Showing posts with label वैज्ञानिक दृष्टिकोन. Show all posts
Showing posts with label वैज्ञानिक दृष्टिकोन. Show all posts

Saturday, November 22, 2014

वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही !!


जगात असा कुठलाही विषय नाही की ज्यात विज्ञान नाही. ह्या चरचरात विज्ञानच भरून राहीले आहे.निसर्गाचा शोध घेणे म्हणजेच विज्ञान. त्याला चारभिंतीच्या प्रयोगशाळेत बंदीस्त करणे ही आपली संकुचित विचारसरणी झाली. आईनस्टाइनने त्याचे शोध निसर्गाच्या प्रयोगशाळेत गणिती विचार करून लावले. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टीकोन हा माणसाला तत्वज्ञ बनवतो. आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करतो. त्यामध्ये धर्म,भावना,शब्द्प्रामण्य यापेक्षा सत्याची कसोटी महत्वाची ठरते. प्रत्येक गोष्टीचे documentation केल्यावरच त्याची सत्यासत्यता पडताळता येते. तेथे शब्द्प्रामण्यपेक्षा चिकीत्सेला महत्त्व असते. या पध्दतीनेच आजवर माणसाची प्रगती झाली आहे.
गोमूत्र प्यायाल्याने आणि शेण सारवल्याने वा खाल्याने तब्बेत सुधारते हे कुठल्याही authentic कोशात लिहीलेले नाही आणि सिध्दही झालेले नाही. ते फ़क्त लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टीमुळे खरे वाटायला लागते. म्हणून या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी ठरतात.मग ती फ़क्त वैयक्तीक अनुभूती ठरते.सार्वत्रिक नव्हे.
योग, तुळस,वृक्ष, हळदीसारखी काही उदाहरणे वैज्ञानिकतेच्या निकषावर काही बाबतीत खरी असली तरी हनुमान चालीसामध्ये जरी NASA ची साक्ष (खरी असेल तर तो कागद प्रसिध्द करायला कोणाची हरकत आहे?) काढून सूर्य व पृथ्वीचे अंतर दिले आहे तरी कुठल्याही वैज्ञानिकाने त्यावर समर्थन दिलेले नाही. तसेच जानवे घातल्याने रोगांपासून बचाव होतो. (मग जानवेधारी आजारी का पडतात?) चरणस्पर्श केल्याने पाठीचा कणा निरोगी रहातो. (मग दहादा वाकून नमस्कार करणार्यांना स्पाँडीलायटीस का होतो?) दारावर तोरण लावल्याने वातावरण शुध्द होते. (उलट तोरणासाठी पाने-फुले तोडून आपण पर्यावरणाची हानी करत असतो.) दिवा लावल्याने पॉझिटीव्ह ऊर्जा वाढते. (मुळात ती आपल्या वृत्तीत असावी लागते.) कान टोचल्याने अस्थमा बरा होतो.( मग अनेक कान टोचलेल्या बाया अस्थामाग्रस्त का आहेत?) कुंकूम लावल्याने वशीकरणापासून बचाव होतो. (Hypnotist अनेक कुंकू लावलेल्या - टिकली नव्हे - स्त्रीयांना hypnotized कसे करू शकतात?) तिलक लावल्याने कपाळावरील अतिरिक्त पाणी शोषले जाते, शंख ध्वनी केल्याने डासांचा नाश होऊन मलेरीयापासून बचाव होतो. (मग शंखध्वनी करणारेच मलेरीयाग्रस्त का होतात? दुसरे असे की,भारतात आज मोठ्या प्रमाणात मलेरीयाचे रुग्ण वढताहेत तेव्हा करा की शंख ध्वनी! डॉक्टरांची गरज काय?) चिताग्नी दिल्याने प्रेताची योग्य विल्हेवाट लागून पर्यावरणाची हानी टळली जाते.(लाकडे जाळून प्रदूषण झाले तरी) उठाबशा वा कान खेचण्याच्या शिक्षेमुळे मेंदू तल्लख होतो आणि तोतरेपणा जातो यासारख्या गोष्टीत हास्यास्पद व चुकीचे विज्ञान सांगून ते वैज्ञानिक असल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. यातील एकही मुद्दा कुठेही सिध्द झालेला नाही. हे सगळे आपल्या पूर्वजांना माहीत होते या अभिनिवेशाने लिहीले जाते. वैज्ञानिक पध्दतीत documentation ला महत्त्व असते,पुराण कथांना नाही.
कोणत्याही धर्मवाद्यांचे मुद्दे जर विज्ञानेतर असतील तर मग त्यातील प्रत्येक मुद्दयाचा वैज्ञानिक संबंध दाखवण्याचा अट्टाहास का? त्यांनी ही वैयक्तीक अनुभूती आहे असे स्पष्ट करावे, म्हणजे वादच मिटतो. मग त्यांनी Believe-Hinduism is based on science असं म्हणायला नको. खरी मखलाशी अशी असते की,ते विज्ञानाला अनुसरून आहे असे म्हटले की, सुशिक्षित लोक सहज स्वीकारातात, हे त्यांना पक्के ठाऊक असते.ह्याला बनवेगिरी म्हणतात.दुर्दैवाने आजचे सुशिक्षित (की फ़क्त साक्षर) धार्मिक अस्मितेचे आणि उन्मादाचे बळी ठरताहेत.
म्हणूनच मी म्हणतो, आजच्या सुशिक्षित माणसाने वैज्ञानिक सृष्टी घेतली पण वैज्ञानिक दृष्टी मात्र घेतली नाही. त्यातूनच हिन्दू धर्माला वैज्ञानिक लेबल लावायचा फोल प्रयत्न केला जातो.
विचार- जगदीश काबरे सर

Tuesday, May 21, 2013

श्रद्धा तपासण्यात गैर काय?


विज्ञान जर मन मानत नाही, तर मानसोपचार तज्ञ कां तयार झाले? अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांमध्येच ताळमेळ नाही. त्यांनी समाजाची दिशाभूल केल्यामुळे आज समाज श्रद्धेपासून दूर गेला आहे. त्यामुळे श्रद्धा म्हणजे काय, हे जेव्हा आपण लोकाना समजावून सांगू, तेव्हाच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेचे निर्मूलन होईल असे नरेंद्र महाराज यवतमाळ येथील प्रवचन सोहळयात म्हणाले.
तथाकथीत अध्यात्मवादी समाजाची दिशाभूल कशी करतात याचा वरील प्रवचन म्हणजे एक नमुना ठरेल. अध्यात्मवाद्याना खरे अध्यात्म जसे समजलेले नाही तसेच त्यांचे विज्ञानाबद्दलचे अज्ञान म्हणजे निव्वळ बडबड या पलीकडे त्याला महत्व नाही.
विज्ञान अनुभवावर आधारीत आहे तसेच ते अनुमानालाही महत्व देते. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. 'इलेक्ट्रॉन' हा दिसत नाही पण त्याचे अस्तित्व वैज्ञानिक मानतात. ते कसे? इलेक्ट्रॉन्सच्या गतीचे परिणाम आपल्याला दृश्य स्वरुपात पहाता येतात. टेलिव्हिजनच्या पडद्यावर इलेक्ट्रान्सचा नाच चालू असतो. त्याचा परिणाम म्हणून पदडद्यावर चित्र उमटते. अणुच्या अंतरंगातील इलेक्ट्रान, प्रोटान्स वा न्यूट्रान्स दिसत नाहीत. पण त्यांचे अस्तित्व अप्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होते. म्हणून तर न्यूट्रान्स कणांच्या माऱ्यामुळे किरणोत्सारी द्रव्याचे जड अणू फुटतात व प्रचंड उर्जा प्राप्त होते.

