Monday, March 17, 2014

गर्भसंस्कार: एक थोतांड


आपले मूल (बहुदा एकच होऊ देत असल्यामुळे... सर्वात महत्वाचे झालेले ते मुल) हुशार, सुंदर, कर्तृत्ववान व्हावं ही प्रत्येक आई-बापाची स्वाभाविक इच्छा... नैसर्गिकच. आता व्यापारी जगात या नैसर्गिक इछेचा फायदा घेऊन अनेक गर्भसंस्कारांची दुकानं गावोगाव उघडली गेली आहेत.
हजारो रुपये घेऊन ‘गर्भसंस्कारामध्ये प्रशिक्षण देणारे’ वर्ग चालवले जात आहेत.
‘नुकसान तर नाही ना?’
‘आणि आयुर्वेदात आहे... मग शास्त्रीयच असणार ना?’
या दोन वाक्यांत ही सुशिक्षित गिऱ्हाईकं सहजपणे आपल्या आधुनिक ‘अभिमन्यू’साठी काही हजार रुपये खर्च करताना दिसत आहेत. ‘अभिमन्यू’ हे एकच उदाहरण ‘मार्केट’ करून हे तथाकथित व्यापारी गिऱ्हाईकं खेचतात.
ठीक. आपण उदाहरण बघू... शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा जिजाबाई गर्भवती होत्या तेव्हा अक्षरशः मोगल पाठीवर घेऊन पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची/भावाची हत्या झाली. त्यांना ना व्यापारी भेटले ना गर्भसंस्कार केले! तरी शिवाजी महाराजांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडले! जिजाबाईंचा जरूर वाटा आहे. किंबहुना त्या माता होत्या म्हणूनच शिवाजी महाराज घडले.
पण हे ‘जन्मानंतर’च्या संस्कारांमुळे. गर्भसंस्कारांमुळे नाही! पुराणकाल (अभिमन्यू) व भूतकाळ (शिवाजी महाराज) यांच्या उदाहरणानंतर आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ.
भारतातील सधन वर्ग जो पैसे टाकून गर्भसंस्कार घेऊ शकतो हा एकीकडे अन् छोटी गावं, गरिबी यात गर्भसंस्कारासाठी कुठे पैसा आणणार असा मध्यमवर्गीय एकीकडे. आज एशिया व कॉमनवेल्थमध्ये ज्यांनी मेडल्स मिळवली आहेत, त्यात खूप जास्त संख्या ही ग्रामीण भागातून आलेल्या, धडपडणाऱ्या मुलां-मुलींची आहे. उदा. कविता राऊत ही नाशिकमधल्या आदिवासी भागातील मुलगी! आज दीर्घ पल्ल्याची सर्वोत्तम धावपटू आहे. गर्भसंस्कार हा शब्दही तिच्या आईने ऐकला नाही- तरी.
डॉ. कन्ना मडावी हा माझ्याप्रमाणे स्त्रीरोगतज्ञ! कांदोटी या आजही मागासलेल्या व दुर्गम भागात जन्मलेला आणि लोकबिरादरमध्ये १९७६ साली येऊन शिक्षण घेतलेला कन्ना- एम.डी. झाला. अॅडव्होकेट लालचू नौगोटी-जुनी या छोट्या आडगावातल्या; वडील व आई दोघंही लहानपणीच वारले. तो एम.ए.एल.एल.बी. झाला.
ही दोन हेमलकसाची प्रातिनिधीक उदाहरणं. अर्धनग्न, अर्धपोटी, अशिक्षित आईबापांपोटी व आदिवासी व दुर्गम भागात जन्म घेतलाय यांनी! अनेक हजार वर्षांतही या भागात आयुर्वेद पोचलाच नव्हता. डॉ.प्रकाश व डॉ. मंदा यांच्या रुपानं आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रकाशाची तिरीप प्रथम पोचली ती १९३ ला. या अशा परिस्थितीत या मुलांवर गर्भसंस्कार कुठून येणार?
तरीही मुलं शिकली व परत गडचिरोली भागातच परतली. तिथं ती आपल्या ज्ञानाचा फायदा आदिवासींना करून देत आहेत.  गर्भसंस्कारांमुळे हे घडलं नाही तर बाबा, प्रकाश, मंदा आमटे यांच्या मदतीच्या हातानं हा चमत्कार घडला!
या सर्व उदाहरणांनी अभिमन्यूची कथा किती फोल आहे व जन्मानंतरचे संस्कार, जिद्द, प्रेरणा कर्तृत्वासाठी किती महत्वाचे ठरतात हे आपण सहजपणे स्वतःच बघू शकतो. गर्भसंस्कार मार्केट करणाऱ्यांकडे फक्त एका अभिमन्यूची कथा आहे. आपल्यासमोर गर्भसंस्काराशिवाय नोबेल, ऑलिम्पिक व इतर मेडल मिळवणाऱ्यांची प्रत्यक्ष फौज आहे. तेव्हा कथेच्या मोहातून आपण बाहेर पडू या.
आता गर्भसंस्कारांचा तथाकथित शास्त्रीय/वैज्ञानिक मुखवटा आपण तपासून बघूया.
गर्भसंस्कार वर्गात हे घडते.
१.       चर्चा, कौन्सेलिंग- मान्य
२.       आहार मार्गदर्शन- मान्य
३.       व्यायाम मार्गदर्शन- मान्य
४.       आनंदी राहण्याची सूचना- मान्य
५.       नवरा-सासूचा सहभाग- मान्य
हे सर्व कोणीही सुजन व्यक्ती मान्य करेल. त्यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा मुखवटा घ्यायची गरज नाही.
गर्भावर संस्कार करण्यासाठी, पूर्णपणे त्याची बुद्धी वाढवण्यासाठी मातेला ‘मंत्र’ शिकवले जातात. हे मात्र पूर्ण अमान्य.
गर्भ पोटात असताना मंत्र म्हणून त्याची बुद्धी वाढू शकते हा विश्वास शास्त्रीय आहे व त्यासाठी आयुर्वेदात ‘मंत्र’ दिले आहेत, असा गर्भसंस्कारांचा पाया सांगितला जातो...
या पायाची दोन पद्धतीनं आपण चिकित्सा करू.
अ)     आयुर्वेदात काय आहे?
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?

