नगरहून कोपरगावला जाताना रहाता गाव ओलांडलं तशी शिर्डीची चाहूल लागू लागली.आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्मोठी हॉटेल्स , रिसॉर्टस, त्यातही त्यांची नावं अपेक्षेप्रमाणं साईलीला, साईरंग अशी. बाकीच्या देवस्थानांच्या मानानं ही भलतीच झकपक आणि पंचतारांकित.रस्त्यावर भरधाव चालणाऱ्या परप्रांतातल्या नवीन गाड्या आणि त्यावरचे भलेमोठे फुलांचे हार.
शिर्डीचं बसस्थानक ओलांडून पुढं आले तसा शेजारी बसलेल्या राजेंनी हात जोडून , डोळे घट्ट मिटून नमस्कार केला. शिर्डी सोडून बरेच पुढे आलो तरी राजेंचे हात जोडलेले आणि डोळे मिटलेलेच होते.
संध्याकाळी परत येताना शिर्डीत थांबलो. सहा वाजताच्या आरतीचे व्हीआयपी पास मिळवण्याची राजेंनी व्यवस्था केली होती. असा पास (फुकट) मिळवण्यासाठी स्पेशल कॉन्टॅक्ट्स असावे लागतात असे राजे अभिमानानं म्हणाले. संस्थानाच्या काही लोकांनी असे पासेस बाहेर दोन्दोन हजार रुपयांना विकले आणि त्यांचं एक भलंमोठं रॅकेट पकडलं गेलं असे ते म्हणाले.
हॉटेलमधल्या बऱ्याचशा खोल्या आंध्र प्रदेशातून आलेल्या भक्तांनी भरलेल्या होत्या.त्यात दोन पाच वर्षांची काही लहान मुलंही होती. काही लहान मुलांच्या डोक्याचं पूर्ण मुंडन केलेलं होतं. डोक्याची आगाआग होत असल्यानं ती मुलं अखंड रडत होती. त्यांच्याबरोबरचे बाप्ये आणि बाया त्यांच्यावर हेंगाड्या भाषेत खेकसत होत्या. आंध्रातल्या लोकांनी हा काहीतरी नवीन चावटपणा सुरु केला आहे, असं राजे म्हणाले.
साडेपाच वाजता हॉटेलातून मंदिराकडे जायला निघालो. व्हीआयपी पासमुळं फक्त मंदिराच्या गाड्यांनाच प्रवेश असलेल्या राखीव प्रवेशद्वारातून आत गेलो. आतल्या बांधकामाच्या पाटीवर व्यवस्थापक मंडळीत अजित पवार असं एक नाव वाचून हे राजकारणी आता इथं पण का असं मी राजेंना विचारलं. तेंव्हा हे वेगळे आणि ते वेगळे असे राजे म्हणाले. या अजित पवारांनी देवस्थानाच्या विकासासाठी फार प्रयत्न केले, पण ते नंतर शिर्डीच्या राजकारणात पडले, आणि मग इथल्या लोकल मंडळींनी त्यांना सरळ केलं असंही त्यांनी सांगितलं.
सहा वाजत आले तशी गर्दी वाढू लागली. ‘स्पेशल कॉन्टॅक्ट्स ‘ वापरून आलेल्या भक्तांचे कपडे आणि रुबाब बाकीच्यांपेक्षा वेगळाच दिसत होता. त्यातल्या मध्यमवयीन बायका टीव्ही सीरीयलसारखा संपूर्ण मेकअप करून आल्या होत्या. दोनतीन तरूण मुली तंग टी शर्टस आणि जीन्स घालून आल्या होत्या.रांगेतले लोक वळूनवळून त्यांचाकडं बघत होते. एका मुलीच्या टी शर्टवर ‘खरंतर तुम्हाला माझं तीव्र आकर्षण वाटत आहे, तर मग ते लपवता कशाला ‘ अशा आशयाचं इंग्रजीत लिहीलेलं होतं. पण तेही बाबांच्या संदर्भात असावं असं समजून मी गप्प राहिलो.तेवढ्यात राजे येऊन माझ्या कानात ‘लुक ऍट दोज बिचेस. दे हॅव कम फॉर द दर्शन ऑफ बाबा ऑर गिव्ह देअर दर्शन टू अदर बाबाज ‘ असं कुजबुजले.