विज्ञानात अदृश्याचे अस्तित्व गृहीत धरतात. त्यांच्या वर्तणुकीचे काही सिद्धांत मांडले जातात. त्यातून अनुमान काढले जाते. अखेरीस तपासण्याजोगा परिणाम मिळविला जातो. विज्ञानाची गृहिते ह्या श्रद्धा नव्हेत. श्रद्धा तपासायची नसते असे श्रद्धावादी म्हणतात. विज्ञानाचा आग्रह असतो श्रद्धा तपासण्याचा. गृहितावरुन काढलेले अनुमान वा निष्कर्ष चुकीचा ठरला तर गृहीत नाकारले जाते. न्यूटनची काही गृहिते चुकली. ती आज आपण मानत नाही. न्यूटन कितीही थोर असला तरी!
श्रद्धा तपासून ती सिद्ध झाली तर त्याला आपण विश्वास म्हणू या. विज्ञान विश्वासावर आधारीत आहे. बटण दाबले की दिवा लागतो हा विश्वास म्हणजे विज्ञान. श्रद्धा (म्हणजेच गृहिते) तपासून विज्ञानाने मानवी दु:खाचा परिहार करण्यात अमोल कामगिरी बजावली आहे. एके काळी देवीच्या कोपामुळे देवीचा आजार(अंगावर फोड येणे) होतो ही श्रद्धा होती. देवी, कांजिण्या, गोवर, मलेरिया, कॉलरा इ. संसर्गजन्य आजार विषाणू व जंतुंमुळे होतात हे विज्ञानाने तपासले देवीचा कोप ही श्रद्धा विज्ञानाने झुगारुन दिली. त्याचा परिणाम म्हणून देवीचा रोगी कळवा व 1 हजार रु. मिळवा ही सरकारी घोषणा आली.
एकेकाळी पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो ही श्रद्धा होती. ही श्रद्धा हा भ्रम होता हे कोपर्निकस-गॅलिलिओच्या संशोधनातून सिद्ध झाले. अशा विविध भ्रमांचे निराकरण विज्ञान करीत आले आहे. आजही करीत आहे. पहावे, तपासावे, प्रयोग करावेत, कल्पना लढवाव्यात व पुन्हा तपासावे या पद्धतीने निसर्गाची असंख्य गुपिते विज्ञानाने उलगडली. ह्या कार्यात अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तरी त्यांनी आपले जीवित कार्य चालूच ठेवले. हे वैज्ञानिक खरे आध्यात्मिक. अध्यात्माचा अगदी साधा आणि सोपा आशय आहे. अध्यात्माचा एक मात्र निकष म्हणजे ज्यामुळे प्रेम, परोपकार करुणा, बंधुता, सहनशीलता अशा मूल्यांची जोपासना होते ते खरे अध्यात्म. विविध आजारावर विज्ञानाने केलेली मात, भौतिक गरजा भागविण्यासाठी निर्माण केलेल्या विविध वस्तू, विश्वाच्या रचनेचे उलगडत ठेवलेले रहस्य यातून सौंदर्य, कला व समृद्धी यांचा लाभ आपणास होत आहे. तथाकथीत अध्यात्मवाद्यांचा आत्मा ज्या शरीरात वास करतो त्या शरीराच्या अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण या मूलभूत गरजा भागविणे हे एक प्रकारचे अध्यात्माचेच कार्य होय. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा अध्यात्मवाद्यांची प्रवचने भागवतील काय? ते वापरत असलेल्या कार, संगणक, ध्वनीयंत्रणा, दूरदर्शनची चॅनेल्स कशी निर्माण झाली? अध्यात्मवाद्यांनी विज्ञानाचे आभार मानले पाहिजेत. तसे न करणे हा कृतघ्नपणा होईल.
विज्ञान मन मानत नाही हे अज्ञान आहे. मन हे वस्तुरुप नाही. ती अमूर्त संकल्पना आहे. हे विज्ञानाचे गृहीत आहे. मनोविज्ञानाने फ्राईडपासून ते आजतागाईत प्रचंड संशोधन केले आहे. त्याचा सुपरिणाम म्हणजे मानसिक आजारावर मनोविज्ञानाने मिळवलेले नियंत्रण. सिझोफ्रेनियासारख्या गंभीर मानसिक आजारावर मनोविज्ञान नियंत्रण ठेवू शकते. मनोविज्ञानाचा विकास होण्यापूर्वी समाजात सिझोफ्रेनियाच्या रोग्याना भूताने झपाटले असे समजून अनन्वित अत्याचार होत असत. आजही ते चालू आहेत. परवा घडलेली घटना पहा-
विरारजवळ अनिता नावाच्या मुलीने इतरांच्या मदतीने ज्योत्स्ना तांडेल या 18 वर्षांच्या तरुणीला होमात ढकलले. तिचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दोन कारणे पुढे येत आहेत. मूल प्राप्त होण्यासाठी ज्योत्स्नाचा नरबळी द्यावयाचा होता. व ज्योत्स्नाचा कांजिण्याचा आजार ज्या देवीच्या कोपामुळे झालाय, त्या देवीची शांती करायची होती.
अनिता सांगते, तिच्या अंगात देवी संचारली आहे. एक नाही तर अनेक देवीचा संचार तिच्यात झालाय. मनोविज्ञान सांगते हा अनिताचा मनाचा आजार. तो बराही होऊ शकतो. पण देवीचा आत्मा अनितात आला म्हणजे काय? शरीराविना आत्मा किंवा मनाचा अनेक अंगानी तपास केला तर पुरावा मिळत नाही. म्हणून मुक्त संचार करणारे मन वा आत्मा नाही हा विज्ञानाचा निष्कर्ष आहे. मन हा मेंदूतील रासायनिक विद्युत क्रियेचा अविष्कार आहे. मेंदूविना स्वतंत्र मन व आत्मा नाही असा विज्ञानाचा निष्कर्ष आहे. भूत, चेटूक, पितर, भानामती, करणी यांच्या मुळाशी असलेला आत्मा हा केवळ कल्पना विलास आहे.
तात्पर्य वैज्ञानिक दृष्टिकोन हा ज्ञानाचा पाया असावा. अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचविण्याचे साधन आहे. आम्हाला ताळमेळ आहे. अध्यात्मवाद्यांनी ताळमेळ ठेवावा. श्रद्धेचा निकष ज्ञान असावे अज्ञान नव्हे. श्रद्धा तपासाव्यात, चुकीच्या श्रद्धांचा त्याग करावा असे सांगण्यात गैर काय?
-प्रा. प. रा. आर्डे

Friday, May 17, 2013

यासाठी पुरावा काय?


