचा आचार व तिने केलेले ‘संस्कार’ दोघांसाठी ‘एकच’ असताना ही भिन्नता कशी? पुढे जाऊन प्रत्येकाचं कर्तृत्व पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात आईच्या इच्छेवर बाळ सुंदर, बुद्धिमान बनत नाही. अजिबात नाही.
अशा गर्भसंस्कारामुळे पसरणाऱ्या समजुती घातक आहेत. मातेचा गर्भारपणाचा सहज आनंद या समजुती मातीत मिळवतात. एक OBSESSION मातेमध्ये रुजवतात. जणू बाळाचं भवितव्य तिच्या हातात आहे! हल्ली झटपट व पैसे टाकून सर्व, अगदी आरोग्यही, विकत मिळते अशी रूढ समजूत आहे. पैसे फेका... मंत्रोचार शिका. पैसा फेका- क्लास लावा, आपलं मूल- बिल गेट्स.
भयंकर सापळा आहे हा... व तो बाळाला पकडतो. गर्भसंस्कार करून बाहेर पडलेलं बाळ बुद्धीनं सामान्य निघालं तर आईला धक्का बसतो. इतकं हे Obsession  या गर्भसंस्काराच्या खुळामुळे पसरते आहे.
या सगळ्या Instant व पैसे टाकून विकत मिळवायच्या शर्यतीत आपण मुळात व्यक्ती/बाळ शिकते कसे ते लक्षात घेत आहोत का?
५) व्यक्ती शिकते कशी?
खालील learning pyramid बघा.
(शिक्षणाचा आराखडा)
सर्वसाधारण व्यक्ती वेगवेगळ्या मार्गानं शिकत असते. ते मार्ग व त्यांची उपयुक्तता अशी. (आईनस्टाईन वगैरे अपवाद. ते सोडून द्यायचे. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आपलं मूलही तसंच आहे, हे वास्तव आधी मान्य करूया.)
सर्वसाधारण व्यक्ती अशी शिकते
१०% वाचणे, २०% ऐकणे व पाहणे, ३०% प्रयोग बघणे व करणे, ५०% मनन व चर्चा, ७५% ज्ञानाचा उपयोग करून, ९०% दुसऱ्यांना शिकवून.
आपण बघितलं की गर्भाला मुळात मायलीनेशन नसल्यामुळे फक्त आवाजाची संवेदना समजते. त्यातून ते अर्थ समजू शकत नाही. वादापुरतं असं मान्य केलं की तो समजतो, पण मग जो विषय आपण शिकवतो (गर्भारपणी काय शिकवतो? गणित?) पण जरी शिकवलं गणित गर्भारपणी, तरी ते ऐकून फक्त शिकणार म्हणजे ते वाचू शकणार नाही, प्रयोग बघू शकणार नाही. करू शकणार नाही, त्या ज्ञानाचा उपयोग ‘तेव्हाच’ करू शकणार नाही.
२०% शिकण्याची क्षमता उपयोगात येईल आली तर! अर्थातच बाळ पोटात आईनं म्हटलेलं मंत्र ऐकून शिकते ही एक पूर्ण अंधश्रद्धा आहे. मातृत्वाच्या टप्प्याला मातेनं व तिच्या नवऱ्यानं नीट आत्मसात करावं. त्याचं मनन करावं. ते वापरावं आपल्या बळावर.
समारोप
‘गर्भसंस्कार’ करायला जाणाऱ्या सुशिक्षित स्त्री/पुरुषांची दोन गृहीतं असतात. ‘नुकसान तर नाही ना?’ आणि ‘आयुर्वेदात आहे मग वैज्ञानिकच असणार ना!’
यात ‘आयुर्वेदा’ची व आधुनिक विज्ञानाची ही कसोटी लावली तर ‘गर्भसंस्कार’ वैज्ञानिक नाहीत. Evidence based नाहीत हे आपण बघितलं. आता ‘नुकसान तर नाही ना?’ या मुद्द्याकडे येऊ या.
खलील जिब्रान म्हणतो तसं तुमचं बाळ हे सुटलेला बाण आहे. अगदी गर्भावस्थेपासून ते वेगळी ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे. गर्भसंस्कारांसारखे अट्टाग्रह मनात धरून त्याचा रोबो करू नका. आई-बाप आहात... आधार द्या, प्रेम द्या, थोडी शिक्षाही करा.
पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फुलवा. आपली स्वप्न... आपले हट्टाग्रह लादू नका. पालकांच्या हट्टाग्रहाची सुरुवात गर्भसंस्कारांचे मंत्रपठण करून होते... ही वाट धोक्याची आहे... सावध असा!
गर्भसंस्कारांना आपण जातो तेव्हा, आपण आपल्या बाळाकडून अवास्तव अपेक्षांची सुरवात गर्भावस्थेतच करतो! हे मोठं नुकसानच आहे, नाही का? म्हणून प्रत्येक वाचकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा.
...खरं-खोट्याचा बेमालूम व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकत असतील बाजारात...
पण मी अवैज्ञानिक व अवास्तव अपेक्षांनी भारून जाऊन त्यांना बळी का पडतेय/पडतोय?
गर्भसंस्कार करायचे नाहीत तर काय करायचं?
तर मातृत्व उपनिषद वाचायचं. त्यातलं ज्ञान मिळवायचं. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या आपल्या बाळाची व्यवस्थित जडणघडण घडेल, मातृत्वाचे त्रास कमी होतील, धोके आधी समजतील. मातृत्व सुखद, समाधानी, सुखरूप ठरेल. डिलीव्हरीनंतर निव्वळ स्तनपान करायचं. आदर्श हे... की पहिले ६ महिने फक्त स्तनपान! त्यासाठी आईचा आहार... गर्भवती असताना होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. बाहेरचं दूध, पावडरी... कशाचीही गरज नाही.
हल्ली मुली नोकऱ्या व करिअर करतात. ठीक. जेवढे महिने जमेल तेवढं-
१. तात्पुरती, दोन वर्षं फक्त, गृहिणी व्हायचा पर्याय सर्वोत्तम शक्य आहे. (सरकारसुद्धा सहा महिने मॅटर्निटी लीव्ह... बाळंतपणाची रजा देते.)
आर्थिक गरज नसेल तर शक्य होईलही कदाचित. विचार तर करा. हा पर्याय विचारात घ्या.
२. किमान पहिले चार महिने निव्वळ स्तनपान.
३. नंतर बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने गरज असेल तर, बाहेरचं दूध व इतर आहार.
जन्मतः मायलीनेशन फक्त १२ ते १५% व पहिल्या ३ वर्षात पूर्ण. अर्थातच बाळाच्या दृष्टीनं हा कालखंड सर्वात महत्वाचा. त्याचं पोषण/आहार अत्यंत काटेकोर व योग्य असावा. (बालरोगतज्ञाची मदत घ्या.)
४. लसीकरण पूर्ण व त्या त्या वेळेवर.
५. बाळाशी बोलणं महत्वाचं... खूप बोलणं.
जन्मल्यापासून बोलवं... गर्भसंस्कारांच्या वेळचा मंत्रोच्चार काही उपयोगाचा नाही. आता बोलणं उपयोगाचं.
६. संस्कार हे ‘बोलून’ होत नाहीत. ते करून होतात. जे काही मुलानं/मुलीनं करावं असं वाटतं ते आपण करावं. बाळ स्वभावतःच आई वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं.
सर्वात शेवटी
आपलं मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जे जमत नाही (बुद्धीमुळे, कमी क्षमतांमुळे वा परिस्थितीमुळे) त्या गोष्टी करणारं ते यंत्र नाही. ही समज महत्वाची. नाही का?
खात्री आहे आमची... की आजचे होणारे आई-बाबा... खूप संवेदनशील, उत्साही व सजग आहेत.
सारासार विचार करून निर्णय घेणारे आहेत. सदिच्छा.

 लेखक- डॉ. अरुण गद्रे

No comments:

Post a Comment