Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, August 1, 2015

तू मुर्ख आहेस

तू हिंदू असशील तरी मुर्ख आहेस,
तू मुसलमान असशील तरी मुर्ख आहेस …
तू कुठल्याही धर्माचा असलास तरी मूर्खच.
कारण तुला जगायला 'धर्माचा' आधार लागतो.
समोरच्याने सांगितलं, तु निमूटपणे ऐकलंस
तुझ्या विचारांना तूच चौकटीत बसवलंस.
कारण पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडली नाहीत कधी,
ना कधी त्या प्रश्नांनाच जाब विचारायची हिंमत झाली तुझी.
तू अडकत गेलास आणि स्वत:ला अडकवत राहिलास.
पण,
तू धर्म पाळतोस म्हणून तुझी अधोगती झाली असं नाहीच,
तू धर्म पाळतोस म्हणून तुला यश आलं नाही, असंही नाही
कारण प्रगतीच्या, यशाच्या व्याख्याच तुझ्या नजरेत वेगळ्या भरतात.
तो धर्म ज्याचा तू पुरस्कार करतोयस, तो धर्म कुठून आणलास ?
याचा तुला ठाव नाही.
आईबापांनी हिंदू सांगितलं कि तु हिंदू समजतो स्वत:ला,
आईबापांनी मुसलमान सांगितलं असतंस तरी तु तेच समजलं असतंस,
कुठल्याही धर्माचा तू स्वीकार केलास असताच ना ?
तुझ्याच धर्माप्रमाणे देव एकच आहे,
तुझ्याच धर्माप्रमाणे देव चराचरात आहे,
मग तरी तुला २० मैल जाऊन देवळात जायची गरज भासते ?
घराशेजारी असलेलं मस्जिद तुला पहावत नाही….
तुझ्या मनातच देव असता तर तुला देव कुठेही दिसला असता.
पण मुळात तुला देव शोधायचाच नाही,
तुझा विश्वास आहे चमत्कारांवर,
तुझा विश्वास आहे दैवी शक्तींवर.
तुला हवंय कुणीतरी ज्याच्यासमोर तुझी गाऱ्हाणी ऐकवू शकशील,
तुझ्या कर्तुत्वाने कुणाला खुश करू शकशील,
बदल्यात मिळेल तुला घबाड काहीतरी,
नाहीतर स्वर्गात जागा एखादी,
वा अप्सरेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची संधी कदाचित ….
हा सगळा आंधळा विश्वास तुला धर्म देतो.
आणि म्हणूनच,
तू मुर्ख आहेस, कारण तू हिंदू आहेस,
तू मुर्ख आहेस, कारण तू मुसलमान आहेस,
तू मूर्ख आहेस, कारण कुठल्यातरी धर्मात अडकणारा आहेस.
तू मूर्ख आहेस, कारण तू तुझ्या विचारांना बंधनात अडकवलंयस.
अर्थात,
तूझ्या नजरेत फार काही वेगळा नाहीच मी !

Sunday, December 21, 2014

व्यसनांना करु बदनाम - पोवाडा



आधी नमन माझे शिवबाला
ज्योतिरावाला शाहुराजाला
भिमराव अण्णाभाऊल़ा
ज्यांनी अर्थ दिला जगण्याला
वंदन करुन त्या सर्वान्ला
शाहिर आज रस्त्यावरती आला
विनवणी करण्या जनतेला
साथ मागतोया तुम्हाला
बदनाम करण्या व्यसनाला जी जी जी $$


जात येडी झाली मानसाची
बघा तर्हा याच्या जगण्याची
झाली घाई त्याला मरण्याची
बायका पोर उघडी पाडन्याची
पान गुटखा खावुन थुकन्याची
सिगारेट बिडी फुकन्याची
तंबाखूचा बार मळण्याची
दारू सोडा आणि चकन्याची
सांगतो व्यथा याच्या व्यसनाची जी जी जी $$