प्रिय मीना, काल तुझी दहावीची परीक्षा संपली. त्यामुळे आता तू एका वेगळया मूडमध्ये असशील म्हणूनच काही महत्त्वाचे सांगण्यासाठी तुला पत्र लिहित आहे. मला हेही माहित आहे की, आजकाल तुम्हा मुलींना लांबलचक पत्र वाचण्याची सवय नाही. एस.एम.एस.वाचायची सवय जडलेली असल्यामुळे लेखी पत्र वाचण्याचा नक्कीच कंटाळा येत असावा. परंतु या अल्लड वयातच काही गोष्टी लक्षात राहतील आता तू तितकी लहानही नाहीस व तितकी मोठीही नाहीस. तुझ्या अगोदरच्यांची ज्या प्रकारे फसगत झाली तशी तुझी होऊ नये म्हणून मी पत्र लिहित आहे.
 आपल्याला माहित असलेल्या गोष्टी कशा काय माहित झाल्या याबद्दल तुला कधी आश्चर्य वाटले का? उदाहरणार्थ, आकाशातील लुकलुकणारे तारे रांगोळीच्या ठिपक्याएवढे दिसत असले तरी त्यांचा आकार फार फार मोठा असतो. त्यांच्यातून निघालेल्या प्रकाश किरणाला पृथ्वीवर पोचण्यासाठी लाखो करोडो वर्ष लागतात हे तुला माहित आहे का? त्या आपल्यापासून फार फार दूर आहेत हे आपल्याला कसे कळले? सूर्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह फिरत असतात; व पृथ्वीसुध्दा सूर्याभोवती फिरते हे कसे कळले? आपली पृथ्वी अगदीच लहान व चेंडूसारख्या गोल आकाराची आहे हे कसे कळले?
 या व अशा अनेक प्रश्नांना एकच उत्तर आहे तो म्हणजे 'पुरावा.' पुरावा म्हणजे प्रत्यक्ष पाहून(वा ऐकून, वास घेऊन, किंवा स्पर्श करून.....) खरे आहे की नाही हे ठरवणे. कल्पना चावलासारखे अंतराळयात्री पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर्स दूर जाऊन पृथ्वीकडे पाहून तो चेंडूच्या आकाराचा आहे, हे प्रत्यक्षपणे स्वत:च्या डोळयांनी पाहून ठरवतात. त्याचे छायाचित्र, व्हिडीओ चित्रण करून पाठवतात. अनेक वेळा आपल्या डोळयांना काही बाह्य मदतीची गरज भासते. आकाशातील तारा चमकणारा ठिपका वाटतो; परंतु टेलिस्कोपमधून तो एक सुंदर असा चेंडूसारखा दिसणारा शुक्र ग्रह असतो. म्हणजेच आपण त्याचे निरिक्षण करतो जे आपण पाहतो(ऐकतो, वास घेतो, स्पर्श करतो.....) त्यांना सामान्यपणे निरीक्षण म्हणतात.

