Sunday, October 16, 2022

बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

 बुवाबाजी विरोधाची वैचारिक कारणे

-श्री. कुमार मंडपे

     काही बाबा हवेत हात फिरवून सोन्याची साखळी काढतात, हिन्याची अंगठी काढतात, तर काही इलेक्ट्रॉनिक्सची घड्याळे, मूर्ती काढून आपल्या भक्तांना त्यांच्या लायकी प्रमाणे अर्पण करतात. इतक्या प्रचंड प्रमाणात सोने, हिरे निर्माण करणारे असंख्य बाबा, महाराज, स्वामी, भगवान, आपल्या देशात असतानाही आमच्या अर्थमंत्र्यांना हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीसाठी देशोदेशी फिरावे लागते आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणताही बाबा देशाच्या मदतीसाठी धावून आला नाही. कोणत्याही बाबाने सोन्याचा डोंगर निर्माण केला नाही, की एखाद्या नदीत किंवा समुद्रात हात घालून पाण्याचे पेट्रोल तयार केले नाही. हातचलाखीने हवेतून विभूती, रुद्राक्ष काढून देऊन चमत्काराचा दबदबा निर्माण करता येतो. लोकांना नादी लावून प्रचंड पैसा कमविता येतो. म्हणून या बाबांना देशाचे दारिद्रय नाहीसे करता येत नाही.

     एखाद्या बाबाने कोरड्या विहिरीला पाणी लावून दिल्याचे सांगितले जाते. नदीतून जाताना नदी दुभंगते व बाबांना पैलतीरी जाण्यासाठी वाट दिली जाते. इतकी प्रचंड दैवी शक्ती त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. पण अशा बाबांना दरवर्षी होणारा महापूरांचा प्रलय थांबविता आला नाही किंवा सतत दुष्काळग्रस्त असलेल्या भागात पाऊस पाडता आला नाही.

     काही बाबा, महाराज, करणी करण्यात, मूठ मारण्यात तरबेज असल्याचे सांगितले जाते, घराघरातून, गावागावातून असे प्रकार केल्याचे भासवून घरातील शांतता नाहीशी केली आहे. आणि गावागावातून भांडणे निर्माण केली आहेत. अशा बुवांनी मूठ मारून पाकिस्तानी आक्रमकांना जमीनदोस्त केल्याचे ऐकण्यात नाही. काश्मिर, पंजाबात होणारे निरपराध लोकांचे शिरकाण थांबविता आले नाही. अहो कसे थांबविता येणार! कारण तशी अतिंद्रिय शक्ती कोणाकडेही नसते.

     बुवा हे तुमच्या आमच्या सारखे सामान्य असतात. त्यांच्या अंगावर असणारी कफनी सुद्धा त्यांना शून्यातून निर्माण करता येत नाही. एखाद्या गोष्टीची निर्मिती करण्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. कायिक रासायनिक बदल घडून यावे लागतात. तेव्हा एखादा पदार्थ तयार होतो. नुसता हवेत हात फिरविला आणि वस्तू तयार केली असे घडत नाही. ही शुद्ध बनवाबनवी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

     कोणत्याही बुवा महाराजांनी, समाजासाठी काहीही केले नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधून समाजाचे मानसिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केले आहे. सामाजिक विषमतेच्या विषवल्लीला खतपाणी घालून पोसले आहे. मठ, आश्रम बांधून अनैतिक कार्ये मोठ्या प्रमाणात केली आहेत. समाजात दैववादाच्या जंतूंचा प्रसार केला आहे. आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

     थोडक्यात आपल्या जवळ जे नाही ते आहे असे भासविणारा, तो बुवा अध्यात्मिक वा पारलौकिक क्षेत्राशी स्वतःला जोडून दैनंदिन जीवनात दिशाभूल वा शोषण करणारा तो बुवा आणि श्रद्धेच्या क्षेत्रातील काळाबाजार म्हणजे बुवाबाजी होय.

