Thursday, May 16, 2013

वैज्ञानिक दृष्टिकोनातील मूल्ये


बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.
 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.

विज्ञान म्हणजे काय?
 निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!
 विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळया परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन. जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.
 आपण 28 फेबु्रवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळतो, कारण भारताचे विज्ञानाचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ, सी.व्ही.रामन यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध, 28 फेबु्रवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता. हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी. झालं असं की परदेश प्रवासाला निघालेले रामन, जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.
 आपल्या आजूबाजूला, असंख्य घटना घडत असतात, त्यांचं निरीक्षणही आपल्याकडून कळत-नकळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर तिथे आग पेटली असणार, हा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वीच जाणवलेल्या, आग आणि धूर यातील कार्यकारणसंबंधामुळे. आपण काही त्याला दिव्याचा राक्षस, चमत्कार किंवा अंतज्र्ञान म्हणत नाही.
 'उद्या सकाळी मी अमुक करीन.....' असं आपण म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का, की उद्या उजाडेलच कशावरून? कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे, आपण असं अनुमान काढलेलं असतं, की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षं सूर्य उगवतोय, त्याअर्थी तो उद्याही उजाडणारच.
 अनुमानानंतरची पुढची कडी म्हणजे प्रचितीची किंवा अनुभवांची. आगीत हात घातला की चटका बसतो, यासारखा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, कोणी जर आग अगदी थंडगार असते असं म्हटलं तर त्याला मूर्खात काढतो. कारण ते प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य असतं; पण योग्य शिक्षणाअभावी, किंवा अगदी वशिल्याअभावी म्हणा, आपल्याला नोकरी मिळत नाही, हे लक्षात आलं तरीही, एखादी सर्व समस्या सोडवणारी अंगठी घ्यायला, आपण चटकन तयार होतो. समजा हजार सुशिक्षित बेकारांनी, आज याप्रकारच्या अंगठया घेतल्या, तरी त्यातल्या 50% लोकांना तरी नोकऱ्या मिळतील का? नाही. कारण मुळात ती गोष्ट, ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कोणत्याही वैज्ञानिक सत्याचा अनुभव, सप्रमाण म्हणजे पुराव्यांसह, वारंवार म्हणजे पुन्हापुन्हा, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे येत असतो, यायला हवा. गुरुत्वाकर्षण ही वस्तुस्थिती आहे म्हणून वर फेकलेली वस्तू खालीच येणार, मग तुम्ही ध्रुवावर असा नाहीतर विषवृत्तावर असा.
 कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे तर विज्ञानाचं आधारतत्त्वं. 'ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते' असं म्हटलं तर ते सिद्ध करता आलं पाहिजे.  मेणबत्ती पेटवून ती उपडया हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. 'पदार्थाचं आकारमान वाढलं किंवा वाढवलं तर त्याची घनता कमी होते' असं म्हटलं  तर आपल्याला हे करून बघता येतं की लोखंडाचा पातळ पत्रादेखील पाण्यात बुडतो; पण तो वाकवून त्याला होडीचा आकार दिला की तो पाण्यावर तरंगतो. बर्फ हे पाण्याचं घनरूप; पण ते तयार होताना त्याचं अनियमित प्रसरण होत असल्यामुळे त्याची तुलनात्मक घनता कमी होते आणि तेही पाण्यावर तरंगतं.