 याचा अर्थ पुरावा म्हणजेच निरीक्षण नव्हे परंतु प्रत्येक ग्राह्य पुराव्यामागे निरीक्षण असतेच. एखाद्या व्यक्तीचा अज्ञात स्थळी खून झालेला असल्यास(खून झालेल्या व खून करणाऱ्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त) कुणी खून केला हे कळणार नाही. परंतु खुनाचा तपास करणारे पोलीस काही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावे गोळा करून खुनी व्यक्तीपर्यंत पोचत असतात. खून करण्यासाठी वापरलेल्या हत्यारावरील ठसे व आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत असल्यास तो पुरावा ग्राह्य धरला जातो. याचा अर्थ त्या व्यक्तिनेच तो खून केला असा होत नाही. परंतु खुनी व्यक्तीच्या विरुध्द आणखी काही भक्कम पुरावे गोळा करण्यास यातून मदत मिळते. अनेक वेळा गुन्ह्याचा तपास करणाऱ्यांना निरिक्षणातून कोडे सुटल्यासारखे वाटू लागते. सर्व पुराव्यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेऊन अमूक व्यक्तीनेच अमूक कारणासाठी खून केला आहे या निष्कर्षापर्यंत तपास करणारे पोचतात.
 या अफाट विश्वातील व आपण राहत असलेल्या जगातील सत्य गोष्टी काय आहेत याचा शोध घेणारे तज्ञ म्हणजेच वैज्ञानिक. एका अर्थाने गुन्ह्यांचा तपास करणाऱ्यासारखेच वैज्ञानिकही काम करत असतात. काही गृहितकांच्या आधारे सत्याच्या जवळपास जाण्याच्या प्रयत्नात ते असतात. अमूक गोष्ट खरे असल्यास अमूक रितीने ते घडायला हवे असे स्वत:शीच संवाद ते करू लागतात. यालाच आपण भाकित म्हणतो. पृथ्वी खरोखरच गोल असल्यास एकाच दिशेने जाणारी व्यक्ती, ज्या जागेपासून सुरवात करते त्याच जागेला पोचायला हवी. जेव्हा डॉक्टर तुम्हाला गोवर झाला आहे असे म्हणत असताना फक्त तुमच्या तोंडाकडे पाहून किंवा गोवर बघून तसे बिनदिक्कत म्हणत नसतात. पहिल्यांदा तुमच्याकडे बघून किंवा तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवरून गोवर झाल्याचा अंदाज मांडतात. मग मनातल्या मनात स्वत:शीच बोलत रोग लक्षणाची उजळणी करू लागतात...... डोळयात फोड....... डोळयाचा लालसर रंग..... कपाळाला हात लावून ताप आल्याची खात्री...... कानांची तपासणी..... श्वास घ्यायला लावणे..... इत्यादी तपासातून तुम्हाला गोवर झाले आहे असे रोगनिदान करतात. काही वेळा रक्त तपासणी, एक्स रे काढायला सांगतात. पुन:पुन्हा डोळे, कान, हात यांचे नीटपणे निरीक्षण करतात. व आपले अंदाज खरे ठरल्यानंतरच औषध-पाणी, इंजेक्शन इत्यादी उपचार करतात. वैज्ञानिकांची पध्दतीसुध्दा सामान्यपणे डॉक्टरांच्या पध्दतीसारखीच असते. 
 प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करू लागल्यास बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याची फार चुकीची कारणं आहेत हे लक्षात येईल व त्यासाठी कुठलाही पुरावा नाही हेही लक्षात येईल. सामान्यपणे रुढी, शब्द वा ग्रंथ प्रामाण्य, साक्षात्कार-अनुभूती अशी कारणे या गोष्टींच्या मागे लपलेल्या असतात. 
 मी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या वर्गात चर्चेसाठी म्हणून गेलो होतो. तेथील संयोजकाने विद्यार्थ्यांना आपण कशा-कशावर विश्वास ठेवता असे प्रश्न विचारले. जी काही उत्तरं ते विद्यार्थी देत होत त्यालाच रुढी असे म्हणण्यास हरकत नसावी. त्यांच्या विधानांना काही आधार नव्हता. किंवा त्यांच्या विश्वासामागे पुरावे नव्हते. वाडवडिलांकडून ऐकत आलेल्या गोष्टीवर डोळे झाकून ते सर्वजण विश्वास ठेवत होते. त्यातील काही जण आम्ही हिंदू आहोत म्हणून या या गोष्टींवर विश्वास ठेवतो असे सांगत होते. त्यातील मुस्लीम विद्यार्थी या गोष्टी पाळतो, नमाज पढतो असे सांगत होते. मुळात ते सर्व जण सर्वस्वी वेगवेगळया गोष्टींवर विश्वास ठेवत होते. याचा अर्थ ते सर्व जण बरोबर होते असा होत नाही. त्यांच्या विश्वास ठेवलेल्या गोष्टींमध्ये विसंगती होती. एकाचा देव अमूर्त स्वरुपात होता, दुसऱ्याचा देव माणसासारखा होता, तिसऱ्याच्या देवीला दोन तीन तोंड, आठ-दहा हात, हत्तीएवढी शक्ती असे होते. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, चांगले वाईट यांची सरमिसळ होती. एकाचा देव आकाशातून उतरलेला होता, दुसऱ्याच्या देवाची आई कुमारिका होती. परंतु संयोजकांना या विसंगतीचे आश्चर्यसुध्दा वाटले नाही. त्यांनी त्यावर कुठलेही मत प्रदर्शन केले नाही. मला मात्र त्यांच्या श्रध्दाविषयीचे मूळ कुठे आहे याचा शोध घ्यावासा वाटला. ते सर्व रुढी परंपरेतून आलेले होते. 
 रुढी म्हणजे आजोबा-पणजोबापासून वडिलांना व वडिलांपासून मुला/मुलींना मिळालेल्या श्रध्देचे प्रकार. पुस्तक-ग्रंथ यामधून शेकडो वर्षांपासून एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे पोचवलेले प्रकार, पारंपारिक श्रध्दांचा उगम अनेक वेळा अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटनेमधून होत असतात. काही रुढी कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेल्या असतात. उदाहरणार्थ पुराणकथामधील प्रसंग व घटना एखाद्याच्या कल्पनाविलास असू शकतो; परंतु वर्षानुवर्षे त्याच त्याच गोष्टी सांगत/ऐकत असल्यामुळे त्या खऱ्या वाटू लागतात. व त्या फार विशेष आहेत असे वाटतात. वर्षानुवर्षे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत असल्यामुळे लोक अशा गोष्टींवर डोळे झाकून चटकन विश्वास ठेवतात. यांनाच आपण रुढी म्हणत असतो. कितीही जुनी गोष्ट असली तरी ती खरी का खोटी याचा अंदाज रुढींच्या बाबतीत तरी कधीही लक्षात येत नाही. एखादी खोटी गोष्ट सातत्याने वर्षानुवर्षे सांगत सुटल्यास काही काळानंतर ती गोष्टसुध्दा खरीच वाटू लागते !
 याच रुढीच्या बरोबर आणखी काही गोष्टींचा अशा प्रकारच्या श्रध्दांशी निगडित असते. त्यापैकी मी फक्त अधिकार व अनुभूती यांचा उल्लेख करणार आहे. कुणीतरी अतिमहत्त्वाची व्यक्ती एखादी गोष्ट ठासून सांगत असल्यास त्याविषयी मागचा पुढचा विचार न करता विश्वास ठेवणे हे एक कारण अधिकाराच्या संदर्भात असू शकते. आपल्या धर्माचा किंवा जातीचा एखादा बाबा-बुवा, ताई-माई अमूक अमूक करण्यास सांगितल्यावर ते करत राहणे हीसुध्दा एक प्रकारे अंधश्रध्दाच असते. ख्रिश्चन धार्मिक पोप जे सांगतो त्याविरुध्द एक चकार शब्द काढत नाहीत. मुल्ला-मौलवीने फतवा काढल्यास काही मुस्लीम धर्मांध तरुण स्वत:च जीव द्यायला पण तयार होतात. पोपने जीससची आई मेरी स्वर्गातून अवतरली असे सांगितल्यास आपण डोळे झाकून विश्वास ठेवायलाच हवा, अशी अपेक्षा ख्रिश्चन धार्मिकाकडून केली जाते. इतर धर्मातही अशाच काही गोष्टी आहेत की त्यावर श्रध्दा ठेवण्याची सक्ती केली जाते. 
 विज्ञानातही काही वेळा आपल्याला प्रत्यक्ष पुरावे सहजपणे सापडत नसल्यामुळे वैज्ञानिकांच्या शब्दावर विश्वास ठेवत असतो. परंतु वैज्ञानिक ग्रंथांचा अधिकार हा धार्मिकांच्या अधिकाराहून सर्वस्वी वेगळा आहे. वैज्ञानिक पुस्तकामधील नोंदी वा निष्कर्ष प्रत्यक्ष प्रयोग करून, पुराव्यांच्या आधारे, पुन:पुन्हा तपासणी करून काढलेले असतात. त्या पुन:पुन्हा तपासता येतात. परंतु बाबा-बुवा, धर्मगुरू यांच्या विधानांवर आपण शंका उपस्थित न करण्याची सक्ती असते. ते जे काही सांगतील त्या सर्व खरे मानायचे. संशय घेत असल्यास त्यांच्या व त्यांच्या भक्तांच्या भावनेला व श्रध्दा विषयांना धक्का पोचत असल्यामुळे आपण काहीही बोलायचेच नाही अशी अपेक्षा ते करतात. परंतु अशा प्रकारच्या बिनबुडाच्या विधानांवर खरोखरच विश्वास ठेवायला हवाच का? 
