Showing posts with label भ्रामक विज्ञान. Show all posts
Showing posts with label भ्रामक विज्ञान. Show all posts

Wednesday, October 29, 2014

पोप यांचा साक्षात्कार

देवाच्या हातात काही जादूची छडी नाही, हे पोप फ्रान्सिस यांचे उद्गार क्रांतिकारी असेच म्हणावे लागतील. कारण धर्म कोणताही असो, त्यात देव म्हणजे जणू कोणी जादूगार आहे याच दृष्टिकोनातून पाहिले जात असते. आकाशात कोठे तरी तो बसलेला असतो आणि तेथून सर्व विश्वाची सूत्रे हलवीत असतो, अशी ती कल्पना. प्रार्थना करून, नवस वगैरे बोलून त्याला प्रसन्न करून घेणे हे त्याच कल्पनेचे व्यावहरिक रूप. त्याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा. अर्थ एकच. त्या अर्थाला कोणा नास्तिकाने आव्हान दिले तर त्यात विशेष काहीही नाही. त्याने धार्मिकांच्या एकूण जीवनव्यवहारावर तसूभरही परिणाम होत नाही. कॅथलिक ख्रिश्चनांच्या मुख्य धर्मगुरूने, पोप फ्रान्सिस यांनीच देवाच्या या लोकप्रिय भूमिकेतील हवा काढून घेणे ही मात्र निश्चितच एक मोठी घटना आहे. आज सर्वच धर्म किरटय़ा एकारलेपणाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर तर पोप यांची अशी भूमिका फारच महत्त्वाची ठरते. पाँटिफिकल अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे केलेल्या भाषणात पोप यांनी हे वक्तव्य केले. पण एवढय़ावरच ते थांबले नाहीत. विश्वाच्या उत्पत्तीचा महाविस्फोट सिद्धान्त तसेच डार्विनप्रणीत उत्क्रांतिवाद यांतही तथ्य असल्याचे त्यांनी मान्य केले. ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. केवळ ख्रिश्चन धर्मातीलच नव्हे, तर सर्वच धर्मातील विश्वोत्पत्तीच्या मूलभूत सिद्धान्तांना किंचित का होईना, पण छेद देणारी अशी ही गोष्ट पोप सांगत आहेत म्हटल्यानंतर त्याचे महत्त्व ध्यानी यावे.
सर्वच मानव समाजांसमोर आणि म्हणून सर्वच धर्मासमोर 'हे सारे कोठून येते' हा एक महत्त्वाचा सवाल राहिलेला आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक धार्मिक तत्त्वज्ञानाचा. दुसरा विज्ञानाचा. धर्मानुसार हे जग, पंचमहाभूते, अवघी सजीव-निर्जीव सृष्टी यांच्या निर्मितीचे श्रेय हे परमेश्वराचे. शिवाय पुन्हा तोच जगन्नियंता. या विश्वाचे यंत्र चालविणारा. विज्ञानाला अर्थातच हे मान्य असण्याचे कारण नाही. विज्ञानानुसार एका महास्फोटातून या विश्वाची निर्मिती झाली. अशी असंख्य विश्वे अवकाशाच्या पोकळीत आहेत. ती सतत प्रसरण पावत आहेत. आता ही अवकाशाची पोकळी कोठून आली. पुन्हा ती आहे तर कशात आहे असे अनेक प्रश्न आहेत. विज्ञान सांगते- माहीत नाही. तीच गोष्ट सजीव सृष्टीची. कोणी केले या सृष्टीचे सर्जन? विज्ञान सांगते, धर्माने त्याला आकाशातला बाप वा खुदा वा ब्रह्मा असे काहीही म्हणू दे; सृष्टीचे असे जनकत्व कोणाकडे नसते. कारण मुळात पृथ्वीवर आधी काहीही नव्हते आणि एका रात्रीत येथे सारे आले असे झालेले नाही. जे काही घडले ते जैवरासायनिक प्रक्रियेतून आणि पुढे उत्क्रांतीतून. ती प्रक्रिया आजही सुरू आहे. नव्या जीवजाती जन्माला येतात. काही नामशेष होतात. जुन्या जीवांच्या गुणसूत्रांत वगैरे बदल होऊन नव्या जाती निर्माण होतात. यात ईश्वरनामक संकल्पनेचा संबंधच काय, असा विज्ञानाचा सवाल आहे. या अर्थाने महास्फोटाचा सिद्धान्त असो वा उत्क्रांतिवाद या गोष्टी ईश्वरवादाच्या मूळ प्रमेयांनाच चूड लावतात. केवळ एवढेच करून त्या थांबत नाहीत, तर मानवाचे श्रेष्ठत्वच त्या नाकारतात. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. त्यामुळे त्याचे मत असे की आपण परमेश्वराचे लाडके. त्याने आपणास खेळण्यासाठी म्हणूनच हे जग दिले आहे. येथील प्रत्येक गोष्ट मानवाच्या सुखोपभोगासाठीच निर्माण झाली आहे. जगाच्या निर्मितीतच हा रचनावाद आहे. थोडक्यात सांगायचे तर देवाने माणसाला जे नाक दिले ते चष्मा ठेवण्यासाठी म्हणूनच, अशा शब्दांत फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअर यांनी या रचनावादाची खिल्ली उडविली होती. पुढे उत्क्रांतिवादाने या रचनावादाच्या पायालाच सुरुंग लावला. माणसाचा जन्मच जर माकडापासून झाला असेल, तर त्याच्यासाठी देवाने हे जग बनविले या म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. या सिद्धान्ताने रचनावाद तर ढासळून पडतोच, पण रचनाकारही कोसळतो. त्यामुळेच कोणत्याही धर्मश्रद्धाळूला हे मान्य असणे शक्यच नव्हते. हे सिद्धान्त मांडणारी सारी मंडळी युरोप-अमेरिकेतली पण प्रबोधनकाळानंतरची म्हणून ती बचावली. नाही तर त्यांना या पाखंडाबद्दल सुळावरच चढावे लागले असते. अर्थात या वैज्ञानिकांना जाळणे-मारणे यांसारखे धर्मदंड देण्यात आले नसले, तरी त्यांच्या विज्ञानविचारांना मात्र सातत्याने क्रुसेड वा जिहादचा सामना करावा लागला आहे. या तथाकथित धर्मयुद्धातील एक हत्यार असते छद्मविज्ञान. छद्मविज्ञान म्हणजे काटय़ाने काटा काढण्याचा धार्मिकप्रिय प्रकार. विज्ञानातील काही तत्त्वे, काही विचार घ्यायचे आणि ती धार्मिक बाबींमध्ये अशी काही घोळायची की वाटावे हा अभिनव शास्त्रविचारच. अमेरिकेत लोकप्रिय असलेला इंटेलिजन्ट डिझाइन किंवा काही ख्रिस्ती पंथांना अत्यंत प्रिय असलेला क्रिएशनिझम हा त्यातलाच प्रकार. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश धाकटे हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ. अफगाणिस्तान, इराक या देशांवर हल्ले करावेत असा आदेश त्यांना खुद्द आकाशातल्या बाप्पानेच दिला असल्याचे खुद्द त्यांनीच सांगितले होते, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा ख्रिस्तित्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या नेत्याच्या कारकिर्दीत छद्मविज्ञानाला बहर यावा यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्याच काळात अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांतून इंटेलिजन्ट डिझाइन हे 'विज्ञान' शिकवावे अशी टूम निघाली होती. या 'इंटेलिजन्ट डिझाइन'कारांनुसार नैसर्गिक निवड वगैरे प्रकार मिथ्या आहे. विश्वातील अनेक गोष्टींमध्ये कोणा बुद्धिमान रचनाकाराचा हात दिसतो. हा रचनाकार म्हणजेच परमेश्वर. तर 'क्रिएशनिझम'नुसार हे जग, ही प्राणीसृष्टी हे सारे एका दैवी निर्मितीची अपत्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांनी महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद खरे असल्याचे सांगितल्याने ही छद्मविज्ञाने उताणी पडली आहेत. अर्थात येथे हेही लक्षात घ्यायला हवे की असा क्रांतिकारी विचार मांडणारे फ्रान्सिस हे काही पहिलेच पोप नाहीत. यापूर्वी पोप पायस बारावे यांनी महास्फोट सिद्धान्ताचे स्वागत केले होते. ते १९३९ ते ५८ या काळात पोपपदी होते. त्यानंतर १९९६ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी उत्क्रांतिवाद पुराव्याने शाबीत झाल्याचे सांगून खळबळ उडविली होती. पण हा असा किंचित विज्ञान पक्षपातही चर्चच्या गुणसूत्रांत नाही. त्याची प्रचीती २००५ मध्ये पोपपदी आलेले बेनेडिक्ट सतरावे यांनी आणून दिली. त्यांनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शब्दांची अशी काही जाळी विणून इंटेलिजन्ट डिझाइनचा सिद्धान्त उचलून धरला. परंतु पोप फ्रान्सिस यांनी आज त्याची भरपाई केली आहे. याचा अर्थ त्यांनी देव नाकारला आहे असे नाही. त्यांचे म्हणणे एवढेच की महास्फोट सिद्धान्त आणि उत्क्रांतिवाद देवकल्पनेशी विसंगत नाही. खरे तर चर्चला नव्याने झालेला हा साक्षात्कारही थोडका नाही.
धर्म हा मोठा चलाख परंतु गतिमंद विद्यार्थी असतो. चलाख यासाठी की तत्त्वज्ञानाच्या मायाजालात तो बडय़ा बडय़ा बुद्धीमंतांनाही मंद करून टाकतो आणि गतिमंद विद्यार्थी यासाठी की तो आधुनिक ज्ञान-विज्ञान अंगीकारतो परंतु त्यासाठी त्याला वेळ लागतो. पोप फ्रान्सिस यांनी विज्ञानाचे दोन महत्त्वाचे सिद्धान्त मान्य करून धर्माची आजवरची चलाखी उघड करून दाखविली आहेच, पण त्याच्या गतिमंदत्वाचेही प्रमाण दिले आहे. काहीही असो, त्यांना झालेला हा साक्षात्कार क्रांतिकारी ठरणारा आहे हे नक्की.
-३० ऑक्टोबर २०१४ च्या 'लोकसत्ता' मधील अग्रलेख