सामाजिक उपयोजनाची कडी
 मला असं वाटतं की, वैज्ञानिक विचारशृंखलेत आणखी एक कडी येते ती म्हणजे त्या शोधाच्या सामाजिक उपयोजनाची. वैज्ञानिक दृष्टिकोन कितीही बाळगला तरी त्याचा व्यापक हितासाठी उपयोग करणं यातूनच माणसाची ऐहिक प्रगती झाली आहे. अपघातानंच जाणवलेल्या घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेऊन त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेणं, हे मानवी बुद्धीचं काम आहे. एक साधं उदाहरण पाहू. एके काळी कापसाच्या बोंडापासून सरकी वेगळी करणं, हे खूप त्रासाचं काम होतं. एली व्हिटने या अमेरिकन शास्त्रज्ञानं, एकदा एक मजेशीर दृश्य पाहिलं. एका उभ्या गजांच्या मोठया चौकोनी खोक्यात, काही कोंबडया ठेवल्या होता, आणि एक लांडगा त्यांना बाहेर ओढण्यासाठी, गजांमधून त्याचा पंजा घालत होता. बाहेर पडत होती फक्त पिसं, कोंबडया मात्र आतमध्ये सुरक्षित होत्या. हे पाहून त्याला कल्पना सुचली आणि याच कार्यकारणभावाचा वापर करून, त्यानं कापसापासून सरकी वेगळी करणारं यंत्र बनवलं.  जॉर्ज दमेस्ट्रॉलला 'वेलक्रो'ची कल्पना त्याच्या पँटमध्ये अडकून राहिलेल्या विशिष्ट गवताच्या तुसांच्या निरीक्षणावरून सुचली. रॉन्टजेनला लागलेला एक्सरे, म्हणजे क्ष किरणांचा शोध, पाश्चरला सापडलेली कॉलऱ्याची लस, फॅरेडेने शोधलेले चुंबकीय प्रवर्तनाचे नियम, ही अशीच काही उदाहरणं. निव्वळ अपघातानं आढळलेल्या गोष्टींमागील कार्यकारणसंबंध ओळखून, इतर ठिकाणी तशाच प्रकारे उपयोग करणाऱ्या या जागरूक, प्रयोगशील मनाच्या करामती!
 जागरूक मन विचार करत असतं, त्यामुळेच कोणत्याही घटनेकडे ते जसं कुतूहलानं, शोधकतेनं बघतं तसंच वस्तुस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करत असतं. तर्कसुसंगत कार्यकारणभावानं विचार केल्यामुळे त्याला निसर्गाच्या अशा स्वतंत्र नियमपद्धतींची जाणीव होते. याप्रकारे विचार केल्यामुळेच आपल्याला सत्य उलगडू शकतं, अन्यथा नाही हे जाणवल्यामुळे ते निर्भय बनतं. सत्य हे टप्प्याटप्प्यानं लक्षात येतं, त्यामुळे आधीच्या टप्प्यावर झालेलं आकलन जर अपुरं वाटलं तर ती संपूर्ण आणि अक्षम्य चूक न मानता ती नम्रपणे स्वीकारली जाते. त्यामुळेच या विचारपद्धतीत शोधकता, सम्यकता, स्वायत्तता, निर्भयता आणि नम्रता ही मूल्यं अंतर्भूत आहेत असं आपण म्हणतो.
 आपल्यासमोर अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. त्यांचा अर्थ लावण्यासाठी लागते ती शोधक दृष्टी. विषुववृत्तावरील प्रदेशात सगळयात जास्त काळ सूर्य तापतो. त्यामुळे खरं तर  तिथली झाडं करपायला हवीत. प्रत्यक्षात सगळयात जास्त हिरवी जंगलं त्याच भागात आहेत. असं का याचा शोध घेता आपल्या लक्षात येतं की तिथं पाऊसही वर्षभर, दर दिवशी पडतो; पण एरवी तर सततच्या पावसानं झाडं कुजलेली आपण पहातो. मग आपण विचार करतो की हिरव्या वनस्पतीच्या वाढीला आवश्यक गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. कारण त्यामुळेच या वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वत:चं अन्न तयार करू शकतात. याच्या जोडीला पाणी आणि त्यातून येणारी खनिजं मिळाली की वाढ जोमानेच होणार!
 तुमच्या शोधक बुद्धीसाठी आणखी एक मजेशीर कोडं. झालं असं की 10+2 ही शिक्षणपद्धती अस्तित्वात आली आणि रायगड जिल्ह्यातलं तांदळाचं उत्पन्न एकदम कमी झालं! वस्तुत: या दोन्हीचा सकृतदर्शनी संबंध नाही. काय झालं ते पाहा. नव्या शिक्षणपद्धतीत विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना बेडकांचं 'डिसेक्शन' सुरू झालं. त्यासाठी बेडकांची गरज वाढली. रायगड जिल्हा म्हणजे 'फ्रॉगरी'-बेडकांची सर्वाधिक पैदास तिथे होते. साहजिकच तिथून बेडूक 'एक्स्पोर्ट' होऊ लागले. यापूर्वी तिथले बेडूक पावसाळयात भातपिकावर येणारे किडे खाऊन वाढत. बेडकांची संख्या घटली आणि परिणामी वाढलेल्या किडयांमध्ये भातपिकाच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला.
 आपल्या लक्षात आलं असेल की आपण वरचं कोडं सोडवताना नेहमीच्या 'बंदबुद्धी' चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला. हाच विचार उपलब्ध माहिती आणि वर्तमानातील अनुभव यांनाही सम्यकपणे लावायला हवा. कुटुंबनियोजनाचं उदाहरण घेऊ. गेली सुमारे पन्नास वर्षं भारतात हा कार्यक्रम राबवला जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातली सम्यकता ज्यांना कळली नाही, ते काय म्हणतात? शासन, व्यवस्था, सर्वकाही भ्रष्ट आहे, कारण लोकसंख्या कमी कुठे झाली? अशा वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, वाढत्या वैद्यकीय प्रगतीबरोबर माता आणि अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालंय, वृद्ध लोकांचं आयुर्मान वाढलंय, त्यामुळे आपल्याला जी वाढ दिसते ती तात्पुरती आहे; पण हाच प्रयत्न निकरानं चालू ठेवला तर नजीकच्या भविष्यकाळात अपेक्षित परिणाम निश्चितच दिसेल.