 समज, मी तुला 'तुझा आवडता कुत्रा मेला' असे सांगितल्यास तुला खरोखरच वाईट वाटेल. कदाचित तू ''तुम्हाला खात्री आहे का? तुम्हाला कसे कळले? नेमके काय झाले?'' असे प्रश्न विचारशील. जर मी ''मला नेमके काहीही माहित नाही. माझ्याजवळ पुरावा नाही. परंतु तो मेला आहे असे सकाळपासून वाटत आहे.'' असे सांगू लागल्यास तू माझ्यावर चिडशील. अशा प्रकारे 'वाटण्याला' काही अर्थ नाही म्हणून माझ्या विधानांवर विश्वास न ठेवता तूच कुत्रा खरोखरच मेला आहे का याचा खात्रीशीर पुराव्याचा शोध घेशील. खरे पाहता तुला पुरावा हवा आहे नुसत्या भावना नको  आहेत.
 आपल्याला अनेक घटना घडाव्यात किंवा घडू नये असे अनेक वेळा वाटत असते. कुणीही आजारी पडू नये, चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये आपल्या मुला-मुलींना विनासायास प्रवेश मिळावा असे वाटत असते. त्यातल्या काही आपल्या मनाप्रमाणे घडतात काही घडत नाहीत. घडल्यास देवाची कृपा, न घडल्यास आपले नशीब म्हणून आपण आपले समाधान करून घेत असतो. गंमत म्हणजे वेगवेगळया लोकांच्या इच्छा वेगवेगळया प्रकारच्या असतात. त्या अगदी एकमेकांच्या विरुध्द असतात. छेद देणारे असतात. मग मात्र आपल्या कुठल्या भावना बरोबर होत्या, कुठल्या चुकीच्या होत्या हे कसे ठरवता येईल? कुत्रा मेला आहे हे फक्त मनात वाटण्याऐवजी त्याचे हृदय थांबले आहे का? याची खात्री करून घेतल्यास समजून चुकेल. किंवा कुणीतरी पुराव्यानिशी सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवता येईल.
 काही जण आपल्याला आपल्या भावनांच्यावर विश्वास ठेवण्याचा आग्रह करत असतात. 'भावनांच्यावर विश्वास नसल्यास तुमचे तुमच्या मुलावर प्रेम आहे की नाही हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.' असा त्यांचा दावा असतो. परंतु हा वाद निरर्थक आहे. माझे मुलावरील प्रेम फक्त भावनेतूनच व्यक्त होत नसते. ते माझ्या अनेक छोटया मोठया गोष्टींवरूनही ठरवता येते. त्याच्यासाठीच म्हणून माझा मी किती वेळ देतो, त्याचा अभ्यास मी कशाप्रकारे घेतो, त्याची कशी मदत करतो, इत्यादी अनेक छोटया मोठया घटनेतून, प्रसंगातून आपण आपल्या प्रेमाची ग्वाही देऊ शकतो. प्रेम समजून घेण्यासाठी साक्षात्कार वा अनुभूतीची गरज नाही. भावनेपेक्षा इतर अनेक गोष्टींतून समजू शकते. आपल्या डोळयातून व्यक्त होणारी संज्ञा, आवाजातील चढ-उतार, देहबोली, कळत नकळत केलेली मदत, हे आपल्या प्रेमाचे पुरावेच असतात. 
 मनातल्या आत जे वाटत असते त्यालासुध्दा विज्ञानात स्थान आहे. विज्ञान तेवढे कोरडे नाही. परंतु 'ते वाटते' पुराव्यानिशी सिध्द करण्यास उद्युक्त करणारे हवे. काही प्रतिभाशाली वैज्ञानिकांना मनातल्या मनात काही तरी वेगळे, अचूक गोष्टींचा ध्यास लागलेला असतो. परंतु तेवढया वाटण्यावरती ते थांबत नाहीत व वाटणे पुरेसे ठरत नाही. आपल्याला सुचलेल्या(भन्नाट !) कल्पनाची खात्री करून घेतल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. त्यासाठी वेळ खर्ची घालतात. ग्रंथालय उलथी पालथी करतात. प्रयोगांची जुळणी करतात. व मनातल्या या कल्पनेची शहानिशा करून घेतात. त्यामुळे फक्त भावनेवर भरवसा न ठेवता निरिक्षण करून खातरजमा करून घेण्यातच शहाणपण आहे. वैज्ञानिक आपला आतला आवाज ओळखून सिध्दांताची मांडणी करत असतात. अनेक वेळा त्यांचा कयास चुकतही असतो. परंतु प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण यामधून या कल्पना सिध्दांत म्हणून जगापुढे येतात. त्या केवळ भावनोद्रेक नसतात.
 याचप्रकारे रुढी-परंपरांच्याबाबतीतसुध्दा आपण वेगळया प्रकारे विचार करू शकतो. काही वेळा काही रुढी-पध्दती आपल्याला उपकारकही ठरत असतात. मूलत: जगातील सर्व सजीव आपापल्या भोवतालचे वातावरण व परिस्थितीशी जुळवून घेत जगत असतात. सिंह, वाघ जंगलात राहतात. माकडं झाडावरील पाला, फळे खाऊन  जगतात. माशांना पाण्याशिवाय जगता येत नाही. त्याप्रमाणे माणूस-माणूससुध्दा एक सजीव प्राणी-माणसातच वावरणे पसंत करतो. इतर प्राण्यांसारखे आजच्या काळातली माणसं आहारासाठीच म्हणून शिकारीला जात नाही. आपण आपले आहार पदार्थ पिकवतो, साठवतो, इतर माणसांकडून विकत घेतो. ती माणसं इतर माणसाकडून विकत घेतात, विकतात. ज्याप्रकारे पाण्यावाचून मासे जिवंत राहू शकत नाहीत त्याचप्रकारे सामान्यपणे माणसं माणसांपासून लांब राहू शकत नाहीत. इतर माणसांशी व्यवहार करताना विचार करावा लागतो व तो अकलेचा भाग असतो व त्यासाठी मेंदूचा वापर करावा लागतो या विकसित मेंदूमुळेच आपण इतरांशी व्यवहार कसा करावा हे शिकतो व शिकण्याचे माध्यम भाषा असते. 
 मुलं आपापल्या समाजाची आपापल्या भोवतालची भाषा शिकत असतात. त्यांचा मेंदू एखाद्या टीपकागदासारखा मोठया प्रमाणात पारंपारिक माहिती टिपून घेत असतो, साठवत असतो. मुलांच्या मेंदूत अशा हजारो, लाखो गोष्टी साठवल्या जात असतात. त्यात अगदी क्षुल्लक माहितीही असू शकते. चुकीचीपण असू शकते. अपायकारक माहितीपण असू शकते भूताखेताच्या विषयीची असू शकते. देव, देवदूत, आकाशातल्या पऱ्या अशा चमत्कृतीयुक्त माहितीही असू शकते. 
 कदाचित अशा प्रकारची चुकीची माहिती साठवणे मुलांच्या दृष्टीने वाईट असली तरी त्याला उपाय नाही. कारण वयाने मोठी असलेली माणसं जे काही सांगतात-चुकीची असो की बरोबर असो, चांगली असो की वाईट-त्यावर लहानांना विश्वास ठेवावाच लागतो. काही माहितींना कुठलाही आधार नसतो. त्या किमान तर्कसुसंगत असाव्यात अशी अपेक्षा असते. मुलांच्या साठवणीत सर्व प्रकारची परंपरागत माहिती साठवली जाते. मग मुलं मोठी झाल्यावर काय होते? तीच मुलं आपल्या पुढच्या पिढीतल्यांना तशीच्या तशी सांगतात. त्यामुळे अशा प्रकारे सांगितलेली गोष्ट-ती कितीही चुकीची वा वाईट असली तरी-अनेक पिढया विश्वास ठेवत जातात. त्यासंबंधी प्रश्न विचारले जात नाहीत व ही परंपरांची साखळी कधीच तुटत नाही. 
 स्वर्ग-नरक यावरचा विश्वास, पुराणकथातील चमत्कारिक घटना, सत्यनारायण-कडवा चौथ सारख्या पूजा, व्रत वैकल्ये, प्रार्थनेतून रोग बरा होणे, गणपती दूध पिणे, समुद्रातील पाणी गोड लागणे इ. इ. अनेक गोष्टी कुठल्याही पुराव्यावाचून स्वीकारल्या जातात. लाखो-करोडो लोक अशा गोष्टींवर डोळे मिटून विश्वास ठेवतात. त्यांची ती श्रध्दास्थाने होतात. कदाचित त्यांना या गोष्टींबद्दल एकही अडचणीचा प्रश्न न विचारता, कुठलीही शंका-संशय उपस्थित न करता विश्वास ठेवायलाच हवे असे अगदी लहानपणापासूनच शिकवून ठेवलेले असेल, सक्ती केली असेल. 
 गंमत म्हणजे यातील अनेक गोष्टी तर्कविसंगत असतात. मनात गोंधळ निर्माण करणारे असतात. हिंदूंची शिकवण वेगळी, मुस्लिमांची वेगळी, ख्रिश्चनांची आणखीन वेगळी. जेव्हा हे सर्वजण मोठे होतात तेव्हा आपलेच तेवढे बरोबर इतर चूक अशी भावना बळावत जाते. हिंदूंमध्ये अठरापगड जाती असल्यामुळे ब्राह्मणांचे वेगळे, मराठयांचे वेगळे, कुणबींचे वेगळे, लिंगायत, कायस्थ, यादव, नंबूद्री, अय्यर, अय्यंगार इ.इ.चे आणखी भलतेच व या सर्वांना आपलेच बरोबर व इतरांनीही तसेच वागायला हवे असे वाटत असते. 
 श्रध्दा-अंधश्रध्दांच्या या गोंधळलेल्या परिस्थितीत आपण नेमके काय करायला हवे? तुला हे फार जड जाईल कारण तू अजून लहान आहेस. तरीसुध्दा काही बाबतीत तू प्रयत्न करू शकशील. पुढच्या वेळी कुणीतरी तुला काही महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत असल्यास तू थोडासा विचार कर. ''हे जे काही सांगत आहेत त्याला काही पुरावा आहे का? किंवा ते फक्त परंपरा, अधिकार, अनुभूतीच्या आधारावर ते विधान करत आहेत का?'' याचा विचार करू लागल्यास तुझे तुलाच अशा विधानातील विसंगती लक्षात येऊ लागेल. त्यामुळे त्यांना ''याचा पुरावा काय?'' असा प्रश्नही तू विचारू शकशील. जर ते गुळमुळीत अस्पष्ट उत्तर देत असल्यास अशा विधानांवर विश्वास ठेवायचा की नाही हे तुझे तूच ठरव.
 पत्र लांबले आहे; परंतु हे सर्व सांगण्याची गरज होती. म्हणूनच तुझा वेळ घेत आहे. 
-तुझा आजोबा
(मूळ : रिचर्ड डॉकिन्सचा लेख)
-प्रभाकर नानावटी