     मग लोक बुवाकडे का जातात? हा प्रश्न निर्माण होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रश्न निर्माण होतात. हुंड्याच्या बाजारामुळे मुलीचे लग्न ठरण्यात अडचणी येतात. इच्छा असूनही घरात अपत्य खेळत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही. नवरा नांदवत नाही. नवऱ्याची दारू सुटत नाही. घरातील व्यक्तीला असाध्य रोग झाला आहे. अशा नानाविध अडचणींमुळे व्यक्ती अगतिक बनते, आणि बुवाला शरण जाते. भारतीय संस्कृतीत अवतार कल्पना प्रत्येकाच्या मनात घर करून असते. परमेश्वराचा अवतार असलेला बुवा आपणास मार्गदर्शन करेल. संकटात मदत करेल अशा वेड्या आशेने लोक बुवाकडे जातात आणि कायमचे जायबंदी होतात.

बाबांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. इंग्लिश, हिंदीवर प्रभुत्व असते. त्यांच्याकडे संभाषणचातुर्य असते. याउलट काही बाबा ठार पागल असतात. स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव

नसते. त्यांच्या भोवती असणारे धूर्त भक्त या स्थितीचा हुशारीने उपयोग करून घेतात. बाबांच्या चमत्कारांच्या पद्धतशीर कंड्या पिकवितात. प्रसारमाध्यमांचा पद्धतशीर उपयोग करून घेतात. बाबांच्यासाठी मठ, समाध्या, देवळे बांधतात. बाबांचे महत्व वाढवून अर्थार्जन करतात. 

     बुवाबाजीची तंत्रे ठरलेली असतात. बाबांच्या सामर्थ्याचा कणखर पाया म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत होय. जरी बाबांचे भाकित चुकले तरी या सिद्धांताची मदत बाबांना घेता येते. गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणजे हा जन्म होय व म्हणून या जन्मात कितीही चांगले वागले तरी गेल्या जन्मीचे फळ या जन्मात भोगून संपवावे लागते व या जन्मातील कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो. म्हणजे बाबांचे भाकित चुकले नसून पूर्व जन्मीचा भोग आहे असे भक्ताला पटविता येते. याला म्हणतात कर्मविपाकाचा सिद्धांत.

    बाबांच्या तंत्राचा दुसरा मुद्दा म्हणजे संभवतेच्या नियमाचा (law of probability) आधार होय. बाबा ज्या प्रश्नांची उत्तरे देतात ते सर्व प्रश्न द्विपर्यायी असतात. उदा. मी परीक्षेत पास होईन का? मला मुलगा होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे होय, नाही स्वरूपाची असतात. त्यामुळे कोणतेही भाकित केले तरी ५० ते ६० टक्के भाकित बरोबर येतेच. मुलगा झाला तर हत्तीवरून साखर वाटत बैंड लावून मठात यायला सांगितले जाते. त्यामुळे बाबांची प्रसिद्धी मोठ्याप्रमाणात होते आणि मुलगी झाली तर? गेल्या जन्मीचे पाप म्हणून व्यक्ती घरी स्वस्थ बसून राहते. माणसाचा स्वभावच आहे की, एखाद्या गोष्टीत यश मिळाले तर गावभर सांगत सुटायचे आण अपयश आले तर तेरी भी चूप और मेरी भी चूप.

    बाबांच्या तंत्राचा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, अफवा पसरविण्याचा पद्धतशीर प्रयत्न होय. उदाहरणार्थ बाबांची थुंकी अंगाला चोळली असता महारोगी बरा होतो. बाबांच्या स्पर्शाने आंधळा बघू लागतो. पांगळा चालू लागतो, मुका बोलतो. पुरावा विचाराल तर हजार मैलावरील गाव सांगितले जाते. इतक्या दूरवरची चौकशी सामान्य माणसांना अशक्य असते.

     अशा बुवाबाजीला जर सुरूंग लावायचा असेल तर प्रत्येक गोष्ट पदर पसरून स्वीकारण्याचे सोडून दिल पाहिजे. उलट चमत्काराची चिकित्सा केली पाहिजे. सकस शिक्षणाची गंगोत्री प्रत्येकाच्या दाराशी नेली पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्याचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून मिळाले पाहिजे. प्रत्येक भारतीय मन शोधक व पुरुषार्थी बनविले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रबोधन करून माणसाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे.


=================================

No comments:

Post a Comment