अ)     आयुर्वेदात काय आहे?
आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणाऱ्या गोष्टी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळंतपणानंतर ‘वार’ कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. तसेच त्याकाळात गर्भपात अटळ असेल तर ‘राजाची’ परवानगी घ्या अशी कायदेशीर यंत्रणाही दर्शवली गेली आहे.
आयुर्वेदाला विरोध म्हणून गर्भसंस्काराला विरोध अशी आमची भूमिका नाही. आमचे आयुर्वेदातील तज्ञ सहकारी अनेक व्याधी आज व्यवस्थित पद्धतीने हाताळतात व या सर्वांबद्दल आम्हाला व्यावसायिक आदर आहे. आयुर्वेद ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे व अर्थातच त्यातली काही निरीक्षणे/अनुमाने व उपाय कालबाह्य झाले आहेत.
उदाहरणं अशी:
(अष्टांग हृदय, वाग्भट कृत)
१.       गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो.
२.       पाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर नवरा मरतो.
३.       पाळीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या समागमातून गर्भधारणा झाली तर बाळ पोटात मरते. –(सार्थ भाव प्रकाश) पूर्वखंड श्लोक १३-१६, वैद्य नानल यांची प्रत
४.       पाळीनंतर सम रात्री (२,४,६,८,१०,१२) संभोग केला तर पुत्र होतो व विषम रात्री (५,७,९) केला तर कन्या होते.
(पाळीनंतर पहिल्या 10 दिवसांत गर्भधारणाच होऊ शकत नाही हे शास्त्रीय सत्य आज शाळांतही शिकवलं जातं.)
५.       शरीरात ३०८ हाडं आहेत. (पाचवा अध्याय) आजच्या शास्त्राप्रमाणे २०६.
६.       गर्भाधान संस्कार: गर्भधारणा होण्याचे ठिकाण, त्यावेळची मानसिक अवस्था याचा गर्भावर होणारा परिणाम. उदा. समागमाच्या खोलीत अडगळ नको. (आज हे किती जोडप्यांना शक्य आहे?)
७.       अनवमोलन संस्कार: यात गर्भपातापासून सुटका सांगितली आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहपीडा यामुळे होणारा.
३००० वर्षांपूर्वीचं आयुर्वेद अर्थातच तत्कालीन मर्यादांचा विचार करूनच वाचलं गेलं पाहिजे.
निष्कर्ष:
आयुर्वेद हे ३००० वर्षांपूर्वीचे शास्त्र आहे ही त्याची मर्यादा आज मान्य करायला हवी. खुद्द वाग्भटानं असं नमूद केलं आहे की आयुर्वेद हे परिवर्तनशील शास्त्र आहे व क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे आद्य कर्तव्य आहे. क्रमवृद्धीच्या नियमाचे पुष्टीकरण करणे म्हणजे- नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा, सतत पुढे जाणं, अचूकतेकडं प्रवास करणं. ते करायला हवं!
आ)   आजच्या विज्ञानाला जे माहित आहे त्यानुसार बाळ गर्भावस्थेत शिकू शकते का?
काही गर्भसंस्कार करणारे तर हेही बिनदिक्कत सांगतात की, आजच्या शास्त्राप्रमाणे गर्भसंस्कार वैज्ञानिकच आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्र काय सांगते?
१) गर्भाची गर्भाशयामधली वाढ व क्षमता अशी विकसित होते.
तीन महिन्यांचा गर्भ: हात, पाय, डोळे, हृदय, किडनी, आतडी, मेंदूही प्राथमिक स्वरुपात तयार.
चार महिन्यांचा गर्भ: ऐकू शकतो. म्हणजे आवाजाची जाणीव होण्यासाठी मेंदूचा भाग थोडा विकसित होतो. ऐकणं... म्हणजे आवाज ऐकणं. ऐकून समजणं नव्हे.
चौथ्या महिन्याअखेर: Myelination मायलीनेशन म्हणजे मज्जातंतूवरचं आवरण. ह्याची सुरुवात होते. मायलीनेशन झाल्याशिवाय मज्जातंतू काम करू शकत नाहीत. त्यांचे काम संवेदना इकडून तिकडे पोचवण्याचे असते.
जन्मवेळेपर्यंत: जेमतेम १२ ते १५% मज्जातंतू हे मायलीनेशनचे असतात, व त्यामुळे श्वसन, हृद्य, आतडं अशा जीवनावश्यक क्रियाच फक्त शक्य असतात. ‘समजण्या’साठी (ऐकून/वाचून) अजून बाळ तयार नसते. हे मायलीनेशन जन्मानंतरही चालूच राहते व ते वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत पूर्ण होते.
२) शिक्षणक्षमता (गर्भाची)
३२ आठवडे पूर्व गर्भाला ही शिक्षण क्षमता थोडीबहुत येते. मात्र ही Habituation हॅबीच्युएशन या प्रकारची असते.
ती Reflex असते. प्रतिक्षिप्त क्रिया असते. ती Response नसते, प्रतिसाद नसतो.
अगदी एकपेशीय आमीबाही त्यावर प्रकाशाचा तीव्र झोत टाकला तर आक्रसून दूर होतो!
म्हणजे
-ओरडणे (आवाज आदळणे)
-बोलणे (आवाज येणे)
-मंत्रोच्चार (आवाज येणे)
-फटाके (आवाज आदळणे)
-हॉरर मुव्ही (आवाज आदळणे)
-शास्त्रीय संगीत (आवाज येणे)
या सर्व Stimulus ला... उत्तेजनेला- गर्भ प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देतो- एवढेच त्याचं ऐकणं असतं! उदा. आई हॉरर मुव्ही बघत असेल तर आवज व आईच्या दचकण्यामुळे गर्भ हलतो.
तसाच तो आई अत्यानंदाने ओरडली तरी हलतो. हॅबीच्युएशनची प्रतिक्रिया म्हणजे ‘शिक्षण’ नव्हे.
केवळ या मुलभूत क्षमतेचा वापर गर्भसंस्कार व्यापारासाठी करतात. ते म्हणतात, ’बघा... बाळ ऐकतंय.’
बाळाला ऐकू येतं... पण गोंगाटाच्या स्वरुपात! त्यात शिक्षण घेण्याची क्षमता नसते.
३) बाळाला ऐकू येतं?
वर सांगितल्याप्रमाणे त्याला ऐकू येतो तो गोंगाट. आवजाची संवेदना. गर्भसंस्कारात आई मंत्रोच्चार करते. हा आवाज बाळापर्यंत पोचतो का? तर पोचतो, पण क्षीण! बाळाच्या आजूबाजूला गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या असतात. मागे भला मोठा अेओर्टा असतो. यातून जाणाऱ्या रक्ताचा आवाज बाळापर्यंत पोहोचतो, तो ६० ते ८० डेसिबलचा! म्हणजे बाळ आर्टरीचा, हा मोठ्या आवाजात डिस्को ऐकत असतं दिवसरात्र!
त्यात हा पुटपुटण्याचा (मंत्रांचा) आवाज कसा पोहोचणार? शक्यच नाही.
किंबहुना मायलीनेशन होत नाही व बाळ काही ‘समजू’ शकत नाही हे बाळाला वरदानच आहे. नाहीतर या गोंगाटानं ते बधीर व्हायचं!
४) आईच्या मनातील भावनांचा व तिच्या विचारांचा, गर्भावर काय परिणाम होतो?
उत्तर: काहीही नाही.
पुरावा: Dizygotic Twins.
यामध्ये दोन बाळं एकाचवेळी आईच्या गर्भाशयात असतात. यात एक मुलगा व एक मुलगी किंवा दोन्ही मुलगे/दोन्ही मुली असं काहीही असू शकतं. यांची जनुकं वेगळी असल्याने त्यांच्यात शारीरिक साधर्म्य कमी प्रमाणात असतं. पूर्णपणे भिन्न असतात.