मंदिराचं दार उघडलं तसे संगमरवरी पायरीवरून व्हीआयपी आत घुसले. स्टेनलेसस्टीलच्या जाड नळ्यांच्या रेलिंगचं छोटं गेट अजून बंदच होतं.तिथून पुढं संपूर्ण चांदीच्या पार्श्वभूमीवर बाबांची संगमरवरी मूर्ती दिसत होती. तेवढ्यात मागून जनता गेट उघडलं आणि प्रचंड पळापळ सुरु झाली. काही मिनिटातच पूर्ण मंडप भरून गेला.मंदिरातला धुपाचा वास, धूर, बाबांची चकचकीत मूर्ती, त्यांच्या डोक्यावरील सोन्याचा मुगुट, त्यावरचं सोन्याचं छत्र, क्लोज सर्किट टीव्हीमधून मागे दूरवर दिसणाऱ्या बाबांच्या असंख्य प्रतिमा आणि प्लेअरवर वाजणारा एकसंध खर्जातला ओम साईनाथाय नमः असा जप यानं वातावरण एकदम संमोहित झाल्यासारखं झालं. तेवढ्यात भालदार चोपदारांसारखा गणवेश घातलेले आणि हातात चांदीचा मानदंड घेतलेले दोन पगडबंद बाबांच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिले. पेटी-तबला असा सरंजाम होताच. माइकसमोर येऊन एका तरतरीत चष्मावल्या पुजाऱ्यांनी सराईतपणे आता आरती सुरु होत आहे, सर्वांनी एकसाथ आरती म्हणावी, आरती चालू असताना फोटो काढू नयेत असं आळीपाळीनं मराठी व हिंदीतून सांगितलं. तेवढ्यात आमच्याही पुढं असलेलं एक अतिअतिविशिष्ट लोकांसाठीचं दार उघडलं आणि त्यातून चारपाच लोक आत घुसले. त्यात एक सिनेमानटासारखा दिसणारा लाल रंगाची जर्सी घातलेला तरुण होता. आपल्याला आरतीला उशीर झाला की काय या कल्पनेने तो घाबराघुबरा झाल्यासारखा वाटत होता.
तेवढ्यात आरती सुरु झालीच. माझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या झांजवाल्यानं इतक्या जोरात झांज वाजवायला सुरुवात केली की मी दचकलोच.बऱ्याच लोकांकडे आरतीचं छोटं पुस्तक होतं. पण लोकांना चालीचा अंदाज नसल्यानं ते थोडेथोडे चुकत होते. माझ्या समोरच्या लाल जर्सीवाल्यानं सिनेमातले भक्त देवापुढं गाणं म्हणताना जसे हात फैलावून धरतात तसे धरले होते. मधूनच तो कॅच पकडल्यासारखंही करत होता. माझ्या शेजारचा तुळतुळीत डोक्याचा तरुण आपल्या गालावर तौबा तौबा करताना मारून घेतात तसं सरळ आणि उलटं मारत होता.आरती संपून अचानकच ‘घालीन लोटांगण..’ सुरु झालं आणि लोक स्वतःभोवती फिरायला लागले. हात व डोळे जोडलेली असंख्य मानवी सिलींडर्स एखाद्या राक्षसी यंत्राच्या सुट्या भागांसारखी दिसत होती. नेमक्या किती गिरक्या घ्यायच्या याचा अदमास नसल्यानं काही लोक मध्येच थांबले होते. त्यांना शेजारच्याचं डोकं, कोपर लागल्यावर ते वैतागत होते.