Sunday, March 2, 2014

कसे ओळखायचे भ्रामक विज्ञान?

शाळा, महाविद्यालयांत विज्ञान नीटपणे शिकवले जात नाही. वैज्ञानिकांनी कोणते शोध लावले हे सांगितले जाते; पण आतापर्यंत लागलेल्या शोधांची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. शोधांमागची प्रक्रिया म्हणजे विज्ञान. प्रश्‍न कसे उभे राहतात, त्यांची संभाव्य उत्तरे आहे काय असू शकतात, संभाव्य उत्तराचा खरे-खोटेपणा कसा जोखायचा, त्यासाठी प्रयोग, निरीक्षणे कशी करायची, नोंदी कशा ठेवायच्या, त्यातून निष्कर्ष कसे काढायचे, त्यासाठी गणिते मांडावी लागली, तर कशी मांडायची, संख्याशास्त्राचा योग्य उपयोग कसा करायचा, सिद्धान्तांची मांडणी कशी करायची, कोणत्या निकषांवर एखादा सिद्धान्त मान्य अथवा अमान्य होतो, या सगळ्यांमागची तत्त्वे आणि ती अमलात आणण्याच्या पद्धती म्हणजे विज्ञान. ही मूलभूत तत्त्वे आणि पद्धती आत्मसात न करता कितीही माहिती गोळा केली, तरी त्याला विज्ञान म्हणता येत नाही. 