आता आईचे विचार, तिचा आचार व तिने केलेले ‘संस्कार’ दोघांसाठी ‘एकच’ असताना ही भिन्नता कशी? पुढे जाऊन प्रत्येकाचं कर्तृत्व पूर्णपणे वेगळं असतं. थोडक्यात आईच्या इच्छेवर बाळ सुंदर, बुद्धिमान बनत नाही. अजिबात नाही.
अशा गर्भसंस्कारामुळे पसरणाऱ्या समजुती घातक आहेत. मातेचा गर्भारपणाचा सहज आनंद या समजुती मातीत मिळवतात. एक OBSESSION मातेमध्ये रुजवतात. जणू बाळाचं भवितव्य तिच्या हातात आहे! हल्ली झटपट व पैसे टाकून सर्व, अगदी आरोग्यही, विकत मिळते अशी रूढ समजूत आहे. पैसे फेका... मंत्रोचार शिका. पैसा फेका- क्लास लावा, आपलं मूल- बिल गेट्स.
भयंकर सापळा आहे हा... व तो बाळाला पकडतो. गर्भसंस्कार करून बाहेर पडलेलं बाळ बुद्धीनं सामान्य निघालं तर आईला धक्का बसतो. इतकं हे Obsession  या गर्भसंस्काराच्या खुळामुळे पसरते आहे.
या सगळ्या Instant व पैसे टाकून विकत मिळवायच्या शर्यतीत आपण मुळात व्यक्ती/बाळ शिकते कसे ते लक्षात घेत आहोत का?
५) व्यक्ती शिकते कशी?
खालील learning pyramid बघा.
(शिक्षणाचा आराखडा)
सर्वसाधारण व्यक्ती वेगवेगळ्या मार्गानं शिकत असते. ते मार्ग व त्यांची उपयुक्तता अशी. (आईनस्टाईन वगैरे अपवाद. ते सोडून द्यायचे. आपण सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आपलं मूलही तसंच आहे, हे वास्तव आधी मान्य करूया.)
सर्वसाधारण व्यक्ती अशी शिकते
१०% वाचणे, २०% ऐकणे व पाहणे, ३०% प्रयोग बघणे व करणे, ५०% मनन व चर्चा, ७५% ज्ञानाचा उपयोग करून, ९०% दुसऱ्यांना शिकवून.
आपण बघितलं की गर्भाला मुळात मायलीनेशन नसल्यामुळे फक्त आवाजाची संवेदना समजते. त्यातून ते अर्थ समजू शकत नाही. वादापुरतं असं मान्य केलं की तो समजतो, पण मग जो विषय आपण शिकवतो (गर्भारपणी काय शिकवतो? गणित?) पण जरी शिकवलं गणित गर्भारपणी, तरी ते ऐकून फक्त शिकणार म्हणजे ते वाचू शकणार नाही, प्रयोग बघू शकणार नाही. करू शकणार नाही, त्या ज्ञानाचा उपयोग ‘तेव्हाच’ करू शकणार नाही.
२०% शिकण्याची क्षमता उपयोगात येईल आली तर! अर्थातच बाळ पोटात आईनं म्हटलेलं मंत्र ऐकून शिकते ही एक पूर्ण अंधश्रद्धा आहे. मातृत्वाच्या टप्प्याला मातेनं व तिच्या नवऱ्यानं नीट आत्मसात करावं. त्याचं मनन करावं. ते वापरावं आपल्या बळावर.
समारोप
‘गर्भसंस्कार’ करायला जाणाऱ्या सुशिक्षित स्त्री/पुरुषांची दोन गृहीतं असतात. ‘नुकसान तर नाही ना?’ आणि ‘आयुर्वेदात आहे मग वैज्ञानिकच असणार ना!’
यात ‘आयुर्वेदा’ची व आधुनिक विज्ञानाची ही कसोटी लावली तर ‘गर्भसंस्कार’ वैज्ञानिक नाहीत. Evidence based नाहीत हे आपण बघितलं. आता ‘नुकसान तर नाही ना?’ या मुद्द्याकडे येऊ या.
खलील जिब्रान म्हणतो तसं तुमचं बाळ हे सुटलेला बाण आहे. अगदी गर्भावस्थेपासून ते वेगळी ‘स्वतंत्र’ व्यक्ती आहे. गर्भसंस्कारांसारखे अट्टाग्रह मनात धरून त्याचा रोबो करू नका. आई-बाप आहात... आधार द्या, प्रेम द्या, थोडी शिक्षाही करा.
पण त्याच्या व्यक्तिमत्वाला फुलवा. आपली स्वप्न... आपले हट्टाग्रह लादू नका. पालकांच्या हट्टाग्रहाची सुरुवात गर्भसंस्कारांचे मंत्रपठण करून होते... ही वाट धोक्याची आहे... सावध असा!
गर्भसंस्कारांना आपण जातो तेव्हा, आपण आपल्या बाळाकडून अवास्तव अपेक्षांची सुरवात गर्भावस्थेतच करतो! हे मोठं नुकसानच आहे, नाही का? म्हणून प्रत्येक वाचकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा.
...खरं-खोट्याचा बेमालूम व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकत असतील बाजारात...
पण मी अवैज्ञानिक व अवास्तव अपेक्षांनी भारून जाऊन त्यांना बळी का पडतेय/पडतोय?
गर्भसंस्कार करायचे नाहीत तर काय करायचं?
तर मातृत्व उपनिषद वाचायचं. त्यातलं ज्ञान मिळवायचं. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या आपल्या बाळाची व्यवस्थित जडणघडण घडेल, मातृत्वाचे त्रास कमी होतील, धोके आधी समजतील. मातृत्व सुखद, समाधानी, सुखरूप ठरेल. डिलीव्हरीनंतर निव्वळ स्तनपान करायचं. आदर्श हे... की पहिले ६ महिने फक्त स्तनपान! त्यासाठी आईचा आहार... गर्भवती असताना होता तेवढाच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचा आहे. बाहेरचं दूध, पावडरी... कशाचीही गरज नाही.
हल्ली मुली नोकऱ्या व करिअर करतात. ठीक. जेवढे महिने जमेल तेवढं-
१. तात्पुरती, दोन वर्षं फक्त, गृहिणी व्हायचा पर्याय सर्वोत्तम शक्य आहे. (सरकारसुद्धा सहा महिने मॅटर्निटी लीव्ह... बाळंतपणाची रजा देते.)
आर्थिक गरज नसेल तर शक्य होईलही कदाचित. विचार तर करा. हा पर्याय विचारात घ्या.
२. किमान पहिले चार महिने निव्वळ स्तनपान.
३. नंतर बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने गरज असेल तर, बाहेरचं दूध व इतर आहार.
जन्मतः मायलीनेशन फक्त १२ ते १५% व पहिल्या ३ वर्षात पूर्ण. अर्थातच बाळाच्या दृष्टीनं हा कालखंड सर्वात महत्वाचा. त्याचं पोषण/आहार अत्यंत काटेकोर व योग्य असावा. (बालरोगतज्ञाची मदत घ्या.)
४. लसीकरण पूर्ण व त्या त्या वेळेवर.
५. बाळाशी बोलणं महत्वाचं... खूप बोलणं.
जन्मल्यापासून बोलवं... गर्भसंस्कारांच्या वेळचा मंत्रोच्चार काही उपयोगाचा नाही. आता बोलणं उपयोगाचं.
६. संस्कार हे ‘बोलून’ होत नाहीत. ते करून होतात. जे काही मुलानं/मुलीनं करावं असं वाटतं ते आपण करावं. बाळ स्वभावतःच आई वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं.
सर्वात शेवटी
आपलं मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्याला जे जमत नाही (बुद्धीमुळे, कमी क्षमतांमुळे वा परिस्थितीमुळे) त्या गोष्टी करणारं ते यंत्र नाही. ही समज महत्वाची. नाही का?
खात्री आहे आमची... की आजचे होणारे आई-बाबा... खूप संवेदनशील, उत्साही व सजग आहेत.
सारासार विचार करून निर्णय घेणारे आहेत. सदिच्छा.