आरती संपली आणि दहा कडव्यांचं एक साईस्तोत्र सुरु झालं. प्रत्येक कडव्याची सुरुवात पुसो न आम्हा अमुकतमुक अलाणाफलाणा न पुसो तरीपण साईनाथ आमच्यावर न रुसो अशी होती. त्यातल्या पुसो आणि रुसो या शब्दांची गंमत वाटून ते स्तोत्र मी पूर्ण बघीतलं. पुढेपुढे पुसो मधल्या गोष्टी संपल्यानं डसो – नसो – ठसो अशी जुळवाजुळव केली होती.
आता बराच वेळ झाला होता. मागं एक्दोन मुलं रडण्याचा आवाज येत होता. पगडबंद परत एकदा ललकारी दिली आणि बाबांचा मुगुट आणि चांदीचे दंड बंदोबस्तात आत पाठवले.मुगुट काढल्यावर आतल्या केशरी वस्त्रात बाबा अगदी घरगुती दिसू लागले. आता दर्शनाची लैन सुरु झाली. हिरवं वस्त्र पांघरलेल्या समाधीवर दोन्ही बाजूला हात टेकवून लोक डोकं, गाल समाधीवर घासत होते. लाल जर्सीवाल्यानं समाधीच्या दोन्ही बाजूला हात रोवून धरले आणि उभ्याउभ्या तो सूर्यनमस्कार घातल्यासारखं करू लागला. राजे त्या समाधीला आलिंगन दिल्यासारखे जे आडवे झाले ते उठेतनाच. मागचे लोक कुरकुर करू लागले तसे राजे नाइलाज झाल्यासारखे उठले , एखादं पाऊल पुढं आले आणि परत झटका आल्यासारखे समाधीवर जाऊन आडवे झाले. पुजाऱ्यानं त्यांना डोक्याला धरून उठवलं तसे ते नाइलाज झाल्यासारखे उठले.
आम्ही मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसलो. राजेंच्या चेहऱ्यावरून समाधान निथळत होतं. काही जाणवलं की नाही तुला, का नुसताच पुतळ्यासारखा उभा होतास? त्यांनी मला जाब विचारल्यासारखं विचारलं. काही नाही बुवा, मी म्हणालो. राजे एकदम चिडल्यासारखे झाले. चूक केली तुला इथं आणून, ते म्हणाले. हे बघा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आहे हं काहीतरी असं मी म्हणू शकलो असतो, मी म्हणालो. पण तुम्ही मानता त्या पवित्र ठिकाणी खरं बोलणं जास्त योग्य आहे. राजे जास्तच वैतागल्यासारखे झाले. थोड्या वेळाच्या शांततेनंतर म्हणाले, कसे रे अश्रद्ध तुम्ही, घरात संध्याकाळी दिवा तरी लावता का देवासमोर? माझ्या घरात देवघर नाही हो, मी अपराधीपणानं म्हणालो. कर, एक देवघर, किमान एक फोटो लाव महाराजांचा, आणि दिवा लावत जा रोज संध्याकाळी त्याच्यासमोर. मग बघ तुला कसं शांत आणि समाधानी वाटेल ते. ते म्हणाले.
अहो, पण असलं काही न करताच मला शांत आणि समाधानी वाटतंय, मी म्हणालो.
बघ, मी म्हणालो नव्हतो का की तुला कसला तरी दृष्टांत होईलच म्हणून, राजे विजयी हसले.
मी गाडी सुरु केली. झांजेच्या आवाजानं एक कान बधीर झाला होता. मनाशी म्हणालो, दोन्ही कान बधीर झाले तरी चालेल, कानांच्या मधला भाग बधीर न होता शाबूत राहो, की वाचलो!
-इंटरनेटवरून
-इंटरनेटवरून
No comments:
Post a Comment