Tuesday, May 28, 2013

अध्यात्म...


उन्हाळ्यात लावी
दगडा चंदन
मरतो राबून
... शेतकरी...

करोडोंची माया
जमवोनि ठेवी
दगडाच्या पायी
गर्भगृही...

रिकामटेकडे
फुकटचे खाती
कष्टकर्‍या हाती
टाळ देती...

करोडोंचे मठ
स्थापोनि अनंत
झालेत महंत
मोक्षमार्गी...

भस्मलावे साधू
जाहले अनंत
परि त्यात संत
कोणी नसे...

पुजार्‍यांची दिसे
गर्भारली पोटे
झोपडीत काटे
भक्षितात...

न खात्या देवाला
रोजचा खुराक
जीवंत बालकं
कुपोषित...

देवाच्या निवासा
प्रचंड राऊळे
जिवंत मावळे
निर्वासित...

ठासून सांगतो
देव नाही कोठे
मानव्यचि मोठे
धर्म-कर्म...

सुधाकर कदम

No comments:

Post a Comment