 लेखक- डॉ. अरुण गद्रे

Sunday, March 2, 2014

कसे ओळखायचे भ्रामक विज्ञान?

शाळा, महाविद्यालयांत विज्ञान नीटपणे शिकवले जात नाही. वैज्ञानिकांनी कोणते शोध लावले हे सांगितले जाते; पण आतापर्यंत लागलेल्या शोधांची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. शोधांमागची प्रक्रिया म्हणजे विज्ञान. प्रश्‍न कसे उभे राहतात, त्यांची संभाव्य उत्तरे आहे काय असू शकतात, संभाव्य उत्तराचा खरे-खोटेपणा कसा जोखायचा, त्यासाठी प्रयोग, निरीक्षणे कशी करायची, नोंदी कशा ठेवायच्या, त्यातून निष्कर्ष कसे काढायचे, त्यासाठी गणिते मांडावी लागली, तर कशी मांडायची, संख्याशास्त्राचा योग्य उपयोग कसा करायचा, सिद्धान्तांची मांडणी कशी करायची, कोणत्या निकषांवर एखादा सिद्धान्त मान्य अथवा अमान्य होतो, या सगळ्यांमागची तत्त्वे आणि ती अमलात आणण्याच्या पद्धती म्हणजे विज्ञान. ही मूलभूत तत्त्वे आणि पद्धती आत्मसात न करता कितीही माहिती गोळा केली, तरी त्याला विज्ञान म्हणता येत नाही. 