स्वायत्तता म्हणजे काय?
 आपलं विश्व आणि त्यात घडत असणाऱ्या लहान मोठया घटना यात एक कार्यकारणभाव आहे. सगळीच कोडी अजून उलगडली नसली तरी त्यांच्या मागचा कार्यकारणभाव शोधण्याची पद्धत सापडली आहे. निरीक्षण आणि प्रयोगांच्या साखळीतून आपल्याला ती उलगडता येतात. विश्वाचं नियंत्रण करणारी कोणतीही 'पवित्र' किंवा 'सैतानी' शक्ती नाही. त्यामुळे तिच्या कृपेमुळे किंवा अवकृपेमुळे काहीही बरं-वाईट होत नाही. जे काही घडतं त्यामागे कार्यकारणभावाचे नियमच असतात. या अर्थानं विश्व स्वायत्त आहे.
 'सत्य-असत्यासी मन केले ग्वाही' अशी मानसिकता झाली की माणूस निर्भय बनतो. सत्याच्या आग्रहासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा रोष पत्करण्यास तो हसतमुखानं तयार होतो. सत्यशोधनाची किंमत म्हणून ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस विषाचा प्याला तोंडाला लावतो(इ.स.पूर्व399) तर गिओर्दानो ब्रुनो सूर्यकेंद्री व्यवस्थेच्या समर्थनासाठी(इ.स.1600) जिवंत जाळणं स्वीकारतो.
 वैज्ञानिक दृष्टिकोन आणखी गोष्ट शिकवतो ती म्हणजे नम्रता. 'मला गवसलेलं सत्य तेच अंतिम' असा दावा धर्म करतो, विज्ञान नाही. नवीन संशोधनानं आणि पुराव्यांनी प्रकाशात आणलेलं सत्य स्वीकारणं हे विज्ञानाचं खास वैशिष्टय. त्यामुळेच आईन्स्टाईनच्या 'सापेक्षतावादाच्या व्यापक सिद्धांता'मुळे न्यूटन कमी ठरत नाही किंवा हायझेनबर्गच्या 'अनिश्चिततेच्या तत्त्वाच्या' सत्यापुढे आईन्स्टाईन संपत नाही.
 खरं तर एवढी चांगली जीवनमूल्यं देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन यापूर्वीच समाजात रूजायला हवा होता. तसं का झालं नाही/होत नाही? याचं एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या समाजाची भूतकाळात रमण्याची मानसिकता आणि व्यक्तीपूजेचा हव्यास. आपलं कर्तव्य सिद्ध करण्याऐवजी पूर्वजांच्या कर्तृत्वाचे अधिकाधिक पुरावे शोधायचे. जुन्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून भविष्याचा वेध घेणाऱ्यांचं खच्चीकरण करायचं. राज्यापासून कुटुंबापर्यंत व्यक्तीकेंद्री एकाधिकारशाही. तरीही एखादा कर्तबगार माणूस झालाच तर त्याला देवत्व बहाल करायचं आणि त्याला डोक्यावर घेऊन इतकं नाचायचं की तो कशासाठी मोठा ठरला हेच विसरायला व्हावं.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शत्रू :
'गप्प बसा' संस्कृती : ज्याला आपण इथली प्राचीन संस्कृती म्हणतो, ती मुळात दैववादी आणि चिकित्सा नाकारणारी 'गप्प बसा' संस्कृती आहे. उलटे प्रश्न विचारायला प्रतिबंध करणारी आहे. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान' असे संस्कार प्रयत्नवादाचं खच्चीकरण करतात. कुतूहल आणि पूर्वग्रहविरहित दृष्टी त्यामुळे अभावानेच आढळते.
'शॉर्ट कट' शोधण्याची मानसिकता : माणसाला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. लोकसंख्या वाढ, त्यामानानं मर्यादित साधनसंपत्ती आणि मूलभूत सुविधांचं अपुरेपण, दिवसागणिक कमी होणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी, श्रमांची कमी होत चाललेली प्रतिष्ठा आणि किंमत, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी अशा कटकटींमुळे गांजलेला सामान्य माणूस फारसा विचार करत नाही. अडचणीच्या मुळाशी जात नाही. तात्पुरते, सोपे मार्ग शोधतो, त्यासाठी 'शॉर्ट कट' स्वीकारतो.
रुढी-परंपरांचा खोल प्रभाव : प्रत्येक समाजात संस्कृतीच्या वेगवेगळया टप्प्यावर आणि त्या त्या मानवसमूहाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित काही पद्धती बनतात. पुढे त्यांची चिकित्सा न करता त्या तशाच पाळत राहिल्या की त्या रुढी होतात. व्यापक भौगोलिक प्रदेशात तिथल्या भौतिक परिस्थितीमुळे आणि राजकीय स्थितीमुळे काहीसा मूल्यात्मक(?) आशय असणाऱ्या पद्धती पिढयान्पिढया पाळल्या जातात त्या परंपरा ठरतात. इथल्या समाजाची एकंदरच मानसिकता 'सांगे पूर्वजांची किर्ती' अशी असल्यामुळे कर्तबगार पूर्वजांचे अधिक कर्तबगार वंशज होण्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे रुढीपरंपरांच्या बेडया हे दागिने वाटू लागतात. त्या जास्तीत जास्त जुनाट पद्धतीनं पाळण्याचं भूषण वाटतं. चालू वास्तवाशी या प्रथा सुसंगत आहेत का हे तपासण्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यामुळे झापडं लावून चाकोरीत विचार(?) करण्याची वृत्ती बळावते.