पैसा कमावला होता थोडा फार
पण तम्बाखुने दिला केंसर
बरा करण्या त्याचा आजार
खर्च झाला किती बेसुमार
मग धरला दारुवर जोर
सिगारेटीचा काढला धूर
जेव्हा झाले ख़राब लीवर
लागले विकायला घरदार
व्यसनांनी केले बेजार जी जी जी $$

जरा विचार कर माझ्या भावा
जरा विचार कर माझे ताई
घे आनंद जीवनाचा
सोड सगळ्या वाईट सवयी
व्यसनांना घालुन लगाम
करुन टाकू त्यांना रामराम
आयुष्याला करुन सलाम
आज करू एक सत्काम
व्यसनांना करू बदनाम जी जी जी
व्यसनांना करू बदनाम जी जी जी$$

- अन्ना

Sunday, September 8, 2013

अपराजित दाभोलकर

अपराजित दाभोलकर
20 ऑगस्ट 2013 ,रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, फुटपाथच्या कडेला, 
पण,
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं, 108 भटजींचा कळप घेऊन, रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा धुपारा
आणि जादुटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...........
एखाद्या चमत्कारी बुवाकडून,एखाद्या अवतारी माताकडून,एखाद्या गुरूमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप, दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचा लिंबू अर्धवट कापून,टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,त्यांच्या नेत्रात फुल पाडण्यासाठी,त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रध्देने लटकावयाची होती काळी बाहुली,तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया,बाहुलीच्या अंगभर,दाभोलकर समजून...
हात जोडून,डोळे झाकून करायचा होता नवस,
एखाद्या कोट्याधिश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात,वस्तीवस्तीत भरवायचे होते सतसंग,
आणि खुशाल करायचे होते, दाभोलकरांना पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतय
तुम्ही हे सारं करून थकला, मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन,पाऊस वारा पीत,ओठी घेऊऩ समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डेक्यातला अंधार झाडत,मस्तकातले धर्मांध किडे काढत,अंधश्रध्देची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले, काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,एक गांव एक पाणवठ्यापासून
जातपंचायतीच्या उच्चाटनापर्यंत, दाभोलकर अखंड लढत राहिले, ......पण....
अंधारातल्या सनातनी दुतांनो
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला ,तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला,तुमच्या पंचांगाला,तुमच्या अंगा-याला,तुमच्या धुपा-याला,
तुमच्या अधर्माला,तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलीत करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगिषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित अध्यात्मिक शक्तिने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: ....
पराभूत होऊन तुम्हाला टेकावे लागले गुडघे,...दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी....
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, 20 ऑगस्ट2013,फुटपाथच्या कडेला,....पण...
अंधाराच्या सनातनी दुतांनो, मी तुरूंगातून बघतोय तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......
सचिन माळी(ऑर्थर रोड जेलमधून)

Tuesday, May 28, 2013

अध्यात्म...


उन्हाळ्यात लावी
दगडा चंदन
मरतो राबून
... शेतकरी...

करोडोंची माया
जमवोनि ठेवी
दगडाच्या पायी
गर्भगृही...

रिकामटेकडे
फुकटचे खाती
कष्टकर्‍या हाती
टाळ देती...

करोडोंचे मठ
स्थापोनि अनंत
झालेत महंत
मोक्षमार्गी...

भस्मलावे साधू
जाहले अनंत
परि त्यात संत
कोणी नसे...

पुजार्‍यांची दिसे
गर्भारली पोटे
झोपडीत काटे
भक्षितात...

न खात्या देवाला
रोजचा खुराक
जीवंत बालकं
कुपोषित...

देवाच्या निवासा
प्रचंड राऊळे
जिवंत मावळे
निर्वासित...

ठासून सांगतो
देव नाही कोठे
मानव्यचि मोठे
धर्म-कर्म...

सुधाकर कदम