विज्ञानाविषयी विज्ञान शिक्षणातच इतके अज्ञान असल्यानंतर त्याचा गैरफायदा घ्यायला अनेक मंडळी सरसावली तर आश्‍चर्य वाटायला नको. विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या भेटीतच मी "ज्योतिष हे विज्ञान आहे काय?' हा प्रश्‍न विचारतो. गेली अनेक वर्षे पहिल्या वर्षाच्या पहिल्या तासाला हा किंवा यासारखा प्रश्‍न मी विचारत आलो आहे. (मला मिळणाऱ्या उत्तरांमध्ये अर्थातच "हो' आणि "नाही' असे पक्ष असतात. त्यापुढे जाऊन का "हो' किंवा का "नाही' असे विचारले, तर येणाऱ्या उत्तरांमध्ये चकित करणारी विविधता असते.) "अमुक-तमुक' हे विज्ञान आहे काय, असा प्रश्‍न विचारला, तर त्याच्या उत्तरात दोन टप्पे असायला हवेत. पहिल्या टप्प्यात विज्ञान कशाला म्हणतात, विज्ञानाचे निकष कोणते, ते कळले पाहिजेत आणि दुसऱ्या टप्प्यात ते "अमुक-तमुक' या निकषांमध्ये बसते की नाही, हे पाहिले पाहिजे. विज्ञान कशाला म्हणायचे, हे सामान्यांना नीटसे माहीत नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण विज्ञानाची पदवी घेताना तरी ते समजलेले असायला हवे; पण फार थोड्या पदवीधरांना ते समजलेले असते. 

सुदैवाने अथवा दुर्दैवाने एखादी गोष्ट विज्ञानाधारित आहे, असे म्हटले, की पटकन समाजमान्य होते. पण विज्ञान म्हणजे नक्की काय, याचे चित्र समाजाच्या मनात पक्के नाही. त्यामुळे विज्ञानाचा मुखवटा पांघरून आपला माल खपवायला बसलेल्यांची या जाहिरातींच्या युगात मुळीच कमतरता नाही. यातून होणारी सामान्यांची फसवणूक कशी टाळायची, हा मुख्य प्रश्‍न आहे. मला तरी याचे एकच उत्तर दिसते, ते म्हणजे विज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि पद्धती समजून घेणे. 

सुरवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचेच उदाहरण घेऊ. त्यातून विज्ञानाची तत्त्वे थोडीफार तरी स्पष्ट करता येतील. ज्योतिषशास्त्र ग्रहमानावरून भाकीत वर्तवते. हवामानशास्त्र हवामानाविषयी भाकीत वर्तवते. दोघांचीही भाकिते कधी बरोबर येतात, कधी चुकतात. मग हवामानशास्त्र विज्ञान असेल, तर ग्रहज्योतिष हे विज्ञान का नाही? विज्ञानाचा पहिला निकष हा, की केलेली भाकिते वस्तुनिष्ठ असायला हवीत. पुणे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडेल हे भाकीत वस्तुनिष्ठ आहे. कारण अनेक वर्षांच्या सरासरीची पद्धतशीर नोंद आहे आणि पाऊस मोजण्याच्या प्रमाणित पद्धतीही आहेत."या महिन्याच्या 6, 12 व 13 तारखा शुभ आहेत. चांगल्या घटना घडतील,' हे भाकीत वस्तुनिष्ठ नाही. कारण शुभ म्हणजे नक्की काय, याचे प्रमाणित मोजमाप नाही. एकाला जे शुभ वाटते, ते दुसऱ्याला अशुभ वाटत असेल, तर शुभ तारीख हे वस्तुनिष्ठ भाकीत नाही. ज्योतिष्याने वस्तुनिष्ठ आणि मोजता येणारी भाकिते केली, तर विज्ञानाच्या परीक्षेचा पहिला पेपर पास झाला, असे म्हणता येईल. दुसरा पेपर पास होण्यासाठी या भाकितांचे खरेपण पाहावे लागेल. यासाठी शंभर टक्के भाकिते खरी होण्याची आवश्‍यकता नाही. पावसाचे अंदाज अथवा वैद्यकशास्त्राचे रोगाविषयीचे अंदाज कुठे शंभर टक्के बरोबर असतात? एखादा सिद्धान्त, तत्त्व किंवा पद्धत वापरून केलेला अंदाज, ते न वापरता केलेल्या अंदाजापेक्षा पुरेशी अधिक अचूकता देत असेल, तर त्या तत्त्वाला किंवा पद्धतीला पुष्टी मिळाली, असे म्हणता येईल. "पुरेशी अधिक' म्हणजे किती अधिक, हे ठरवण्याच्या प्रमाणित संख्याशास्त्रीय पद्धती आहेत. सामान्य ज्ञान वापरून केलेल्या अंदाजापेक्षा ग्रहांची स्थिती पाहून केलेली भाकिते वस्तुनिष्ठ मोजमापांवरून जास्त प्रमाणात खरी ठरली, तर दुसरा पेपर पास झाला, असे म्हणता येईल. हवामानाचे अंदाज अनेकदा चुकत असले, तरी त्यांनी ही संख्याशास्त्रीय चाचणी पास केलेली असते. दोन, पेपर म्हणजे पूर्ण पदवी परीक्षा नाही. संख्याशास्त्रीयदृष्ट्या कोंबडा आरवणे आणि सूर्य उगवणे यातला सहसंबंध खूप घट्ट आहे. कोंबडा आरवण्यावरून सूर्योदयाचे भाकीत करता येते. (पण म्हणून कोंबडा आरवण्याने सूर्य उगवला असे म्हणता येत नाही.)ज्यांच्यामधला सहसंबंध दाखवता येतो, त्यांच्यामधला कार्यकारणभाव दाखवणे, ही पुढची खूप महत्त्वाची पायरी. कार्यकारणभाव शोधण्याचा काही एक ठोक सरधोपट फॉर्म्युला नाही. इथे वैज्ञानिकाची विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता पणाला लागते. यातून एक किंवा अनेक प्रमेये (हायपॉथिसिस) तयार होतात. त्यापुढची परीक्षा म्हणजे या प्रमेयाची पडताळणी करणे. ती करण्याचा मार्ग परत मागल्या वळणावर जातो. प्रत्येक प्रमेयाने चाचणी घेता येईल, असे काही नवीन भाकीत केले पाहिजे. चाचणीवरून हे प्रमेय तगणार, का फेकून द्यावे लागणार, ते ठरते. कधी एखादे प्रमेय असे असते, की त्याची चाचणी घेण्याचा काही मार्ग नसतो. ज्याची चाचणी घेता येत नाही असे प्रमेय विज्ञानाला मान्य नाही. अशा चाचण्यांमधून उत्तीर्ण झालेला कार्यकारण संबंध हा विज्ञानाचा गाभा आहे. 