सदोष शिक्षणपद्धती : सामान्यत: सुशिक्षित लोकांना असं वाटत असतं की आपण विज्ञान शिकलो आहोत त्यामुळे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहेच, तो नाही निरक्षर लोकांमध्ये. हे साफ चूक आहे. चिकित्सक वृत्ती ही नेहमी शिक्षणामुळेच येते असं नाही. शिकलेले लोक वस्तुस्थितीला नेहमीच ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रश्न विचारतात का? आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान आहे ते विषय म्हणून, त्यात चिकित्सक भाग आणि प्रयोगशीलता कमीच आढळते. स्वत: विचार करून परंपरागत समजुतींपलीकडे जाणारे आणि तसं शिकवणारे शिक्षकही अत्यल्प आहेत. बाकीच्यांचा व्यक्ती म्हणून दोष नसला तर तो संस्कारांचा असेल. आडनाव ऐकलं की जातीचा विचार करणारे आणि रोजच्या पेपरातलं भविष्य वाचून काम करणारे कसला दृष्टिकोन रुजवणार? काही वेळा पुस्तकात आहे म्हणून तरी काही शिकवलं जातं; पण अभ्यासक्रमातच जर स्त्री-पुरुष समता, जाती-धर्मनिरपेक्षता अशी चांगली मूल्यं ठसवणारे धडे नसतील तर काय करणार?
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार आणि प्रसार हे प्रत्येक भारतीयाचं घटनादत्त कर्तव्य असलं तरी प्रत्यक्षात मात्र अवैज्ञानिक दृष्टिकोनाचं राजकीय समर्थन होताना दिसतं. राष्ट्रपतींपासून मंत्र्यांपर्यंत अनेक राजकीय व्यक्ती जेव्हा सत्यसाईबाबासारख्या चिल्लर चमत्कार करणाऱ्या भोंदूबाबाकडे जाऊन नतमस्तक होतात तेव्हा सामान्य माणसापर्यंत चुकीचाच संदेश पोचतो. उपेक्षितांच्या आणि स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अंधश्रद्धांना उखडून टाकण्यासाठी परिणामकारक कायदा अस्तित्वात यायला दिरंगाई होते, ती याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे.

प्रसारमाध्यमांची भूमिका : वाचक आणि प्रेक्षक यांची संख्या वाढवणे हे एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे प्रसिद्धी माध्यमं अवैज्ञानिक विचारांना अधिकाधिक प्रसिद्धी देत असतात. लोक आवडीनं वाचतात-बघतात(आणि विश्वासही ठेवतात!) म्हणून सरसकट कुठल्याही गोष्टीला अपरिमित प्रसिद्धी दिली जाते. लोकांची मानसिकता घडवण्याची ताकद असलेल्या प्रसारमाध्यमांच्या 'मागणी तसा पुरवठा' अशा व्यवहारामुळेही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारात अडचणी येतात.
 पण कितीही अडचणी असल्या तरी अंतिम विजय सत्याचा म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच होणार. कारण 'सत्यमेव जयते' ही निव्वळ कविकल्पना नाही, नुसतं सुभाषितही नाही. ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज!
डॉ. आशुतोष मुळ्ये

No comments:

Post a Comment