Showing posts with label प्रथा. Show all posts
Showing posts with label प्रथा. Show all posts

Wednesday, April 9, 2014

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.
हे भीषण अमंगळ हिंदुधर्मा ! तुझ्या आज्ञेने स्मशानात शेकडो वर्षे आम्ही क्षौरें केली,कणकेचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेवले,गळके मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घातल्या,त्याबद्दल तू आम्हांस काय दिलेस?...हिंदूंनो!, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक,तोंड,पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय?
खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? गरुडपुराणातील किळसवाण्या गप्पांवर श्रद्धा ठेवणार्‍या मूढांनो,अरबी भाषेतील चमत्कारी कथा खर्‍या मानून त्यांना पुराणांच्या पदवीला चढवाल तर अधिक बरें होईल.अकलेची ऐट मिरविणार्‍या मतिमंदांनो ’अ’ व्यक्तीचा ’ब’ हा आप्त वारला तर ’अ’ला कोणत्या कारणानें सुतकी,अस्पृश्य मानून त्याला दहा दिवस वाळीत टाकता? ’अ’चा अपराध काय? बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का ? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हें तुम्हाला कसे कळले ? कुणी सांगितले?" ...( "सुधारका"तील लेखाचा काही भाग)
.........खरें तर कुणाचा मृत्यू हा दु:खद प्रसंग.पण पिंडदान विधीत जें चालतें तें पाहून हसूं यावे. पिंड ठेवले आहेत .काकस्पर्शासाठी माणसे ताटकळत उभी आहेत.मग मृताचा मुलगा पुढे येऊन हात जोडून म्हणतो," बापू, चिंता करू नका.आत्याला आम्ही अंतर देणार नाही.शेवटपर्यंत सांभाळू."बापूंच्या आत्म्याला हे ऐकू येते.त्याच्या अदृश्य चेहेर्‍यावरील चिंतेचे भाव जाऊन समाधान पसरते.झाडावरील कावळ्याला हा बदल दिसतो.तो खाली येऊन पिंडाला शिवतो.हे सगळे खरे मानण्यात आपले काही चुकते आहे असे कुणाला वाटतच नाही.
माझ्या परिचयाच्या एका गृहस्थाने काकस्पर्शासंबंधीचा एक अनुभव गंभीरपणे सांगितला.तो त्याच्या शब्दांत:--"आमचे एक ब्रह्मचारी काका--म्हणजे माझ्या वडिलांचे धाकटे बंधू--आमच्याकडे राहात.ते वारले.दशक्रिया विधीला पिंड ठेवले.पण कावळा शिवेना.आम्ही दोन तास थांबलो.नाना प्रकारचे सांगणे झाले.पण व्यर्थ.काकांचे एक मित्र विधीला आले होते.ते म्हणाले की काकांना अश्लील पुस्तके वाचण्याची फार आवड होती. मी लगेच स्कूटरवरून घरी गेलो.काकांच्या खोलीतील टेबलावरील एक पुस्तक चाळले. त्यात वाचन खुण होती. म्हणजे गोष्ट वाचून पूर्ण झाली नव्हती.काकांची अतृप्त इच्छा हीच असावी हे जाणून मी ते पुस्तक घेऊन घाटावर आलो.खुणेच्या पानापुढील दोन पाने,काकांना जरा कमी ऐकू येत असे म्हणून, खड्या आवाजात वाचून गोष्ट संपवली. तुम्हांला सांगतो, दोन मिनिटात कावळा शिवला ."
काकांच्या आत्म्याला आपण सद्गती दिली याची कृतकृत्यता त्या गृहस्थाच्या चेहर्‍यावरून ओसंडत होती....(हा अनुभव ऐकून एक कल्पना सुचली की अनेकांचे असे अनुभव असतील. त्यांचे संकलन केले तर "काकस्पर्श अनुभव बृहत् कोश" सिद्ध होऊ शकेल.त्यात "त्वरित काकस्पर्शासाठी अकरा वचने आणि तेरा सूत्रे "समाविष्ट केली आणि कोशाच्या प्रती पिंडदानाच्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली तर त्याचा खप घाटोघाट होईल.मात्र अनुभव काल्पनिक नसावे.घाटावर जाऊन,लोकांना भेटून,त्यांना बोलते करून अनुभव संकलित करावे.म्हणजे कोश रंजक होईल.)
कल्पना करा की असले अंत्यविधी प्रकार आपल्याकडे नाहीतच. समजा आफ्रिकेतील एका जमातीत थेट असेच प्रकार रूढ आहेत.एका मराठी मासिकात "ऐकावे ते नवलच!" या सदरात त्या पिंडदान विधीची साग्रसंगीत माहिती छापून आली.आबांनी ती वाचली. तर ते म्हणतील, "काय हे घोर अज्ञान! मृताचा आत्मा तृप्त आहे की नाही ते कावळ्याला समजते म्हणे! एकविसाव्या शतकात कोणी हे खरे मानत असेल यावर विश्वास बसत नाही." यावर तात्या म्हणतील," म्हणजे तुम्हाला हे खरे वाटते की काय? अहो, हे संपादक लोक मासिकाची पाने भरण्यासाठी काही मनात येईल ते छापतात.काल्पनिक लिहावे. पण ते थोडेतरी खरे वाटेल असे असावे. आप्तांची आश्वासने काय,काकस्पर्श काय ,सगळे काल्पनिक.असले कधी कुठे असते काय? आफ्रिकेतील जमात असली म्हणून काय झाले? लोक इतके मूर्ख असणे शक्य नाही. आपले गंमत म्हणून वाचायचे झाले."
आज आपल्याकडे हे वास्तव आहे .प्रत्यही घडते आहे.अशा श्रद्धावंतांना सव्वा शतकापूर्वी "खुळ्यांनो,असे पोराहून पोर कसे झालांत? "असा प्रश्न आगरकरांनी विचारला तो आजही विचारणे योग्य आहे.
-प्रा. य. ना. वालावलकर