ज्या प्रश्‍नांनी आपण सुरवात केली, त्याचे उत्तर मी दिले नाही; देणारही नाही; पण याचे उत्तर कसे शोधायचे, याचा मार्ग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मार्ग समजला, तर फेंग-शुई, वास्तुशास्त्र ही विज्ञाने आहेत काय, यांचीही उत्तरे ज्याला त्याला मिळतील. यामागचे तत्त्व सोपे आहे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे विज्ञान. ही पद्धत वापरली तर संगीतकलासुद्धा विज्ञान आहे आणि पाठ्यपुस्तके पाठ करून पदवी मिळवली, तर भौतिक विज्ञानसुद्धा विज्ञान नाही. शाळा-महाविद्यालयांमधून खऱ्या अर्थाने विज्ञान शिकवायला आपण कधी सुरवात करणार? 
- डॉ. मिलिंद वाटवे
(लेखक विज्ञानाचे अध्यापक व संशोधक आहेत.)

Monday, February 24, 2014

संत गाडगे महाराज - बुद्धीप्रामाण्यवाद - अंधश्रद्धा निर्मुलन



महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील संतांमधील शेवटची कडी म्हणजे संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला या माध्यमातून अतिशय सुंदर व्यावहारिक ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले. तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व व्यसनमुक्ती केली हे आपण प्रामुख्याने वाचत व ऐकत आलो आहोत.

मित्रांनो - मला जास्त आकर्षित करून घेणारा संत म्हणजे गाडगे महाराज. खर म्हणजे परीटाच्या / धोब्याच्या घरात जन्म झालेला हा मुलगा दुसऱ्या वर्गाचेही शिक्षण त्याला प्राप्त झालेले नाही ह्या अर्थाने त्याला खरे तर अशिक्षित म्हटले पाहिजे. ह्या माणसाने अत्यंत ताकदीने महाराष्ट्राला बुद्धीप्रामाण्यवाद दिला जनसामान्यांपर्यंत तो ताकदीनं पोहोचवला ही फार महत्वाची गोष्ट आहे.

खरं म्हणजे संत गाडगे महाराज यांनी नवी परंपरा निर्माण केली गाडगे महाराजांचे वैशिष्ट्य असे होते की हा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुणालाही पाया पडू देईना. जेंव्हा लोक संत म्हणून त्यांच्या पाया पडायला यायचे तेंव्हा हे त्याना काठीने मार द्यायचे आणि म्हणायचे -
' माझ्या पाया तुमी कायले पडता त्यापेक्षा आपल्या आई बापाच्या पाया पडा !'
मित्रांनो - अतिशय निस्पृह वृत्तीचा हा थोर माणूस होऊन गेला आहे !

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक इंग्लंडची नौका पाण्यामध्ये बुडाली होती आणि कल्पना अशी होती की इंग्लंडने आपल्या देशातील सर्व सोनं भारतामध्ये पाठवण्यासाठी या नौकेचा वापर केला होता. आणि युद्ध काळात ही नौका बुडाली आणि भारताच्या जवळच समुद्रामध्ये तळाशी ते सर्व सोनं गेलेलं आहे ह्या अफवेचा फायदा घेवून गाडगे महाराज जनतेचे प्रबोधन करायचे. प्रबोधन करत असतांना सत्यनारायनाचा उल्लेख करायचे. आता सत्यनारायण हा भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याला धर्माचा भाग मानून प्रत्येकजण सत्यनारायण करतांना दिसतो. घरी लग्न असलं की -सत्यनारायण मुलाच लग्न -सिंगल सत्यनारायण, मुलीचं लग्न -डबल सत्यनारायण, ह्या पद्धतीन हे सत्यनारायण चालतात एव्हढच नव्हे तर माझा एक व्यवसाइक इंजिनिअर मित्र प्रोजेक्ट चालू केला म्हणून - सत्यनारायण, पूर्ण झाला म्हणून सत्यनारायण. असे सत्यनारायण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतात. गाडगे महाराज ह्या सत्यनारायण कथेचा उल्लेख करून म्हणायचे ( गाडगे महाराजांचे कीर्तन म्हणजे लोकांना एक मोठी पर्वणीच असे. ते लोकांपुढे उभे राहून लोकांशी संवाद साधत असत. लोकांना प्रश्न विचारत असत आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये त्यांचे कीर्तन रंगत जात असे. लोकांना ते जाहीररित्या प्रश्न विचारायचे - )

'काउन रे तुमी सत्यनारायण करता ना ? मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदे लिवलय ना - बुडालेली नाव वर येते ! मग आता सत्यनारायण कराव, जे आता इंग्लंडची नाव पाण्यात बुडाली, तीच्याव लई मोठ सोन है, अरे सत्यनारायण करा ते नाव वर काढा , आपल्या देशाच लई भलं होऊन जाइल !'
असं म्हटल्यावर लोक गप्प रहायचे कारण लोकांना माहित होत की सत्यनारायण करून नाव काही वर येणार नाही.