Thursday, May 16, 2013

वैज्ञानिक दृष्टिकोनातील मूल्ये


बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.
 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.

विज्ञान म्हणजे काय?
 निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!
 विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळया परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन. जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.
 आपण 28 फेबु्रवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळतो, कारण भारताचे विज्ञानाचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ, सी.व्ही.रामन यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध, 28 फेबु्रवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता. हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी. झालं असं की परदेश प्रवासाला निघालेले रामन, जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.
 आपल्या आजूबाजूला, असंख्य घटना घडत असतात, त्यांचं निरीक्षणही आपल्याकडून कळत-नकळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर तिथे आग पेटली असणार, हा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वीच जाणवलेल्या, आग आणि धूर यातील कार्यकारणसंबंधामुळे. आपण काही त्याला दिव्याचा राक्षस, चमत्कार किंवा अंतज्र्ञान म्हणत नाही.
 'उद्या सकाळी मी अमुक करीन.....' असं आपण म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का, की उद्या उजाडेलच कशावरून? कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे, आपण असं अनुमान काढलेलं असतं, की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षं सूर्य उगवतोय, त्याअर्थी तो उद्याही उजाडणारच.
 अनुमानानंतरची पुढची कडी म्हणजे प्रचितीची किंवा अनुभवांची. आगीत हात घातला की चटका बसतो, यासारखा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, कोणी जर आग अगदी थंडगार असते असं म्हटलं तर त्याला मूर्खात काढतो. कारण ते प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य असतं; पण योग्य शिक्षणाअभावी, किंवा अगदी वशिल्याअभावी म्हणा, आपल्याला नोकरी मिळत नाही, हे लक्षात आलं तरीही, एखादी सर्व समस्या सोडवणारी अंगठी घ्यायला, आपण चटकन तयार होतो. समजा हजार सुशिक्षित बेकारांनी, आज याप्रकारच्या अंगठया घेतल्या, तरी त्यातल्या 50% लोकांना तरी नोकऱ्या मिळतील का? नाही. कारण मुळात ती गोष्ट, ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कोणत्याही वैज्ञानिक सत्याचा अनुभव, सप्रमाण म्हणजे पुराव्यांसह, वारंवार म्हणजे पुन्हापुन्हा, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे येत असतो, यायला हवा. गुरुत्वाकर्षण ही वस्तुस्थिती आहे म्हणून वर फेकलेली वस्तू खालीच येणार, मग तुम्ही ध्रुवावर असा नाहीतर विषवृत्तावर असा.
 कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे तर विज्ञानाचं आधारतत्त्वं. 'ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते' असं म्हटलं तर ते सिद्ध करता आलं पाहिजे.  मेणबत्ती पेटवून ती उपडया हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. 'पदार्थाचं आकारमान वाढलं किंवा वाढवलं तर त्याची घनता कमी होते' असं म्हटलं  तर आपल्याला हे करून बघता येतं की लोखंडाचा पातळ पत्रादेखील पाण्यात बुडतो; पण तो वाकवून त्याला होडीचा आकार दिला की तो पाण्यावर तरंगतो. बर्फ हे पाण्याचं घनरूप; पण ते तयार होताना त्याचं अनियमित प्रसरण होत असल्यामुळे त्याची तुलनात्मक घनता कमी होते आणि तेही पाण्यावर तरंगतं.