विज्ञानाविषयी विज्ञान शिक्षणातच इतके अज्ञान असल्यानंतर त्याचा गैरफायदा घ्यायला अनेक मंडळी सरसावली तर आश्‍चर्य वाटायला नको. विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या भेटीतच मी "ज्योतिष हे विज्ञान आहे काय?' हा प्रश्‍न विचारतो. गेली अनेक वर्षे पहिल्या वर्षाच्या पहिल्या तासाला हा किंवा यासारखा प्रश्‍न मी विचारत आलो आहे. (मला मिळणाऱ्या उत्तरांमध्ये अर्थातच "हो' आणि "नाही' असे पक्ष असतात. त्यापुढे जाऊन का "हो' किंवा का "नाही' असे विचारले, तर येणाऱ्या उत्तरांमध्ये चकित करणारी विविधता असते.) "अमुक-तमुक' हे विज्ञान आहे काय, असा प्रश्‍न विचारला, तर त्याच्या उत्तरात दोन टप्पे असायला हवेत. पहिल्या टप्प्यात विज्ञान कशाला म्हणतात, विज्ञानाचे निकष कोणते, ते कळले पाहिजेत आणि दुसऱ्या टप्प्यात ते "अमुक-तमुक' या निकषांमध्ये बसते की नाही, हे पाहिले पाहिजे. विज्ञान कशाला म्हणायचे, हे सामान्यांना नीटसे माहीत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण विज्ञानाची पदवी घेताना तरी ते समजलेले असायला हवे; पण फार थोड्या पदवीधरांना ते समजलेले असते. 

सुदैवाने अथवा दुर्दैवाने एखादी गोष्ट विज्ञानाधारित आहे, असे म्हटले, की पटकन समाजमान्य होते. पण विज्ञान म्हणजे नक्की काय, याचे चित्र समाजाच्या मनात पक्के नाही. त्यामुळे विज्ञानाचा मुखवटा पांघरून आपला माल खपवायला बसलेल्यांची या जाहिरातींच्या युगात मुळीच कमतरता नाही. यातून होणारी सामान्यांची फसवणूक कशी टाळायची, हा मुख्य प्रश्‍न आहे. मला तरी याचे एकच उत्तर दिसते, ते म्हणजे विज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि पद्धती समजून घेणे. 

सुरवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचेच उदाहरण घेऊ. त्यातून विज्ञानाची तत्त्वे थोडीफार तरी स्पष्ट करता येतील. ज्योतिषशास्त्र ग्रहमानावरून भाकीत वर्तवते. हवामानशास्त्र हवामानाविषयी भाकीत वर्तवते. दोघांचीही भाकिते कधी बरोबर येतात, कधी चुकतात. मग हवामानशास्त्र विज्ञान असेल, तर ग्रहज्योतिष हे विज्ञान का नाही? विज्ञानाचा पहिला निकष हा, की केलेली भाकिते वस्तुनिष्ठ असायला हवीत. पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल हे भाकीत वस्तुनिष्ठ आहे. कारण अनेक वर्षांच्या सरासरीची पद्धतशीर नोंद आहे आणि पाऊस मोजण्याच्या प्रमाणित पद्धतीही आहेत."या महिन्याच्या 6, 12 व 13 तारखा शुभ आहेत. चांगल्या घटना घडतील,' हे भाकीत वस्तुनिष्ठ नाही. कारण शुभ म्हणजे नक्की काय, याचे प्रमाणित मोजमाप नाही. एकाला जे शुभ वाटते, ते दुसऱ्याला अशुभ वाटत असेल, तर शुभ तारीख हे वस्तुनिष्ठ भाकीत नाही. ज्योतिष्याने वस्तुनिष्ठ आणि मोजता येणारी भाकिते केली, तर विज्ञानाच्या परीक्षेचा पहिला पेपर पास झाला, असे म्हणता येईल. दुसरा पेपर पास होण्यासाठी या भाकितांचे खरेपण पाहावे लागेल. यासाठी शंभर टक्के भाकिते खरी होण्याची आवश्‍यकता नाही. पावसाचे अंदाज अथवा वैद्यकशास्त्राचे रोगाविषयीचे अंदाज कुठे शंभर टक्के बरोबर असतात? एखादा सिद्धान्त, तत्त्व किंवा पद्धत वापरून केलेला अंदाज, ते न वापरता केलेल्या अंदाजापेक्षा पुरेशी अधिक अचूकता देत असेल, तर त्या तत्त्वाला किंवा पद्धतीला पुष्टी मिळाली, असे म्हणता येईल. "पुरेशी अधिक' म्हणजे किती अधिक, हे ठरवण्याच्या प्रमाणित संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. सामान्य ज्ञान वापरून केलेल्या अंदाजापेक्षा ग्रहांची स्थिती पाहून केलेली भाकिते वस्तुनिष्ठ मोजमापांवरून जास्त प्रमाणात खरी ठरली, तर दुसरा पेपर पास झाला, असे म्हणता येईल. हवामानाचे अंदाज अनेकदा चुकत असले, तरी त्यांनी ही संख्याशास्त्रीय चाचणी पास केलेली असते. दोन, पेपर म्हणजे पूर्ण पदवी परीक्षा नाही. संख्याशास्त्रीयदृष्ट्या कोंबडा आरवणे आणि सूर्य उगवणे यातला सहसंबंध खूप घट्ट आहे. कोंबडा आरवण्यावरून सूर्योदयाचे भाकीत करता येते. (पण म्हणून कोंबडा आरवण्याने सूर्य उगवला असे म्हणता येत नाही.)ज्यांच्यामधला सहसंबंध दाखवता येतो, त्यांच्यामधला कार्यकारणभाव दाखवणे, ही पुढची खूप महत्त्वाची पायरी. कार्यकारणभाव शोधण्याचा काही एक ठोक सरधोपट फॉर्म्युला नाही. इथे वैज्ञानिकाची विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता पणाला लागते. यातून एक किंवा अनेक प्रमेये (हायपॉथिसिस) तयार होतात. त्यापुढची परीक्षा म्हणजे या प्रमेयाची पडताळणी करणे. ती करण्याचा मार्ग परत मागल्या वळणावर जातो. प्रत्येक प्रमेयाने चाचणी घेता येईल, असे काही नवीन भाकीत केले पाहिजे. चाचणीवरून हे प्रमेय तगणार, का फेकून द्यावे लागणार, ते ठरते. कधी एखादे प्रमेय असे असते, की त्याची चाचणी घेण्याचा काही मार्ग नसतो. ज्याची चाचणी घेता येत नाही असे प्रमेय विज्ञानाला मान्य नाही. अशा चाचण्यांमधून उत्तीर्ण झालेला कार्यकारण संबंध हा विज्ञानाचा गाभा आहे. 

ज्या प्रश्‍नांनी आपण सुरवात केली, त्याचे उत्तर मी दिले नाही; देणारही नाही; पण याचे उत्तर कसे शोधायचे, याचा मार्ग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मार्ग समजला, तर फेंग-शुई, वास्तुशास्त्र ही विज्ञाने आहेत काय, यांचीही उत्तरे ज्याला त्याला मिळतील. यामागचे तत्त्व सोपे आहे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे विज्ञान. ही पद्धत वापरली तर संगीतकलासुद्धा विज्ञान आहे आणि पाठ्यपुस्तके पाठ करून पदवी मिळवली, तर भौतिक विज्ञानसुद्धा विज्ञान नाही. शाळा-महाविद्यालयांमधून खऱ्या अर्थाने विज्ञान शिकवायला आपण कधी सुरवात करणार? 
- डॉ. मिलिंद वाटवे
(लेखक विज्ञानाचे अध्यापक व संशोधक आहेत.)