गाडगे महाराज या सत्यनारायनाच्या पोथिचा उल्लेख का करायचे हे समजून घेण्यासाठी ह्या पोथिकडे जरा पाहू - सत्यनारायण - अध्याय -४ साधुवाण्याचा

साधुवाण्याची मुलगी कलावती सत्यनारायण करत होती । एव्हढ्यात तिच्या कानी वार्ता आली । तिचा पती स्वगृही परत आलेला आहे । ती वार्ता ऐकताच ती तडक समुद्रकिनारी निघाली । सत्यनारायण अर्धवट सोडून , प्रसाद भक्षण न करता ती तडक समुद्रकिनारी धावत गेली । समुद्र किनारी जाउन पहाते तर तर काय तिचा पिता धाय मोकलून रडतो आहे । स्वत:चा उर बडवून घेतो आहे । … ती पित्याला विचरती झाली । बा तुंम्ही का रडता आहात । … यावर पिता उद्गारला , - हे कालाव्ते भरपूर धन धान्य आणि संपत्ती घेवून मी इथवर आलो । माझ्यासमवेत तुझा पती म्हणजे माझा जावई होता । मी खाली उतरलो , तुला निरोप पाठवला आणि बघता बघता संपूर्ण जहाज पाण्यामध्ये बुडालं । त्यासोबत सारी धनसंपत्ती पाण्यात बुडाली । एव्हढंच नव्हे तर तुझा पती माझा जावई पाण्यात बुडाला । बराच कालावधी झाला तरी तो वर आलेला नाही । त्यामुळे तो मृत झाला अस मला वाटत । आणि जावई वियोगाच्या दु:खान मी उर बडवून घेतो आहे । … हे कलावती ऐकताच पती वियोग झाला अस तिला कळलं । तिलाही अतीव दु:ख झालं । तीही धाय मोकलुन रडू लागली । स्वत:चा उर बडवून घेऊ लागली । …. तेवढ्यात आकाशवाणी झाली …. ( मित्रांनो तेंव्हा आकाशवाणी एकच होती आज सारखी मुंबई केंद्र, पुणे केंद्र अशी नव्हती ) …. हे कालावते तू रडून उपयोग नाही । धाय मोकलून उपयोग नाही । कारण तू सत्यनारायण देवाचा कोप ओढवून घेतला आहेस । पतीची वार्ता ऐकताच तू पतीप्रेमापोटी सत्यनारायण अर्धवट टाकलास । प्रसादसुद्धा भक्षण न करताच तू समुद्र किनारी गेलीस । त्यामुळे सत्यनारायण देवांचा अपमान झाला । त्यामुळे सत्यनारायण देव अत्यंत क्रोधीत झाले । आणि त्यांनी जहाजच्या जहाज तुझ्या पतीसमवेत पाण्यात बुडवलं । तुला जर तुझा पती परत हवा असेल तर साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा कर । सात्यनारायाणाला प्रसन्न करून घे । त्यानंतर तुझा पती तुला परत मिळेल.।……

( मित्रांनो - मला कळत नाही कलावती पतीप्रेमापोटी सत्यनारायण सोडून धावत गेली असेल , राहिली पूजा अर्धवट, काय बिघडलं? दोघही परत आले असते मग दोघांनी ही मस्त जोड्याने हाताला हात लाऊन पूजा केली असती ……पण नाही … मला सोडून कशी काय नवऱ्याकडे चालली … बुडव त्याची नाव … असला हा आपला देव ! … असा कसा देव असू शकेल ? त्याला एव्हढा राग ? सवता आहे का ? या पद्धतीने आपण जर विचार केला तर यातील विरोधाभास आपल्या लक्षात येईल.)

… हे ऐकल्यानंतर कलावतीने डोळे पुसले । ती स्वत:च्या घरी आली घरी आल्यावर तिने साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा केली । त्यानंतर अतिशय भक्ती भावाने प्रसाद भक्षण केला …. आणि पहाता पहाता समुद्रात बुडालेली नाव वर आली, एव्हढंच नव्हे तर समुद्रात बुडालेला नाका तोंडात पाणी गेलेला तिचा पती जिवंत वर आला. तिची बुडालेली सर्व धनसंपत्ती परत मिळाली । … हे आपण सार ऐकतो, नंतर सत्यनारायण देवाला भक्तिभावाने हात जोडतो. आणि म्हणतो हे सत्यनारायण देवा जसं कलावतीला तीच बुडलेल सर्व मिळाल तस आम्हालाही आमच बुडालेल सारं आम्हाला मिळवून दे !. या पद्धतीन सत्यनारायणाची पूजा गावोगाव चालत असते.

या सत्यनारायण कथेचा उपयोग करून गाडगे महाराज विचारायचे - अरे पोथीत लिवलय ना , सत्यनारायण केला की नाव वर येते ? मंग आता करा सात्यनारायण आणि बुडालेली नाव वर काढा ! आपल्या देशाला लई सोनं भेटन ! देशाच भलं होऊन जाइल ! … ह्यावर लोक गप्प बसायचे. मग ह्या गप्प बसलेल्या लोकांना गाडगे महाराज डिवचून म्हणायचे -

'काउन रे एका सत्यनारायणान होत नाही काय ? मंग दहा दहा सत्यनारायण घाला ! धा सत्यानारायनान होत नसन तर दहा हजार सत्यनारायण घाला ! इथून सत्यनारायण पावत नसन तर ममैय (मुंबई) च्या समुद्राजवळ जा … पैसे मी देतो … तिथ सत्यनारायण करा पण बुडालेली नाव वर काढा !' अस म्हटल्यावर लोक गप्प बसायचे … मग चिडल्याचा आविर्भाव आणून म्हणायचे - ' दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी ! तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता ? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता ? आणि वरून त्याले सत्यनारायण म्हणता ?' … वरून ते असही म्हणायचे - 'चालले बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले ! '

मित्रांनो मी तुम्हाला अस म्हणणार नाही की तुम्ही सत्यनारायण करू नका ! पण मित्रांनो दुसरी इयत्ता ही न शिकलेल्या माणसाचे एक वाक्य लक्षात ठेवा - 'चाल्ले सारे च्या सारे , बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले !'

मित्रानो - गाडगे महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य होते की त्यांनी जिथे जिथे यात्रा होतात त्या सर्व ठिकाणी ते जायचे. गरिबांच्या खाण्या पिण्याची सोय करायचे मित्रांनो गरीब लोकांना रहाण्यासाठी अशा ठिकाणी सोयी नसतात म्हणून त्यांनी ठीक ठिकाणी अनेक धर्मशाळा काढल्या अशा शेकडो धर्मशाळा बांधणारा माणूस, अनेक शाळा बांधणारा माणूस, अनेकांना फुकट खाऊ घालणारा माणूस, मंदिरामधून लोक नदीच्या पात्रामध्ये स्नानाकरिता उतरतात, पाय घसरून पडतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घाट बांधले. परंतु एकही मंदिर त्यांनी बांधले नाही. गाडगे महाराज कधीही मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण - गाडगे महाराज माणसामध्ये देव पहाणारे माणूस होते.