सामाजिक उपयोजनाची कडी
 मला असं वाटतं की, वैज्ञानिक विचारशृंखलेत आणखी एक कडी येते ती म्हणजे त्या शोधाच्या सामाजिक उपयोजनाची. वैज्ञानिक दृष्टिकोन कितीही बाळगला तरी त्याचा व्यापक हितासाठी उपयोग करणं यातूनच माणसाची ऐहिक प्रगती झाली आहे. अपघातानंच जाणवलेल्या घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेऊन त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेणं, हे मानवी बुद्धीचं काम आहे. एक साधं उदाहरण पाहू. एके काळी कापसाच्या बोंडापासून सरकी वेगळी करणं, हे खूप त्रासाचं काम होतं. एली व्हिटने या अमेरिकन शास्त्रज्ञानं, एकदा एक मजेशीर दृश्य पाहिलं. एका उभ्या गजांच्या मोठया चौकोनी खोक्यात, काही कोंबडया ठेवल्या होता, आणि एक लांडगा त्यांना बाहेर ओढण्यासाठी, गजांमधून त्याचा पंजा घालत होता. बाहेर पडत होती फक्त पिसं, कोंबडया मात्र आतमध्ये सुरक्षित होत्या. हे पाहून त्याला कल्पना सुचली आणि याच कार्यकारणभावाचा वापर करून, त्यानं कापसापासून सरकी वेगळी करणारं यंत्र बनवलं.  जॉर्ज दमेस्ट्रॉलला 'वेलक्रो'ची कल्पना त्याच्या पँटमध्ये अडकून राहिलेल्या विशिष्ट गवताच्या तुसांच्या निरीक्षणावरून सुचली. रॉन्टजेनला लागलेला एक्सरे, म्हणजे क्ष किरणांचा शोध, पाश्चरला सापडलेली कॉलऱ्याची लस, फॅरेडेने शोधलेले चुंबकीय प्रवर्तनाचे नियम, ही अशीच काही उदाहरणं. निव्वळ अपघातानं आढळलेल्या गोष्टींमागील कार्यकारणसंबंध ओळखून, इतर ठिकाणी तशाच प्रकारे उपयोग करणाऱ्या या जागरूक, प्रयोगशील मनाच्या करामती!
 जागरूक मन विचार करत असतं, त्यामुळेच कोणत्याही घटनेकडे ते जसं कुतूहलानं, शोधकतेनं बघतं तसंच वस्तुस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करत असतं. तर्कसुसंगत कार्यकारणभावानं विचार केल्यामुळे त्याला निसर्गाच्या अशा स्वतंत्र नियमपद्धतींची जाणीव होते. याप्रकारे विचार केल्यामुळेच आपल्याला सत्य उलगडू शकतं, अन्यथा नाही हे जाणवल्यामुळे ते निर्भय बनतं. सत्य हे टप्प्याटप्प्यानं लक्षात येतं, त्यामुळे आधीच्या टप्प्यावर झालेलं आकलन जर अपुरं वाटलं तर ती संपूर्ण आणि अक्षम्य चूक न मानता ती नम्रपणे स्वीकारली जाते. त्यामुळेच या विचारपद्धतीत शोधकता, सम्यकता, स्वायत्तता, निर्भयता आणि नम्रता ही मूल्यं अंतर्भूत आहेत असं आपण म्हणतो.
 आपल्यासमोर अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. त्यांचा अर्थ लावण्यासाठी लागते ती शोधक दृष्टी. विषुववृत्तावरील प्रदेशात सगळयात जास्त काळ सूर्य तापतो. त्यामुळे खरं तर  तिथली झाडं करपायला हवीत. प्रत्यक्षात सगळयात जास्त हिरवी जंगलं त्याच भागात आहेत. असं का याचा शोध घेता आपल्या लक्षात येतं की तिथं पाऊसही वर्षभर, दर दिवशी पडतो; पण एरवी तर सततच्या पावसानं झाडं कुजलेली आपण पहातो. मग आपण विचार करतो की हिरव्या वनस्पतीच्या वाढीला आवश्यक गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. कारण त्यामुळेच या वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वत:चं अन्न तयार करू शकतात. याच्या जोडीला पाणी आणि त्यातून येणारी खनिजं मिळाली की वाढ जोमानेच होणार!
 तुमच्या शोधक बुद्धीसाठी आणखी एक मजेशीर कोडं. झालं असं की 10+2 ही शिक्षणपद्धती अस्तित्वात आली आणि रायगड जिल्ह्यातलं तांदळाचं उत्पन्न एकदम कमी झालं! वस्तुत: या दोन्हीचा सकृतदर्शनी संबंध नाही. काय झालं ते पाहा. नव्या शिक्षणपद्धतीत विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना बेडकांचं 'डिसेक्शन' सुरू झालं. त्यासाठी बेडकांची गरज वाढली. रायगड जिल्हा म्हणजे 'फ्रॉगरी'-बेडकांची सर्वाधिक पैदास तिथे होते. साहजिकच तिथून बेडूक 'एक्स्पोर्ट' होऊ लागले. यापूर्वी तिथले बेडूक पावसाळयात भातपिकावर येणारे किडे खाऊन वाढत. बेडकांची संख्या घटली आणि परिणामी वाढलेल्या किडयांमध्ये भातपिकाच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाला.
 आपल्या लक्षात आलं असेल की आपण वरचं कोडं सोडवताना नेहमीच्या 'बंदबुद्धी' चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला. हाच विचार उपलब्ध माहिती आणि वर्तमानातील अनुभव यांनाही सम्यकपणे लावायला हवा. कुटुंबनियोजनाचं उदाहरण घेऊ. गेली सुमारे पन्नास वर्षं भारतात हा कार्यक्रम राबवला जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातली सम्यकता ज्यांना कळली नाही, ते काय म्हणतात? शासन, व्यवस्था, सर्वकाही भ्रष्ट आहे, कारण लोकसंख्या कमी कुठे झाली? अशा वेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, वाढत्या वैद्यकीय प्रगतीबरोबर माता आणि अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालंय, वृद्ध लोकांचं आयुर्मान वाढलंय, त्यामुळे आपल्याला जी वाढ दिसते ती तात्पुरती आहे; पण हाच प्रयत्न निकरानं चालू ठेवला तर नजीकच्या भविष्यकाळात अपेक्षित परिणाम निश्चितच दिसेल.

स्वायत्तता म्हणजे काय?
 आपलं विश्व आणि त्यात घडत असणाऱ्या लहान मोठया घटना यात एक कार्यकारणभाव आहे. सगळीच कोडी अजून उलगडली नसली तरी त्यांच्या मागचा कार्यकारणभाव शोधण्याची पद्धत सापडली आहे. निरीक्षण आणि प्रयोगांच्या साखळीतून आपल्याला ती उलगडता येतात. विश्वाचं नियंत्रण करणारी कोणतीही 'पवित्र' किंवा 'सैतानी' शक्ती नाही. त्यामुळे तिच्या कृपेमुळे किंवा अवकृपेमुळे काहीही बरं-वाईट होत नाही. जे काही घडतं त्यामागे कार्यकारणभावाचे नियमच असतात. या अर्थानं विश्व स्वायत्त आहे.
 'सत्य-असत्यासी मन केले ग्वाही' अशी मानसिकता झाली की माणूस निर्भय बनतो. सत्याच्या आग्रहासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा रोष पत्करण्यास तो हसतमुखानं तयार होतो. सत्यशोधनाची किंमत म्हणून ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस विषाचा प्याला तोंडाला लावतो(इ.स.पूर्व399) तर गिओर्दानो ब्रुनो सूर्यकेंद्री व्यवस्थेच्या समर्थनासाठी(इ.स.1600) जिवंत जाळणं स्वीकारतो.
 वैज्ञानिक दृष्टिकोन आणखी गोष्ट शिकवतो ती म्हणजे नम्रता. 'मला गवसलेलं सत्य तेच अंतिम' असा दावा धर्म करतो, विज्ञान नाही. नवीन संशोधनानं आणि पुराव्यांनी प्रकाशात आणलेलं सत्य स्वीकारणं हे विज्ञानाचं खास वैशिष्टय. त्यामुळेच आईन्स्टाईनच्या 'सापेक्षतावादाच्या व्यापक सिद्धांता'मुळे न्यूटन कमी ठरत नाही किंवा हायझेनबर्गच्या 'अनिश्चिततेच्या तत्त्वाच्या' सत्यापुढे आईन्स्टाईन संपत नाही.
 खरं तर एवढी चांगली जीवनमूल्यं देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन यापूर्वीच समाजात रूजायला हवा होता. तसं का झालं नाही/होत नाही? याचं एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या समाजाची भूतकाळात रमण्याची मानसिकता आणि व्यक्तीपूजेचा हव्यास. आपलं कर्तव्य सिद्ध करण्याऐवजी पूर्वजांच्या कर्तृत्वाचे अधिकाधिक पुरावे शोधायचे. जुन्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून भविष्याचा वेध घेणाऱ्यांचं खच्चीकरण करायचं. राज्यापासून कुटुंबापर्यंत व्यक्तीकेंद्री एकाधिकारशाही. तरीही एखादा कर्तबगार माणूस झालाच तर त्याला देवत्व बहाल करायचं आणि त्याला डोक्यावर घेऊन इतकं नाचायचं की तो कशासाठी मोठा ठरला हेच विसरायला व्हावं.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे शत्रू :
'गप्प बसा' संस्कृती : ज्याला आपण इथली प्राचीन संस्कृती म्हणतो, ती मुळात दैववादी आणि चिकित्सा नाकारणारी 'गप्प बसा' संस्कृती आहे. उलटे प्रश्न विचारायला प्रतिबंध करणारी आहे. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान' असे संस्कार प्रयत्नवादाचं खच्चीकरण करतात. कुतूहल आणि पूर्वग्रहविरहित दृष्टी त्यामुळे अभावानेच आढळते.
'शॉर्ट कट' शोधण्याची मानसिकता : माणसाला आपल्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. लोकसंख्या वाढ, त्यामानानं मर्यादित साधनसंपत्ती आणि मूलभूत सुविधांचं अपुरेपण, दिवसागणिक कमी होणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी, श्रमांची कमी होत चाललेली प्रतिष्ठा आणि किंमत, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी अशा कटकटींमुळे गांजलेला सामान्य माणूस फारसा विचार करत नाही. अडचणीच्या मुळाशी जात नाही. तात्पुरते, सोपे मार्ग शोधतो, त्यासाठी 'शॉर्ट कट' स्वीकारतो.
रुढी-परंपरांचा खोल प्रभाव : प्रत्येक समाजात संस्कृतीच्या वेगवेगळया टप्प्यावर आणि त्या त्या मानवसमूहाच्या भौगोलिक परिस्थितीवर आधारित काही पद्धती बनतात. पुढे त्यांची चिकित्सा न करता त्या तशाच पाळत राहिल्या की त्या रुढी होतात. व्यापक भौगोलिक प्रदेशात तिथल्या भौतिक परिस्थितीमुळे आणि राजकीय स्थितीमुळे काहीसा मूल्यात्मक(?) आशय असणाऱ्या पद्धती पिढयान्पिढया पाळल्या जातात त्या परंपरा ठरतात. इथल्या समाजाची एकंदरच मानसिकता 'सांगे पूर्वजांची किर्ती' अशी असल्यामुळे कर्तबगार पूर्वजांचे अधिक कर्तबगार वंशज होण्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे रुढीपरंपरांच्या बेडया हे दागिने वाटू लागतात. त्या जास्तीत जास्त जुनाट पद्धतीनं पाळण्याचं भूषण वाटतं. चालू वास्तवाशी या प्रथा सुसंगत आहेत का हे तपासण्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यामुळे झापडं लावून चाकोरीत विचार(?) करण्याची वृत्ती बळावते.

सदोष शिक्षणपद्धती : सामान्यत: सुशिक्षित लोकांना असं वाटत असतं की आपण विज्ञान शिकलो आहोत त्यामुळे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहेच, तो नाही निरक्षर लोकांमध्ये. हे साफ चूक आहे. चिकित्सक वृत्ती ही नेहमी शिक्षणामुळेच येते असं नाही. शिकलेले लोक वस्तुस्थितीला नेहमीच ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रश्न विचारतात का? आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान आहे ते विषय म्हणून, त्यात चिकित्सक भाग आणि प्रयोगशीलता कमीच आढळते. स्वत: विचार करून परंपरागत समजुतींपलीकडे जाणारे आणि तसं शिकवणारे शिक्षकही अत्यल्प आहेत. बाकीच्यांचा व्यक्ती म्हणून दोष नसला तर तो संस्कारांचा असेल. आडनाव ऐकलं की जातीचा विचार करणारे आणि रोजच्या पेपरातलं भविष्य वाचून काम करणारे कसला दृष्टिकोन रुजवणार? काही वेळा पुस्तकात आहे म्हणून तरी काही शिकवलं जातं; पण अभ्यासक्रमातच जर स्त्री-पुरुष समता, जाती-धर्मनिरपेक्षता अशी चांगली मूल्यं ठसवणारे धडे नसतील तर काय करणार?
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार आणि प्रसार हे प्रत्येक भारतीयाचं घटनादत्त कर्तव्य असलं तरी प्रत्यक्षात मात्र अवैज्ञानिक दृष्टिकोनाचं राजकीय समर्थन होताना दिसतं. राष्ट्रपतींपासून मंत्र्यांपर्यंत अनेक राजकीय व्यक्ती जेव्हा सत्यसाईबाबासारख्या चिल्लर चमत्कार करणाऱ्या भोंदूबाबाकडे जाऊन नतमस्तक होतात तेव्हा सामान्य माणसापर्यंत चुकीचाच संदेश पोचतो. उपेक्षितांच्या आणि स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अंधश्रद्धांना उखडून टाकण्यासाठी परिणामकारक कायदा अस्तित्वात यायला दिरंगाई होते, ती याच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे.

प्रसारमाध्यमांची भूमिका : वाचक आणि प्रेक्षक यांची संख्या वाढवणे हे एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे प्रसिद्धी माध्यमं अवैज्ञानिक विचारांना अधिकाधिक प्रसिद्धी देत असतात. लोक आवडीनं वाचतात-बघतात(आणि विश्वासही ठेवतात!) म्हणून सरसकट कुठल्याही गोष्टीला अपरिमित प्रसिद्धी दिली जाते. लोकांची मानसिकता घडवण्याची ताकद असलेल्या प्रसारमाध्यमांच्या 'मागणी तसा पुरवठा' अशा व्यवहारामुळेही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारात अडचणी येतात.
 पण कितीही अडचणी असल्या तरी अंतिम विजय सत्याचा म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच होणार. कारण 'सत्यमेव जयते' ही निव्वळ कविकल्पना नाही, नुसतं सुभाषितही नाही. ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज!
डॉ. आशुतोष मुळ्ये