गाडगे महाराज लोकांना विचारायचे -

काउन रे तुमी देव मानता का नाय ?
लोक म्हणायचे - हो जी ! आमि देव मानतो !
अरे मी बी देव मानतो ! माहा देव माझ्या मनात असते ! तुमचा देव कुठ र्हायते रे ?
लोक म्हणायचे 'आमचा देव देवळात र्हायते !'
अरे तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असते का न्हायी ?
लोक म्हणायचे - 'हो जी असते !'
मंग तुमच्या देवळातले देवाले धोतर कोन नेसवते रे ?
लोक म्हणायचे- 'आमीच नेसवतो जी !'
काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय ?
त्यावर लोक म्हणायचे- 'नाय जी नाय नेसता येत !'
अरे व्वा रे व्वा तुमचा देव ! ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नाय नेसता येत , तो तुमाला काय नेसवणार रे ? …
…( या पद्धतीचे प्रश्न विचारून माणसांना ते विचार करायला प्रवृत्त करत.)
पुढे ते म्हणत - काय रे देवाला निवद दाखवता का नाय ?
लोक म्हणायचे - 'हो जी दाखवतो !'
मंग काय करता ?
लोक म्हणायचे - हातात काठी घेवून बसतो !
कायले काठी घेवून बसता ?
लोक म्हणायचे- नाय मंजे ते कुत्र येते, मांजर येते त्याले हाकलाय लागते न व !
अरे वा रे वा तुमचा देव ! तुमच्या देवाले सोताच्या निवदावरच कुत्र न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलणार रे ?
(या पद्धतीने ते लोकांना विचार करायला भाग पाडत असत समजावत असत ! )

एवढच नव्हे तर ज्या ठिकाणी बळी दिले जात अशा ठिकाणी गाडगे महाराज जात. लोक तिथे कोंबडी बकरी कापत असत बाजूला त्यांची मुले असत बहुदा मुलांसंदर्भात नवस फेडणे असे. तिथेही उभे राहून गाडगे महाराज लोकांना प्रश्न विचारत -

'काय करून ऱ्हायला रे ?'
'न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !'
'अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?'
'देवाचच लेकरू हाय !'
'आन तूह लेकरू ?'
'माह व्ह्य ना जी !'
'आन तू कोनाचा रे ?'
'मी माह्या बापाचा न जी !'
'म्हन्जे शेवटी कोनाचा ?
'देवाचं लेकरू !'
'मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
'हो जी !'
अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.

गाडगे महाराज पंढरपूरच्या यात्रेत प्रबोधनासाठी जायचे -
अरे संत ज्ञानेश्वरांनी , तुकारामांनी सांगितलेय देव माणसात असते , तरी तुमी हित आले … देव चरा - चरात आहे अस म्हनता …. आणि चंद्रभागेत आंघोळ करून हित वाळवंटात लोटे घेवून बसता …सगळ वाळवंट घाण करून टाकता …हे साफ कोण करणार रे ? … ते विठोबाचे हात कमरेवर हैत .. तुमचे पण हात कमरेवर हैत .. ते कमरेवरचे हात काढा .. हातात झाडू घ्या .. माझ्यासोबत हे वाळवंट झाडून काढा ..अस म्हणणारे गाडगे महाराज लोकांना स्वच्छतेच आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून सांगायचे. आणि म्हणायचे -

देवळात देव नसते, देव माणसाच्या मनात र्हायते !
ज्या मानसाले खायला भेटत नसन त्याले खायला द्याव !
ज्याले शिक्षण नसन त्याले शिक्षण द्यावं !
ज्याले आसरा नसन त्याले आसरा द्यावं !
देव माणसाच्या मनात राह्यते, देवळात रहात नायी, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट र्हायते !
मित्रांनो - हा ताकदीचा बुद्धीप्रमाण्यवाद आपण समजून घेतला पाहिजे.
चमत्कार होत नाहीत असे सांगणारे गाडगे महाराज लोकांच्या /महिलांच्या अंगात देव्या येण्यासंमंधी म्हणायचे -
'अरे हिच्या अंगात देवी येते सात सात दिवस आंग नाय धूत आनि हिच्या अंगात देवी येते काय देवीला काम धंदा नाय काय रे ? घूस हिच्या अंगात घूस तिच्या अंगात !

या पद्धतीन अत्यंत ताकदीन बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे चमत्कारांना विरोध करणारे संत गाडगे महाराज १९५६ साली वारले. उमाळेगुरुजी (बी.ए.बी.टी.) यांनी गाडगे महाराजांवर पोथी लिहिली. या पोथीमध्ये गाडगे महाराजांनी भरपूर चमत्कार केले आहेत. असे वर्णन पोथीमध्ये जागो जागी पहायला मिळते - गाडगे महाराज सदेह कीर्तनातून अंतर्धान पावत असत -- गाडगे महाराज तुकारामाचा अवतार आहेत -- खरा कळस तर -गाडगे महाराजांसाठी वैकुंठातून पुष्पक विमान आले आणि गाडगे महाराज त्यात बसून वैकुंठात निघून गेले अस लिहिलेली पोथी १९८३ साली लिहिली जाते.
ज्या गाडगे महाराजांना पाहिलेली, त्यांचे कीर्तन ऐकलेली, त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालेली माणसे आजही असतांना,प्रबोधनकार ठाकरें सारख्यां व्यक्तीने त्यांचे चरित्र लिहिले आहे. अशा गाडगे महाराजान्बधल अशा स्वरुपाची पोथी १९८३ साली अवघ्या ३० ते ४० वर्षात लिहिली जाऊ शकते मग ३५० वर्षापूर्वीचे संत तुकाराम ७०० वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर अशा अनेक संतांचे आम्ही काय करून ठेवले असेल ? विचार करा मित्रांनो !

सं/ले. - विवेक घाटविलकर